मुलभूत सूक्ष्म त्रिगुण: सत्व, रज आणि तम
मुलभूत सूक्ष्म त्रिगुण: सत्व, रज आणि तम
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपली पृथ्वी आणि त्यावरील सृष्टी ही अनंत काळापासून आपले वैशिष्टपूर्ण असे अस्तित्व टिकवून आहे. असे म्हटले जाते की सृष्टी ही तीन मुलभूत गुणांनी परिपूर्ण आहे. या मध्ये सत्व, रज आणि तम या गुणांचा समावेश होतो. साहजिकच हे गुण सर्व पदार्थ आणि प्राणीमात्र या मध्ये कमी जास्त प्रमाणात दिसून येतात. असे म्हटले जाते की, मानव हा गुणांचा पुतळा आहे. तसा तो दुर्गुणांचा पर्वत सुद्धा आहे. साहजिकच सत्व, रज आणि तम या गुणांचे अस्तित्व कमी जास्त प्रमाणात मानवी देह आणि आणि मानवी मन यात दिसून येते. सत्व हे उर्जेचे रूप आहे, रज हे गतीचे कारण आहे तर तम हे गती रोधक आहे. प्रस्तुत लेखात आपण सत्व, रज आणि तम गुणांबाबत विस्तृत असे विवेचन करणार आहोत.
सृष्टी ही तीन गुणांनी परिपूर्ण आहे हे आपण पहिले. या तीन गुणात सत्व, रज आणि तम या गुणांचा समावेश होतो. हे तीनही गुण सजीव आणि निर्जीव या ठिकाणी दिसून येतात. हे गुण अत्यंत सूक्ष्म स्तरावर असल्याने त्याचे सामान्यपणे आणि सहजासहजी आकलन होत नाही. साहजिकच सृष्टीतील सर्व काही हे या तिन्ही गुणांनी युक्त आहे. यात सत्व हे उर्जा स्वरूप आहे, रज हे कंपन स्वरूप आहे आणि तम हे स्थिर स्वरूप आहे. मात्र हे स्वरूप कायम बदलणारे असते हे लक्षात घ्यावे. भारतीय तत्वज्ञान असे सांगते आपली काया म्हणजे शरीर हे पंच महाभूते म्हणजे अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी तसेच उपरोक्त निर्देशित तीन गुणांनी बनलेले आहे.
सांख्यशास्र हे अत्यंत प्राचीन असे भारतीय दर्शन असूण त्यात सत्व, रज आणि तम या गुणांचा निसर्ग आपल्या अवती भोवती आहे असे वर्णन आढळते. निसर्गात हे गुण अस्तित्वात असतात. ज्या प्रमाणे हे गुण प्रभाव उत्पन्न करतात, त्या प्रमाणे निसर्गाचे कार्यावलन आणि कार्यकारणभाव होतो. या तीनही गुणांचे कमी जास्त प्रमाण माणसाचा स्वभाव प्रतीत करते. योग आणि सांख्य तत्वज्ञानात सत्व गुण याला महत्व दिले आहे. ज्या गुणांपासून बुद्धी ,प्रज्ञा आणि वाचा शुद्ध होते त्याला सत्व गुण असे संबोधले जाते. या तीन गुणांपैकी पैकी सत्व गुण हा पवित्र समजला जातो. सत्व गुणात मनाचा समतोल हा अभेद्य असा असतो तो कुमकुवत होत नाही. त्यामुळे सत्व गुणी माणसे खंबीर बाण्याची असतात. निसर्ग हा आपल्याला सात्विक राहण्यास प्रोत्साहित करतो. निसर्गाची सात्विकता ही चराचरात सामावलेली दिसते. सात्विकताचा अर्थ शुद्ध हा होय. सात्विकता जेथे वास करते तेथे सुख आणि आनंद वास करतो. सत्व गुणात एकाग्रता साधली जाते आणि स्मरणशक्ती वृद्धिंगत पावते.
