भारतीय युवकांसमोरील संधी आणि आव्हाने Indian Youth: Opportunities and Challenges

भारतीय युवकांसमोरील संधी आणि आव्हाने Indian Youth: Opportunities and Challenges

     वाढती लोकसंख्या व वाढती बेरोजगारी ही आपल्या देशातील एक भयावह समस्या असून त्यामुळे लोकांमध्ये व विशेषतः युवकांमध्ये त्यांच्या भविष्याबद्दल एक अनिश्चितता निर्माण झाली आहे. असं म्हटलं जात की,“ मुल ज्या वेळेस जन्माला येते, त्या वेळी त्याला एक पोट असते व ते अन्न मागत असते, असे असले तरी त्या मुलाला एक हात व एक मेंदू असतो, जर आपण मेंदूला योग्य मुल्ये आणि शिक्षण देवू शकलो आणि हाताला काम देवू शकलो तर ही वाढती लोकसंख्या भारभूत न वाटता आधारभूत वाटेल”. आजचा विषय याला धरून आहे. भारतीय युवकांसाठी भविष्यातील तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण, रोजगार व स्वयं रोजगार संधी आणि आव्हाने व व्यवस्थापन कौशल्य यावर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

इतिहासाची पाने आपण तपासली असता त्यात शेतकरी, शेतमजुर, कुळे, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, लहान मोठे उद्योग आणि व्यावसायिक, राजाकडे असणारे नोकर-चाकर, राज्याच्या सैन्यातील नाईक-शिपाई अशा प्रकारे रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध असत. सन १८१८ साली भारतात खऱ्या अर्थाने इंग्रजांचा अंमल सुरु झाला आणि हळू हळू ते भारतात स्थिरावले. अशा परिस्थितीत त्यांना त्यांचे प्रशासन सांभाळण्यासाठी लोक हवे होते. त्यामुळे त्यांनी नवीन शिक्षण पद्धती सुरु करून कारकुनी शिक्षणाचा पाया भारतात रचला. त्या अनुषंगाने भारतीय लोक शिक्षण घेवून ब्रिटिश प्रशासनात नोकरी करू लागले. व्यवसाय, लघु उद्योग, कुटीर उद्योग व उद्योगधंदे यांची या काळात म्हणावी तेवढी वाढ झाली नाही कारण भारत हा इंग्रंजासाठी पक्या मालाची बाजारपेठ होता. त्यामुळे येथील कच्चा माल लंडनला जावून त्यावर प्रक्रिया करून तोच माल परत विक्री साठी भारतात आणला जात असे. साहजिकच या काळात येथील पारंपारिक उद्योग व व्यवसाय यांना उतरती कळा लागली होती.

सन १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला आणि उद्योग व व्यवसाय यात हळू हळू वाढ झाली. ही वाढ प्रथम शहरात झाल्याने लोकांच्या हाताला काम मिळत गेले. त्यामुळे खेड्यातील स्थलांतर मोठ्या प्रमाणावर शहरांकडे झाले. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त स्थलांतर झाल्यामुळे शहरामध्ये विकासाची सुज तयार झाली व पायाभूत सुविधांवर भरमसाठ ताण आल्याने बकाल आणि झोपडपट्टी असलेली शहरे तयार झाली. देशात उद्योगधंदे, व्यवसाय, लघु उद्योग, कुटीर उद्योग यात जरी वाढ होत असली तरी लोकसंख्येचा विस्फोट एवढा मोठा आहे की वाढत्या लोकसंख्येला अस्तित्वात असलेले उद्योग, व्यवसाय, खाजगी, शासकीय क्षेत्र, संघटीत व असंघटीत क्षेत्र सामवून घेवू शकले नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत गेली. या बेरोजगारी मध्ये आपल्याला हंगामी बेरोजगारी, घर्षण बेरोजगारी, छुपी बेरोजगारी, न्यून बेरोजगारी पाहावयास मिळते, की त्याची गणना सहसा बेरोजगार म्हणून होत नाही.

