संधीचा दरवाजा उघडा(Open the Door of Opportunity)
संधीचा दरवाजा उघडा(Open the Door of Opportunity)
विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग हा संधीच्या दरवाज्यातून उघडतो. संधी ही आपल्या सर्वांच्या आयुष्यामधील एक दुर्मिळ अशी बाब असते. काही लोकांना संधी चालून येते तर काहींना संधी शोधावी लागते. काही लोक संधीचे सोने करतात तर काही लोक संधीचे मातेरे करतात. संधी योग्य वेळी ओळखता नाही आली की, तिचा संधिवात होतो. मला माझ्या आयुष्यात संधी मिळालीच नाही आणि त्यामुळे मी प्रगती करू शकलो नाही असे तुणतुणे वाजवणारेही असंख्य आजूबाजूला दिसतात आणि सापडतात. वास्तविक संधी ही अत्यंत चौकस आणि दक्ष राहून शोधण्याची आणि ओळखण्याची बाब आहे. आज आपण या प्रस्तुत लेखात संधी कशी शोधावी, ती कशी ओळखावी, तिच्यावर कसे स्वार व्हावे आणि संधीच्या माध्यमातून कष्टसाध्य रीतीने आपली प्रगती कशी साध्य करावी याबाबत विवेचन करणार आहोत.
संधी म्हणजे एका ठराविक वेळी आणि ठराविक परिस्थिती मध्ये तुम्हाला तुमचे उदिष्ट आणि ध्येय साध्य करण्यासाठी उपलब्ध झालेली अथवा उपलब्ध केलेली बाब होय. संधी ही अनेक घटक, घटना, व्यक्ति/संस्था, ठिकाण आणि वेळ यातील एक किंवा अनेक गोष्टी एकत्र येवून तयार होत असते. तसेच बर्याच वेळा संधी ही व्यक्ति सापेक्ष असते. एक संधी ही जेंव्हा एखान्द्या साठी महत्वाची आहे, तेंव्हा ती दुसर्यासाठी तेवढीच महत्वाची असेलच असे नाही. मात्र ज्यांची उदीष्टे आणि ध्येये समान असतात त्यांच्या संधी मात्र समान असतात. मात्र ही संधी ओळखणे, शोधणे आणि तिच्यावर स्वार होणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. तसेच एखांद्याला ते जमले तरी तो संधीचे कष्टसाध्य रीतीने सोने करेलच असेही नाही.
संधी ही तुम्हाला दरवाजा दाखवते मात्र असा दरवाजा कष्टाने उघडणे आणि पुढे मार्गस्थ होणे हे आपल्या हातात असते. एकंदर तीन प्रकारचे दरवाजे आपल्याला आढळून येतात. एक आत उघडणारे, दुसरे बाहेर उघडणारे आणि तिसरे बाजूला स्लाईड होऊन उघडणारे. संधीचे दरवाजेही असेच असतात. मात्र आपण संधीचे दरवाजे उघडतात एका बाजूला आणि आपण प्रयत्न करतो दुसर्या बाजूला साहजिकच त्यामुळे कधी संधी निघून जाते तर कधी संधी मिळून सुद्धा प्रगतीचा आलेख खालीच राहतो. बर्याच वेळा संधी चालून आलेली असते आणि आळशी लोक आपली कूस बदलून झोपी जातात मग संधी त्यांना लथाडून पुढे निघून जाते. त्यातही काही महाभाग हे कोल्ह्याला द्राक्ष आंबट गोष्टीतील कोल्हयासारखे असतात तर काही जांभळाच्या झाडाखाली कधी एकदा जांभूळ प्रत्यक्ष तोंडात पडेल यासाठी आ वासून उभे असतात. असे लोक आपल्या उभ्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. संधीचे सोने बनवणे तर खूप दूर राहते.
