पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष टाळा ! Avoid Prejudice, Misunderstanding and Hate!

पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष टाळा ! Avoid Prejudice, Misunderstanding and Hate!

      माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. तो समाजात जन्माला येतो, त्या समाजात मोठा होतो आणि त्या समाजात नष्ट होतो. या वैशिष्टपूर्ण अशा समाजात तो आपले एकंदर जीवन व्यतीत करत असतो. असे जीवन व्यतीत करत असताना समाजातील अनेक लोकांसोबत त्याचा सहसंबध आणि परिचय येत असतो. या सहसंबंध मध्ये त्याचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र किंवा कामाच्या ठिकाणी काम करणारे त्याचे सहकारी यांचा समावेश होतो. या सर्वांसोबत त्याचे वैयक्तिक आणि आंतरवैयक्तिक संबध काळाच्या ओघात निर्माण झालेले असतात आणि त्यातूनच एक वेगळा बंध अथवा नाते त्यांचे आपापसात निर्माण झालेले असते. मात्र हे संबध आणि नाते कधीच एकसमान आणि एकसारखे नसतात तसेच ते बदलणारे आणि चढउतार असणारेही असतात. हे संबध एकसमान, एकसारखे राहत नाहीत किंवा त्यात बदल अथवा चढउतार होतात यामागे सर्वात महत्वाची कारणे असतात ती म्हणजे एकमेकाविषयी असलेला पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष होय. पूर्वग्रह,गैरसमज आणि दोष या मुळे परस्पर सहकार्य आणि समभाव संपुष्टात येवून वैयक्तिक आणि सार्वजनिक उत्पादकता आणि उत्पादन यामध्ये कमालीची घसरण होते. साहजिकच वैयक्तिक पातळीवर असो किंवा व्यावसायिक पातळीवर निर्माण होणारे पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष याला थारा न देणे अत्यावश्यक आणि अनिवार्य ठरते. प्रस्तुत लेखात पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष काय आहेत? ते कसे निर्माण होतात? ते निर्माण झाल्याने नुकसान कसे होते ? ते होवू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी? अशा अनेक बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

माणूस हा तसा समजून आणि उमजून घेण्यास खूप क्लिष्ट असा प्राणी आहे. त्यामुळे इतर प्राणी त्याला जसे घाबरून आणि दचकून राहतात त्या पेक्षाही एक माणूस दुसर्‍या माणसापासून जास्त घाबरून आणि दचकून राहतो. याचे सूत्र मानवाच्या गुणसूत्रात दडले आहे. फार पूर्वी माणूस हा अगदी लहान लहान टोळ्यांनी राहायचा. एक टोळी ही दुसर्‍या टोळीसोबत कायम संघर्ष करायची. हा संघर्ष अपरिहार्य होता  कारण जगणयसाठी आवश्यक असणारे संसाधने आणि विशेषत: अन्न याचा कायम तुटवडा असे. त्यामुळे एका लहान टोळी पुरता परस्पर समभाव असला तरी त्या टोळीच्या बाहेर कायम दुजाभाव असे. मागील बारा हजार वर्षात शेतीने मानवाला स्थर्ये दिले आणि मागील अडीचशे वर्षात उद्योगाने गती दिली तर मागील चाळीस वर्षात माहिती तंत्रज्ञानाने त्याला उंच भरारी दिली. यामुळे सर्वात मोठी गोष्ट घडली ती म्हणजे परस्पर सहकार्यात झालेली मोठी वाढ होय. या परस्पर सहकार्याच्या जोरावर मानवाने अंतराळाला गवसणी घातली तर समुद्रावर प्रभुत्व सिद्ध केले. असे असले तरी आपल्या गुणसूत्रात दडून राहिलेला परस्परविषयी असलेला पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष हा कधी कधी हळू हळू डोक वर काढत असतो. आणि मानवाला मानवाच्या मानवीय पातळीवरून खाली ओढण्याचे काम करत असतो. त्यातून माणसाचे माणूसपण याचा लोप होवून माणूस निम्नतम पातळीवर पोहचतो.

