प्रशासनातील क्षेत्रीय भेटी आणि दौरे( Field Visits and Tours in Administration)

प्रशासनातील क्षेत्रीय भेटी आणि दौरे( Field Visits and Tours in Administration)

प्रशासन हे कोणत्याही राष्ट्राचे महत्वाचे असे अंग आहे. जगातील विविध राष्ट्रांत आपल्याला राजेशाही, उमरावशाही, वसाहतवाद, हुकुमशाही, कुलीनशाही, धर्मसत्ता, लष्करशाही, समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा अनेक व्यवस्था पाहावयास मिळतात. मात्र यापैकी कोणतेही व्यवस्था असो, राज्यकारभार चालविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अनिवार्य ठरते. या प्रशासकीय यंत्रणेत वरिष्ठ ते कनिष्ठ अशी एक उतरंड कायम पहावयास मिळते. प्रशासकीय व्यवस्थेचे यश अनेक बाबी आणि गोष्टीवर अवलंबून असते. त्यापैकी क्षेत्रीय भेटी आणि दौरे याला प्रशासनात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रशासन या क्षेत्रीय भेटी आणि दौरे या आधारे राज्यातील नागरिक यांचेशी किती प्रमाणात प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या अडचणी आणि समस्या समजावून घेते. त्याचे कशा प्रकारे निराकरण करते यावर प्रशासनाचे यश आणि अपयश अवलंबून असते. प्राचीन कालखंडापासून राज्य प्रमुख, महामंत्री आणि त्याची प्रशासकीय यंत्रणा यांच्या क्षेत्रीय भेटी आणि दौरे याला महत्व आहे. वाढलेली दळणवळण साधने आणि माहिती तंत्रज्ञान या मुळे झालेली संपर्क क्रांती यामुळे क्षेत्रीय भेटी आणि दौरे यांची संख्या कमी झाली आहे.मात्र सामान्य नागरिक यांचा या प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास दृढ आणि कायम करण्यासाठी क्षेत्रीय भेटी आणि दौरे अनिवार्य आणि आवश्यक आहेत. गाव स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कृषि सेवक,पोलिस पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर, पशुधन पर्यवेक्षक, कोतवाल, बीट अंमलदार यासारखे गाव कामगार किंवा कर्मचारी कार्यरत असले तरीही जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी नेमून दिलेल्या किमान भेटी आणि दौरे क्षेत्रीय स्तरावर करत नाहीत तो पर्यंत प्रशासन गावात पोहचले असे म्हणता येत नाही. लगतच्या काळात प्रशासकीय यंत्रणेच्या कमी कमी होत असलेली क्षेत्रीय भेटी आणि दौरे हा एक चिंतेचा विषय असून त्यामुळे लोकांची प्रशासनाबाबतची आपुलकी, आत्मियत्ता आणि विश्वास कमी होत आहे. साहजिकच या क्षेत्रीय भेटी आणि दौरे वाढवणे आणि त्यातून प्रशासन अधिक लोकाभिमुख, जबाबदार, उत्तरदायी, पारदर्शक ,गतिमान आणि परिणामकारक करणे ही काळाची गरज ठरू पाहत आहे. प्रस्तुत लेखात प्रशासनातील क्षेत्रीय भेटी आणि दौरे याचा इतिहास, प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज, त्याचे फायदे आणि तोटे, संधी आणि आव्हाने, क्षेत्रीय महत्व आणि भवितव्य यावर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

प्राचीन काळी विखुरलेला मानव हा एकत्र येवून टोळ्यांच्या स्वरुपात वास्तव्य करू लागला. या मागील प्रमुख कारण नव्याने सुरु झालेली शेती होती. शेतीच्या शोधानंतर मानवाचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय या क्रमाने विकास झाला. भारताच्या संदर्भात बोलायचे तर आर्य आणि अनार्य टोळ्या आणि त्यांची युद्धे यातून जनपदे आणि महाजनपदे अस्तित्वात आली. ग्राम म्हणजे गावे आणि त्यांचा समूह म्हणजे जनपद होय. असे जनपद समूह ज्यांचा नावलौकिक होता, त्यात सोळा महाजनपदे यांचा उल्लेख करावा लागतो. यात १) अंग २) काशी ३) कोसल ४) वज्जी ५) मल्ल ६) मगध ७) चेदी ८) वत्स ९) कुरु १०) पांचाल ११) मत्स्य १२) शूरसेन १३) अश्मक १४) गांधार १५) कांबोज १६) अवंती यांचा समावेश होतो. महाजनपद यांची प्रशासकीय व्यवस्था ठरलेली आणि काळाच्या ओघात दृढमुल झालेली होती. यामध्ये गण, गट,जात, श्रेणी अशी कामाची विभागणी होती. त्या नंतर मोर्य,चोल, पांड्या, शुग, कणव, गुप्त, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, परमार, काकतीय, होयसळ अशी अनेक राज्य आणि घराने अस्तित्वात आली. त्या नंतर भारतात इस्लामी राजवटी स्थापन झाल्या. यामध्ये सुलतानी आणि मुघल राजवट असे दोन भाग पडतात. बहमानी राज्य आणि त्या नंतर त्याची पाच शकले होवून अहमदनगरची निजामशाही,विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती. उत्तरेकडे राजपूत राजे यांनी मोघलाना शह देण्याचा प्रयत्न केला तर दक्षिणेकडे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारले. त्यांतर ब्रिटिश आले आणि त्यांची राजवट जवळपास दीडशे वर्ष राहिली. या जवळपास चार हजार वर्षाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात असली तरी तिचे स्वरूप हे प्रत्येक काळात बदलत गेले. असे म्हटले जाते की ‘इतिहास कायम तोच राहतो फक्त साधने आणि माणसं बदलत राहतात’.

