मोबाइल फोनचा कार्यक्षम व परिणामकारक वापर(𝐄𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐄𝐟𝐟𝐞𝐜𝐭𝐢𝐯𝐞 𝐔𝐬𝐞 𝐨𝐟 𝐌𝐨𝐛𝐢𝐥𝐞 𝐏𝐡𝐨𝐧𝐞)

मोबाइल फोनचा कार्यक्षम व परिणामकारक वापर(𝐄𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐄𝐟𝐟𝐞𝐜𝐭𝐢𝐯𝐞 𝐔𝐬𝐞 𝐨𝐟 𝐌𝐨𝐛𝐢𝐥𝐞 𝐏𝐡𝐨𝐧𝐞)

मोबाईलचा शोध ही मानवी इतिहासातील एक मोठी उपलब्धी असून मोबाईलने मानवी जीवनातील सामाजिक व भौगोलिक अंतर कमालीचे कमी केले आहे. रेडिओ, दूरदर्शन,केबलटीव्ही आणि संगणक या तंत्रज्ञानाने मानवी जीवनात मूलगामी बदल केले. मोबाईलने मात्र संपूर्ण मानवी जीवन व्यापले आहे. मोबाईल हा शरीराचा एक अविभाज्य भाग झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा होत. मात्र आता या मध्ये एक नव्या गरजेची भर पडली आहे, ती म्हणजे आपला मोबाइल फोन. एक वेळेस जेवण मिळाले नाही तर चालेल; मात्र मोबाइल शिवाय चैन पडत नाही अशी एकंदर आपली स्थिती झाली आहे. मोबाइलने आपले व्यक्तिमत्व व आयुष्य व्यापले आहे याची प्रचिती वारंवार येते. मोबाइलचा वापर हा मानवी इतिहासातील संवाद, संपर्क व संदेश यातील क्रांती असून त्यामुळे भौगोलिक अंतर शून्य झाले आहे. तसेच मोबाइलचा वापर मर्यादित न ठेवता त्याचा वापर करून आपण आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग त्यात कार बुकिंग असो किंवा विविध विविध वस्तूंची ऑनलाइन खरेदी असो. मोबाइल चा वापर ही जरी मानवी इतिहासातील क्रांति असली तरी त्याच्या अति वापरा मुळे अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक समस्या निर्माण झाल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. मानवी जीवन सुसह्य व्हावे यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हे अहोरात्र प्रयत्नशील असते. आपण आपल्यासाठी मोबाइल वापरत असलो तरी अनेक आभासी शक्ती आपल्याला इंटरनेटचा मायाजाळ वापरून नियंत्रिन व हेरगिरी करत आहेत हे नव्याने सांगायला नको. या लेखात मोबाइलचा कार्यक्षम व परिणामकारक वापर या बाबत माहिती घेण्याचा आपला प्रयत्न राहील तसेच मोबाइलचा अति वापर आणि त्या मुळे होणारे दुष्परिणाम याचा परामर्श आपण घेणार आहोत .

*सिग्नल स्ट्रेंग्थ:* मोबाइल मधील सेल्युलर नेटवर्क हे विद्युत चुंबकीय लहरी द्वारे चालते. मोबाइल टॉवर कडून जो सिग्नल आपल्या मोबाइलचा अन्टेना ग्रहण करतो असा सिग्नल डेसिबल मिलीवॅट मध्ये मोजतात. सिग्नल स्ट्रेंग्थ तपासण्यासाठी आपल्या मोबाइल वरून *#*#4636#*#* हा कोड डायल करावा लागतो. अशा प्रकारे आपल्या मोबाइलची सिग्नल स्ट्रेंग्थ हि -30dBm to -110 dBm च्या दरम्यान असावी लागते. या पेक्षा सिग्नल स्ट्रेंग्थ जास्त अथवा कमी असेल तर आपल्याला संपर्क साधण्यास अडचणी निर्माण होतात.

*IMEI कोड:* मोबाइल वरुन *#06# हा कोड डायल केला कि IMEI म्हणजे International Mobile Equipment Identity क्रमांक तुम्हाला मिळतो. हा क्रमांक आपण आपल्या नोंदवही वर लिहून ठेवावा. या क्रमांक आधारे आपण आपल्या हरवलेल्या, चोरलेला व विसरलेला मोबाइलचा शोध घेवू शकतो. तसेच आपण https://ceir.gov.in/या संकेतस्थळावर वर जावून आपण IMEI क्रमांक आधारे मोबाइल शोधू शकतो.

