मनाचे स्वरूप आणि अस्तित्व The Nature and Existence of the Mind (Review Article)
मनाचे स्वरूप आणि अस्तित्व The Nature and Existence of the Mind (Review Article)
मानवी देह हा भौतिक आहे, तो स्पर्शग्राही आहे आणि तो सखोलतेने तपासताही येतो. मात्र मानवी मन हे अभौतिक असल्याने ते फक्त जाणून आणि समजून घ्यावे लागते. मानवी मन हे विचार आणि भावना यांना प्राथमिकरीत्या जरी जन्म देत असले तरी ते जाणीवा, प्रेरणा, संवेदना, आकलन, श्रद्धा, इस्चा, याबाबतही ते कामकाज करत असते. मानवी मन हे अनंत काळापासून मानवासाठी गूढ बनून राहिले आहेत. विविध ऋषीमुनी, धर्मगुरू, तत्ववेत्ते, संत, संशोधक यांनी आपल्या परीने हे गूढ शोधण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी अंतिम सत्य शोधन अजूनही होवू शकले नाही. मन हा शब्द ‘मनस’ या शब्दावरून तयार झाला आहे. तसेच या मनाला अंतकरण किंवा चित्त असे संबोधले जाते. मन आणि मेंदू असा वेगवेगळा विचार आपल्याला करता येत नाही. मन आहे तर मेंदू आहे आणि मेंदू आहे तर मन आहे. त्यामुळे त्यांच्यातील परस्पर संबंध वेगवेगळा करून त्याचा अभ्यास करणे शक्य होत नाही. मानवी मेंदू आणि मन, त्यांचा परस्पर संबंध ,मनाचा उगम, मनाचे स्थान, मनाचे कार्ये आणि मन आणि मेंदू याच्याशी निगडीत विविध बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
मानवी मन बाबत जाणून घेतांना आपल्याला वैदिक काळामधील मनाबद्दलच्या विविध संकल्पना आधी समजून घ्याव्या लागतात. वेदिक काळ हा ख्रिस्तपूर्व १५०० ते ५०० असा समजला जातो. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे चार वेद आहेत. या प्रत्येक वेदांचे एकूण चार भाग पडतात. यात संहिता, ब्राह्मणे, अरण्यके आणि उपनिषदे यांचा समावेश होतो. वेदांची संहिता म्हणजे देवांची स्तुती आणि आराधना याबाबत माहिती होय. वेदांची ब्राह्मणे म्हणजे यज्ञविधींची माहिती होय. वेदांची अरण्यके म्हणजे विविध विधीमार्ग याबाबत माहिती होय. वेदांचे उपनिषदे म्हणजे तत्वविचार आहे. वेदांमध्ये ईश्वर, सृष्टी, शरीर, आत्मा आणि मन याबाबतचे विवेंचन दिसून येते. जैन तत्वज्ञान आणि बुद्ध तत्वज्ञान यात सुद्धा मन आणि आत्मा यावर चिंतन आणि प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रीक आणि रोमन तत्ववेत्ते यांनी मन आणि शरीर यातून द्वैतवाद संकल्पना मांडली होती. यात शरीर आणि मन असे दोन वेगळे मूलद्रवे किंवा पदार्थ आहेत असे मानले जाते. दुसरी संकल्पना हि भौतीकवादाची होती. यात शरीर किंव मेंदू हे जसे मूलद्रवे अथवा पदार्थ पासून बनले आहे तसे मन सुद्धा पदार्थ पासून बनलेले असावे असा हा विचार होता. सॉक्रेटिस यांचा असा विश्वास होता कि मन आणि शरीर हे वेगवेगळ्या पदार्थ पासून बनलेले आहेत. प्लेटोने असे मत मांडले कि शरीर आणि आत्मा हे भिन्न आहेत. प्लुटोचा मानवी इंद्रिये यांच्यावर मात्र विश्वास नव्हता. कारण