भारतीय योग ! एक चिकित्सक अभ्यास Indian Yoga! An Analytical Study
भारतीय योग ! एक चिकित्सक अभ्यास Indian Yoga! An Analytical Study
आपला भारत देश आणि त्याचा प्राचीन इतिहास यांचा आपल्याला कायम अभिमान आहे. मागील पाच हजार वर्षातील आपल्या अनेक ठेव्यांपैकी भारतीय योग हा ठेवा अनमोल असा आहे. असे असले तरी इतिहासकालीन अनेक आक्रमणे आणि विविध आपत्ती यामुळे आपला हा अनमोल ठेवा आपल्याला तेवढा ठळकपणे आणि मुक्तपणे पुढे आणता आला नाही हे वास्तव आहे. तसेच भारतीय योगचा उपयोग मागील काही शतकात जीवन सुसह्य करण्यासाठी म्हणावा तेवढा केला गेला नाही. एकंदर प्राचीन ज्ञानाबाबत आपली परिस्थिती ही, तुझे आहे तुजपाशी। परि तू जागा चुकलासी॥ अशी झाली आहे. भारतीय योग आणि त्याचे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा हे आठ अंग बाबत आपले प्राचीन वाड्मय ज्ञान आणि वैभव हे प्रचंड आणि व्यापक स्वरूपाचे आहे. असे म्हटले जाते की अपूर्ण आणि अर्धवट ज्ञान हे कायम संकटग्रस्त आणि धोकादायक असते. आजच्या या धावपळीच्या आणि शॉर्टकटच्या जगात भारतीय योग बाबत सामान्य माणसाकडे असलेले ज्ञान हे अपुरे, अपूर्ण आणि अर्धवट असे झाले आहे. तसेच काही प्रमाणात याचे बाजरीकरण झाल्याने त्याला एक वेगळे स्वरूपही प्राप्त झाले आहे. मात्र आपल्या भारतीय योगचा योग्य संदर्भ घेवून आणि उचित मार्गदर्शन घेवून त्याचा अवलंब आपल्या दैनदिन जीवनात केला तर आपण एक सुसह्य आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. प्रस्तुत लेखात भारतीय योग म्हणजे काय?, त्याचे विस्तृत प्रकार काय आहेत?, आपल्या जीवनात त्याचा कसा वापर करता येवू शकेल? त्याचे फायदे काय आहेत? आणि त्याचे अंतिम उद्दिष्ट आणि ध्येय काय आहेत? यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
योग ह्या शब्दाची उत्पत्ति युज या धातू पासून झाली आहे. युज या शब्दाचा अर्थ साधने किंवा जोडणे असा आहे. अध्यात्मानुसार आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे योग होय. जर हे मिलन पूर्णत्वाकडे गेले तर या अवस्थेला समाधी अवस्था असेही म्हणतात. मानसशाश्र आणि तत्वज्ञान या नुसार योग म्हणजे मनातील भवाना आणि मेंदूतील विचार की जे सर्व दु:खाचे मूळ आहेत ते स्थिर करणे होय. शरीरशास्त्र नुसार योग म्हणजे शरीरामद्धे लवचिकता आणि श्वासात एकसमानता आणि स्थिरता आणणे होय. योग बाबत ऋषि, तत्ववेत्ते, टीकाकार आणि संत महात्मे यांनी आपआपल्या परीने व्याख्या केल्या आहेत आणि संकल्पना मांडल्या आहेत.
भगवद्गीता मध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला अठरा योग संगितले असे म्हटले जाते. या मध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग इत्यादि योगचा समावेश होतो. योगचा उगम प्राचीन हडप्पा संस्कृती मध्ये आढलेल्या काही मूर्ति आणि अवशेष यामध्येही दिसून येतो. म्हणजे योग हा साधारण पाच हजार वर्षाच्या पूर्वी पासून अस्तीत्वात असावा असे वाटते. महर्षि पतंजलि यांनी योग म्हणजे समाधी अवस्था असे प्रतिपादले आहे. व्यास आणि वाचस्पती यांनीही योग म्हणजे समाधी अवस्था असेच म्हटले आहे. महर्षि पतंजलि हे योग म्हणजे योगश्चित्तवृत्तिनिरोधः असे मानतात. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे तुमचे चित्त म्हणजे मन मधील अनेक वाईट वृती आणि प्रवृती ज्या आहेत त्याचा निरोध करणे म्हणजे त्याग करणे होय. भगवद्गीता मध्ये योग: कर्मसु कौशलम् असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की कोणतेही काम कौशल्ये पूर्वक करणे म्हणजे योग होय. कोणत्याही व्यक्तीने कर्मावर लक्ष दिले पाहिजे आणि कर्म अथवा काम हे कोणतेही अपेक्षा न धरता केले पाहिजे असे भगवद्गीता सांगते.