*स्पेसिफिक अब्सॉर्प्शन रेट(SAR):* स्पेसिफिक अब्सॉर्प्शन रेट(SAR) म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी संपर्कात असताना मानवी शरीराने किती ऊर्जा शोषली जाते या बाबत माहिती मिळते. त्या साठी आपण आपल्या मोबाइल वरून *#07# डायल करू शकता. जर मोबाइल प्रति किलोग्राम 1.6 वॅट च्या खाली SAR पातळी दर्शवित असतील तर ते ठीक आहे. अन्यथा आपल्याला त्वरित आपला स्मार्टफोन बदलण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.

*डोळ्यांपासूनचे अंतर:* मोबाइलचे आपल्या डोळ्या पासून अंतर किती असावे या बाबत आज कोणीही विचार करतांना दिसत नाही. त्या मुळे Mobile Vision Syndrome आणि Digital Eye Strain या दोन बाबी युवकांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहेत. सतत डिजिटल स्क्रीन पहिल्याने लघु दृष्टीदोष ज्याला आपण मयोपिया असे म्हणतो तो वाढीस लागला आहे. आपण एखांदे पुस्तक अथवा पेपर वाचतो तेंव्हा सरासरी अंतर हे ४० ते ४५ सेमी असते. डोळे व मोबाइल मधील अंतर सरासरी ३५ ते ४५ सेंमी मीटर असायला हवे मात्र हे अंतर युवकांमध्ये २० ते ३० सेंटी मीटर आढळून आले आहे, त्याचा दूरगामी वाईट परिणाम युवकांच्या डोळ्यावर दिसून येत आहेत.

*मोबाइल अंगल:* मोबाइल व आपल्या मानेचा अंगल हा सरासरी ० ते १५ डिग्री असणे आवश्यक आहे जेवढा अंगल जास्त वाढेल तेवढा जास्त दाब मानेतील व पाठीतील मणक्यावर येणार आहे हे लक्षात घ्यावे. त्या साठी मोबाइल चा वापर हा योग्य अंगल राखून करावा.

*ब्राईटनेस:* आपल्या मोबाइल च्या brightness हा आजूबाजूच्या प्रकाश प्रमाणे असावा असे संशोधन सांगते. खूप प्रकाश असेल तर ब्राईटनेस ७५ ते १०० टक्के असावा .मध्यम प्रकाश असेल तर ५० -७५ असावा आणि प्रकाश अंधुक असेल तर २५-५० टक्के असावा. साधारण पणे ४०-६० टक्के ब्राईटनेस हि पातळी चागली आहे.

*किरणाचा उत्सर्ग व डोळे:* मोबाइल मधील किरणाचा उत्सर्ग व मोबाइलच्या स्क्रीन मधून निघणारी किरणे ज्याला आपण short-wavelength blue color region in the visible light spectrum म्हणतो ती डोळ्यासाठी घातक तर ठरतातच तसेच ती आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला सुद्धा मारक ठरत असल्याचे संशोधन अंती पुढे आपले आहे. नील प्रकाश जेंव्हा डिजिटल उपकरणातून निघतो तेंव्हा तो डोळ्याच्या कॉर्निया मार्फत रेटीना पर्यंत पोहचतो व तेथे तो शोषला जातो. अगदी जवळून जर असा प्रकाश सारखा रेटीना वर पडत असेल तर लघु दृष्टीदोष , मोतीबिंदू , डोळ्याचा कन्सर, डोळे कोरडे होणे असे रोग होवू शकतात. नॅशनल आय इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहिती नुसार मुले प्रौढांपेक्षा अधिक असुरक्षित असतात कारण त्यांचे डोळे डिजिटल उपकरणांमधून अधिक नील प्रकाश शोषतात.

*संभाषण:* जेंव्हा आपण मोबाइल कानाला लावून बोलतो त्यावेळेस कान व मोबाइल मधील अंतर एक इंच अंतर ठेवून बोलावे. शक्यतो शक्य असल्यास मोबाइल स्पीकर वर बोलावे. हेडफोन व एअरफोन चा वापर हे सद्याच्या धावपळीच्या युगात गरजेचे झाले आहे. त्या मुळे तुम्ही तुमचा मोबाइल शरीर पासून लांब ठेवू शकता. जेवढा मोबाइल आपल्या शरीर पासून आपण दूर ठेवण्यास यशस्वी होवू तेवढे आपण आपले जीवन संतुलन साधण्यास यशस्वी होणार. ३० मिनिट पेक्षा जास्त वेळ एका वेळेस सलग न बोलणे, बटरी १० टक्के पेक्षा कमी असल्यास कॉल टाळणे , दोन्ही कानांचा वापर फोनवर बोलण्यासाठी करणे आवश्यक आहे.