जर आपण वाढत जाणारी लोकसंख्या व उपलब्ध असणारे जॉब याचे गुणोत्तर कसे बिघडत गेले यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असता असे दिसून येते की, महाराष्ट्र राज्यात दर वर्षी सरासरी ग्रामीण भागात १० लाख व शहरी भागात १० लाख अशी २० लाख मुले जन्माला येतात. दर वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा सरासरी १८ लाख मुले देतात. तर इयत्ता बारावीची परीक्षा १४ लाख मुले देतात. पदवीधर बाबत माहिती घेतली असता ७ लाख मुले हे कॉमर्स-आर्ट सारख्या गैर व्यावसायिक कोर्स घेवून पदवीधर होतात तर ३ लाख मुले टेक्निकल व व्यावसायिक पदवीधर होतात. म्हणजे एका वर्षात साधारण १० लाख मुले पदवीधर होतात. या पैकी साधारण ३ लाख मुले ही नोकरी–उद्योग–व्यवसाय-संघटित क्षेत्र(खाजगी आणि शासकीय) यात प्रवेश करतात. तर ७ लाख मुले ही शेती, शेतमजुरी, असंघटित क्षेत्र यात पर्याय नाही म्हणून सामावून घेतली जातात असा एक अभ्यास सांगतो. शेती आणि असंघटित क्षेत्र या क्षेत्रात अर्ध बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, निम्न बेरोजगारी कायम स्थिरावलेली असते. याचा अर्थ असा होतो की हा युवक रोजगार मिळवतो, पण ज्या क्षेत्रात त्याला रोजगार मिळाला आहे, त्यात त्याला अर्ध बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, निम्न बेरोजगारी समस्यांचा सामना करावा लागतो. या प्रकारच्या बेरोजगारी मुळे प्रत्येकालाच जगण्याचा आणि रोजीरोटीचा कायम संघर्ष करावा लागतो.

वास्तविक चिंतनाच्या सुरुवातीला नमूद केल्या प्रमाणे कामाची व श्रमाची विभागणी होणे आणि त्यातून समाजातील प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावणे आवश्यक असते. काम लहान असू किंवा मोठे श्रमाला प्रतिष्ठा मिळणे ही आवश्यक बाब आहे. मात्र याची उणीव आपल्या देशात दिसून येते. लहान व मोठा, गरीब व श्रीमंत, उच्च व नीच अशी विभागणी समाजात झालेली पहावयाला मिळते. त्यामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आदान प्रदान यास मर्यादा येते व ही दरी दिवसेंदिवस वाढत जाते. समाजाची विभागणी ही अशा प्रकारे उभ्या पद्धतीने होणे हे कोणत्याही समाजासाठी धोकादायक असते.