राजेशाही व्यवस्थेमध्ये राजा आणि प्रजा असे नाते असते. साम्यवादी व्यवस्थेमध्ये प्रमुख आणि कामगार यांचे नाते असते. धर्म व्यवस्थेमध्ये धर्मगुरू आणि अनुयायी यांचे नाते असते आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन आणि जनता यामध्ये नाते असते. असे नाते आणि नाळ कायम राखण्यासाठी एक महत्वाची यंत्रणा कायम कार्यशील आणि कार्यप्रवण असते ती यंत्रणा म्हणजे प्रशासन होय. ही व्यवस्था उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे उभ्या उतरंड स्वरुपात असून ती वरच्या स्तराचा खालच्या स्तराशी संपर्क आणि संयोग घडवून आणते. असा संपर्क आणि संयोग घडवून आणण्यासाठी या यंत्रणेला खालच्या म्हणजे क्षेत्रीय स्तरावर भेटी आणि दौरे करावे लागतात. अशी ही यंत्रणा क्षेत्रीय भेटी आणि दौरे या आधारे समाजातील शेवटच्या घटक अथवा लाभार्थी यांच्या पर्यंत विविध पद्धतीने पोहचण्याचा प्रयत्न करत असते. असा प्रयत्न फक्त प्रशासनच करत नाही, तर लोकनियुक्त सरकारे आणि त्यांचे मंत्री हे भेटी आणि दौरे यावर कायम भर देत असतात. जर शासन आणि प्रशासन हे जनतेच्या सोबत आणि त्यांच्या पातळीवर जावून काम करत असेल तरच ते खर्‍या अर्थाने त्यांचे ते संकटमोचक आणि संरक्षक होवू शकते आणि त्यातून सुप्रशासन अस्तित्वात येते.

प्रशासकीय व्यवस्था ही काळाच्या ओघात स्थिर झालेली व्यवस्था असून तिच्या मध्ये कामकाजाची एक एकसमानता आढळून येते. आपल्या राज्यात लहान मोठे एकूण ५२ विभाग आहेत. अशा प्रकारे मंत्रालयीन विभाग, विविध आयुक्तालये, विविध संचनालये, विविध महामंडळे , सार्वजनिक उपक्रम,जिल्हा स्तरावरील कार्यालये, तालुका स्तरावरील कार्यालये आणि ग्राम स्तरावरील कार्यालये आणि त्यात काम करणारे सर्व साधारणपणे १९ लाख अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होतो. या प्रशासकीय यंत्रणेला विविध प्रकारची कामे सोपवलेली असतात आणि ही कामे पार पाडत असताना क्षेत्रीय भेटी आणि दौरे हे करणे अनिवार्य असते. तसेच याबाबत वार्षिक लक्षांक सुद्धा दिली जातात. तसेच वार्षिक कार्यमूल्यांकन भरत असताना अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेले दौरे आणि दिलेल्या क्षेत्रीय भेटी या विचारार्थ घेण्यात येतात.

प्रशासकीय दौरे आणि भेटी याचे दोन उद्देश असतात एक म्हणजे कनिष्ठ कार्यालयाची आणि कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांच्या कामकाजाची तपासणी करणे तर दुसरे म्हणजे शासकीय योजनेचे विविध लाभार्थी यांना लाभ मिळाले की नाही ते तपासणे आणि त्यांचा फिडबॅक घेणे. असे असले तरी क्षेत्रीय भेटी आणि दौरे याला अनेक अर्थाने महत्व प्राप्त झालेले असते. विस्तार शिक्षण विषयक कामकाज हा सुद्धा याचा मुख्य असा गाभा असतो. विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून जनतेला माहिती देवून त्यांच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. जनतेला विविध धोरणे, योजना, कार्यक्रम, अभियान याची माहिती दिली जाते. सामाजिक अंकेशन म्हणजे शासकीय अभिलेखे याचे ग्रामपंचायत चावडीवर गावातील ग्रामस्थ यांच्या समोर केलेले वाचन होय. सामाजिक अंकेशन हे प्रशासकीय पारदर्शकता साधण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावते. प्रशासकीय भेटी आणि दौरे यातून शासनाच्या विविध सेवा ह्या जनतेच्या दारापर्यंत देण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान जनतेकडून विविध योजनेचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही सुद्धा होते. तसेच शासनाच्या विविध योजनाचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या हातात सुद्धा दिले जात असतात. सध्याच्या ऑनलाइन युगात ऑफर लेटर आणि इंडेंट लेटर लाभार्थी यांच्या हातात देणे म्हणजे योजनेचा लाभ प्रत्यक्ष देणे असेही समजले जाते.

