दु:खाची तीव्रता कमी करूया !
दु:खाची तीव्रता कमी करूया !
मानवाच्या गळ्यातून सप्त सुर जसे बाहेर पडतात अगदी तश्याच मानवी मनातून सुद्धा सात भावना बाहेर पडतात. या मूळ सात भावनांमध्ये आनंद, दु:ख, राग, द्वेष, भीती, आश्चर्य आणि प्रेम यांचा समावेश होतो. तसेच या सात मूळ भावनांचे संयोजन आणि संयोग होवून अजून पस्तीस उपभावना आपल्या मनात तयार होत असतात. मानवी मन हे मेंदूच्या परिसरात वास आणि वास्तव्य करते. मनातील विचार प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणार्या भावना आपली मानसिक आणि शारीरिक जडणघडण, आपले वागणे आणि वर्तणूक आणि स्वभाव यावर बर्याच अंशी प्रभाव टाकत असतात. प्रस्तुत लेखात आपण दु:ख या मूळ भावनेबद्दल विस्तृत माहिती घेवून त्याचे मूळ शोधण्याचा आणि दु:खाचे हरण कसे करायचे याची माहिती घेणार आहोत.
दु:खाकडे नकारात्मक भावना म्हणून आपण पाहत आलो आहोत आणि त्यामुळे दु:ख होवूच नये किंवा ते टाळण्याचा आपण अतोनात प्रयत्न करत असतो. वास्तविक दु:ख ही सात भावनांपैकी एक असून ती तिचा प्रभाव वेळोवेळी ती दाखवत असते. उदाहरण दाखल सांगायचे झाल्यास आपल्या मामाच्या काकांचा मृत्यू झाला तर त्याचे दु:ख मामाच्या चुलत भावांना अती जास्त, मामाला आणि आपल्या आईला जास्त, तर आपल्याला कमी होते. एखादी वस्तू हरवली तर त्याचे दू:ख ज्याची मालकीची होती त्याला जास्त तर आपल्याला कमी होते. एका वर्गात एक शिक्षक एका समान कारणामुळे ‘अ’ विध्यार्थ्याला रागवला आणि नंतर ‘ब’ विध्यार्थ्याला रागवला तर ‘अ’ आणि ‘ब’ ला होणारे दू:ख सारखेच आणि एकसमान नसते. एखानदी गोष्ट अथवा वस्तु एखांद्याला मिळाली आणि आपल्याला मिळाली नाही म्हणूनही दू:ख होते. अगदी जवळचे उदाहरण पहायचे गेल्यास वडील आपल्या दोन मुलांना एकाच विषयावरून रागावले अथवा ओरडले तर होणार्या दु:खाची तीव्रता दोघांचीही वेगळी वेगळी असते. असे का होते? तर प्रत्येक व्यक्तींची अंतर्गत आणि बाह्य मानसिक जडणघडण आणि त्या घटनेचा किंवा घटकाचा त्या व्यक्तीशी सहसंबंध यावर दु:खाची तीव्रता अवलंबून असते. एकंदर मानवी दू:ख हे अनेक घटक आणि घटना याचे आकलन आणि समज आहे, तसेच त्या घटना आणि घटक यांचा आपल्याशी सहसंबध कश्या प्रकारे होतो त्यावरही दु:खाची तीव्रता अवलंबून असते.
दू:ख काय आहे, तर ती एक मनातून येणारी किंवा निर्माण होणारी भावना आहे. मात्र ही भावना निर्माण होण्यामागे अनेक कारणे असतात. आपल्या जवळील कोणी तात्पुरते किंवा कायमचे सोडून गेले तर दू:ख होते. आपल्याला जे मिळणे अपेक्षित होते, ते मिळाले नाही की दुःख होते. आपल्याला एखांद्याचे अपेक्षित असलेले वागणे असते;तसे झाले नाही की दुःख होते. अशी दु:खाची अनेक रुपे आहेत. तसेच दु:ख होण्यामागचे अजून एक महत्वाचे कारण हे की, दु:ख आणि तणाव, त्रास, द्वेष, तिरस्कार, हेवा, मत्सर, लालसा, मोह यात भेद न करता येणं होय. ही सर्व दु:खाची रुपे आहेत असे समजून आपण दु:ख करत राहतो आणि आपल्या दु:खाची तीव्रता वाढत जाते. एकंदर दू:ख हे अनेक घटक आणि घटना यांचा परस्परसंबंध आणि त्यांचा आपल्याशी सहसंबंध यावर अवलंबून असते.