या सर्व वस्तुस्थितीदर्शक बाबी व गोष्टी विचारात घेता युवकानी आपले कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान आपण कशा प्रकारे वृद्धिंगत करू शकतो आणि त्यातून आपला स्वत:चा, कुटुंबाचा, समाजाचा आणि एकंदर राष्ट्राचा विकास कसा साधू शकतो यावर विचारमंथन व काम सुरु करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. हा शेतकरी आहे, हा शेतमजूर आहे, हा कामगार आहे, हा हमाल आहे, हा शिपाई आहे असे दूषण देवून आपल्या समाजात मोठ्या वर्गाला कमी लेखले जाते. एखांदा व्यक्ती काहीही काम करत नाही, पण त्याच्या कडे गाडी आहे, जमीन आहे, घर आहे तर त्याला उच्च लेखले जाते. म्हणजे व्यक्ती काम करत असूनही त्याची प्रतिष्ठा कमी व जो काम करत नाही त्याची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान जास्त अशी एकंदर स्थिती आहे. म्हणजेच श्रमाला प्रतिष्ठा न दिली जाता ती संपत्ती धारण करणार्‍याला दिली जाते हे सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही आणि हाच आपल्या भारतीय समाज पद्धती मधील मोठा दोष आहे. आपल्या देशातील अनेक मुले शिक्षनासाठी परदेशात जातात तेथे वेटर, कुक, ऑफिस बॉय अशी कामे करतात.मात्र त्या ठिकाणी त्यांना तसे हिनवले जात नाही आणि त्यांना याबाबत संकोच सुद्धा वाटत नाही. मात्र असे आपल्या देशात असे होतंय दिसत नाही आणि म्हणून समाजातील अनेक घटकांची क्रियाशीलता आणि कार्यशक्ती वाया जात असल्याचे निदर्शनास येते. तसेच युवकांच्या मनात लहान वयातच ही बाब बिंबवली जात असल्याने एकतर युवक हे श्रमाला महत्व देत नसून ते संपत्तीला महत्व देतात आणि शॉर्टकट मार्गचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात व त्या मुळे त्यांची फसगत होवून ते बेरोजगारी व गरिबीच्या चक्रव्यूह मध्ये फसतात. पुढे जावून श्रम आणि कष्ट करण्याच्या लायकीचे ते उरत नाहीत व यश हे त्यांच्या पासून खूप दूर राहून जाते.

अगदी लहान वयातच अथवा शालेय जीवनातच श्रमाला महत्व आहे, हे युवकांच्या अथवा विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारित करणे आणि रुजवणे ही पालकांची, शिक्षकांची व समाजातील विविध घटकांची जबाबदारी ठरते. श्रम याचा शब्दश अर्थ फक्त शारीरिक श्रम असा न घेता यात शारीरिक, बौद्धिक, मानसिक श्रमाचा समावेश होतो हे युवकांनी लक्षात घ्यावे. उदाहरण द्यायचे झाल्यास वेल्डर शारीरिक काम करतो आणि संगणक ऑपरेटर हा बौद्धिक काम करतो. म्हणजे संगणक ऑपरेटर याचेही काम श्रम म्हणून मोजले जाते.

आपल्या भारत देशात जवळपास ५० कोटी युवक आहेत आणि ही आपल्या दृष्टीने जमेची बाजू आहे. ही मोठी संख्या हीच संधी ओळखून समाजविकास आणि राष्ट्रविकास यामध्ये त्यांचा कसा सहभाग घेता येवू शकेल याबाबतच्या काही मौलिक सूचना खालील प्रमाणे.

आपली शिक्षण पद्धती: आपली शिक्षण पद्धती आपल्याला फक्त आपला शैक्षणिक पाया भक्कम करून देते हे आपण विसरता कामा नये. म्हणजे बघा नुसता घराचा पाया रचून ठेवला आणि घर बांधले नाही तर त्या घराचे मूल्य शून्य होते हे एकंदर तसे आहे. आपण एकदा पदवी किंवा पदव्युतर पदवी हस्तगत केली असेल तर मी म्हणेल तुमचा फक्त पाया रचून होतो. बरेच लोक असा समज व गैरसमज करून घेतात की शैक्षणिक क्षेत्रात पदवी किंवा पदव्युतर पदवी मिळवली की आपले काम पूर्ण झाले. आता काही पहायची आणि करायची गरज नाही, आता मायबाप सरकारने किंवा कोण्याएक सरकारी किंवा खाजगी संस्थेने अथवा अस्थापनाने आपल्याला नोकरी द्यावी असा विचार केला जातो. वास्तविक शिक्षण पूर्ण करणारे युवक यांची संख्या व उपलब्ध होणारे रोजगार व स्वयं रोजगार संधी याचे असणारे व्यस्त प्रमाण तसेच भारतीय युवकांच्या ठायी असलेला कौश्यल्याचा अभाव त्यामुळे चक्रवाढ पद्धतीने बेरोजगारी वाढत जाते. साहजिकच या पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे जर राज्यात २० लाख मुले सरासरी जन्माला येत असतील त्यातील इयत्ता १० वी मध्ये १८ लाख विध्यार्थी, इयता १२ वी मध्ये १४ लाख विध्यार्थी आणि पदवीधर म्हणून १० लाख मुले दर वर्षी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असतील आणि सरते शेवटी पदवीधर झाल्यावर फक्त ३ लाख मुले कौशल्य आणि तांत्रिक विषयक शिक्षण आत्मसाद करत असतील तर इतर ७ लाख पदवीधर हे कोणत्या व्यवस्थेमध्ये सामावून घ्यायचे हा मोठा यक्ष प्रश्न आहे. त्यासाठी त्यामुळे युवकांनी आपले विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतांना खालील महत्वाची कौशल्ये आत्मसाद करून आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण बनवले पाहिजे.