इंद्रिये जसे दिसेल तशी कल्पना करेल, मात्र मन तसे नाही असे त्याचे मत होते. मनाच्या माध्यमातून सत्याचा उलगडा होवू शकतो असे प्लुटो म्हणत असे. ज्या गोष्टी दिसतात तश्या त्या नसतात त्यासाठी तर्कशुद्ध आत्मपरीक्षण आवश्यक आहे, असे तो सांगे. अंतकरण मधूनच म्हणजे मनातूनच सत्य साधन होवू शकते. प्लेटोच्या शिष्यांपैकी एक म्हणजे ॲरिस्टॉटल होय. ॲरिस्टॉटलने प्लेटोचे रूपांचे क्षेत्र नाकारले आणि असा युक्तिवाद केला की, ही रूपे म्हणजे वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी लोकांनी तयार केलेल्या संकल्पना आहेत. सतराव्या शतकात थोमस हॉब्स यांनी असे मांडले कि आपण फक्त भौतिक गोष्टीच्याच कल्पना करू शकतो. जी गोष्ट अभौतिक आहे, जसे मन आणि आत्मा याच्या कल्पना आपल्याला करता येत नाहीत. आपल्या शरीरात काही तरी आहे कि जे संवेदन, गती आणि हालचाल देते ते म्हणजे आत्मा किंव मन होय. या हॉब्सला समकालीन दुसरा विचारवंत होता रेने देकर्ते, याने १६४१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या पहिल्या तत्त्वज्ञानावरील चिंतनात देकार्तने असे सुचविले की, मन भौतिक पदार्थांपेक्षा तीन प्रकारे वेगळे असते. यात ज्या संवेदनांचे यांत्रिकपणे स्पष्टीकरण देता येत नाही ते म्हणजे मन होय, अशा संवेदनांचा अनुभव मनाला येतो, मेंदूप्रमाणे भौतिक दृष्ट्या मनाचे अस्तित्व नसते आणि मन हे एक आवश्यक संपूर्ण आहे. म्हणून भौतिक वस्तूला जसे शक्य आहे तसे मनाचे विभाजन किंवा त्याची प्रतिकृती करता येत नाही. जगत गुरु संत तुकाराम महाराज मनाची महती सांगत असतांना म्हणतात की, मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धीचें कारण। मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान इच्छा ते ।।१।। याचा अर्थ असा कि कोणतेही कार्य पूर्ण करायचे असेल तर तुमचे मन प्रसन्न करायला हवे. कवियत्री बहिणाबाई चौधरी मनाची ख्याती आणि मोठेपण सांगताना म्हणतात, कि मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर आणि ।। देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥.
मानवी मन हे भासमान स्वरूपाचे असून ते फक्त जाणता येते. साहजिकच या मनाचे अस्तित्व देहामध्येच कोठे तरी असावे या बाबत प्रत्येकाने आपल्या परीने गृहीतके आणि संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपले देह हा रक्त, मास आणि हाडे याचा एक क्लिष्ट असा आणि एका विशिष्ट अशा पद्धतीने कार्यान्वयन होणारा जैविक गोळा आहे. या देहातील मेंदू, हृदय, फुफुसे, किडनी आणि यकृत हे महत्वाचे अंतर्गत अवयव होय. या सर्व अवयवांचा समन्वय एवढा शिस्तबद्ध असतो की त्यात एखांदा मोठा अडथळा आला तर हे सर्व अवयव हळू हळू एका पाठोपाठ एक मृतवत होतात आणि साहजिकच त्या जीवाचा मृत्यू होतो. या अवयांवमध्ये सर्वात क्लिष्ट, नाजुक आणि तेवढाच गुंतागुंतीचा अवयव म्हणजे आपला मेंदू होय.