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असे सांगतात की जे सात्विक, राजसिक, तामसी भाव आहेत हे जरी तुम्ही माझ्यातून जाणत असाल किंवा माझ्यातून ते उत्पन्न होत असतील परंतु मी त्यांच्यात नाही, सृष्टीच्या सर्व पदार्थ मध्ये हे गुण अस्तित्वात आहेत. साहजिकच मानवी मन आणि देहामध्ये हे गुण दृष्टीक्षेपात येतात. याचे प्रमाण कमी जास्त होते तसे आपल्या भाव भावना बदलत असतात. सत्व गुण हा चांगली आणि उत्तम कार्य आणि कामे करण्यास प्रोत्साहन देतो. सत्व गुण हा सर्वात प्रबळ असा गुण असून तो परस्परात हा प्रेम आणि स्नेह निर्माण करत असतो. मानवी प्राण्याची उत्क्रांती आणि विकास यामध्ये या गुणाने महत्वाची कामगिरी बजावली आहे. सत्व गुण हा ज्ञान आणि माहिती प्राप्त करून देतो. सत्व गुण हा अत्यंत महत्वाचा आणि मौलिक गुण होय. सत्व म्हणजे शुद्ध स्वरूप आणि पदार्थाचे सार होय. असे सत्व हे नितळ आणि स्वच्छ असते. तसेच ते प्राप्त होण्यासाठी साधना आणि एकाग्रता लागते. जसे देवांनी समुद्र मंथन करून अमृत काढले, तसे सत्व गुण मानवाच्या मनाच्या आणि विचाराच्या मंथनातून निर्माण होतो. सत्व गुण हा तुम्हाला अंत आणि बाह्य प्रकशित करतो आणि त्यासोबत इतरांना प्रकाशीत करतो. सत्व गुण प्राप्ती साठी कठोर परिश्रम आणि मेहनत लागते. सत्व मधूनच स्व:चा मार्ग जातो. जेवढे तुम्ही सत्व गुणी तेवढे तुम्ही उंचीवर जाता. एक उंची गाठली की तुम्हाला टेकू द्यायची गरज पडत नाही. सत्वातूनच सत्व जन्माला येते ते यामुळेच. सत्वाची पारख ही सोन्यासारखी असते, सत्व हे ज्ञान आणि प्रज्ञा याचा विकास घडवून आणण्यासाठी सहायभूत ठरते. सत्व हे नितळ आशा पाण्यासारखे असते. सत्व हे दुधाच्या साय सारखे असते. सत्व हे सूर्याच्या किरणासारखे असते. सत्व हे शुभ्र असते. असे सत्व मात्र जपण्यासाठी मोठी शक्ती आणि ताकत लागते. जेवढे आपण सत्वाच्या जवळ जावू तेवढी त्याची ओळख आपल्याला होते आणि आपण लखलखीत होतो. इतरांना सुखाची सावली देतो. सत्व हा गुण सकारात्मकता, चांगुलपणा ,सत्य, समतोल, सद्गुण साकार करतो आणि आपल्याला ज्ञानाकडे ओढतो. सत्व, सत आणि सद्गुण जरी एकच अर्थाने प्रचलित असले तरी त्यामध्ये सूक्ष्म असा भेद प्रत्ययास येतो. सत्व हे खूप मुलभूत आणि पायाभूत असे तत्व असून सतगुण हे सत्व हा तत्वाचे आकलनीय रूप आहे. सतगुण म्हणजे सत्य आणि चांगली आणि सरळ कामे करणे होय. निस्वार्थ भावनेने केलेले काम आणि कार्ये सुद्धा सत्व गुण मध्ये येते. सत्वगुणी मनुष्य हा आशावादी, संतुष्ट आणि आनंदी असतो. सत्व गुण हे निस्वार्थ आणि परमार्थिक असल्याने असा व्यक्ती जास्त धेर्येवान आणि शील संपन्न होतो. या मध्ये आपली इंद्रिये ही आपल्या काबूत राहतात. कोणत्याही पदार्थाच्या मूळ म्हणजे सत्व होय. जसे आंब्याचा रस हा त्याचा मूळ भाव आहे. म्हणजेच त्याचे ते सार आणि सत्व आहे.
जे काही अस्तित्वात आहे आणि ज्याची आपल्या मनाला जाणीव आहे ते म्हणजे सत्व होय. सत्व हे आजू बाजूला नसते तर ते तुमच्या अंतर्मनात आणि अंतरात्म्यात असते ते आजूबाजूला आणि आत्मा मधेही वास करते. सत्व व्यक्तीची उपस्थिती सर्व काही सांगून जाते. भारतीय तत्वज्ञान हे जगातील काही श्रेष्ठ तत्वज्ञान पैकी एक आहे. हे तत्वज्ञान सत्व म्हणजे प्राणी, त्यांचा अधिवास आणि त्याचे जीवनमान या विषयी आस्था आणि प्रेम दाखवते. सत्व गुणातून ज्ञान तयार होते कि जे सुख निर्माण करते. सत्व हे प्रवाही असते. ते तसे नसेल तर त्याला षडरिपूचा गढूळपणा येतो. या सत्वला आपण अर्क म्हणतो किंवा रस म्हणतो. सात्विक गुणाचा अविष्कार आणि वाढ होण्यासाठी विचार, भावना, वाचा, काम आणि कृती हे एका सरळ रेषेत आणि एका समान पातळीवर आणावे लागतात. भगवद गीते मध्ये असे सांगितले आहे कि सत्व, रज आणि तम हे गुण तुमच्या आत्म्याला शरिराशी बांधून ठेवण्याचे काम करतात. साहजीच हे सर्व गुण मानवी देहामध्ये अस्तित्व दाखवत असले तरी त्यांचे प्रमाण हे कमी जास्त आणि वेळ आणि काळ परत्वे बदलणारे असते. सत्व गुणाची सध्या अवश्यकता आहे. सत्व गुण हाच सागर आणि आधार आहे. या मध्ये पवित्रता येते, सत्य येते आणि शुद्धता पण येते. सत्व गुण हा काही तरी मिळवून देतो. सत्व गुणाची वृद्धी होण्यासाठी अन्न, आचार आणि विचार जर शुद्ध असतील तरच सत्व गुणाची निर्मिती होते. सत्व गुणाची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावना ह्या नियंत्रित आणि विचार हे प्रवाहित करायला लागतात. तुमची सकारात्मकता एका उंच स्थरावर घेवून जायला लागते. तुमचे आचरण आणि वागणे हे परस्पर सहकार्ये वाढीस असणारे असावे लागते.