  1. Comprehension Skills (आकलन कौशल्ये)
  2. Interpersonal Skills (वैयक्तिक कौशल्य)
  3. Communication Skills (संभाषण कौशल्य)
  4. Logical Reasoning (तार्किक कौशल्य)
  5.  Analytical Ability (विश्लेषणात्मक क्षमता)
  6. Decision-Making (निर्णय घेणे क्षमता)
  7.  Problem-Solving (समस्या सोडवणे कौशल्य)
  8. General Mental Ability (सामान्य मानसिक क्षमता)
  9. Basic Numeracy (मूलभूत संख्या अर्थ लावणे)
  10. Data Interpretation (महितीचा अर्थ लावणे)

अशा प्रकारची कौशल्य आत्मसाद केली की युवक एक मानवी संसाधन किंवा कौशाल्यधीष्टीत मानवी भांडवल म्हणून तयार होतो आणि या मानवी संसाधन व मानवी भांडवल याची गुंतवणूक देशाच्या विकासास हातभार लावते. त्यासाठी प्रत्येक युवकाने शिक्षण चालू असतांना अथवा ते पूर्ण झाल्यावर लगेचच प्रक्टीकल कौशल्य आत्मसाद केले पाहिजे व ही एक अनिवार्यता आहे. जगाच्या हा बाजारात आपले नाणे हे वाजवायचे असेल तर आपण आपल्या विषयात पारंगत असायला हवेच. त्या सोबत आपण बदलत्या युगाप्रमाणे काळाची पावले ओळखून विविध कौशल्ये हस्तगत करायला हवीत. याबाबतीत शहरात राहणारे तरुण हे काही अंशी सुदैवी असतात असे म्हणायला वाव आहे. उपलब्ध असलेले वातावरण, आजूबाजूचा परिसर, कौटुंबिक सहकार्य व विविध पर्याय यामुळे हे तरुण लवकर कौशल्य आत्मसाद करून आपल्या पायावर उभे राहून एक स्थिर व चांगले आयुष्यास सुरुवात करतात. या उलट ग्रामीण भागातील युवक सुयोग्य वातावरण नसल्याने व योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कौशल्य आत्मसाद करण्यात मागे राहून जातात आणि भरकटत जातात. सबब युवकांनी व विशेषतः ग्रामीण युवकांनी जर आयुष्यात रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त करून स्वताच्या पायावर उभे राहायचे असेल तर आपले व्यक्तिगत कौशल्य आत्मसाद करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. खरे पहिले तर, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच युवकांनी स्वतः मध्ये विविध कौशल्ये वृद्धिंगत करण्यावर भर दिला पाहिजे. परंतु असे होत नाही पदवी किंवा पद्व्वूतर शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि अनेक ठिकाणी ठोकर खाल्यावर अर्थातच २४ किंवा २६ व्या वर्षी कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. तेंव्हा बर्‍यापैकी वेळ निघून गेलेली असते. सबब विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना युवकांनी कौशल्य विकसित कशी करावी यावर प्रकाश टाकूया.