योगचे विविध प्रकार आहेत. तसेच योगची विविध अंग सुद्धा आहे. योगचे त्याचे अंग नुसार अष्टांग, सप्तांग इत्यादि प्रकार पडतात. आपल्या प्राचीन परंपरा या आधारे राजयोग, भक्तियोग, कर्मयोग, हठयोग असे प्रकार पडतात. भगवद्गीता मध्ये कृष्ण सांगतात की योग हा सृष्टीच्या प्रारंभा पासून अस्तीत्वात आहे. हठयोग प्रदीपिका नुसार श्री. आदिनाथ यांनी योग पहिल्यांदा सांगितला. श्रुति काळ विचारात घेतला असता तो साधारण ई.स.पूर्व ५०० येतो. यजुर्वेद मध्ये शरीरातील पाच वस्तुचे तेज वाढविण्याची प्रार्थना दिली आहे. विविध उपनिषदात शरीरक्रीयांची माहिती दिली आहे. श्रुति काळ नंतर दर्शन काळ हा महत्वाचा काळ आहे. तो साधारण ई.स.पूर्व ५०० ते ई.स. १०० हा येतो. या काळात अनेक संकल्पना आणि सिद्धांत हे एका सूत्रात बांधले गेले. या मध्ये पतंजलि योगसूत्रे, भगवद्गीता, योगवशिष्ट, योगयज्ञवल्क यांचा समावेश होतो. तसेच विविध पुराणे, स्मृतिग्रंथ याच काळात झाले. या नंतर टीकाकार किंवा भाष्यकाळ हा काळ येतो. तो काळ साधारण ई. स. १०० ते ई. स.१२०० हा येतो. या काळात भोजदेव, वाचस्पती, नागोजी भट्ट यांनी टीका लिहिली. या काळाताच अनेक विद्या आणि कला यांचा विकास झाला. भक्तियोग आणि हठयोग साधारण ई. स. १२०० ते ई. स.१८५० काळ मधील आहेत. या काळात हठप्रदीपिका, घेरंड संहिता असे ग्रंथ आले. नाथ संप्रदायाचा सुद्धा हाच काळ आहे. आधुनिक काळ हा ई.स. १८५० नंतर सुरू होतो. या मध्ये स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री. अरविंद, स्वामी कुवलयानंद यांचे योग विषयक तत्वज्ञानाचा समावेश होतो
योग बाबत जाणून घेत असताना हठयोग आणि अष्टांगयोग महत्वाचे गणले जातात. हठयोग मध्ये सूर्य व चंद्र चक्रे तसेच मानसिक आणि कायिक उर्जेला एकत्र एका दिशेत आणले जाते. अष्टांग योग ला राजयोग असेही संबोधले जाते. अष्टांग योग हा सर्व समावेक्षक आणि समग्र असा आहे. जेवढे आपण या आठ अंगाबाबत जाणून घेवू तेवढे आपण परिपूर्णतेकडे वाटचाल करतो. योग म्हणजे नुसते जाणून घेणे इतपर्यंत मर्यादित नाही तर त्याची अंमलबजावणी आपल्या विचारात आणि कृतीत करावी लागते. अष्टांग योग मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा या आठ अंगांचा समावेश होतो. ही आठ अंगे आपल्याला सविस्तरपणे पाहायची आहेत.
यम म्हणजे व्यक्तीने समाजात कसे वागावे, कसे वर्तन ठेवावे, कशी जीवनशैली ठेवावी याबाबतचे सूत्र होय. अष्टांग योग मध्ये एकूण पाच यम आहेत. या मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो. अहिंसा म्हणजे हिंसेचा त्याग एवढा संकुचित अर्थ नसून तो अर्थ खूप व्यापक आणि विस्तृत आहे. यात फक्त कायिक म्हणजे शारीरिक हिंसेपासून मुक्तता नाही तर मानसिक आणि वाचिक अहिंसेचा समावेश होतो. वाचिक अहिंसा ही आपल्या वाणीशी निगडीत असून आपण आपले शब्द जपून आणि तोलून वापरले पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. मानसिक अहिंसे मध्ये दुसर्याप्रती सहिष्णू अशी भावना आणि विचार याचा समावेश होतो. सत्य हे सत्य वचन आणि सत्य वर्तन याचेशी निगडीत आहे. सत्य हाच योग चा पाया आणि आधार आहे. अस्तेय म्हणजे दुसर्यांच्या वस्तु आणि विचार याची चोरी न करणे होय. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तु आणि बाबींचा गरजेपेक्षा साठा न करणे होय. यात आपण गरजेपेक्षा जास्त संग्रह आणि साठा करू नये हे संगितले जाते. ब्रह्मचर्य हे फक्त शरीराशी संबंधित नसून कोणत्याही वस्तू आणि बाबीचा उपभोग हा गरजेपुरता करावा असे यात सूचित केल जाते. या मध्ये आसक्ती राहत नाही आणि विरक्ती येते.
