खेड्यांमधील स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता Self reliance and self sufficiency in Indian villages

खेड्यांमधील स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता (Self reliance and self sufficiency in Indian villages)

             आधी खेडे तयार झाली आणि नंतर खेड्यांचे मिळून राष्ट्रे तयार झाली. ब्रिटीशांनी भारतात प्रवेश करण्यापूर्वी स्वराज्य संकल्पना अस्तीत्वात असली तरी राष्ट्रवाद उदयास आला नव्हता. साहजिकच खेडे आणि त्यातील सामान्य माणसांचा खूप कमी संबंध बाहेरच्या जगाशी येत असे. आज सारखी अतिविकसित संपर्क साधने त्या काळी तर निश्चितच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे परमुलखात काय चालले आहे, याची खबरबात गावातील सामान्य जनतेपर्यंत पोहचत नसे. गावाचा गाडा हाकणारे जे काही वतनदार, गाव कामगार आणि जमीनदार असत त्यांनाही सर्व घडामोडीची इत्यंभूत माहिती असेलच असेही नव्हते. सहाजिकच या मुळे अनेक गोष्टी गावात सुरू होवून गावातच संपत असत. गाव हेच एक महत्वाचे कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक उलाढालीचे केंद्र बनलेले होते. त्यामुळे मानवी जीवन आणि त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टी, बाबी आणि घटना याची रेलचेल गावातच पाहायला आणि अनुभवायला मिळत असे. एकंदर भारतीय खेडी ही परिस्थितीनुरूप स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अशी होती. प्रस्तुत लेखात स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता हे लादलेले होते, की स्विकारलेले, त्यातून गाव गाडा कसा चाले, त्यात कोणते प्रकार होते, त्यातले गुण आणि दोष काय होते? आणि ही स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता का नष्ट झाली? या अशा अनेक बाबीचा आपण ऊहापोह करणार आहोत.

होमो सेपियन किंवा आपण त्याला शहाणा मानव म्हणतो त्याचा साधारण कालावधी एक लाख वर्षापासून सुरू होतो. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत या मानवाचा मेंदू विकसित होत गेला आणि मेंदू विकसित झाल्याने त्यातून कुतूहल निर्माण झाले. या कुतूहल मुळे त्याचे आकलन क्षमतेत वाढ झाली. त्यातून तो विचार करू लागला. भावना प्रकट करू लागला. कल्पनाशक्तीला वाव देवू लागला. या विचाराच्या आधारे होणार्‍या सुयोग्य कृतीतून तो त्याचे खडतर जीवन सुसह्य करू लागला. हळू हळू परस्पर सहकार्य वाढीस लागल्याने तो समूह करून राहू लागला. यातूनच हळू हळू लहान वस्त्या आणि त्यातून लहान खेडी निर्माण झाली. निश्चितच हा प्रवास जवळपास ९० हजार वर्षाचा होता. म्हणजे खेडी अगदी १२००० वर्षापूर्वी अविकसित स्वरुपात अस्तीत्वात आली असे म्हणणे चूक ठरणार नाही.       राजस्थान येथील उत्खनन मध्ये कलिबंगा हे इ.स.पू ४००० पूर्वीचे नगर आढळून आले आहे. म्हणजे वेद पूर्व काळात आपल्या देशात विकसित असे गाव/नगर अस्तीत्वात होते याला पृष्टी मिळते. इ.स.पू.२५०० च्या सुमारास आपल्या देशात प्राचीन सिंधु संस्कृती अस्तीत्वात होती. त्याच सोबत या काळी हडप्पा, मोहेंजोदारो, ‎‎लोथल‎‎, ‎‎कालीबांगन‎‎, ‎‎धोलाविरा‎‎ आणि ‎‎राखीगढी‎‎ ही मोठी शहरे अस्तित्वात होती.तर यांच्याशी जोडलेली अनेक खेडी सुद्धा अस्तीत्वात होती.