व्यक्तिमत्व विकास : व्यक्तीमत्व विकास हे सुधा एक कौशल्य असून त्या बाबत युवकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. यात आपले संभाषण कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. यात सोय व सुविधा असेल तर जाणीव पूर्वक इंग्रजी संभाषण कौशल्य आत्मसाद करण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून बदलत्या युगाला सामोरे जाण्यास युवक सज्ज होतील. आपले संभाषण व वत्कृत्व कौशल्य आपण विकसित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेवून त्यात उत्तरोतर प्रगती घडवून आणली पाहिजे. त्या नंतर आपले ड्रेस कोड, उभी राहण्याची व चालण्याची पद्धती यावर सुद्धा पण जाणीव पूर्वक काम करायला हवे. जेणेकरून कौशल्य विकासाची पहिली पायरी ही आपली व्यक्तीमत्व विकास आहे हे मित्रांनी लक्षात घ्यावे.

पदवी व पदव्युतर शिक्षण :असे दिसून येते की युवक आपली पदवी अथवा पदव्युतर शिक्षण पूर्ण करत असताना आपली पदवीचे किंवा पदवीत्तर पदवीचे प्रमाणपत्र आपल्या पदरात पाडून घेणे येवढा संकुचित विचार करतात. त्या अनुषंगाने महाविध्यालयातील शैक्षणिक सत्र व क्लासला उपस्थित न राहणे व परीक्षेच्या काही दिवस फक्त परीक्षा पुरता अभ्यास करणे. अशा प्रकारची शिक्षण पद्धती अवलंब करून फक्त पदवी व पदव्युतर प्रमाणपत्र मिळवतात. आता मी पदवीधर झालो. आता मी एकदाचे सुटलो अशा प्रकारची पलायन भावना त्यांच्या मध्ये दिसून येते. साहजिकच ते ‘पास झालेले असतात पण स्पर्धेतून बाद झालेले असतात’. कारण कोणतेही कौशल्य आत्मसाद न झाल्याने त्यांच्या अधोगतीला सुरुवात झालेली असते आणि ते अजून नैराश्याच्या गर्तेत सापडतात. एकीकडे घरच्यांचा दबाव व एकीकडे वाढते वय याच्या फटीत ते सापडून निराश होवून जातात आणि व्यवस्थेला दोष देत बसतात. लोक म्हणतात ना की ‘शिक्षणाने हा हुकला’ ते यामुळेच. वास्तविक युवकांनो आपण ज्या शिक्षणाचा स्विकार केला आहे त्यात चांगले मार्क तर मिळवायचे आहेतच, त्या बरोबर आपल्याला नाविन्यपूर्ण काय देता येईल?, काय करता येईल? याचा विचार साकल्याने व सातत्याने होणे आवश्यक आहे. त्या साठी फक्त परीक्षा पुरता अभ्यास न करता थेअरी सोबतच प्रक्टीकॅल काय करता येवू शकेल यावर चिंतन युवकांनी करायला हवे.उदाहरण देयचे झाल्यास तुमचा विषय इतिहास असेल तर तुम्ही किल्ले, महत्वाच्या चळवळीची ठिकाणे, संग्रलाय या सारख्या ठिकाणी जावून याबबत अधिक माहिती घेवून त्यावर संशोधन   करू शकता. तोच भूगोल मधील मृदा विकास हा विषय असेल असेल तर याबाबत तुम्ही फक्त पुस्तकी शिक्षण घेता स्वतः विविध क्षेत्राला भेट देवून माती तपासणी, मातीचे गुणधर्म, त्या मातीत येणारी पिके, पाणी धारण क्षमता, मातीत असलेली मुलद्रवे याबाबत  प्रत्यक्ष काम करू शकता. सांगायचे तात्पर्य एवढेच की फक्त पुस्तक व परीक्षा एवढा संकुचित विचार न करता पुस्तकी ज्ञान हे वस्तुस्थितीशी व परिस्थितीशी कसे ताडून पाहता येईल व त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग कसा होवू शकेल याबाबत युवकांनी विद्यार्थी दशेतच चिकित्सक असायला हवे

