कीटकांचे पुनरुत्पादन आणि आयुष्यमान Insects reproduction and longevity
कीटकांचे पुनरुत्पादन आणि आयुष्यमान Insects reproduction and longevity
मानव आणि कीटक यांचे सह अस्तित्व आपल्याला पदोपदी पहायला मिळते. शेतातला शेतकरी असो किंवा कार्यालयातील अधिकारी कीटकांचा त्यांच्या आजूबाजूला कायम वावर सुरू असतो. शेतात जेवण करत असताना शेतकऱ्याच्या ताटावर कधी मुंगी येईल याचा नेम नाही तसा कार्यालयात मिटिंग घेत असलेल्या अधिकाऱ्यांला डास कधी चावून जाईल याचा नेम नाही. आपण कितीही मुंग्या, मच्छर, झुरळे, माश्या इत्यादी कीटकांना मारले तरीही त्यांच्या संख्येत काडीमात्र फरक पडत नाही. हे कीटक संपत का नाहीत आणि त्यांच्या संख्येत कायम वाढ कशी होत राहते याबाबत आपण अनभिज्ञ असतो. साहजिकच कीटकांमध्ये पुनरुत्पादन कसे होते? कीटक किती अंडी देतात? किती वेळा अंडी देतात? पिल्ले कशी तयार होतात? ती कशी जगतात? कीटकांचे आयुष्य किती असते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत.
सृष्टीमधील तमाम जीव हे आपला वंश पुढे घेवून जाण्यासाठी जनन अथवा पुनरुत्पादन करत असतात. कीटकांची पुनरुत्पादन पद्धती पाहण्यापूर्वी आपल्याला मानवाची प्रजनन प्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. मादी आणि नर यांचे जेंव्हा मिलन होते. त्यावेळी नराचे शुक्राणूचे मादीच्या अंडाशय सोबत संयोग होवून गर्भ तयार होतो. असा गर्भ गर्भाशयात वाढून त्या पासून मूल तयार होते. या प्रक्रियेला साधारण ९ महीने लागतात. कीटकांचा पुनरुत्पादन आपण जेंव्हा माहिती घेतो त्यावेळी असे दिसते की बहुतेक कीटक हे अंडीच देतात आणि या अंड्यातून नवीन कीटक जन्माला येतो. आपल्याला नवल वाटेल की किटकामध्ये मानवासारखेच परंतु सूक्ष्म स्वरुपात जनन किंवा पुनरुत्पादन अवयव असतात. यामध्ये जनेंद्रिये, अंडाशय, शुक्राणू, यांचा समावेश होतो.
ज्यावेळेस कीटकांची नर आणि मादी यांचे मिलन होते. त्या वेळी नराने सोडलेले शुक्राणू म्हणजे पुरुषबीज याचा संबंध लगेच स्रीबीज सोबत न येता ते एका विशिष्ट अशा पिशवीत साठवले जातता त्याला स्पर्माथेसिया म्हटले जाते. यात अजून विशेष बाब म्हणजे किटकाच्या मादीच्या हातात असते की, कधी या शुक्राणू म्हणजे पुरुषबीजाचा वापर करून अंडी तयार करायची. म्हणजेच ज्या वेळी अंडी देण्यासाठी वातावरण अनुकूल असते त्यावेळेस ही कीटक मादी नर उपलब्ध नसतांना सुद्धा अंडी देवू शकते. मादी कीटक अंडी देण्यात खूप माहीर असतात. वाटेल तेथे आणि वाटेल तेंव्हा ते अंडी देत नसून जागेची आणि वातावरणाची निवड ते जाणीव पूर्वक करतात. जेथे अंडी इतर भक्ष्य कीटक अथवा प्राणी खाणार नाही अशा ठिकाणी ते अंडी देतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना पुरेसे अन्न मिळेल अशीही जागा ते निवडतात. त्यामुळे कीटकांची संख्या वाढत राहते आणि वाढत राहते.
कीटकांचे अंडी देण्याची शक्ती ही खूप अजब गजब आणि प्रजाती नुसार वेगवेगळी असते. आपल्याला सर्वात सतावणारा कीटक म्हणजे डास होय. डास मादी सरासरी ४०-५० दिवस जगते आणि १०० -५०० अंडी देते. तर नर डास सरासरी ७-१० दिवस जगतो. झुरळ हे एक ते दोन वर्षे जगू शकते. झुरळ मादी सरासरी १४-४८ अंडी तिच्या पूर्ण आयुष्यात देते. फुलपाखरू हे ३०-४० दिवस जगते तर मादी १००-४०० अंडी देते. राणी मधमाशी ही १-२ वर्ष जगते आणि १५०० ते २००० अंडी दर दिवशी देते. घरातील माशी १५-३० दिवस जगते आणि १२०-१५० अंडी देते. नाकतोडा हा जवळपास एक वर्ष जगू शकतो आणि त्याची मादी जवळपास १००-३०० अंडी देते. राणी मुंगी ५-२० वर्ष जगू शकते आणि ३ लाख अंडी देते. वाळवी राणी १५-२० वर्ष जगू शकते आणि ती २०-३० हजार अंडी देते. एकंदर कीटकांचे जीवन हे आपल्याला विस्मयचकित करते. काही कीटक हे महिनाभरही जगत नाहीत, काही कीटक हे एक ते दोन वर्ष जगतात, तर काही कीटक हे २० वर्षही जगू शकतात. विशेषत; सामाजिक कीटक जास्त दिवस आणि त्यात राणी कीटक जास्त दिवस जगतात.
कीटकांमध्ये त्याच्या जीवन वाढीचे दोन प्रकार दिसून येतात. काही कीटकांचा जीवनप्रवास हा अंडी, अळी, कोष आणि प्रौढ कीटक असा असतो, त्याला पूर्ण रूपांतरण अवस्थेचे कीटक म्हणतात. या मध्ये फुलपाखरू, डास, पतंग, रेशीमकिडा, मुंगी, मधमाशी यांचा समावेश होतो. तर काही कीटक मात्र प्रत्यक्ष लहान पिल्ले जन्माला घालतात त्यांना अपूर्ण रूपांतरण म्हणतात. अपूर्ण रूपांतरण मध्ये पिल्ले ही प्रौढ किटकासारखी दिसतात आणि ती तीन ते पाच अवस्था पूर्ण करून आपली कात टाकून प्रौढ होतात. या मध्ये झुरळ आणि नाकतोडा इत्यादी कीटकांचा समावेश होतो.
एकंदर सृष्टीतील प्रत्येक सजीवाचा जगण्यासाठी आणि आपला वंश वाढवण्यासाठी कायम संघर्ष चालू असतो त्याला कीटक तरी कसे अपवाद राहतील. पुनरुत्पादन आणि त्यातून आपली प्रजाती कायम ठेवण्याच्या या ३५० कोटी वर्षाच्या कालावधीत कित्येक जाती आणि प्रजाती नष्ट झाल्या आणि किती नवीन तयार झाल्या याची गणना नाही. असे असले तरी हा पुनरुत्पादनचा प्रवास निरंतर चालू आहे अगदी सृष्टीच्या अनिश्चित शेवटा पर्यन्त.
००६/५१ दिनांक ०४.०२.२०२२
कीटकांची आश्चर्यकारक दुनिया©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७