मन आणि त्याचे अस्तित्व पाहत असताना या मनाचे स्थान अथवा केंद्र आपल्याला शोधावे लागते. साहजिकच भावना या जरी मनातून उत्सर्जित होत असल्या तरी त्याचा संबध हा मानवी मेंदूतील अनेक केंद्रांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या येत असतो. सहजीकच मन आणि मेंदू यांच्यातील सहसंबध जाणून घेत असताना या मेंदू बाबत अगोदर जाणून घेणे कमप्राप्त ठरते. मेंदूचे वजन हे सरासरी दीड किलो आणि त्याचे एकूण शरीराच्या वजनाशी प्रमाण हे २.५ टक्के असते. तर हा मेंदू आपल्या शरीरात निर्माण होणारी २०-३० टक्के ऊर्जा ग्रहण करतो. मेंदूत एक हजार कोटी मज्जापेशी असतात. तर या मज्जापेशी आणि मज्जातंतु यात एक लाख कोटी विविध जोडण्या असतात. या मेंदुतून आपल्या शरीराची विविध कार्य साकार करणे आणि आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणे अशी अनेक प्रकारची कामे केली जातात. मानवी मेंदू मध्ये अमायग्डला नावाचे एक केंद्र असून ते मानवी भावनांशी संबधित असते असे संशोधन सांगते. मानवी मेदू मध्ये थलमस, हायपोथलमस, अमयग्डला, सेरेब्रम, सेरेबेलम, मेड्यूला अब्लोंगेटा, ब्रेनस्टेम, पीनेल ग्रंथी, पिटूटरी ग्रंथी असे विविध भाग असतात. तसेच मेंदूत एकूण चार लोब असतात यात फ्रंटल लोब, प्यारीइटल लोब, टेंपरल लोब आणि ओसिपटल लोब यांचा समावेश होतो. मेंदू मध्ये विविध प्रकारचे केंद्र आणि भाग असतात त्यांना कोर्टेक्स किंवा लोब म्हणतात. कोर्टेक्स म्हणजे बाह्यपटल तर लोब म्हणजे स्पष्ट रीतीने दिसणारा अवयवाचा भाग होय. या विविध लोब आणि कोर्टेक्स मध्ये लक्ष, नियोजन, निर्णय, वाचा, वास, स्मृति, श्वसन, हालचाल, दृष्टी, ऐकणे, चव, स्पर्श असे अनेक भाग किंवा केंद्र असतात. हे सर्व भाग एकमेकाशी विविध मज्जापेशी, ग्लायल पेशी, जोडबिंदू, मज्जातंतु यांनी जोडलेले असतात. तसेच या मेंदूच्या सर्व भागांमध्ये विविध प्रकारचे आदान प्रदान हे जैव रासायनिक विद्युत लहरी मार्फत होत असते. तसेच विविध अंतरस्रावी ग्रंथी सुद्धा वेगवेगळे संप्रेरक स्रावून वेगवेगळे प्रकारचे काम करत असतात. अशा प्रकारे मेंदूत विविध भाग, आवरण, केंद्र, यात एक प्रकारची लयबद्धता असते की जी सतत कार्यक्षिल असते. या सर्व भागांची जोडणी आणि संदेशाचे आदान प्रदान हे अगोदर सांगितल्या प्रमाणे विविध रासायनिक आणि विद्युत लहरी मार्फत होत असते. असा मेंदू आपल्या देहामध्ये एक समन्वयाची आणि नेतृत्वाची भूमिका निरंतरपणाने बजावत असतो.
मेंदूचा विकास हा काय एकदम होत नाही, तर तो मानवी गर्भ तयार होत असताना विकसित होत असतो. गर्भधारणा झाल्यानंतर पाचव्या ते सहाव्या आठवड्यात मेंदू निर्माण होण्यास सुरुवात होते. हळू हळू त्याचे विविध भाग विकसित होवून त्या जीवाचा जन्म होण्यापूर्वीच त्याचे कामकाज सुरू झालेले असते. मूल जन्माला येते तेंव्हा त्याच्या मेंदूची ५० टक्के वाढ झालेले असते तर त्याच्या पाच वर्ष वयापर्यंत त्याचा ९० टक्के मेंदू विकसित झालेला असतो आणि पंचवीस वर्षापर्यंत तो पूर्ण विकसित होतो. अशा प्रकारे मेंदूचा विकास होत असताना मनाचा विकास सुद्धा त्याच सोबतच होत असतो. आपल्या पूर्वजांकडून मिळालेले अनुवांशिक गुणधर्म आणि त्यानुसार आपल्या शरीराची आणि मेंदूची वाढ होते. शरीराच्या आणि मेंदूच्या वाढीच्या वेळेस देहाला दिला जाणारा आहार आणि आजूबाजूचे वातावरण यावर मेंदूची वाढ आणि त्याच्या कार्यक्षमता अवलंबून असते. असे म्हटले जाते उच्च क्षमता असलेला मेंदू उच्च बुद्धिमता निर्माण करत असतो. मात्र उच्च बुद्धिमता कायम एक उच्च दर्जाचे आणि यशस्वी आयुष्य प्रदान करेलच असे नसते.
