भविष्याची बीजे हि भूतकाळाच्या जमिनीतच रुजतात

भविष्याची बीजे हि भूतकाळाच्या जमिनीतच रुजतात
𝐓𝐡𝐞 𝐬𝐞𝐞𝐝𝐬 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐟𝐮𝐭𝐮𝐫𝐞 𝐚𝐫𝐞 𝐫𝐨𝐨𝐭𝐞𝐝 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐬𝐨𝐢𝐥 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐩𝐚𝐬𝐭
 
सर्वसाधारण आपल्या आयुष्याची वर्गवारी तीन कालखंडात अथवा कालावधीत होते. आपले जे आयुष्य सरले तो भूतकाळ, जे उरले तो भविष्यकाळ आणि ज्या परिस्थितीत सध्या आपण जगतो, तो आपला वर्तमानकाळ होय. भूतकाळावरची पकड आपली सुटलेली असते वर्तमान काळात आपण चाचपडत असतो आणि भविष्याबद्दल मोठी अनिश्चितता आपल्यामध्ये असते. आजच्या लेखात आपण आपला भूतकाळ हाच वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा आधार आणि मार्गदर्शक असतो याबाबत विचारमंथन करणार आहोत.
 
क्षणागानिक आणि दिवसागणिक वर्तमानकाळ भूतकाळात बदलत असतो. व्याकरणाच्या भाषेत सांगायचे तर आधी साधा, मग चालू आणि नंतर पूर्ण भूतकाळामध्ये घटना मागे मागे पडत जातात. असा भूतकाळ जरी सरलेला असला तरी तो अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर निश्चितच प्रभाव आणि परिणाम साधत असतो. आपली विचारप्रक्रिया आणि आपले वागणे हे भूतकाळात घडलेल्या अनेक गोष्टीचा परिपाक असते यात शंका नसावी. वर्तमान काळ आपल्या काबूत आणि हातात असला तरी भूतकाळात मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि कौशल्ये यावरच आपली वाटचाल सुसह्य होत असते हेही विसरता कामा नये. त्याच्याच जोरावर पुढे येणारा भविष्यकाळ आपल्याला नवी उमेद आणि आशावाद दाखवत असतो.
 
मात्र असे दिसून येते कि आपण लोक भूतकाळाला खूप सहज घेतो अथवा त्याला विसरून जात असतो. भूतकाळ हा आपल्या अपयशाची आणि झालेल्या चुकांची काळ कोठडी आहे असेही आपण समजत असतो.एकंदर भूतकाळात घडलेल्या घटनांचे न केलेले विश्लेषण हीच आपल्या वर्तमानकाळातील दु:खाचे आणि अपयशाचे कारण आहे. काही लोक तर वर्तमान काळातील दु:खाचे आणि अपयशाचे खापर सारासार त्यांच्या भूतकाळावर फोडून मोकळे होत असतात. एकंदरच भूतकाळावरील पकड जेवढी सैल तेवढी आपली पुढील वाटचाल धीमी होत असते. भूतकाळाला निम्न अथवा नगण्य समजण्याची चूक आपण वारंवार करत आलो आहोत. यामुळे काय होते कि आपण आपल्या वर्तमान काळाला अजून तकलादू बनवत राहतो आणि भविष्याला अंधारमय बनवतो.
 
प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आणि वाईट घटनांचा भूतकाळ असतो.असा भूतकाळ हा तसं पहिले तर आपले काम आणि कर्तुत्वाने लिहिला जात असतो. मात्र अशी हि भूतकाळातील सोनेरी, रुपेरी आणि चंदेरी पाने आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण बंदिस्त करून ठेवलेली असतात. त्यामुळे कधी कधी निवांत क्षणी आपण यातील एक एक क्षण पण हळुवार उलगडून पाहायला हवीत त्यांचे सिंहावलोकन आणि विश्लेषण करायला हवे. अशी पाने चाळताना आपल्या चुका आपले अपयश हे आपल्यालाच उमजते. घडलेल्या घटना, आपले वागणे आणि आपली भूमिका याचे अवलोकन आपण करतो. आपण तसे का वागलो आपण तसा निर्णय का घेतला याबाबत आपल्याला निरीक्षण आणि परीक्षण करता येते. भूतकाळ हा कधीच वाईट नसतो तर वाईट असतात आपले तत्कालीन विचार आणि वागणे.
 
त्यामुळे नेहमी भूतकाळाला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर चिंतन करायला हवे. आपला भूतकाळ हाच आपला पाया आहे तो कधीही भक्कम असणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. भविष्याची बीजे हि भूतकाळाच्या जमिनीत वर्तमान काळातच पेरली आणि रुजवली जातात. जेवढा भूतकाळ सुपीक तेवढे आपण अधिक भविष्यामध्ये बहरतो आणि यशस्वी होतो. म्हणून भूतकाळाला समजून घ्या त्याचे परीक्षण आणि विश्लेषण करा आणि साधे,सोपे,सरळ,सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगा.
 
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.
 
०२६/१०१ दिनांक २७.०८.२०२१
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७