संधी ओळखायची असेल तर त्या साठी आपले ध्येये आणि उदीष्टे ही पक्की लागतात. त्याच सोबत एक सकारात्मक वृत्ती, विचार आणि दृष्टी लागते. तसेच त्याच्या जोडीला एक चौकसपणा आणि दक्षपणा आवश्यक असतो. काळाच्या सोबत चालणे आणि आजूबाजूला काय घडतय या कडे डोळसपने पहानेही तेवढेच महत्वाचे असते. वस्तुस्थिती काय आहे आणि आभासी काय आहे याच्यात भेद करणे आपल्याला जमायला हवे. जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या मानसिकतेत असाल तर योग्य व्यवसाय आणि योग्य भागीदार निवडण्याची संधी तुमच्या समोर राहील त्यावेळेस तुम्ही निर्णय घ्या. जर तुम्ही नोकरी करू इश्चित असाल आणि तुमच्या समोर कमी पगारची किंवा दूरवरची नोकरीची ऑफर आली तर तुम्ही ती संधी म्हणून पहा. समोर आलेली बाब किंवा गोष्ट ही संधी आहे की नाही हे ठरवण्यासाठी उदीष्टे आणि ध्येये ह्या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. जर तुमचे ध्येय ठरले नसेल तर उदीष्टे ठरवता येत नाहीत आणि ज्यांना उदीष्टे आणि ध्येये नसतात त्यांना संधी समजण्याचा आणि उमजण्याचा प्रश्नच नाही. ज्याला सुपर शॉपी सुरू करायचे आहे, तो योग्य जागा मिळेल याची संधी नेहमी शोधत असतो. ज्याला अधिकारी बनायचे आहे तो योग्य क्लास आणि योग्य मार्गदर्शन मिळण्याची संधी शोधत असतो.ज्याला खाजगी कंपनीत नोकरी करायची तो त्यांच्या घराच्या जवळ आणि समाधानकारक पगाराची नोकरीची संधी शोधत असतो.
‘संधीचे सोने करणे’ का आपल्याकडे बराच प्रसिद्ध असा वाक्प्रचार आहे. असे अनेक वेळा दिसून आले आहे की एकदा संधी प्राप्त झाली की आपण ढीले पडतो. कारण आत्ता संधी प्राप्त झाली आ,हे सर्व व्यवस्थित होईल असा एक कोरडा आत्मविश्वास घेवून आपण मिरवतो. तेथेच खरे घोडे पेंड खाते. वास्तविक मिळालेली संधी अत्यंत महाप्रयसातून मिळालेली आहे आणि तिचे आपण महत्व समजून सोने करायचे आहे याची खूनगाठ आपण मनाशी पक्की करायला हवी. सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक तरूणाशी सर्वसाधारण अठरा लाख समवयसक तरुण स्पर्धा करत असतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे मिळणार्या संधी कमी कमी होत आहेत. साहजिकच मिळणारी संधी ही शेवटची संधी आहे असे समजून प्रत्येकाने काम करायला हवे. तरच आपण प्रगती करू शकू आणि पुढे जावू.
एकंदर संधी ही रेल्वेगाडी सारखी आहे. ती तिच्या नेमून दिलेल्या स्टेशनवर काही ठरविक वेळ थांबते. तेवढ्या वेळात आपल्याला तिच्यात स्वार होणे आहे. जर तर ती हुकली तर नवीन संधीची वाट पाहण्याशिवाय पर्याय समोर राहत नाही. जागतिक, देश, राज्य आणि शहर/गाव पातळीवर गळेकापू स्पर्धा आणि अस्तित्वाची लढाई पुढे अजून हळू हळू तीव्र होत जाणार आहे. साहजिकच आपण डोळस, चौकस आणि दक्ष राहून आपली उदीष्टे आणि ध्येये याच्या अनुषंगाने संधी शोधणे, त्यावर स्वार होणे आणि संधीचे सोने करून आपली प्रगती आणि विकास साधण्यासाठी कायम प्रयत्नशील असायला हवे. शेवटी या संधींच्या माध्यमातूनच आपला विकास आणि प्रगती निरंतर चालू राहील आणि आपण एक सोपे, सरळ, साधे, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगू शकाल.
आयुष्य अनमोल आहे, ते अधिक सुंदर बनवूया !
३२/१०१ दिनांक ३१.१०.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी , मुंबई
९९७०२४६४१७