पूर्वग्रह म्हणजे एखाद्या व्यक्ति विषयी केलेली आणि अपुर्‍या माहितीवर आधारित असलेली पूर्व कल्पित भावना अथवा विचार होय. पूर्वग्रह हा एक संकुचित आणि अपूर्ण असा विचार प्रवाह असतो. पूर्वग्रह हा माहिती आणि ज्ञान याचा अभाव असल्याने तयार होतो. तसेच आपली इतरांबाबत विचार करण्याची सवय कशी आहे. तसेच समाजाप्रती आपला दृष्टीकोण कसा आहे. यावरही पूर्वग्रह अवलंबून असतो. काही लोकांना सर्व काही वाईट दिसते यातील हा प्रकार आहे. जेवढे आपण इतरांबाबत संकुचित विचारसरणीचे असू तेवढा पूर्वग्रह वाढीस लागतो. पूर्वग्रह हा दोन प्रकारचा असतो एक असतो. पहिला म्हणजे दुसर्‍याने सांगितलेल्या ऐकीव माहिती वर आधारित असणारा आणि दूसरा असतो तो आपल्या विचारातून निर्माण झालेला. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी जिल्हाधिकारी यांना भेटायला जायचे आहे. अशा वेळी जर कोणीतरी ते जिल्हाधिकारी हे अत्यंत खडूस आणि कडक शिस्तीचे असून ते कोणाचेही काहीही ऐकून घेत नाहीत असे संगितले असेल तर आपल्या मनात जिल्हाधिकारी यांच्या विषयी पूर्वग्रह निर्माण होवून आपण त्यांची भेट घेण्याचे टाळतो. अगदी सहज होणारे काम अशा अपुर्‍या माहितीच्या आधारे पूर्वग्रह करून घेतल्याने होयचे राहून जाते.

पूर्वग्रह आणि गैरसमज यात फरक आहे. पूर्वग्रह हा पुढे होणार्‍या एखानद्या गोष्ट, घटना आणि व्यक्ति बाबत असू शकतो, मात्र गैरसमज हा पूर्वी घडलेले किंवा नुकत्याच झालेल्या घटनेबाबत असतो. गैरसमज हे अपुर्‍या आणि चुकीच्या माहितीवर आधारलेले असतात. तसेच जेवढे ज्ञान कमी तेवढे गैरसमज वाढतात. तुमचा दृष्टीकोण आणि वर्तणूक कशी आहे यावरही गैरसमज अवलंबून असतात.तुम्ही जगाकडे कोणत्या नजरेतून बघतात यावरही गैरसहज अवलंबून असतात. गैरसमज हा अग्निसारखा असतो त्याला जेवढी नकारात्मक विचाराची हवा मिळेल तेवढा तो वाढत जातो. आपला स्वभाव हा जर संकुचित असेल तर गैरसमजाचे बांडगुळ लवकर वाढते. गैरसमज झाला की आपल्याला चांगलं आणि वाईट आणि खरे खोटे यातील फरक समजून येत नाही. गैरसमजाचा अंधार गडद असतो त्यामुळे आपल्या दृष्टीला काहीच दिसत नाही, जे दिसते ते सर्व काळे आणि गडद असते. समज आणि गैरसमज यातील भेद असा आहे की, जो समज चुकीच्या समजुती मधून होतो त्याला गैरसमज म्हणावे. चुकीच्या समजुती म्हणजे वस्तूस्थितीच्या विपरीत असा दृष्टीकोण होय. एखाद्या साडीच्या दुकानात साड्या ह्या साधारण दर्जाच्या असून दुकानदार त्या खूप महाग विकतो असा गैरसमज आपला होतो. शरद कडे उसने पैसे मागितले मात्र शरदने त्याचा पगार झाला नाही असे सांगून उसने पैसे देण्याचे नाकारले. सुनीलने अगोदर महाबळेश्वरच्या ट्रीपला येण्यासाठी होकार दिला मात्र ऐनवेळी त्याची तब्बेत बरी नाही असे सांगून नकार दिला. दुकानदाराचे साड्या महाग देणे, शरद ने उसने पैसे नाकारणे आणि सुनील ने ट्रीपला नकार देणे या बाबत आपल्या मनात तिघांबद्दल गैरसमज निर्माण होतो. कारण आपण वस्तुस्थिती नक्की काय आहे? हे पडताळून पाहिलेले नसते. अपुर्‍या माहितीच्या आधारे तिघेही चूक आहेत, असा आपण गैरसमज करून घेत असतो. कदाचित हे तिघेही बरोबर असूही शकतात. तुम्ही जर सर्व समावेशक असाल आणि इतरांचा विचार करणारे असाल तर गैरसमज तयार होत नाहीत.