*दैनिक वापर:* आपला रोजचा मोबाइल चा वापर किती आहे हे तपासण्यासाठी अनेक अप्लिकेशन प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत. यात दैनंदिन, आठवडी व मासिक मोबाइल वापर आपल्याला कळतो. जर आपला मोबाइलचा कॉल व सर्फिंग वापर तीन तासाच्या आत असेल तर हि बाब समाधानकारक आहे. तीन तास ते पाच तास असेल तर काळजी करण्यासारखे आहे. जर पाच तासाच्या पुढे असेल तर आपण धोकादायक पणे मोबाइल चा वापर करत आहात हे लक्षात घ्यावे. सर्व अप्लीकेशन च्या नोटीफिकेषण बंद करणे हा मोबाइल पासून दूर राहण्याच्या सर्वोत्तम मार्ग आहे.

*उत्पादकता:* मोबाइल च्या अति वापरामुळे आपली स्वताची उत्पादन क्षमता कमी झाली आहे काय या बाबत आपण तपासून पहिले पाहिजे. जर मोबाइल आपली उत्पादकता कमी करत असेल तर हे आपल्यासाठी व आपण ज्या संस्थेसाठी काम करतो त्या साठी हि निश्चितच चांगली गोष्ट नाही. विद्यार्थी यांनी वाचन व आकलन या द्वारे विद्याग्रहण व अध्ययन करावे अशी रास्त अपेक्षा आहे. परंतु मोबाइल च्या अति वापर मुळे जर असे अध्ययन मध्ये अडथळे येत असतील तर भविष्यात प्रगती होणार नाही याची जाणीव तरुण मित्रांनी करून घ्यावी. मोबाइल चा अति वापर हा आपले करियर बरबाद करतो हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे .

*कॉलिंग:* येणारा कॉल कधी, केंव्हा व कोठे घ्यावा या बाबत आपण आपली कॉल संहिता तयार केली पाहिजे. गाडी चालवत असताना कितीही महत्वाचा कॉल असला तरी तो गाडीच्या चालू स्थितीत उचलू नये. मोटार सायकल चालवतानी मोबाइल वर बोलणे म्हणजे यमराजला आपले मृत्यू हरण करण्यासाठी ऑफर देण्यासारखे आहे हे लक्षात घ्यावे. आपण जेवत असाल आणि आपल्याला एखांदा कॉल आला तर तो आपण टाळला तरी चालू शकते. महत्वाच्या मुद्यावर आपले घरचे लोक यांचे सोबत आपला संवाद चालू असेल आणि कॉल आला तर आपण नम्रपुर्वक नंतर कॉल करतो असे सांगितले पाहिजे . आधी जे समोर आहे त्याला महत्व देणे आवश्यक आहे.

*रिंगटोन:* घरात आपण जरी फोन रिंग वर ठेवत असलो तरी कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणीं आपला फोन हा कंपन मोड वर ठेवणे आवश्यक आहे. आपल्या फोनची रिंगटोन व असल्यास डायलर टोन हि आपले व्यक्तिमत्व दर्शवते. त्या मुळे आपली रिंग टोन व डायलर टोन हि आपल्या प्रोफेशन ला साजीशी असावी.

*मोबाईल ठेवण्याची जागा:* आपण ज्या वेळेस कोठेही काम करतो त्या वेळेस आपला मोबाइल हा आपल्या शरीरापासून दूर ठेवला पहीजे किंवा हाताच्या अंतरावर ठेवला पाहिजे. मोबाइल हा शर्टच्या खिश्यामध्ये ठेवू नये कारण आपला शर्टचा खिसा आहे तेथे हृदय असते व तेथे इलेक्ट्रिक फिल्ड कार्यरत असते. त्या मुळे पॅन्ट च्या खिश्यात अथवा शक्य असेल तर बॅगेत मोबाइल ठेवावा.