मानवी मनाची निर्मिती मात्र अत्यंत हळुवारपणे होत असते आणि त्यात बर्याच अंशी मेंदूकडून होणारे विविध प्रकारचे आकलन आणि अनुभव जबाबदार असते. एकीकडे मेंदूची वाढ होत असताना मनाचे अस्तित्व तयार होत असते आणि मनाचे वहन मेंदूमध्ये विविध भागात आणि केंद्रात सुरू झालेल असते. मेंदूची वाढ ही भौतिक स्वरूपाची आणि दिसून येणारी असते मात्र मनाची वाढ ही भौतिक स्वरूपाची नसल्याने दिसून येत नाही. तर ती समजून आणि उमजून घ्यावी लागते. जाणणे आणि प्रतिसाद देणे हे मानवी मनाचे पहिले कार्य मानवी गर्भातच सुरू होत असते. त्या नंतर मूल जन्माला येते आणि त्याचा खर्या अर्थाने त्याचा जीवन प्रवास सुरू होतो. मन हे विकसित होते म्हणजे काय तर त्यात अनेक प्रकारचे विचार आणि भावना यांची निर्मिती होणे होय. ही विचार आणि भावना यांची निर्मिती होण्यासाठी मेंदुमधील विविध केंद्र किंवा भाग कार्यरत असतात, हे आता सिद्ध झाले आहे. तसेच कोणता भाग कोणते कार्य करतो? यावर आता संशोधकांचे एक मत झाले आहे. मात्र हे भाग परस्परांशी समन्वय साधून भावना आणि विचार कसे निर्माण करतात, याविषयी मात्र पुरेसे संशोधन उपलब्ध नाही.
मेंदू हा शरीराकडून ऊर्जा घेतो आणि त्या बदल्यात तो शरीराचे समन्वय साधतो. म्हणजे तो शरीराकडून काही घेतो, म्हणून त्याला काही तरी देतो. एकंदर ही एक साखळी असून त्यात एक लयबद्धता असते. मात्र मनाबाबत तसे नसते ते अत्यंत स्वैर आणि नियंत्रण नसलेले आणि कोणतीही लयबद्धता नसलेले असते. त्याला थांबवणे अत्यंत कठीण आणि जिकरीचे असते. कारण त्याची कोणतेही एक जागा नसते, कोणताही एक बिंदू नसतो आणि कोणतीही एक नाडी नसते. अशा प्रकारे मानवी मन हे स्वैर आणि आंनियंत्रित असले तरी त्याचे भासमान अस्तित्व आणि जोडणी ही मानवी मेंदू आणि त्यातील विविध भाग, लोब, पटल आणि केंद्र यांच्याशी असते हे लक्षात घ्यावे.
मेंदूची उच्च आकलनशक्ती, उच्च साठवणशक्ती, आणि उच्च कल्पनाशक्ती याचा संयोग आणि संश्लेषण मधूनच मानवी बुद्धीचा उगम होतो. बुद्धी म्हणजे काय तर इंद्रियांच्या मार्फत आकलन झालेली बाब जाणीवपूर्वक तपासून ती समजून घेणे, तिचा विचारपूर्वक अर्थ लावणे, त्यावरून तर्क बांधणे आणि त्यातून निर्णय घेणे अथवा समस्याचे निराकरण करणे होय. तसेच मानवी बुद्धी मध्ये आकलन क्षमता, अमूर्तीकरण, निर्णय क्षमता ,सर्जनक्षिलता, नियोजन क्षमता प्रेरणा, श्रद्धा आणि इस्चा यांचाही समावेश होत असतो हे लक्षात घ्यावे. साहजिकच मानवी बुद्धी ही मानवाच्या विकासात आणि प्रगतीत महत्वाची भूमिका निभावत असते. मात्र जो पर्यंत त्याला शांत, चिंतनशील, विवेकशील मनाची साथ मिळत नाही तो पर्यंत आयुष्य हे पूर्णत्वास जात नाही. यालाच आपण भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणू शकतो.