अष्टांग योग मधील दुसरे अंग आहे ते म्हणजे नियम होय. हे नियम आपण स्वत:हून स्वतःसाठी ठेवलेल्या सीमा किंवा अटी असतात. नियम मध्ये तप, संतोष, शोश्च, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याचा समावेश होतो. तप मध्ये एखांदी गोष्ट प्राप्त करणे साठी मन:पूर्वक आणि सखोलपणे प्रयत्न करणे याचा समावेश होतो. तप मध्ये मन एकाग्र केले जाते. संतोष मध्ये जे मिळेल त्यात आनंदी आणि समाधानी राहावे असे सांगितले जाते. शोश्च फक्त शारीरिक स्वच्छता नाही तर ती मनाची आणि विचाराची स्वच्छता आहे. स्वाध्याय म्हणजे स्व-अध्याय होय. या मध्ये मनाचा अभ्यास करावा असे संगितले जाते. ईश्वर परिधान म्हणजे जे काही आहे ते ईश्वराला अर्पण करावे असे संगितले जाते. तसेच कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेवू नये असेही यात सुचवले जाते
अष्टांग योग मधील तिसरे अंग आहे ते म्हणजे आसन होय. ‘स्थिरम सुखंम आसन’ असे मानले जाते. ज्या आसनात तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकता मिळते ते आसन होय. आसनाचा मुख्य विषय हा प्राणायाम आणि ध्यानधारणा करण्यासाठीची स्थिति होय. पतंजलि ऋषींनी कोणतेही आसन निर्देशित केलेले दिसून येत नाहीत, मात्र हठयोग मध्ये आसनांचे प्रकार उद्भुत केले आहेत. पद्मासन, वज्रासन, सिद्धासन, मत्स्यासन, वक्रासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, गोमुखासन, पश्चिमोत्तनासन, ब्रह्म मुद्रा, उष्ट्रासन, गोमुखासन, अर्ध हलासन, हलासन, सर्वांगासन, विपरीतकर्णी आसन, पवन मुक्तासन, नौकासन, शवासन, मकरासन, धनुरासन, भुजंगासन, शलभासन, विपरीत नौकासन इत्यादि आसनाचे प्रकार आहेत. यातील कोणतेही आसन हे योग्य मार्गदर्शक आणि मार्गदर्शन शिवाय करू नये असा संकेत आहे.
अष्टांग योग मधील चौथे अंग आहे ते म्हणजे प्राणायाम होय. प्राण या वैश्विक चैतन्यशक्ती नियमन करतो. प्राणायाम मध्ये आपला श्वासावर नियंत्रण प्राप्त केले जाते. प्राणायाम करताना तीन क्रिया केल्या जातात त्यांना पूरक(श्वास घेणे), कुंभक(श्वास धरून ठेवणे) आणि रेचक(श्वास बाहेर सोडणे) असे म्हटले जाते. घेतला जाणारा श्वास आणि सोडला जाणारा उच्छवास यावर सूक्ष्म रीतीने नियंत्रण प्राणायाम मध्ये प्राप्त केले जाते. प्राणवायूची मात्रा शरीरात वाढवून मन स्थिर करण्याचा प्रयत्न प्राणायाम मध्ये केला जातो. सूर्यभेदन/नाडी शोधन/अनुलोम-विलोम प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शितली प्राणायाम, शीतकारी प्राणायाम, मूर्च्छा प्राणायाम, प्लाविनी प्राणायाम असे प्राणायामाचे आठ प्रकार आहेत. अनुलोम विलोमचा नियमितपणे सराव केल्याने शरीरातील ऊर्जा वाहिन्यांचे ब्लॉकेजेस खुलण्यास आणि मेंदूला-मनाला शांत करण्यास मदत मिळते. उज्जायी प्राणायामामुळे कार्बन डाय-ऑक्साईड वायूचा ताण सहन करण्याची मेंदूची क्षमता वाढते. अपचन, गॅस यांसह विविध पोट विकार साठी हा भस्त्रिका प्राणायाम महत्त्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम मुळे मानसिक ताण, संताप आणि अस्वस्थता यापासून झटपट सुटका मिळते. शीतली प्राणायाम आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी केले जाते. शीतकारी प्राणायाम क्षुधा, तृष्णा, निद्रा व आळस यांची बाधा होत नाही. मूर्छा प्राणायाम मानसिक शांति आणि शक्ति साठी सर्वोत्तम मनाला जातो. प्लाविनी प्राणायाम मुळे पचनक्रिया सुधारते.