*मोबाइल बॅटरी:* जर आपल्याला आपल्या मोबाइल ची बॅटरी सारखी चार्ज करावी लागत असेल तर ते आपला मोबाइल व आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपल्या मोबाइल सोबत आलेल्या चार्जर वापरून आपण मोबाइल चार्ज केला पाहिजे .दुसऱ्या चार्जरचे व्होल्ट व अम्पियर हे जुळत नसल्याने मोबाइल चार्ज होण्यास वेळ लागतो व मोबाइल गरम होतो. तसेच त्यामुळे आपली मोबाइलची बॅटरी खराब होवू शकते. .

*सिक्युरिटी:* पासकोड व फिंगर प्रिंट चा मोबाइल लॉक करण्यासाठी वापर करावा. शक्यतो फेस रीडिंगचे लॉक ठेवू नये. जर आपला मोबाइल हरवला, विसरला, चोरीला गेला तर तो कसा शोधायचा या बाबत आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. या साठी सेटिंग मध्ये Security and Lock स्क्रीन मधील Find My Location हे बटन चालू करावे. त्या नंतर काही घटना घडली तर www.google.com/android/find या संकेतस्थळावर जावून तुम्ही तुमच्या मोबाइल ची रिंग संगणक वरून वाजवू शकता, त्याचे ठिकाण तुम्हाला कळू शकते आणि तुम्ही त्यातील Data Erase करू शकता .

*प्ले स्टोअर:* गुगल प्ले स्टोअर वर अनेक प्रकारची अप्लिकेशन उपलब्ध होत असतात. कोणतेही अप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी ते विश्वासनिय अप्लिकेशन आहे काय याची खात्री करणे आवश्यक आहे . तसेच सदर अप्लिकेशन गुगल प्ले स्टोर वरून किती लोकांनी डाऊनलोड करून घेतले आहे. कॉमेंट काय आहेत हे सुद्धा तपासून मग ते अप्लिकेशन डाऊनलोड केले पाहिजे.

*मोबाइल व ड्रायव्हिंग* : देशात गाडी चालवणार्‍या ८५ टक्के वाहन चालक यांचेकडे मोबाइल फोन असतो आणि त्यातील ३१ टक्के लोक हे गाडी चालवत असताना फोन वर बोलतात असे एक संशोधन सांगते. देशात मागील काही वर्षात रोड अपघात ने मृत्यू मुखी पडणारे लोकांची संख्या दर वर्षी साधारण दिड ते दोन लाख झाली आहे. संशोधक असे सांगतात कि जे अपघात होतात त्यात ८१ टक्के अपघात हे चालकाच्या चुकीने होतात तर त्या पैकी २८ टक्के अपघात हे गाडी चालवत असताना मोबाइल चा वापर केल्याने होतात. संशोधन असेही सांगते कि मोबाइल चा वापर ड्रायविंग करतानी केल्यावर अपघाताची रिस्क तीन ते चार पट वाढते. त्या मुळे गाडी चालवत असताना मोबाइल फोन चा वापर करण्याचे टाळले पाहिजे.

*नातेसंबंध:* मोबाइल चा अति वापर मुळे वैयक्तिक नातेसबंध यात सुद्धा तणाव व दुरावा निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.जे आपल्याकडे नाही त्याचे आकर्षण असणे हा मानवाचा जन्मजात स्वभाव आहे. त्या मुळे बराच वेळा आपले जोडीदार, आपली मुले व आपले मित्र यांचेसामोरच आपण मोबाइल वर अनावश्यक व्यस्त राहिल्याने दुरावा निर्माण होतो. त्यामुळे आपण आपल्या मोबाइल चा वापर हा किमान करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे मोबाइल जरी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असला तरी त्याने आपले संपूर्ण आयुष्य व्यापता कामा नये. मोबाइल चा कार्यक्षम वापर करून आपली कार्यक्षमता वाढवणे आवश्यक ठरणार आहे. मोबाइल वापरतांनी निर्माण होणारे धोके व दुष्परिणाम याबाबत आपल्याला माहिती असायला हवीच आणि त्या अनुषंगाने मोबाइल चा परिणामकारक वापर करत असतांना हे धोके व दुष्परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ वर दूरगामी परिणाम करणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शेवटी विज्ञान व तंत्रज्ञान आणि त्या अनुषंगाने आलेले मोबाइल क्रांतीचा वापर आपले जीवन हे सुखकर, सोपे आणि सुटसुटीत करण्यासाठी करणे यातच आपले आयुष्याचे गमक व यश सामावले आहे.

जीवन अनमोल आहे !ते अधिक सुंदर बनवूया !!

००९/१०१ दिनांक ३१.०३.२०२१
राजीव नंदकर©उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७.