संगणक विषयक कौशल्य :आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. संगणक व स्मार्ट फोन हे आता खूप महत्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्या मुळे युवकांनी संगणक बाबत संपूर्ण माहिती घ्यायला हवीच.  त्या सोबतच विविध अप्लीकेशन चा वापर त्यांना करता येयला हवा. उदाहरण द्यावयाचे झाल्यास Microsoft Word, Excel, ppt इत्यादि मध्ये आपल्याला विध्यार्थी दशेतच कामकाज करता आले पाहिजे. तसेच मराठी व इंगर्जी संगणक की बोर्ड टायपिंग आपल्याला किमान २० शब्द प्रती मिनिट या स्पीडने यायला हवी आहे. यासाठी तुम्ही स्वतः शिकू शकता अथवा याबाबत अत्यंत अल्प दरात आपल्याला विविध Institute मधून याबाबत  Certificate Courses चालवले जातात. त्यामुळे संगणक शिक्षण हि काळाची गरज आहे आणि त्यात येणारे नवीन तंत्रज्ञान याबाबत आपल्याला अद्ययावत माहित असायला हवी.

वाहन चालवणे व पोहणे : चारचाकी वाहन चालवता येणे हे सुधा एक महत्वाचे कौशल्ये आहे. त्यासाठी पण विध्यार्थी दशेतच यात पारंगत होयला हवे, तसेच विविध वाहन विषयक कायदे व नियम याची माहिती तुम्हाला असायला हवी. शक्य असेल तर यात आपण व्यावसायिक क्लास जॉईन करून याबाबत लायसन्स मिळवू शकतो. तसेच पोहता येणे ही एक आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. या अनुषंगाने हे शिकून घेणेसाठी युवकांनी योग्य प्रकारे प्रयत्न करणे आवश्यक आहे

शारीरिक कसरत अथवा व्यायाम व खेळ  :आपले व्यक्तिमत्व हे शारीरिक कसरती व व्यायाम यामुळे अजून खुलून दिसते. त्या मुळे आपण चालणे, पळणे, व्यायाम करणे, योग, प्राणयाम, ध्यानधारणा या बाबत कौशल्य शिकून घेणे आवश्यक आहे आणि त्याचा अंगीकार दैनंदिन जीवनात केला पाहिजे.

ऑनलाइन कोर्सेस: सध्याच्या हा संगणकीय युगात अनेक ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. यात काही फ्री तर काही पेड आहेत. मात्र आपली आवड व सवड विचारात घेवून आपण हे कोर्सेस शिकू शकतो. याचा निश्चितच फायदा आपल्याला भविष्यात होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास यात कोर्सेरा, उडेमी, लायंडा या संकेत स्थळांचा उल्लेख करत येवू शकेल यात विविध लँग्वेज, कोडींग, व्यवस्थापन स्किल्स इत्यादी कोर्सेस आपण पूर्ण करू शकतो.