मानवी मन हे भौतिक नसून ते मानवी मेंदू मधील वेगवेगळे केंद्र आणि त्याची आणि त्या केंद्रांची वैशिष्टे यांची संयोग, संयोजन आणि संश्लेषण यातून ते प्रतीत आणि प्रचलित होते. मानवी मन ही एक भासमान शक्ति असून ती मेंदूच्या आत आणि बाहेर असे अस्तित्व दर्शवते. मानवी मन ही एक जाणीव असून ती कायम आपल्याला जागृत अवस्थेत ठेवण्याचे काम करते. ज्यावेळेस मेंदूचे कार्य संपुष्टात येते, त्यावेळी मनाचे अस्तित्व संपून जाते. दिवा लावल्या नंतर प्रकाश तयार होतो. तसाच मेंदू म्हणजे दिवा आणि प्रकाश म्हणजे मन होय. ध्वनीक्षेपक लावल्या नंतर आवाज निर्माण होतो. ध्वनीक्षेपक म्हणजे मेंदू तर त्यातून निघणारा ध्वनि म्हणजे मन. फूल सुंगंध निर्माण करते. यात फूल म्हणजे मेंदू तर सुंगध म्हणजे मन. आग केली तर उष्णता निर्माण होते. आग म्हणजे मेंदू तर उष्णता म्हणजे मन. येथे प्रकाशचे अस्तित्व डोळ्यांना जाणवते, तर ध्वनिचे अस्तित्व कानाला जाणवते, वासाचे अस्तित्व नाकाला जाणवते, उष्णता ही त्वचेला जाणवते. साहजिकच मनाचे अस्तित्व हे असेच जाणणारे आणि जाणिवेतून निर्माण होणारे असते. त्यामुळे ज्याची जाणीव होते, ते अस्तीत्वात असते असे आपण सर्वसाधारणपणाने म्हणतो हे अगदी तसेच आहे. म्हणजे मानवी मन हे मेंदू मधून निर्माण झालेली एक जाणीव असून ती जाणीव अनेक बाबी आणि गोष्टींना जन्म देते. या मानवी मनाची कल्पनाक्षमता, विचारक्षमता आणि भावनाक्षमता ही प्रचंड असून तिला अंत नाही. साहजिकच या प्रचंड क्षमतेमुळे मानवी मन हे सर्व प्राणीमात्रां मद्धे मध्ये उजवे आणि प्रबळ ठरते.
असे हे मानवी मन भावनांना, विचारांना प्रेरणांना, श्रद्धा , इस्चाना आणि कल्पनांना कसा जन्म देते ते पाहणे औचित्याचे ठरते. अगोदर नमूद केल्याप्रमाणे मानवी मन ही एक जाणीव आहे. तर ती जाणीव कशी निर्माण होत असावी या बाबत विचारमंथण आणि चिकित्सा करणे आवश्यक ठरते. मानवी मेंदू हा विलक्षण स्वरूपाचा एक क्लिष्ट शारीरिक अवयव असून तो अनेक महत्वाच्या बाबींचे केंद्र आहे. जे काही निर्माण होते ते तेथूनच आणि जे काय घडवून आणले जाते ते तेथूनच. या मेंदूला आपले पाच ज्ञानद्रिये अनेक प्रकारचे माहितीची रसद पुरवत असतात. म्हणजे आपण सकाळी जागी झालो डोळे उघडले आणि जर आपल्याला नदी दिसली तर ती माहिती मेंदू कडे जाते. आपण आपल्या खोलीची खिडकी उघडली की गाड्याचे आवाज आपल्या कानामार्फत मेंदू पर्यंत जातात. त्या नंतर आपण देवाची पूजा करतांना अगरबत्ती लावली तर त्याचा सुगंध हा नाकामार्फत मेंदू पर्यंत जातो. आपण अल्पोहर मध्ये चहा घेतला तर त्या चहाची चव जीभेमार्फत आपल्या मेंदू पर्यंत जाते. आपल्या बिछानावरील मुलायम रजईची घडी घातली तर तिचा तो मुलायम स्पर्श आपल्या हातावरील त्वचेमार्फत मेंदूकडे जातो. आता ही माहिती आपल्या मेंदूकडे विविध ज्ञानेद्रिये मार्फत