रजो गुणी व्यक्ती सत्य आणि असत्य याचा सहारा घेतो. सर्वात जास्त लोक या गुणाला घेवून आपले जीवन व्यतित करतांनी आपण पाहतो. रजो गुण हे चंचलता, गती आणि उत्तेजना याच्याशी संबधित आहे. रजो गुण हा सजीव आणि निर्जीव पदार्थ याला गती देतो. रजो गुण हा सक्रीय असतो आणि तो इतर दोन गुणांना उत्तेजित करत असतो. आजूबाजूला हवा मध्ये गती असणे. इंद्रिये कामे करणे, मन चंचल असणे ही सर्व रजो गुणाची लक्षणे आणि आणि वैशिष्टे आहेत. रजो गुण लोभ निर्माण करतो आणि त्यामुळे मनुष्य दुरावस्थेला जावू शकतो. रजस म्हणजे उत्कटता आणि क्रियाक्षीलता होय. रज गुण हा कंपन आणि गती प्राप्त करून देत असला तरी या गुणांवर सत्व गुणाचा किती प्रभाव आणि नियंत्रण आहे, यावर त्याचे महत्व ठरते अथवा अधोरेखित होते. साहजिकच रज गुण हा मनुष्याला आत्मकेंद्रित बनवतो. असा मनुष्य मग इतरांना दोष देण्यात त्यांचे उणे दुने काढण्यात धन्यता मानायला सुरुवात करतो. रज गुणात काम, क्रोध, मद, मोह , लोभ ,मत्सर लालसा, तृष्णा याचे प्राबल्य वाढलेले दिसून येते. हे प्राबल्य वाढले की मनुष्य प्राणी उदासीन आणि निराश होतो. साहजिकच रज गुण युक्त लोक भौतिक आणि तात्काळ मिळणाऱ्या सुखाकडे आकृष्ट झाल्याने आणि त्याच्या मागे लागल्याने मनाची अशांती आणि शरीराचे विकार जडवून घेतात. त्यामुळे असंतुष्टता, अशांती, अपुरेपणा, रिक्तपणा आणि निराशा याचे साम्राज्य पसरते. असे असले तरी रज गुण हा सत्व गुणासोबतच काही प्रमाणात आवश्यक असतो. कारण रज हा गुण गती आणि कार्य याच्यासाठी काम करतो. जीव उत्पती आणि नवीन जीव निर्मिती यामध्ये रज गुण कार्य करतो. रजस गुण क्रियाक्षीलता आणि गती निर्माण करतात. रज गुण तुम्हाला कर्म करण्यास उद्युक्त करतो. तो कर्माकडे आपली आसक्ती दर्शवतो त्यामुळे आपण आपल्या कार्य आणि कर्म याकडे कायम आकृष्ट होतो. त्यामुळे रज गुण हा निश्चितच दोष नाही मात्र त्यावर आपले सुयोग्य असे नियंत्रण आवश्यक ठरते. रज गुणाची पातळी आणि मात्रा ही सत्व गुण खालोखाल असावी लागते. तसेच रज गुणावर सत्व गुणांचा प्रभाव कायम लागतो तरच योग्य काम आणि क्रिया मानवी देहाकडून होते.