औद्योगीक प्रशिक्षण संस्था : औद्योगीक प्रशिक्षण संस्था ज्याला आपण ITI असे म्हणतो तेथे आपल्यासाठी जवळपास ९५ प्रकारचे ट्रेड आता उपलब्ध असून त्यातील काही ट्रेड हे ८ वी पास साठी काही १० वी पास साठी तर काही १२ वी पास साठी आहेत.तसेच यातील काही कोर्सेस हे एक ते दोन वर्षाचे आहेत. राज्यात ITI प्रशिक्षण देणाऱ्या ४१७ शासकीय व ५५४ खाजगी संस्था आहेत. या संस्था मार्फत दर वर्षी १,३९,००० विध्यार्थी यांना प्रवेश दिला जातो. या बाबत तुम्ही Directorate of Vocational Education and Training चे संकेतस्थळ पाहू शकता. त्या मुळे जर आपण इयता १० वी अथवा १२ वी असतांना आपली परिस्थिती व बुद्धिमता विचारात घेवून याबबत उचित निर्णय घेतला तर याबबत आपण एक विशेष कौश्यल्य असलेले मनुष्यबळ तयार होवू शकतो. पण असे दिसुन  आले आहे कि योग्य नियोजन व अचूक मार्गदर्शन नसल्या मुले १२ पास झाल्यावर १० वी च्या बेस वर तर पदवीधर झाल्यावर १२ वी च्या बेसवर ITI ला  अडमिशन घेतले जाते. या मुळे वर्ष तर वाया जातातच शिवाय या युवकांमध्ये एक अपमानाची भावना तयार होते.

कृषी महाविद्यालये: महाराष्ट्र कृषी शिक्षन व संशोधन परिषद मार्फत राज्यात चार विद्यापीठे, ३३ अनुदानित कृषी महाविद्यालये, १५६ कायम स्वरूपी विना अनुदानित महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात कृषी कृषी अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्यपालन, अन्न तंत्रज्ञान, वनीकरण ,गृहविज्ञान,फळबाग, रेशीम पालन पदवी कोर्सेस शिकवले जातात. या विविध महाविद्यालयात दर वर्षी साधारणपणे १२००० मुलांना प्रवेश दिला जातो. या सोबत कृषी तंत्र पदविका २ वर्षाचा कोर्स ,कृषी तंत्रज्ञान पदविका ३ वर्षाचा कोर्स, कृषी विज्ञान पदविका २ वर्षाचा कोर्स, माळी प्रशिक्षण १ वर्षाचा कोर्स  यासाठी १० वी उत्तीर्ण व माळी साठी ९ वी उतीर्ण आवश्यक आहे. या साठी कृषी तंत्र निकेतन संस्था राज्यात अस्तित्वात आहेत. हे कौशल्य आधारित कोर्सेस असल्याने याचा फायदा भविष्यात निश्चितच होतो .

अभियांत्रिकी महाविद्यालये: महाराष्ट्रात ५१० अभियांत्रिकी महाविद्यालये  तर ५९९ पोलितेचनिकल विद्यालये आहेत.राज्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यास क्रमाच्या एकूण १,३८,००० जागा दर वर्षी भरल्या जातात तसेच अभियांत्रिकी पदविका याच्या १,४२,००० जागा दर वर्षी भरल्या जातात. वास्तू विशारादकच्या ५२५५, फार्मसीच्या १४०००, हॉटेल व्यवस्थापनच्या६००, MBAच्या  ३४०००, MCA /BCA ७३०० जागा भरल्या जातात. तात्पर्य हेच कि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यात आपल्याला चांगला स्कोप आणि भविष्य असून जवळपास ३,००,००० ते ३,५०,००० जागा राज्यात दर वर्षी उपलब्ध होत आहेत .

वैद्यकीय महाविद्यालये: मेडिकल महाविध्यालयात MBBS व  BDS सध्या राज्यात साधारण ८००० जागा दरवर्षी भरल्या जात आहेत. BHMS , BAMS,BUMS च्या राज्यात ५००० जागा दरवर्षी भरल्या जात आहेत. म्हणजे मेडिकल क्षेत्रात दरवर्षी सर्व साधारण १५००० प्रवेश होत असतात.