प्रत्याहार हे बहरंग योग आणि अंतरग योग यांना जोडण्याचे काम करते. बहिरंग योग मध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम येते तर अंतरंग योग मध्ये धारणा, ध्यान आणि समाधी येते. प्रत्याहार मध्ये आपल्या पाचही ज्ञानद्रिये यावर नियंत्रण मिळविले जाते. पाहणे, चव घेणे , ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे ही आतल्या बाजूला वळवून त्यापासून चित्त अलग केले जाते. कारण यामुळे चित्त विचलित होते असे मानले जाते. ज्ञानेद्रिये ताब्यात घेण्याचे काम प्रत्याहार मध्ये केले जाते.
धारणा हे अष्टांग योगचे सहावे अंग आहे. मनाची एककेंद्री अवस्था प्राप्त करणे म्हणजे धारणा होय. ध्यान हे अष्टांग योगचे सातवे अंग आहे. यात बाहेरच्या जगाशी संपर्क काही काळ तोडला जातो. आंतरिक ध्यान आणि अंतरमन एकाग्र केले जाते. बहिरंग हे अंतरंग सोबत जोडले जाते. समाधी हे अष्टांग योगचे आठवे अंग असून यात आत्मा हा परमात्मा याच्याशी जोडला जातो.
योगचे महत्व आज प्रत्येक क्षेत्रात दृष्टीक्षेपात पडत आहे. आज आरोग्य क्षेत्रात योगचा वापर होत आहे. रोग उपचार क्षेत्रातही काही अंशी योग महत्वाचा आहे. खेळ क्षेत्रात योग आणि प्राणायामचा वापर केला जात आहे. त्यातून लवचिकता आणि एकाग्रता साधण्यावर भर दिला जात आहे. शिक्षणामध्येही योग ने स्थान मिळविले आहे यामध्ये अभ्यास पद्धती आणि मनाची स्थिरता यावर भर दिला जात आहे. सामाजिक क्षेत्रात सुद्धा योगला आता महत्व प्राप्त झाले आहे. एकंदर सर्वच क्षेत्रात योगने कमी अधिक प्रमाणात प्रवेश केला आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल .
असे असले तरी योग चा जो मूळ उद्देश आहे किंवा जे स्वरूप आहे त्या पेक्षा काही तरी आगळे वेगळे करण्याच्या प्रयत्नात योग पासून आपण दूर जात आहोत अशी भीती निर्माण होत आहे. तसेच काही अंशी योग आणि त्याच्या विविध अंगांचे बाजारीकरण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक ठिकाणी योगच्या माध्यमातून कोणताही शास्त्रीय आधार न घेता असाध्य रोग बरा होवू शकतो असे प्रलोभन दाखवले जात आहे. योग म्हणजे फक्त आसने असाही एक अपप्रचार केला जातो. वास्तविक योग मधील आठ अंगापैकी आसन हे एक अंग आहे. आसन हे अंग योग्य आणि उचित मार्गदर्शन शिवाय प्राप्त होत नाही. त्या साठी मार्गदर्शन ही बाब अनिवार्य आहे. योग मध्ये नुसते आसन करणे एवढे मर्यादित न राहता त्या सोबत श्वास आणि मन हे स्थिर आणि शांत करावे लागते. योग ही उपचार पद्धती नाही तर ती एक सहाय्यकारी आणि शुद्धी पद्धती आहे. ती मनाला स्थिर करणारी आणि अनेक बाबी एकत्रितपणे साधणारी क्रिया आहे. योग हा एक संस्कार आहे तो मनावर आणि शरीरावर करावा लागतो. योग हा कधीच एकाकी अभ्यासला जात नाही तर तो समग्र आणि एकात्मिक रीतीने अभ्यासावा आणि अंगीकारावा लागतो. योग आणि त्याची किमान सात अंग ही सामान्य व्यक्ति योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमपूर्वक गाठू शकतो. एकदा योग स्वीकारला आणि अनुभवला की तुमचे आयुष्य साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी होण्यास सुरुवात होते.
जीवन अनमोल आहे! ते अधिक सुंदर बनवूया !
७३/१०१ दिनांक १५.०७.२०२३
सुखाचा शोध ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७