द्वेष हा परस्पर स्पर्धेतून आणि पुढे जाण्याच्या इर्षेतून निर्माण होतो. आज आपण पाहतो की जिकडे तिकडे स्पर्धा झाली आहे. आपली नोकरी, आपला व्यवसाय आणि आपला उद्योग टिकवायचा असेल तर स्पर्धा करण्याशिवाय गत्यंतर नाही अन्यथा आपण बाहेर आणि दूर फेकले जाण्याचा धोका कायम असतो. साहजिकच ही स्पर्धा आणि पुढे जाण्याची उर्मी द्वेष निर्माण करते. एकदा द्वेष निर्माण झाला की त्याचे पर्यावसन हे तिरस्कार मध्ये होते. अशा प्रकारे वाढत जाणारा द्वेष आणि त्यातून निर्माण झालेला तिरस्कार हा परस्पर सहकार्य तर संपुष्टात आणतोच त्या पुढे जावून समोरच्याचे अजून नुकसान होवून तो अजून खाली खडयात कसा जाईल याची कट कारस्थाने रचली जातात आणि त्याची अंमलबाजवणी सुद्धा केली जाते. यातून त्या व्यक्तीचे नुकसान होतेच, परंतु त्याचे कुटुंब, त्याचा समाज आणि शेवटी देशाचे मोठे नुकसान होत असते. साहजिकच परस्परांविषयी असणारे द्वेष आणि त्यातून निर्माण होणारा तिरस्कार हा राष्ट्रीय स्वरूपाचे नुकसान करणारा ठरतो.

अशा प्रकारे पूर्वग्रह करून घेणे, गैरसमज वाढवणे आणि द्वेष निर्माण होणे या तिन्ही बाबी आणि गोष्टी ह्या एक दुसर्‍याशी संबधित असल्या तरी त्याचे विपरीत असे परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य यावर होतात. याबाबत तोच तोच विचार मनात सारखा डोकावत असल्याने विचारांचा मारा होवून विचारशक्ती क्षीण होते अथवा बिघडते. तसेच विचार हे सर्व साधारण प्रती दिवस ६०,००० असतात ते ८०,००० च्या पुढे गेले की आपण काय करतोय याचे आपल्याला भान राहत नाही आणि आपण विचाराच्या खोल दरीत फसतो. तसेच पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष यातून आपण आपल्याशी या ना त्या कारणाने जोडलेले लोक कमी करत असतो. लोक हळू हळू तुटत असल्याने किंवा आपण तोडत असल्याने आपल्यापासून किती लोक तुटत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. साहजिकच हे असे कायम होत गेले तर काही वर्षानी आपल्या जवळ एकही माणूस राहत नाही किंवा एकही माणूस फिरकत नाही किंवा माणस तुमच्या जवळ येण्यास टाळाटाळ करायला लागतात. साहजिकच सहसबंध आणि सहकार्य कमी झाल्याने आपली स्व:तची विकास आणि प्रगती याला ते मारक ठरते. पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. आपल्यासोबत कोणीतरी चुकीचे वागतय या विचारातून आपल्याला एकीकडे राग तर एकीकडे दु:ख होण्यास सुरुवात होते आणि आपण अजून भावना विवश होतो. ज्या व्यक्ति बाबत गैरसमज झाला आहे. ती व्यक्ति आपल्या जवळची किंवा खूप दिवसापासून आपल्याशी जोडलेली असेल तर त्याचे जास्त विपरीत परिणाम आपल्या भावनिक आरोग्यावर होतात.

अशा प्रकारे पूर्वग्रह, गैरसमज आणि द्वेष हे आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करत असल्याने ते होणार नाहीत किंवा झाले तरी त्यातून कसे बाहेर पडायचे यावर काम करावे लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे आपला इतरांप्रती असलेला दृष्टीकोण होय. दृष्टीकोनाचे दोन प्रकार असतात एक असतो डोळस आणि आंधळा आणि दूसरा असतो सकारात्मक आणि नकारात्मक. जग वाईट आहे किंवा जग सुंदर आहे असाही विचार आपल्यात मनात आणि विचारात असतो. साहजिकच यामुळे पूर्वग्रह निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे कोणत्याही बाब, गोष्ट आणि व्यक्ति याबाबत पूर्वग्रहीत राहायचे नाही असा ठाम निश्चय आपल्या विचारात करावा लागतो. आयुष्य सुंदर आहे, जग चांगले आहे, मी सकारात्मक आहे. आपल्या आसपास असणारी माणसे वरुन फणसासारखी काटेरी दिसत असली तरी आतून मृद आणि गोड आहेत हा विचार कायम मनावर रुजवावा लागतो. पूर्वग्रह हा वस्तुस्थितीला कधीच धरून नसल्याने तो मी कोणा बाबतही करून घेणार नाही असे मनाशी ठाम करावे लागते.