उद्योजकता आणि रोजगार : राज्यात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग कार्यरत असून या विभाग बाबत इत्यंभूत माहिती युवकांकडे कडे असणे मला अभिप्रेत आहे. या विभाग मार्फत पंडित दीनदयाळ रोजगार मेळावे दरवर्षी आयोजित केले जातात. ऑटोमोबाईल, बँकिंग,  विमा , वित्त,  बांधकाम , हार्डवेअर व होम , केमिकल्स, फार्मास्युटिकल्स इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर,  फूड प्रोसेसिंग,  जेम्स  व ज्वेलरी,  हस्तकलेचे साहित्य, चामड्याच्या वस्तू,  मिडिया, करमणूक, प्रसारण सामग्री, ट्रॅव्हल,  ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स,  वेअरहाउसिंग आणि पॅकेजिंग, असंगठित क्षेत्र या सारख्या नामवंत क्षेत्रातील कंपन्या , संस्था व अस्थापना या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून कौश्याल्यधीष्टीत युवकांची निवड करतात व त्यांना रोजगार मिळवून देतात.आपले शिक्षण, आपले कौशल्य व आपला अनुभव या आधारे आपली नोंदणी संकेत स्थळावर करता येते. आज पर्यंत संकेत स्थळावर २० लाख जोब सिकर्स ची नोंदणी झाली आहे. जवळपास १६००० नियोक्त्या कंपन्या संस्था व अस्थापना यांची नोंद करण्यात आली आहे. आज पर्यंत या संकेत स्थळ मार्फत योग्य समन्वयान व नियोजन करून ६ लाख व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या साठी युवकांनी,  सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी संपर्क साधावा व आपली नोंदणी करून घ्यावी.

कौशल्य विकास आणि स्वयं रोजगार: कौशल्य विकास साठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत १९०४ VTP केंद्रे, दीनदयाळ अन्तोदय योजना किंवा शहरी उपजीविका अभियान  अंतर्गत २९३० केंद्रे , जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ८१७ , खाजगी कौशल्य विकास केंद्र राज्यात अंतर्गत १७८ आहेत. CSR अंतर्गत ११६ केंद्रे आहेत, प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत ३०४ केंद्रे आहेत, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ची १६ केंद्रे राज्यात आहेत. महत्वाचे कौशल्य विकास कोर्स मध्ये आपण टायपिंग , संगणक ओपेरटोर , फिटर , वेल्डर, टर्नर tally , इलेक्त्रीसियान , ऑटो कॅड  , प्रोग्रामिंग असिस्टनस , मोटार मेकानिक , डीझेल मेकानिक , अकौन्तानांत , डेटा ओपारेतोर, ड्रायवर , बांधकाम पर्यवेक्षक , स्तेनोग्रफेर , संगणक सोफ्त्वेयार , संगणक हर्द्वेअर  अशा प्रकारचे असंख्य कौशल्य आपण आत्मसाद करायला हवे. या केंद्रावांवर विविध प्रकारच्या ९८ सेक्टर मध्ये कौशल्य विकास घडवून आणला जातो

अशा प्रकारे युवकांनी पारंपारिक शिक्षण पूर्ण करत असतानी शिक्षणाच्या अनुरूप आपल्या स्वत:च्या मध्ये किमान कौशल्ये विकासीत करणे हे पुढील काळात अनिवार्य व अत्यावश्यक ठरणार आहे. त्यासाठी विध्यार्थी दशेतच व विशेषतः उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर याबाबत गंभीर होवून विचार केला पाहिजे व अशी विविध कौशल्य आत्मसाद केली पाहिजेत. तसेच अशी कौशल्ये आपल्या पाल्यांमद्धे वृद्धिंगत होण्यासाठी पालक, शिक्षक आणि आप्तेष्ट यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात आजचा युवक आपले अस्तित्व विविधांगी कौशल्ये आत्मसात करूनच टिकवू शकतो. शेवटी एवढच सांगावे वाटते “परिस्थिती कधीही अडसर नसते अडसर असतात विचार, विचार बदला परिस्थिती बदलेल”.

५७/१०१ दिनांक १२.०१.२०२३

जीवन विषयक व्यवस्थापन कौशल्ये ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७