मानवी त्रिदोष: वात कफ पित्त

मानवी त्रिदोष: वात कफ पित्त

    भारतीय आयुर्वेदाला पाच हजार वर्षाचा इतिहास आहे. मुख्य निर्माते अग्निवेश व अनुवादक चरक यांची चरक संहिता इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातील आहे.सुश्रुत यांची सुश्रुत संहिता इ.स.पूर्व सहाव्या शतकातील आहे. वाग्भट यांचा अष्टांग संग्रह इ.स. पाचवे शतकातील महत्वाचा ग्रंथ आहे. हे सर्व ग्रंथ भारतीय आयुर्वेदाचे आधार आहेत. आयुर्वेद मधील आयू म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे विज्ञान होय. आयुर्वेद म्हणजेच जीवनाचे विज्ञान होय. आयुर्वेद हे उपचारापेक्षा निरोगी जीवनावर अधिक भर देते. आयुर्वेद हे फक्त शरीरापुरते बोलत नाही तर ते शरीर, मन आणि आत्मा यावरही भाष्य करते. आयुर्वेद ही एक चिकित्सा पद्धती असून त्यात व्याधीचे म्हणजे रोगाचे समूळ कारण शोधून त्यावर उपचार केले जातात. यालाच निदान परिमार्जन असेही म्हटले जाते. आयुर्वेदतज्ञ सर्व प्रथम व्यक्ति कोणत्या प्रकृतीचा आहे ते निश्चित करतात आणि त्या नंतर उपचार करतात. प्रस्तुत प्रकरणात आपण वात, कफ आणि पित्त या त्रिदोषांबाबत माहिती घेणार आहोत.

मानवात एकूण दोन दोष आढळून येतात. एक शरीरदोष आणि दूसरा मानसदोष होय. शरीरदोष हे वात, कफ आणि पित्त यांचे शरीरातील प्रमाण असंतुलित झाल्याने होतात तर मानसदोष हे सत्त्व, रज आणि तम यांचे असंतुलन झाल्याने निर्माण होतात. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचे पचन होते. पचन झाले की पाचकरस लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात प्रवेश करतो. या पाचकरसाचा प्रवास हा लहान आतड्यातून होत असताना लहान आतड्यातून निर्माण होणारे स्राव जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळतात. स्रावातील विकरांमार्फत वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूळ घटकांमध्ये रूपांतर होते व या मूळ घटकांचे लहान आतड्यातील वैशिष्ट्यपूर्ण पेशी मार्फत शोषण होते. लहान आतड्यातील स्रावांमुळे प्रथिनांचे विघटन अ‍ॅमिनो आम्लांमध्ये होते, कर्बोदकांचे विघटन शर्करेत किंवा ग्लुकोज मध्ये होते व मेद घटकांचे मेदाम्लांत रूपांतर होते. तसेच या वेळी खनिजे आणि जीवनसत्वे सुद्धा रक्तात शोषली जातात.  रक्ताभिसरण क्रियेद्वारे त्याचे रूपांतर हे वात, कफ आणि पित्त यात होते तसेच सप्त धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या मध्येही होते. या चयापचय क्रिये मधून निर्माण होणारा अनावश्यक असा भाग तीन मल म्हणजे विष्ठा, मूत्र आणि घाम या रूपाने शरीराच्या बाहेर टाकला जातो.

आयुर्वेद हे मानवी शरीर संबधात चार बाबीवर भर देते. यात त्रिदोष, सप्त धातू, तीन मल आणि एक अग्नि यांचा मुख्यत्वे संबध येतो. उपरोक्त दिल्याप्रमाणे त्रिदोष म्हणजे वात, कफ आणि पित्त होय. सप्त धातू मध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र यांचा समावेश होतो. तीन मल म्हणजे विष्ठा, घाम आणि मूत्र होत. अग्नि हा सुद्धा महत्वाचे असे कार्य पार पाडतो. आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन होवून पाचकद्र्वे रक्तात शोषली जातात. ही द्र्वे शरीराच्या विविध भागात वहन करण्याचे काम हे त्रिदोष करत असतात. सप्त धातू म्हणजे हे शरीराला पोषण आणि आधार देतात. तीन मल याचे विसर्जन शरीरसाठी आवश्यक असे आहे. पचन आणि चयपचाय क्रिया ही अग्नि मुळे होते. असा अग्नि आपल्या जठरात कायम वास्तव्य करतो.

पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, वायु, अग्नि आणि आकाश होय. प्राचीन तत्वज्ञान असे सांगते की विश्वातील कोणतीही गोष्ट या पंच महाभूते यांनी बनलेली आहे. अगदी तसेच मानवी देह सुद्धा या पंच महाभूते यांनी बनला आहे. या पंच तत्वाच्या परस्पर क्रियेमुळे शरीराचे तीन गुणधर्म तयार होतात. वायु आणि आकाश यातून वात निर्माण होतो. जल आणि अग्नि यातून पित्त निर्माण होते. पृथ्वी आणि जल यातून कफ तयार होतो. कफ हा छातीमध्ये राहतो, पित हे जठर मध्ये राहते तर वात हा स्नायू पोकळी मध्ये राहतो. म्हातारपणी वायु प्रकोप अधिक दिसून येतो. युवावस्था मध्ये पित्ताचा प्रकोप अधिक दिसून येतो. तर बालपणी कफाचा प्रकोप अधिक दिसून येतो. वात, कफ आणि पित्त हे आपल्या शरीरात सम प्रमाणात आढळून येतात मात्र जेंव्हा यांचे प्रमाण कमी जास्त होते किंवा त्यांचे असंतुलन होते, त्यावेळी शारीरिक दोष अथवा व्याधी अथवा विकार तयार होतात.

पित्त हे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते. वात मुळे आपले शरीरात वहन आणि हालचाल होते. कफ आपले शरीर जोडून ठेवतो. वायू: पित्तं कफशेती त्रयो दोष: समसथ,असे  महर्षि वागभट यांनी म्हटले आहे. वातचा असमतोल निर्माण झाल्यास सांधे दुखी, डोके दुखी, वजन कमी होणे, थकवा येणे, कोरडेपणा जाणवणे ही लक्षणे दिसून येतात. पित्त मध्ये असमतोल निर्माण झाल्यास उच्च रक्तदाब, जळजळ, पुरळ, शरीरावर सूज, अम्लपित्त वाढणे ही लक्षणे दिसून येतात. तर कफ मध्ये असमतोल निर्माण झाल्यास भूक न लागणे, मळमळ, नैराश्य ही लक्षणे दिसून येतात. वात प्रवृती असणार्‍या व्यक्ति काटक, सडपातळ आणि उत्साही असतात. कफ प्रवृत्ती असणार्‍या व्यक्ति थंड, शांत, संयमी आणि स्थिर असतात. पित्त प्रवृती असणारे व्यक्ति थोडे जाड आणि पिळदार स्नायू असलेले असतात. तसेच ते ध्येये वेडे असून त्यांच्या मध्ये नेतृत्व गुण असतात.

वात हा शरीरात आवश्यक प्रमाणात लागतो. तो कमी अधिक प्रमाणात झाल्यास विकार उत्पन्न होतो. वात दोष हा थंड, हलका आणि कोरडा असतो. कार्य आणि क्षेत्र याच्या दृष्टीने वाताचे पाच प्रकार आहेत. त्यात प्राण, उदान, व्यान, समान व अपान या प्रकरांचा समावेश आहे. यातील प्राणवायू स्थान हे नाकपुडया, कान, घसा येथे आहे. यात शिंकणे, थुंकणे, श्वास घेणे ह्या क्रिया होतात. उदान वायुचे स्थान नाभी, घसा आणि छाती हे आहे. उदान वायु बोलण्यास प्रेरित करतो आणि आपला उत्साह वाढवतो. व्यान वायु हा जठरात असतो तो ज्वलनास आणि पचनास मदत करतो. जांभई देणे आणि पापण्यांची उघडझाप करणे हे व्यान वायूचे कार्य आहे. अपानचे स्थान हे मूत्राशय आणि गुद्दाशय आणि प्रजनन अवयव हे आहे. याचे काम मल आणि मूत्र तसेच वीर्य आणि स्त्रीबीज याबाबत आहे. वात हे हालचालीशी संबधित आहे. वात स्नायू आणि उत्तीची हालचाल होणे, स्वास घेणे, हृदयाचे ठोके याशी संबधित आहे. वात समतोल प्रमाणात नसल्यास भीती आणि चिंता निर्माण होते.