दु:ख हे आपण किती प्रमाणात बाह्य घटक आणि घटना यांच्या संपर्कात आणि सहवासात येतो त्यावर अवलंबून असते. मात्र आपल्या मनाची एकाग्रता आणि शक्ति ह्या घटकांना आणि घटनांना कशा प्रकारे हाताळते यावर दु:खाची तीव्रता अवलंबून असते. सध्याच्या सोशल मीडिया च्या जगात आपले संपर्क आणि सहवास जास्त झाले आहेत आणि मनाची शक्ति आणि एकाग्रता कमालीची ढासळली आहे त्या मुळे माणूस दु:खी होत आहे. नुसती प्रगती आणि विकास करून भागत नाही, तर त्यासाठी आपल्या मनाची एकाग्रता आणि शक्ती ही समप्रमाणात वाढवावी लागते.
आपण पाहतो की जगात जिकडे तिकडे दुःख पसरले आहे. वास्तविक मागील पाच शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी मानवी जीवन सुखकर आणि आरामदायी करण्याचा अतोनात प्रयत्न केला आहे. तरीही मानवी समाजात दु:खाचे साम्राज्य पसरले आहे. हा विरोधाभास नाही का ? माणूस उत्क्रांत पावत असताना त्याच्यात आवश्यक शारीरिक बदल झाले, तसे त्याच्या मन आणि बुद्धीत सुद्धा आवश्यक बदल झाले. साहजिकच विज्ञान आणि तंत्रज्ञानाला गती दिली ती या मन आणि बुद्धीनेच. मानवी शरीराची जरी शक्ती काही मर्यादित स्वरूपाची असली तरी मात्र मानवी मन आणि त्याची बुद्धी याची शक्ती अमर्यादित स्वरूपाची आहे. मानवी मन हे एका दिवसात ६०००० ते ८०००० विचार निर्माण करते आणि आपला मेंदू हा २५ लक्ष जीबी डाटा प्रक्रिया करून साठवून ठेवू शकतो. असे असले तरी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती आणि विकासाची गती आणि आपल्या बुद्धीची आणि मनाची गती यात तफावत झाल्याने आपण वारंवार दु:खी होत आहोत.
बुद्धीचा आधार घेवून मनाने निर्माण केलेले विचार हे जाळातून निघालेल्या धुरासारखे असतात ते जेंव्हा किंवा उलट अथवा विरूद्ध दिशेने जातात तेंव्हा ते दु:खाचा खोखला निर्माण करतात. दु:ख आणि इतर सर्व भावना ह्या तश्या पहिल्या तर धुरा सारख्या असतात आणि काळानुसार त्या विरळ होत जातात आणि माणसाचे दू:ख कमी कमी होत जाते. त्या मुळे आजच्या दु:खाची तीव्रता आज खूप अती जास्त असेल तर ती उद्या जास्त राहते परवा मध्यम राहते आणि नंतर कमी कमी होत जाते. त्यामुळे होणारे दु:ख कितीही तीव्र असो ते धुराप्रमाणे किंवा धुक्याप्रमाणे विरळ होत जाते, याची खूनगाठ मनाशी पक्की केली की, दु:खाचा त्रास आपल्याला कमी होतो आणि तीव्रता सुद्धा कमी होते. आपल्याला वाईट, नाकारत्मक, न आवडणार्या गोष्टीचे आकलन होते. त्यानुरूप बुद्धी आणि मन यातून निर्माण झालेली विचारप्रणाली याला आपण जेंव्हा अडथळे करतो अथवा थांबवतो तेंव्हा तेथे ती परावर्तीत होवून पुन्हा मन आणि बुद्धी कडे जाते आणि दु:खाची तीव्र भावना निर्माण होते. त्यामुळे असे अडथळे निर्माण करणे टाळायला हवे.