या खेड्यांमद्धे राहणारे लोक आणि त्यांचे परस्पर सहकार्य हे अत्यंत शिस्तबद्ध होते. त्यांच्यामध्ये महिला आणि पुरुष ही श्रम विभागणी होती. पुरुषांनी शिकार करणे, कंदमुळे जमा करणे, ही कामे करायची आणि महिलांनी  मुलांची काळजी घेणे, आणलेली शिकार साफ करणे, कंद मुळे साफ करणे आणि त्याची साठवणूक करणे या प्रमाणे कामकाज चालत असे. शेतीचा शोध लागल्यानंतर मात्र समाज रचनेत मूलभूत बदल होण्यास सुरुवात झाली होती. श्रम विभाजन हे आता स्त्री पुरुष असे मर्यादित न राहता त्याची विभागणी आता कामानुसार होण्यास सुरुवात झाली होती. हळू हळू शेतीचा विकास होत गेला आणि मानव सुद्धा विकासाच्या प्रक्रियेत स्वार झाला. त्यातून नगरे आणि राजव्यवस्था तयार झाले. राज व्यवस्था तयार झाली तशी कामकाजाची वाटणी अजून विस्तारीत होत गेली. त्यातून अनेक जाती,वर्ग,गट उदयास आले आणि व्यापार आणि उदीम सुद्धा उदयास आला. असे असले तरी गावातील गरजा ह्या अत्यंत मर्यादित स्वरुपाच्या होत्या आणि त्या शक्यतो गावातच भागविण्याकडे सर्वांचा कल असे. त्यामुळे खेड्यांमद्धे असणारी गतीक्षलता अत्यंत मंद होती आणि जीवन अत्यंत संथ स्वरूपाचे होते. गती शांत आणि संथ असल्याने खेडी ही स्वयंपूर्णता केंद्र बनली होती. त्यामुळे राजे आणि राजवटी याबाबत गावातील सामान्य माणसाला झळ ही फारशी बसत नसे. त्यांच्या इश्चा आणि महत्वाकांक्षा अत्यंत अत्यल्प असल्याने बाहेरच्या घडामोडीचा त्यांच्यावर आणि एकंदर गावावर खूप मोठा परिणाम होत नसे.

प्राचीन कालखंड मध्ये जात व्यवस्था अस्तीत्वात आली असे मानले जाते. जात व्यवस्थेच्या उगम बाबत अनेक संशोधक यांनी आपल्या उत्पत्ती मांडल्या आहेत. आपली जाती प्रथा ही अत्यंत प्राचीन समजली जाते. तिचा नक्की उगम कधी झाला हे समजून येत नाही. मात्र जातसंस्था अस्तीत्वात येण्यापूर्वी समाज विविध जमाती आणि टोळ्या यामध्ये विभागलेला होता. व्यवसाय हेच जातीव्यवस्थेचे उगमस्थान आहे असे मानवजाती शास्त्रज्ञ होकार्ट सांगतात. जाती संस्था ही व्यावसायिक आणि पारंपारिक निर्बंध यामुळे खोलवर रुजली आणि दृढमूल झाली. जातिसंस्था ही वंश आणि परंपरेने पुढे जात राहते. आपल्या देशात तीन हजार जाती आणि उपजाती आहेत. गावात जे लोक राहत त्यांचा मुख्य विषय शेती हा असे. त्यांना कुणबी आणि मिरासदार असेही म्हणत. गावातील जे मुख्य लोक होते त्यांना यजमान आणि त्यांची सेवा करणारे जजमाणी असेही उल्लेख आढळतात. बलुतेदारी किंवा अलुतेदारी या पद्धतीला उत्तर परदेशात जजमाणी म्हणतात. वतने आणि बलुदे ह्या दोन सज्ञा त्या काळी लोकप्रिय होत्या. वतने हे गाव कामगार म्हणून काम करणार्‍या लोकांना मोबदल्यात दिले जात असे. बलुते मात्र गावात सेवा आणि वस्तु धान्याच्या मोबदल्यात पुरवले जात असे. जे धान्य पुरवले जाते त्याला बलुते म्हणत असत. या बलुतेदार यांना त्यांनी दिलेली सेवा आणि वस्तु याचा मोबदला वस्तु रूपात(धान्य) दिला जात असे. बलुतेदार म्हणजे निरनिराळे कारागीर-कामगार गावासाठी जी विशिष्ट सेवा करीत, त्याबद्दल त्यांना मेहनतान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून कायमस्वरूपी ठराविक धान्य मिळत असे. राजसत्ता बदलली, तरी स्थानिक कारभारात  विशेष फरक पडला नाही. फक्त राजनिष्ठेत फरक झालेला दिसतो. बलुतेदार किंवा अलुतेदार यांना पुरवण्यात येणार्‍या मोबदला हा परंपरेने आणि रीतिरिवाज प्रमाणे देय होत असे. शेतकरी यांना सरकार किंवा राजा याला शेतसारा धान्याच्या मोबदला देण्यास लागे. त्यामुळे शेतकरी सुगी मध्ये हा सारा आणि बलुते याचा हिस्सा बाजूला काढून ठेवत. बलुतेदार आणि अलुतेदार हे वंश परंपरा पद्धतीने असल्याने त्यांना शेतकरी शक्यतो कधीही फसवत नसत. साहजिकच या बलुतेदारी पद्धतीत एक जात दुसर्‍या जातीवर अवलंबून होती. तसेच एका जातीला दुसर्‍या जातीचे काम करण्याचा अधिकार नव्हता. बलुतेदार पद्धती विषयी अनेक उत्पती मांडल्या आहेत. आर्यांनी द्रविड लोकांकडून ही पद्धती स्विकारली असे डॉ.ए एस अळतेकर सांगतात. स्थानिक कारागीर यांना मोबदल देवून किंवा शेतसारा मुक्त जमीन देवून त्यांच्याकडून अनेक कामे, सेवा आणि वस्तु घेतल्या जात आणि गाव स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करत. या कारागीर किंवा बलुतेदार यांना स्वत:चे असे काही उत्पन्न नव्हते तर ते वाटेकरी होते.