तमस गुण हा निम्न श्रेणी समजला जातो. तमस गुण हा अज्ञानशी निगडीत आहे. तमस गुण हा निष्क्रियता सुद्धा प्रकट करतो. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की खूप लोक अज्ञान घेवून जगत असतात किंवा अति निष्क्रिय असतात. त्यांचे जीवन फक्त दोन वेळेचे जेवण मिळाले इतपर्यंत मर्यादित असते. म्हणजे आळशी लोकांचा समावेश आपण या तमस गुणात करू शकतो. साहजिकच तम म्हणजे अंधार काही लोकांना अज्ञानाच्या अंधारात राहू वाटते. साहजिकच त्यांच्या मध्ये हा तमस गुण प्रबळ झालेला असतो. चांगल काय वाईट काय, सत्य काय असत्य काय, चूक काय बरोबर काय याचा त्याला या तमस अवस्थेमध्ये बोध होत नाही. या गुणाच्या माणसाला काहीही जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे हा हळू हळू मागे पडून जातो. तम गुण हा जरी स्थिरता देत असला तरी अशी स्थिरता अती जास्त झाल्याने अंधारमय वातावरण निर्माण येवून एक कुन्ठीतता तयार होते. या मुळे निराशा, उदासिनात आणि नकारात्मकता याची वाढ मोठ्या प्रमाणवर होते. एकंदर तम गुणाचे प्राबल्य वाढल्याने विकास आणि प्रगती खुंटते. तम गुणात आचार, विचार आणि वागणे अत्यंत हीन आणि निम्न दशेला आणि दर्जाला पोहचते. त्यामुळे परस्पर सहकार्य सुद्धा संपुष्टात येते. तम गुण हा शेवटाकडे म्हणजे अंधाराकडे घेवून जातो आणि जे आहे ते नष्ट करण्याकडे वाटचाल करतो. तम गुण मात्र अज्ञान, बेपर्वाई आणि अंधकार कडे घेवून जातो.त्यामुळे तम जरी गुण म्हणून आपण संबोधत असलो तरी काही अंशी त्याची मात्र आवश्यकता असली तरी या गुणाचे प्रमाण आणि पातळी अत्यंत अल्प आणि सूक्ष्म असावी लागते
संत ज्ञानेश्वर महाराज गीतेचे निरूपण आपल्या भावार्थ दीपिका(ज्ञानेश्वरी)या ग्रंथात करतांना म्हणतात की, सत्वात संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च। प्रमादमोहौ तमसो भवति ज्ञानमेव च।।17।। याचा स्वैर मराठी अर्थ असा की सत्व गुणातून ज्ञान प्राप्त होते मात्र रज गुणातून लोभ तयार होतो आणि तम गुणातून मोह आणि अज्ञान तयार होतो. एकंदर हे तीनही गुण मानवी स्वभाव, वागणे, वर्तन, काम आणि कार्ये यावर प्रभाव दाखवत असतात. हे सर्व गुण एकमेकामध्ये मिसळतात किंवा एकमेकाचा प्रभाव कमी जास्त करतात. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा आश्चर्यचकीत होतो. की काल असे वागणारा माणूस आज वेगळा का वागतो, तर त्यातील हे तीन गुण कमी जास्त होत असल्याने तो तसा वागतो. ह्या तीनही गुणाचा समन्वय हा कार्य घडवून आणतो हे सत्य नाकारता येत नाही. सत्व गुण ठायी आहे पण त्याल जर रज गुणाची गती आणि तम गुणाची स्थिरता प्राप्त नाही झाली तर ते सत्व गुण काही एक कामाचे राहत नाहीत.
एकंदर सत्व, रज आणि तम हे गुण मानवी भावना, विचार, स्वभाव, वागणे ,कृती आणि कार्य यावर परिणाम आणि प्रभाव साधतात. त्यामुळे सत्व गुण आपल्या विचार आणि आचार यात कसे समाविष्ट होतील आणि त्यातून स्वत:चे आणि संपूर्ण विश्वाचे कसे भले होईल हा विचार आपण प्रत्येकाने आपल्या मनात रुजवला आणि वाढवला पाहिजे. तसेच रज गुण आपल्या अंगी काही प्रमाणात स्विकारून आपल्या कामाला आणि कार्याला गती देवून आपल्या स्वत:चा, कुटुंबाचा आणि देशाचा विकासास हातभार लावणे शक्य होईल. तम म्हणजे फक्त अंधार नाही तर तो गुण स्थिरता सुद्धा दर्शवतो. त्यामुळे योग्य वेळी आपल्या विचारांना आणि भावनांना स्थिरता देणे साठी या गुणाचा अल्प वापर करून घेणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे या तीनही गुणांचा योग्य समतोल साधून आपण एक साधे, सरळ , सोपे, सुटसुटीत , सुखी आयुष्य जगू शकतो.
आपले जीवन अनमोल आहे, ते अधिक सुंदर बनवूया.
४९/१०१ दिनांक १३.०५.२०२२
सुखाच्या शोधात©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७