मानवी मन विलक्षण आणि गुंतागुंतीचे आहे. ते जर एवढे गुंतागुंतीचे नसते तर माणूस दु:खाने वेडा होवून नामशेष झाला असता. मात्र हीच गुंतागुंत अनेक प्रकारची मोठी दु:खे विरघळून टाकते. भावना ह्या सर्व माणसांच्या ठायी त्यांच्या मनाच्या कुप्पीत भरलेल्या असतात. प्रसंगानुरूप त्या बाहेर येतात आणि आपला प्रभाव दाखवतात. काही लोक मात्र त्यांच्या मनातील सात कुप्यातिल असणार्या भावनांपैकी काही भावनांची कुप्पी खोलतच नाहीत. त्यामुळे त्या भावना आतल्या आत गडद होतात आणि मन, मेंदू आणि शरीर यावर आघात करतात. त्यामुळे आपल्याला दू:ख झाले तर ते आपण दाबून न ठेवता त्याची कुप्पी खोलून त्याला वाट करून द्यायला हवी तरच त्याची तीव्रता कमी होईल आणि आघातही कमी होतील. दु:खदायक भावना निर्माण होणे, त्याची कुप्पी उघडणे आणि दुःखाची तीव्रता कमी कमी होत जाणे ही एक साधारण अशी मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. ती फक्त आपण योग्य प्रकारे हाताळण्याचे कसब अंगी आणायला हवे.
आता कसब काय आहे ? हे पाहूया. या कसब मध्ये दु:खाचे मूळ शोधणे खूप आवश्यक ठरते. म्हणजे दू:ख का झाले हे शोधणे आवश्यक आहेत. काही लोक दु:खाचे मूळ न शोधता फक्त दु:खाचा धूर बाहेर उत्सर्जित करत राहतात. माझे प्रोमोशन झाले नाही ?याचे दू;ख करत बसण्यापेक्षा ते का झाले नाही हे शोधणे जास्त उचित राहते. माझ्याकडे कार नाही? हे दू:ख करत बसण्यापेक्षा मी कार का खरेदी करू शकलो नाही? आणि त्यासाठी मी काय करू हे शोधणे उचित राहते. माझे बायको सोबत पटत नाही याचे दू:ख करत बसण्यापेक्षा मी माझे आणि तिचे संबध आणि माझी वर्तणूक, वागणूक आणि स्वभाव यात काही दोष आहेत का? हे शोधणे जास्त हितावह ठरते.
एकंदर दु:ख ही एक साधारण भावना आहे. ती विविध घटक आणि घटना आणि त्यांचा आपल्याशी सहसंबंध यावरून मनातून निर्माण पावते. ह्या भावनेला योग्य वाट करून देणे आणि ती विरघळवणे अथवा विरळ करणे आवश्यक असते. आपले संपर्क आणि सहवास आणि आपल्या मनाची शक्ति आणि एकाग्रता हे समप्रमाणात विकसित करावे लागते. दुखा:चा नुसता धूर काढण्यापेक्षा त्याचे मूळ शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणेही तितकेच आवश्यक असते. याप्रकारे दु:खाबाबत अधिक दक्ष राहून आणि ते दाबून न ठेवता त्याला मोकळी वाट करून देवून एक सरळ, साधे, सोपे, सुटसुटीत आयुष्य आपण जगू शकतो.
जीवन अनमोल आहे, ते अधिक सुंदर करूया !!
०२८ /१०१ दिनांक ०२.१०.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई
९९७०२४६४१७