पित्ताचे प्रमाण शरीरात वाढल्यास अनेक विकार निर्माण होतात. पित्त हे पातळ, दुर्गंधीत आणि गरम असते. पित्त हे शरीर व्यापी असते. अन्नाचे पचन करणे, तहान आणि भूक लागणे ही कार्य पित्त करते. पित्ताचे एकूण पाच प्रकार आहेत यात रंजक पित्त, साधक पित्त, पाचक पित्त, आलोचक पित्त आणि भ्राजक पित्त यांचा समावेश होतो. पाचक पित्त हे आमशय मध्ये राहते आणि अन्न  पचनास मदत करते. रंजक पित्त हे प्लीहा आणि यकृत यामध्ये राहते. आहारातून जो रस तयार होतो त्याला लाल रंग रंजक पित्त प्राप्त करून देते. आलोचक पित्त हे नेत्रात असते ते आपली दृष्टी साठी काम करते. साधक पित्त हे हृदयात राहते. भ्राजक पित्त हे त्वचा मध्ये राहते. पित्त हे चयापचायशी निगडीत आहे. पित्त हे पचन, चयपचाय आणि शोषण याबाबत कामकाज करते. पित्ताचा असमतोल झाल्यास राग आणि द्वेष वाढतो.

कफ प्रमाण शरीरात वाढल्यास अनेक दोष निर्माण होतात. हा कफ थंड, पांढरा, स्निग्ध असतो. कफ स्थिर असतो मात्र वात सोबत तो पूर्ण शरीरात वाहतो. कार्य व क्षेत्राच्या दृष्टीने कफाचे पाच प्रकार पडतात यात क्लेदक, अवलंबक, बोधक, तर्पक आणि श्लेषक याचा समावेश होतो. क्लेदक कफ हा आमशय येथे राहून अन्नाला ओलसरपणा आणतो. अवलंबक कफ हा छातीत राहून हृदयाला आधार देतो. बोधक कफ हा जिभेच्या ठिकाणी राहून जिभेला अन्नाची चव देण्यात मदत करतो. तर्पक कफ हा डोक्यात राहून ज्ञांनेंद्रिये यांना मदत करतो. श्लेषक कफ हा सांध्याच्या ठिकाणी राहून वंगणाचे काम करतो. कफ हा शरीर रचनेशी निगडीत आहे. हाडे आणि स्नायू याच्याशी ती निगडीत आहे. कफ सांधे यांना वंगण देते. समतोल बिघडल्यास मोह आणि लोभ तयार होतो.

वात संतुलन आयुर्वेद तेल मालीश करून साधता येते. कफ संतुलन साधण्यासाठी मध सेवन आणि पित्त संतुलन साधण्यासाठी देशी गायीचे तूप सेवन करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. वात दोष संतुलन हे योग्य मार्गदर्शन घेवून मालीश आधारे साधता येते. यासाठी काही आयुर्वेदिक तेल गरम करून ते मालीश साठी वापरले जातात. लसूण सेवन आहारात वाढवून वात कमी करता येतो. दूध आणि हळद एकत्र करून सेवन केल्यास वात दोष कमी होतो. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून ते सकाळी घेतल्यास वात दोष कमी होतो. दालचीनी सुद्धा वातावर गुणकारी आहे. पित्त दोष संतुलनसाठी नारळ पाणी गुणकारी आहे तसेच ते शरीराला थंडावा देते. शुद्ध आणि सात्विक तूप हे पित्त दोष कमी करते. निंबू आणि पुदिना पित्त दोषाचे शमन करत असतात. मोड आलेली कडधान्य पित्त कमी करतात. कफ दोष संतुलन साठी हिरव्या पालेभाज्या आणि ज्वारीची भाकरी उपयोगी ठरते. ताक आणि पनीर सुद्धा कफ कमी करण्यास मदत करतात. गरम पाणी पिणे. रोज किमान काही मिनिटे उन्हात उभे राहणे. संतुलित आहार घेणे. स्वच्छ हवा घेणे. पुरेसे पाणी पिणे. नियमित व्यायाम करणे आणि वेळेवर झोप घेणे ही पंचसूत्री कफ, पित्त आणि वात यांचा समतोल राखणेसाठी आवश्यक आणि अनिवार्य ठरते. एकदा शरीराचा समतोल राखून त्रिदोषांचे संतुलन साधले की तुम्ही एक साधे, सोपे ,सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता. जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !

७५/१०१ दिनांक १२.०८.२०२३

सुखाच्या शोधात©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७