आपल्या देशाच्या ग्रामीण भागात शेतकरी किंवा कुणबी किंवा मिरासदार संबोधले जाते. प्रत्येक खेड्यात शेतकरी आणि बिगर शेतकरी असे दोन गट पडत. यातील बिगर शेतकरी हा वर्ग किंवा गट हा शेतकर्‍यांना साह्यभूत ठरेल असे अनेक प्रकारचे व्यवसाय करत असे. जे व्यवसाय प्रत्यक्षपणे शेतीशी जवळचा संबध दर्शवतात त्यांना बलुतेदार असे म्हटले जाते. या बारा बलुतेदार यांच्या मध्ये खालील जातींचा समावेश होत असे

1)  महार : गावचे पहारेकरी किंवा रखवालदार म्हणून काम करत असत. सरकारी नोकराचे काम ते सांभाळत आणि गावकीची विविध कामे सुद्धा ते कामे करत. लग्न किंवा मृत्यू या वेळी सरपण ते देत असत, तसेच गाव स्वचता ते करत आणि सफाई कामगार म्हणून काम करत.

2)  मांग : शेतकरी यांच्यासाठी दोरखंड बनवणे हा मूळ व्यवसाय यांचा होता. त्या बदल्यात त्यांना मोबदला दिला जात असे. तसेच मांग हे सणसुदीला वाजंत्री म्हणून सुद्धा काम करत यावेळी त्यांना गावकरी गोड जेवण देत असत, सफाई कामगार म्हणून काम करत असत.

3)  चांभार : चपला किंवा विहीरीचे मोट यासारखी चमडे विषयक कामे हे लोक करत असतं. अनेक वेळा चांभार यांना गावातील लोकांकडून चामडे सुद्धा नाममात्र अशा दराने मिळत असे.

4)  सुतार : शेतीची औजारे बनविण्याचे कामकाज हे लोक करत, तसेच नाव, रथ, घराचे वासे आणि तुळई करण्याचे काम सुतार करत असत.

5)  कुंभार : मातीची भांडी आणि विटा बनवणे हा मुख्य असा व्यवसाय असे.

6)  न्हावी: केस कापणे, विशेष करून दशक्रिया विधीला केस कापणे ही सेवा दिली जात असे. जावळ काढणे काम करत.

7)  परीट : गावातील लोकांचे कपडे धुणे हा व्यवसाय यांचा असे.

8)  लोहार : लोखंडी अवजारे बनवण्याचे काम लोहार करत. विळे आणि चाकू किंवा लोखंडी औजारे हे लोहार तयार करत असत.

9)  ग्रामजोशी :पंचांग पाहणे,धार्मिक कार्यक्रम मुहूर्त पाहणे, पुजा,लग्न यात हे काम करत, तसेच ज्योतिष सुद्धा सांगत असत.

10) गुरव : गावदेवीच्या मंदिराची देखभाल आणि खेड्यात धार्मिक विधी करणारे गुरव होत.

11) सोनार : सोने व चांदीचे दागिने बनवणे तसेच टाकसाळ मधून नाणी पडणे ही कामे ते करत.

12) मुलांना : मशिदी आणि पीर यांची व्यवस्था ठेवणे बाबत हे कामकाज करत

या काळी अलुतेदार नावाचा दूसरा प्रकार होता. अलुतेदार यांची संख्या १८ असून हे शेतीशी तसे खूप जवळून प्रत्यक्ष संबध दर्शवत नाहीत. बलुतेदार यांना आरू तर अलुतेदार यांना कारू असे संबोधले जाते. या काळात शेतकर्‍याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत. अलुतेदार यांची मध्ये खालील जातींचा समावेश होतो.

