कीटकाचे सात डोळे( 𝐈𝐧𝐬𝐞𝐜𝐭 𝐒𝐞𝐯𝐞𝐧 𝐄𝐲𝐞𝐬)

कीटकाचे सात डोळे( 𝐈𝐧𝐬𝐞𝐜𝐭 𝐒𝐞𝐯𝐞𝐧 𝐄𝐲𝐞𝐬)
          कीटक हा अगदी लहानसा जीव, तरी तो आपल्या अवती भोवती अत्यंत आत्मविश्वासाने वावरत असतो. पृथ्वीतलावरील सर्वात हुशार आणि अहंकारी असा माणूस, एका फटक्यात त्याचा मृत्यू घडवून आणू शकतो, याची त्याला जाणीव असूनही त्याचे वावरणे तेवढेच सहज असते. निश्चितच कीटकांची काही गुण वैशिष्टे हे त्याला या आत्मविश्वासासाठी आणि सहजपणे वावरण्यासाठी शक्ती प्रदान करतात. आपल्या ‘कीटकांची आश्चर्यकारक दुनिया’ या लेखमालेत आज आपण ‘कीटकांचे सात डोळे’ यावर डोळसपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपण लहान असतांना फुलपाखरू किंवा ड्रॅगनफ्लाय पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असेल. तसेच किचन मध्ये झुरळ अथवा माशीला मारण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला असेल. अत्यंत सावधपणे हा प्रयत्न आणि अचूक वार करून सुद्धा आपल्याला किमान ९० टक्के वेळा तरी अपयश आले असेल. असे का घडले? किंवा असे का घडते ? एवढा छोटासा जीव आपल्या हातून का? आणि कसा निसटतो? याचे उत्तर या कीटकांच्या ठायी असलेल्या त्यांच्या वैशिष्ट्य पूर्ण अशा सात डोळ्यांत आहे. चला तर या कीटकांच्या डोळ्यांबाबत माहिती समजून घेवूया.
कीटकांच्या डोळ्यांची माहिती घेण्यापूर्वी आपल्या डोळ्यांची माहिती आपण घेऊया. निसर्गाने आपल्याला दोन डोळे दिले असून ते आपल्या कवटीच्या समोरच्या बाजूस उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत. मानवाचे जे पाच ज्ञानेंद्रिये आहेत त्या पैकी डोळे हे एक महत्वाचे ज्ञानेंद्रिये आहे. डोळा हा एकूण तीन थरांनी बनलेला असतो. या थरांना बाहेरून आत अनुक्रमे श्वेतपटल, रंजितपटल आणि दृष्टिपटल अशी नावे दिलेली आहेत. डोळ्याचे मुख्य कार्य हे वस्तूचा आकार तपासणे, रंग विश्लेषण करणे, आकलन करून ज्ञानार्जन करणे, निसर्गाचे अवलोकन करणे, परिसरात घडोघडी होणाऱ्या बदलांची जाणीव करणे इत्यादी प्रकारची असतात. सज्ञात्मक ज्ञान किंवा आकलन हे मानवामध्ये डोळ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाच ज्ञानेंद्रिये मध्ये डोळ्यांचे स्थान हे खूप महत्वाचे ठरते.
           प्रत्येक सजीव प्राण्यांच्या दृष्टीने जसे डोळे त्याच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात तसे कीटकांच्या दृष्टीने सुद्धा डोळे महत्वाचे असून त्यांच्या जीवनचक्रात ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. मात्र कीटकांचे डोळे हे आपल्यासारखे साधे नसतात तर ते अत्यंत जटील पद्धतीचे असतात. जटील पद्धतीचे म्हणजे कीटकांचे डोळे हे संयुक्त प्रकारचे असतात किंवा त्यांना आपण कम्पाउंड किंवा बहुभिंगी डोळे असेही म्हणू शकतो. साधारणपणे एका कीटकाच्या डोळ्यात एक हजार पेक्षा जास्त भिंगे असतात त्यांना ऑम्मेटिडियम असेही म्हणतात. मानव प्राण्याला जसे दोन डोळे असतात तसे कीटकांना कमी अधिक प्रमानात विकसित झालेले सात डोळे असतात, हे सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे. यात दोन संयुक्त डोळे आणि तीन ओसिली म्हणजे लहान डोळे आणि अजून दोन आयलेट म्हणजे सूक्ष्म छिद्र डोळे कीटकांमध्ये दिसून येतात.