जेंव्हा पोहचते ती त्या वेळी फक्त माहिती स्वरुपात असते. एकदा ही माहिती प्राप्त झाली की मेंदूमध्ये भूतकाळात साठवलेल्या महितीशी तिचा संबध येवून आकलन होते. म्हणजे नदीचे संथ वाहने ,गाडीचा कर्कश आवाज, अगरबतीचा मोगर्याच्या फुलासारखा सुंगध, चहाची गोड चव, रजईचा मुलायम स्पर्श या बाबी आपण अगोदरच्या साठवलेल्या महितीशी ताडून पाहून त्या अनुभवतो अथवा त्याचे आकलन आपल्या बुद्धीला करून देतो. हे आकलन होत असताना नवीन मिळालेली माहिती स्मृति केंद्रात साठवली जाते. म्हणजे माहिती प्राप्ती आणि तिची आकलन आणि तिची साठवणूक अशी प्रक्रिया निरंतर चालू असते. अशा प्रकारे या माहितीचा पूर्वीच्या माहितीशी अर्थ लावून अथवा जोडून मनातल्या मनात काही आखाडे बांधले जातात त्याला आपण विचार म्हणतो. मात्र हे विचार प्रत्येक वेळेस समोर आलेल्या वस्तू अथवा घटनेशी निगडीत नसतात तर ते अत्यंत स्वैर आणि असंबद्ध असेही असतात. हे विचार ज्या वेळी सुसंघटीत रीतीने मांडले जातात तेंव्हा ज्ञान तयार होते. आणि याच ज्ञानाचा वापर वाढ, प्रगती आणि विकास यासाठी केला जातो. म्हणजे ज्ञान हे उपयुक्ततेच्या माध्यमातून तयार करून ते वापरले जाते.
घरातील खिडकीतून दिसलेली नदी ही आपल्याल पूर्वीच्या महितीशी जोडून एक नवी माहिती पुन्हा साठवणूक केली जाते आणि तिचा वापर आणि उपयोग होतो तेंव्हा ज्ञान तयार होते. नदी पूर्वेकडून पचिमकडे वाहत होते, पावसाळा असल्याने तिला पुर आला होता, तिचा प्रवाह शेतात वळवून साठवलेल्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी करता येईल अशा प्रकारचे माहितीची जुळवा जुळव ही साठवलेल्या महितीशी जोडून तयार होते त्याला ज्ञान असे म्हणू शकतो. साहजिकच माहितची जाणीव, तिचे आकलन, तिचे विश्लेषण, तिची साठवणूक आणि तिची पुनर्निर्मिती यातून ज्ञानाची निर्मिती होते. अशा प्रकारे माहिती आणि ज्ञान याची साठवणूक मेदूच्या विविध भागात झाली की त्या माहितीच्या आधारे अनेक प्रकारच्या माहीतचे वहन होवून त्याचे संश्लेषण आणि संयोग होवून एक विचार प्रणाली होते. म्हणजे नदी बाबतची माहिती माहिती आणि पूर्वीची माहिती यातून आपण नदी शांत झाली की तेथे पोहायला जावू किंवा मासे पकडायला जावू अशी विचारप्रक्रिया तयार होते. मोगर्याच्या आगरबत्तीचा सुंगधाच्या आधारे आपण गुलाबाची अगरबत्ती पुढच्या वेळेस विकत आणू अशी विचार प्रक्रिया तयार होते, गाड्यांचा खूप आवाज घरात येतो म्हणून खरे तर घरासमोरील रस्ता शक्य असेल तर दुचाकीसाठी बंधनकारक करायला करायला हवा असा विचार समोर येतो. एकंदर ही विचार प्रक्रिया ही मेंदूची आसपास तयार होते आणि ती तेथेच उचंबळून येवून थांबते आणि पुन्हा परत नव्याने वेगळी विचार प्रक्रिया सुरू होते आणि थांबते. अशा प्रकारे हि विचार प्रक्रिया अखंडपणे आपले मनाच्या मनात मग्नतेत राहत असते.