गैरसमज हा अपुरी माहिती आणि ज्ञान यातून तयार होतो. झालेली घटना आणि निदर्शनास आलेली बाब ही मी नेहमी वस्तुस्थितीशी पडताळून पाहणार. मी इतर अनेक पर्याय मार्फत ती व्यक्ति आणि घटना याबाबत माहिती घेणार. जे काही आहे, तो समज असेल किंवा गैरसमज की जो योग्य पद्धतीने पडताळला गेला आहे याची खात्री करणार. अपुर्‍या माहितीच्या आधारे गैरसमज निर्माण करून घेणार नाही. शक्य असेल तेवढी पडताळणी करणे आणि शक्य नसेल तर सकारात्मकता ठेवून माफ करणे अथवा विषय सोडून देणे हा उपाय बराच फलदायी ठरतो. अनेक चुकीच्या आणि अनावश्यक गोष्टी आपण आपल्या विचारात आणि मनात धरून बसतो त्यामुळे इतर महत्वाच्या गोष्टी आणि कामे राहून जातात किंवा ती पूर्ण करण्यात आपली गती कमालीची कमी होते. त्यामुळे गैरसमज हे होणारच नाहीत. मग ते दुसर्‍याचे आपल्या बद्दल आणि आपले दुसर्‍याबद्दल यावर आपण काम सुरू करू.

पूर्वग्रह आणि गैरसमज याची परिणीती द्वेष मध्ये होते. द्वेष निर्माण झाला की आपण त्या व्यक्तिला शक्य होईल तेवढा त्रास देण्याचा किंवा त्याला अडचणी येतील त्या साठी कट कारस्थाने रचतो. यामुळे आपल्या भावनिक आणि मानसिक पातळीवर उलथा पालथ होतेच मात्र अशी कट कारस्थाने रचण्यात आपला बरचसा वेळ खर्च होतो आणि हाती काही लागत नाही. त्यामुळे द्वेष उत्पन्न होणार नाही अशी आपली वर्तन, वागणूक आणि दृष्टीकोण ठेवा आणि द्वेष निर्माण झालाच तर अगदी शक्य होईल तितक्या लवकर तो आपल्या मनपटल वरुन पुसून टाकावा

एकंदर पूर्वग्रह, गैरसमज आणि यातून निर्माण होणारा द्वेष आपल्या दैनदिन अशा जीवनशैलीत अडथळे आणि अडचणी निर्माण करून आपला आनंद, आपले सुख, आपला विकास आणि आपली प्रगती याला मारक ठरतात. त्यामुळे पूर्वग्रह हा आपल्या आयुष्यातून काढून टाकणे आवश्यक ठरते. जेथे गैरसमज झाला आहे तेथे वस्तुस्थिती काय आहे? किंवा असे कसे झाले? याची डोळस आणि वस्तुस्थितीदर्शक पणाने तपासणी आणि पडताळणी करून घेणे आवश्यक ठरते. एखांदा चुकीचा वागला असेलही तरी त्याच्या बाबत जास्त काळ गैरसमज धरून न ठेवता माफ करणे आणि सोडून देणे या उपायाचा वापर करावा. द्वेष हा अग्नि सारखा आहे तो पुढच्याला जाळत असताना आपल्यालाही जाळून टाकतो म्हणून आपल्या मनातील इतरांबाबत असणारा द्वेष कमी करणे आणि शेवटी तो काढून टाकणे अनिवार्य ठरते. अशा प्रकारे पूर्वग्रह काढून टाकून, होणारे गैरसमज पडताळून पाहणे आणि द्वेषाला आपल्या मनातून हद्दपार करून एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगता येते.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया

६४/१०१ दिनांक २०.०४.२०२३

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७

.