           मानवी डोळ्यांना एखांदी प्रतिमा दिसते म्हणजे काय होते ते आपण प्रथम समजून घेवूया. मानवी डोळ्याने आपण एखांदी वस्तू पाहतो तेंव्हा त्या वस्तूची प्रतिमा हि पारपटल म्हणजे कार्निया, बुबळ म्हणजे पुपील, नंतर नेत्रभिंग म्हणजे लेन्स असा प्रवास करून त्याची उलट प्रतिमा हि दृष्टीपटल म्हणजे रेटीना वर पडते आणि आपल्याला त्या वस्तूचा आकार आणि रंग याचा बोध होतो. किटकांमध्ये हा प्रवास मानवी डोळ्याप्रमाणे जरी असला तरी मानवी डोळ्यात एकच नेत्रभिंग म्हणजे लेन्स असते मात्र किटकांमध्ये अनेक नेत्रभिंग म्हणजे लेन्स असतात. मानवी डोळे आणि कीटकांचे डोळे यातील दुसरा महत्वाचा फरक म्हणजे मानवाच्या डोळ्यातील दृष्टीपटल म्हणजे रेटीना हे अंतर्गोल(Concave) असतो तर कीटकांचा दृष्टीपटल म्हणजे रेटीना हा बहिर्गोल(Convex) असतो. हि दोन्ही महत्वाची वैशिष्टेचा कीटकांना खूप फायदेशीर ठरतात. माणूस हा फक्त १८० अंश कोनात पाहू शकतो. मात्र कीटक हा ३६० अंश कोनात पाहू शकतो .हे शक्य होते ते वर नमूद केलेल्या दोन गुण वैशिष्ट्यामुळेच. त्यामुळे मानवा पेक्षा हि जलद रीतीने कीटक शिकाऱ्याच्या तावडीतून सुटका करून घेवू शकतात. तसेच या पुढेही सांगायचे कीटकांचे वैशिष्टे म्हणजे कीटक त्यांचा उजवा आणि डावा डोळ्याचा वापर करून त्यांचे भक्ष नक्की किती अंतरावर आहे याचा अंदाज बंधू शकतात आणि त्याचा अचूक वेध घेवू शकतात. म्हणजे भक्षाची अचूकता कीटकांमध्ये इतर कोणत्याही सजीव पेक्षा जास्त असते. जेंव्हा कीटक हवेत उडतात त्यावेळी त्यांचे संयुक्त डोळे आणि त्या मधील फोटो रीसेप्टर हे अचूक पणे भक्ष्याचा वेध घेवू शकतात. त्याच बरोबर कीटकांमध्ये काही प्रमाणात रंग ओळखण्याची सुद्धा क्षमता दिसून आली आहे. तसेच अचूकता हे सुद्धा कीटकांमध्ये दिसून येते म्हणजे प्रकाश कोणत्या बाजूला आहे तसेच पाणी कोणत्या बाजूला आहे हे सुद्धा कीटकांना समजू शकते.
          ओसिली किंवा आपण त्याला साधे डोळे म्हणू हे कीटकांमध्ये तीन असतात. कीटकांच्या दोन्ही संयुक्त डोळ्यांच्या मध्ये आणि मस्तकावर तीन लहान ठिपके दिसून येतात ते ओसिली होय. ओसिली हे मात्र एकच नेत्रभिंग असलेले साधे डोळे असतात. त्याचा वापर कीटक प्रकाश टिपण्यात करतात. म्हणून ओसिली डोळ्यांना फोटो रिसेप्टर असेही संबोधले जाते. संयुक्त डोळ्याप्रमाणे ओसिली डोळे जरी जटील प्रतिमा चा अर्थबोध करीत नसली तरी आजूबाजूच्या लहान सहान हालचाली टिपण्यात ओसिली डोळे मदत करतात. तसेच उड्डाण क्षितीज ठरवणे आणि उड्डाण नियंत्रण यात ओसिली महत्वाची भूमिका पार पाडतात. तसेच कीटकांच्या संयुक्त डोळ्यांच्या बाजूला एक आयलेट्स म्हणजे सूक्ष्म छिद्र डोळे असते ते सुद्धा कीटकांचे डोळे म्हणून आणि संयुक्त डोळ्यांना पूरक म्हणून कामकाज करत असतात. मात्र आयलेट्स प्रत्येक कीटकांमध्ये विकसित झालेली असेलच नाही.
आपल्या डोळ्यासारखी अत्यंत स्पष्ट आकृती जरी कीटकांच्या डोळ्याला दिसत नसली तरी दिसणाऱ्या अस्पष्ट आकृतीचे विश्लेषण तो जलद गतीने करू शकतो आणि निर्णय घेवू शकतो त्यामुळे कीटकांच्या हालचाली आपल्याला जलद गतीने पहावयास मिळतात. साहजिकच मानवी उत्क्रांती होत असतांना कीटकांच्या विविध प्रजातीमाधेही काही उत्क्रांती झालेली पाहायला मिळते. त्यामुळे दोन संयुक्त डोळे, तीन साधे डोळे आणि दोन सूक्ष्म छिद्र डोळे या आधारे कीटकांच्या पूर्ण विकसित प्रजाती आपला जीवनक्रम आत्मविश्वासाने पूर्ण करतात. कीटकांच्या अशा पन्नास लाख प्रजाती आणि त्यापैकी शोधल्या गेलेल्या दहा लाख प्रजाती ह्या नेहमीच मानवापुढे आव्हान उभे करून ठेवत आलेल्या आहेत. चला पुढील लेखात अजून या कीटकांविषयी जाणून आणि समजून घेवूया.
००५/०५१ दिनांक २३.११.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई
९९७०२४६४१७