  • कलावंत: गाणी म्हणणे, भविष्यवाणी करणे हे काम करत. एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आढळतात.
  • कोरव किंवा कैकाडी – उपण्या, टोपल्या, कणगुली, झाप, सलूद, कुडवे, कणगी तयार करणे ही कामे करत.
  • गोंधळी : देवीचा गोंधळ घालणारे गोंधळी हा लोककलाकार देवीची भक्ती गीते, लोककथा, प्रबोधनात्मक रचना ऐकवतात.
  • गोसावी: बैरागी किंवा भिक्षा मागून उदरनिर्वाह करनारे होत. या पंथातील लोक दान धर्मावर जगतात. यांना स्वतःचा खास असा काही व्यवसाय नसतो.
  • घडसी : हे विविध प्रकारची भांडी घडवण्याचे काम करत असत.
  • डवर्‍या : डवर्‍या गोसावी असेही संबोधले जाते.
  • तराळ : हे प्रवासी यांच्या समानाची वाहतूक करत असत.
  • तांबोळी :विडा पाने विकणारे होत.
  • तेली : तेलाचा घाना चालवणारे होत.
  • भोई : मासे पकडणारे होत.
  • माळी : फुलांचा व्यापार आणि व्यवसायकरणारे.
  • जंगम: धागा तयार करणे, कंठीमाळा तयार करणे, पुजा अर्चा करणे
  • वाजंत्री: सण आणि कार्यात वाजंत्री म्हणून काम करणे.
  • शिंपी : कपडे शिवण्याचे काम करत असत.
  • साळी/कोष्टी : विणकर विषयक कामकाज करत.
  • जागल्या: गावात कोणी प्रवासी आल्यास त्याच्या साहित्याची जागूनराखण करणार्‍याला जागल्या असे म्हणत
  • रामोशी : पहारेकरी ,हे पाटलाला मदत करत आणि गावातील चोरीचा तपास करत
  • कोळी : मासे पकडणे, पखाल वापर करून पाणी वाहून ते पुरवणे

तसेच अलुतेदार आणि बलुतेदार सोडून इतर काही जाती आपल्याला दिसून येतात त्या खालील प्रमाणे.

1)   कैकाडी: बुरुडा प्रमाणेच हे टोपल्या बनवतात. पण त्यासाठी करंज्याच्या बारीक फांद्या किंवा तरवड्याच्या ओल्या फांद्या वापरतात. घायपातापासून दोर बनवून विकतात.

2)   कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारे.

3)   गारुडी : हे साप, अजगर आणि नाग पकडतात आणि त्यांचे गावोगाव खेळ करतात.

4)   गोंधळी : अनेकजण घरात लग्नमुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावर यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावले जाते.

5)   जोगतिणी : या यल्लम्मा देवीला वाहिलेल्या स्त्रिया डोक्यावर देवघरात ठेवलेली देवीची मूर्ती किंवा छायाचित्र घेऊन गावोगाव आणि रस्तोरस्ती फिरत फिरत दान मिळवतात.

6)   डोंबारी : कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. कोल्हाट्यांनाच प्रामुख्याने कर्नाटकात डोंबारी म्हणतात.

7)   तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात.

8)   दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात.

9)   नंदीबैलवाला : गावोगावी जावून भिक्षा मागतात.

10) पांगुळ: स्वतःला सूर्याचा पांगळा सारथी अरुण याचे वंशज मानण्या‍ऱ्या भिकाऱ्यांची एक जात.

11) पोतराज: भटके भिक्षेकरी

12) फकीर: मुसलमान भटके भिक्षेकरी.

13) फांसेपारधी : डुकरे, ससे, हरणे, पाखरे असे शेतीला त्रासदायक असणारे पशुपक्षी, हे फासे लावून पकडतात.

14) बहुरूपी : बहुरूपी रोज एक सोंग घेऊन गावात येतो. हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतात.

15) बुरूड : बांबूच्या टोपल्या विणणारी माणसे. हे फक्त बांबूकाम आणि वेतकाम करतात. बैरागी : तोंडाला राख फासलेली हातात कमंडलू घेऊन भिक्षा मागणारे.

16) भराडी: भैरव उपासक आणि वाजंत्री

17) भुत्या: देवीचे हे भक्त गावोगाव फिरत दान मिळवतात.

18) मांगगारुडी : हे म्हशी भादरायचे काम करतात.

19) रामदासी: ही माणसे गावोगाव आणि शहरातील घरोघरी फिरून रामदासांच्या काव्यरचना ऐकवून दान मिळवतात.

20) लमाण: बैलावरून सामानाची वाहतूक करणारी भटकी जमात.