हीच विचारशक्ती किंवा विचार प्रक्रिया जेंव्हा वास्तविकतेला धरून नसते तेंव्हा आपण त्याला कल्पनाशक्ती असे म्हणतो. म्हणजे वाहणाऱ्या नदीचा प्रवाह अचानक थांबवून ठेवला तर, नदीचे पाणी लुप्त केले तर, नदीचे पाणी उलट्या दिशेने प्रवाहीत केले तर अशा प्रकारची कल्पनाशक्ती आपण करत असतो. सहाजिकच कल्पनाशक्ती ही सध्या वास्तवाला धरून नसली तरी उद्या ती वास्तववादी होवू शकते. कारण कल्पनाशक्ती ही निश्चितच हवेतून तर झालेली नसते. तिच्यासाठी तुमची कडे महितीचा किती साठा आहे. आणि त्या सत्याचा आधारे तुम्ही कसा मेळ आणि ताळमेळ घालता यावर कल्पनाशक्ती अवलंबून असते. मानवी श्रद्धा, प्रेरणा आणि इस्चा ह्या संपूर्णपणे मनाशी निगडीत आहेत असे समजले जात नाही. श्रद्धा ह्या एक प्रकारच्या परंपरा असतात आणि त्या काळाच्या ओघात सांभाळल्या जातात. प्रेरणा म्हणजे एखांदे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मानाने किंवा अंतकरणाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद होय. इस्चा मात्र ह्या मन आणि मेंदू यांच्या समन्वयातून निर्माण होतात.
मानवी मन आणि मेंदू हे विविध प्रकारच्या जोडण्या साधत असतात. ह्या जोडण्या जैव रासायनिक प्रक्रिया, विद्युत रासायनिक प्रक्रिया आणि विविध संप्रेरके यांचे स्राव यातून निर्माण होत असतात. तसेच मेंदूचे सर्वच भाग एकमेकांना विविध मज्जापेशी आणि मज्जातंतू यांनी जोडलेल्या असतात. ह्या जोडण्या साधत असताना त्यातून एक साचेबंध आणि सूत्रबद्ध असा एक विचार तयार होतो. तसेच ही जोडणी होत असताना बाह्य अथवा अंतर्गत प्रभावामुळे भावना सुद्धा निर्माण होतात. विशेषतः अशा भावना ह्या मेंदूच्या खोलवर आणि मध्यभागी असलेले आमयग्डला या भागातून निर्माण होतात. तसेच मेंदूचे इतर भाग सुद्धा परस्पर पूरक रीतीने विविध प्रकारच्या भावना निर्मिती मध्ये सहभाग घेत असतात. साहजिकच या जोडण्या, परस्पर सहसंबध यातून मानवी मन हे विविध प्रकारच्या भावनाची निर्मिती करत असते. यात काही मुख्य भावना आणि उप भावना यांचा समावेश होतो. आपल्या मनात ज्या भावना तयार होतात त्यात आनंद, सुख, समाधान दुःख, वेदना, भीती, राग, क्रोध, आश्चर्य, तिरस्कार, द्वेष, मत्सर, इच्छा, समाधान, तृप्तता, गर्व, लालसा, प्रेम, करुणा, दया, मोह, अहंकार, खिन्नता, औदासिन्य, कंटाळवाणे, काळजी, माया, हेवा, असूया, घृणा, स्तुती ,कौतुक, उत्सुकता, एकाकीपण याचा समावेश होतो. या भावनाचे उभे आडवे स्तर असतात. काही भावना ह्या एकाकी अस्तित्व दर्शवता तर काही भावना ह्या एकमेकाशी संयोग पावून आपले अस्तित्व दर्शवतात. या भावना बदलणार्या आणि तीव्र आणि सौंम्य स्वरुपाच्या असतात. तसेच या भावना कधीच एकसमान नसतात. या भावनाचे मुख्य वैशिष्टे असे की त्या व्यक्तीपरत्वे आणि व्यक्तीगणिक असतात. म्हणजेच त्यांचे अस्तित्व हे व्यक्तिनिहाय बदलणारे असते.
साहजिकच मानवी जीवनात या भावनांना अनन्य साधारण असे महत्व प्राप्त होत असते. मानवी आयुष्य हे या विविध भावनांच्या भोवतीच फिरत असते किंवा या भावनांच माणसाचे आयुष्य गतिमान करत असतात. मानसाच्या आयुष्यात जे चढ उतार येतात ते या भाव भावना मुळेच. या भावना माणसाला नियंत्रित करतात, तसेच याच भावनामुळे माणूस अनियंत्रित आणि स्वैर सुद्धा होतो. जे काही आजूबाजूला आणि आयुष्यात घडत त्यावर भावनाचा प्रभाव खूप मोठा असतो म्हणजेच माणसाचे संपूर्ण आयुष्य हे भावनांनी व्यापलेले असते. भावनांना योग्य प्रकारे समजने आणि त्यांना योग्य प्रकारे प्रवाहीत करणे हे काम आपले मन करत असते. भावना ह्या सर्व मानवांमध्ये एक सारख्या असतात. मात्र त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. तसेच त्या भावनांच्या आधारे होणारे वागणूक, वर्तन आणि कृती वेगळी असू शकते. राग आला तर ती भावना सर्व मानवांमध्ये एक समान असली तरी तिची तीव्रता आणि त्या प्रमाणे होणारी कृती अथवा प्रतिसाद मात्र वेगवेगळी असते. कारण प्रत्येक भावनेवर आपली माहिती, ज्ञान, आकलन, स्मृति ह्या प्रभाव दाखवत असततात आणि नियंत्रण सुद्धा करत असतात.
अशा प्रकारे मन म्हणजे विचार आणि भावना निर्माण करणारे एक भासमान असे केंद्र किंवा जागा असते आणि ते मेंदुमद्धे स्थानबद्ध असते. मन समजून आणि उमजून घेत असतांना मेंदू बाबत सखोलतेने जाणून घ्यावे लागते. मेंदू हा एक क्लिष्ट आणि उच्च क्षमता असलेला एक मानवी अवयव आहे. मेंदू मध्ये विविध भाग आणि केंद्रे असून ते मज्जापेशी आणि मज्जातंतू यांचे बनलेले असते. या विविध भाग आणि केंद्रे यांचे सहकार्ये, संबध, संयोग आणि संश्लेषण होवून विविध विचार आणि भावना निर्माण होतात. साहजिकच मन हे अभौतिक असल्याने ते फक्त जाणून आणि समजून घ्यावे लागते. मन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना आणि विचार हे योग्य मार्गाने नियंत्रित आणि प्रवाहित करून मानवी आयुष्याला अर्थ आणि दिशा देता येते. त्यासाठी आपल्या मनाला, चित्ताला, अंतकरणाला की जे एकच आहे त्यावर विविध प्रकारचे संस्कार करावे लागतात. हे संस्कार योग्य कौटुंबिक आणि सामजिक वातावरण, अंतप्रेरणा, सकारात्मक वृत्ती, परस्पर समभाव, परस्पर सहकार्य, योग्य आहार-विहार-निद्रा, योग-प्राणायाम-ध्यानधारणा इत्यादीचा स्विकार करून रुजवता आणि वाढवता येतात. मन, मेंदू, शरीर , उर्जा, विचार आणि भावना हे एका रेषेत आणले कि जीवन हे समृद्ध होते आणि तुम्ही एक प्रवाही, सरळ ,साधे, सोपे, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगायला सुरुवात करता.
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.
०४३/१०१ दिनांक १२.०३.२०२१
सुखाच्या शोधात ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७