21) वडारी: गाढवावरून, माती, विटा आदींची वाहतूक करणारे आणि बाधकामात मजुरी करणारे.

22) वाघ्ये आणि मुरळ्या: हे जेजुरीच्या खंडोबाचे भक्त गावोगाव फिरून खेडुतांच्या कपाळाला भंडारा फासतात, त्यांना जेजुरीच्या खंडोबाची आण घालतात, आणि खंडोबाची गाणी म्हणत भिक्षा मागतात.

23) वासुदेव: अगदी पहाटे पहाटे कृष्णभक्तीची गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा गुणवान भिक्षेकरी.

24) वैदू: कंदमुळे आणि झाडपाल्याची औषधे विकणारे भटके वैद्य.

उपरोक्त १२ बलुतेदार, १८ अलुतेदार आणि इतर २४ जाती यांची सरळमिसळ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. काही जाती बलुतेदार मध्ये सापडतील तर काही त्याच जाती अलुतेदार मध्ये सापडतील. मात्र या सर्व जाती मध्ये एक धागा समान आहे की, ते भारतीय सामाजिक व्यवस्थेचे महत्वाचे अंग आहेत. या प्रत्येक जातीचा एक अंगभूत व्यवसाय असल्याने त्या आधारे गावांना स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता बनविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती हे मान्य करावे लागते.

मात्र ब्रिटिश आले नंतर मात्र बाहेरील जगाचे परिणाम खेड्यांवर जाणवायला लागले होते. काही तरी आपल्यावर आक्रमण होत आहे. आपल्यावर अत्याचार होत आहे. अशी भावना खेड्यातील सामान्य जाती मध्ये काही प्रमाणात तयार होत होती. ब्रिटिशांचे धोरण हे भारतातून कच्चा माल जमा करणे आणि त्याच्या बदल्यात पक्का माल येथील बाजारपेठेत आणून विकणे हे असल्याने खेडोपाडी असलेले बलुतेदार, अलुतेदार, उदीम, व्यवसाय, लहान मोठे उद्योग हे लयास आणि देशोधडीला मिळण्यास सुरुवात झाली होती. जे कारागीर, अलूतेदार आणि बलुतेदार होते त्यांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांची उपासमार होत होती आणि शेतकरी शेतसारा भरून भरून मेटाकुटीला आले होते. एकंदर हजारो वर्षात अस्तित्वात असलेले खेड्यांची स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता धुळीस मिळवण्याचे काम ब्रिटीशांनी केले होते. देश स्वतंत्र झालात्यावेळी ही व्यवस्था पुर्णपणे नष्ट झाली होती असे म्हणता येत नाही, मात्र मागील दीडशे ते दोनशे वर्षात ती मात्र खिळखिळी झाली होती. स्वातंत्र्यानंतरची पुढील ४० ते ५० वर्ष ही व्यवस्था तग धरून होती. मात्र झालेली औद्योगिक क्रांती, दळणवळण आणि संदेशवहन या मध्ये झालेली प्रगती तसेच आपण १९९१ साली स्वीकारलेले खाजगीकरण, उदारीकरण आणि जगतिकीकरण हे धोरण या मुळे ही व्यवस्था संपुष्टात येण्याकडे मार्गक्रमण सुरू झाले.

          भारतीय खेडी ही स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण असल्याने गावातील परस्पर समाजमध्ये एकरूपता, परस्पर बद्दल एक समभाव आणि सहानभूती होती. कोणी अडला आणि नडला तर त्याला जे मदत आणि सहकार्य मिळत असे, ते काळाच्या ओघात कमी कमी होत असल्याचे पाहावयास मिळते. समाज एककेंद्री आणि स्वार्थी झाला या मागे आपली संपुष्टात आलेली बलुतेदारी आणि अलुतेदारी हे एक महत्वाचे कारण ठरले. एकीकडे समाज एकसंध न होता तो दुभागला गेला यालाही संपुष्टात आलेली बलुतेदारी आणि अलुतेदारी हे कारण ठरले. शहराकडे होणारे स्थलांतर या बलुतेदार आणि अलुतेदार यांचे झाल्याने गावे ओस पडायला लागली. शहरीकरण वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आणि शहरात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी मोठ्या प्रमाणावर वाढली आणि ती वाढतही आहे. साहजिकच ‘गावांचा विकास हाच देशाचा विकास होय’ हे सूत्र समोर ठेवून संपूर्ण लक्ष या गावांकडे केद्रित केले तरच या परिस्थिती मध्ये काहीसा बदल संभवतो.

०२/०५१ दिनांक २१.०८.२०२२

गाव विकास ते राष्ट्र विकास ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७