शासकीय भेटी आणि दौरे यातून जनतेच्या अडचणी, समस्या आणि प्रश्न सोडविण्याचे कामकाज प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर होते. दौर्‍यावर आम्ही गेल्यावर अनेक वेळा लोक त्यांचे भाऊबंदकीचे जमीन विषयक वाद आणि तंटे याची चर्चा करत असत. त्यामुळे त्यांना योग्य सल्ला आम्ही देत असू तसेच त्याचा अंतर्गत वाद हा न्यायालयीन लढाई पुरता मर्यादित ठेवा, त्याला वैयक्तिक पातळीवर आणू नका असाही सल्ला आम्ही त्यांना देत. हा विषय गावाच्या चावडीवर होत असल्याने निश्चितच त्याला एक वजन प्राप्त होत असे.

सामान्य जनतेमध्ये प्रशासन बाबत पूर्वग्रह आणि भीती असते. प्रशासन आपल्याबद्दल काय विचार करते? आपल्याला स्वीकारते का? आपला अपमान होणार नाही ना ? असे अनेक विचार त्यांच्या मनामद्धे घोंगावत असतात. साहजिकच त्यामुळे जर प्रशासन जनतेपर्यंत पोहचले नाही, तर ही दरी कायम राहते. काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्यातलेच एक आहेत ही खात्री तुम्ही त्यांच्या स्तरावर जावून जो पर्यंत संवाद साधत नाहीत तो पर्यंत पटत नाही. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पर्यंत पोहचली की बुजरेपन्ना जावून धीटपणा येण्यास मदत होते. त्यामुळे असे दौरे आणि भेटी या गावातील सर्वात अविकसित असा घटक जेथे राहतो तेथे पर्यंत आम्ही करत असू. गावातील सर्वात तळातील व्यक्तीशी संवाद साधला तर संपूर्ण गावाचा प्रशासन बाबत असलेला पूर्वग्रह आणि भीती कमी होण्यास मदत होते.

प्रशासन अनेक प्रकारच्या सूचना आणि संदेश लाभार्थी अथवा जनता यांचेकडे विविध माध्यमातून पाठवत असते. यासाठी आवाहन पत्र, दवंडी, जाहीर नोटिस , पोस्टर्स , घडीपत्रिका याचा वापर केला जातो. सोशल मीडियाच्या जगात ऑनलाइन पोस्टर आणि मेसेज याचा वापर होतो. मात्र हा संवाद प्रत्यक्ष होत नसल्याने दिलेला मेसेज अर्धवट किंवा चुकीच्या पद्धतीने पोहचल्याच्या घटना निदर्शनास येतात. जर असा मेसेज अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीने पोहचला तर कामकाजाच्या अंमलबजावणी मध्ये त्रुटी राहतात. यावर क्षेत्रीय भेटी आणि दौरे याची मात्रा उपयोगी पडते. जायमोक्यावर शंका आणि समाधान साधल्याने स्पष्ट संदेश पोहचतो आणि प्रशासकीय कामकाजात गती येते. प्रशासन हा शासन आणि जनता यातील एक दुवा आहे आणि एक सेतु आहे ,याचा विश्वास सामान्य नागरिक यांच्या मनामद्धे निर्माण होतो.

प्रशासनाने दौरे आणि भेटी वाढविल्या की प्रशासनाबाबत जनतेमध्ये एक विश्वास निर्माण होवून जनता त्यांची कामे करण्यासाठी प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात येण्यास सुरुवात करते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये समांतर असलेले मध्यस्थ आणि एजंट यांची संख्या कमी होते. क्षेत्रीय भेटी आणि दौरे हे वरिष्ठांनी सुरू केल्यानंतर कनिष्ठ क्षेत्रीय यंत्रणा ही स्वत:ला अद्यावयात करते आणि आपल्याला कोणी तरी विचारते ह्या भीती पोटी सुद्धा प्रशासकीय गतीमानता वाढते. तसेच क्षेत्रीय भेटी आणि दौरे यामुळे कामकाजात पारदर्शकता सुद्धा निर्माण होते. आपले काम कोणी तरी तपासणार आहे, ही भावना चुकीचे कामे करण्यापासून यंत्रणेला रोखते. सुस्त आणि ढीम्म असलेली यंत्रणा खडबडून जागी करण्यासाठी एकस्तर वरिष्ठ यांनी आपल्या भेटी आणि दौरे हे काही पूर्वनियोजित तर काही आकस्मिक पद्धतीने करणे अगत्याचे आणि फलदायी ठरते.

दोरे आणि भेटी यातून जनतेचा योग्य,अचूक आणि खरा फिडबॅक प्राप्त होत असल्याने योजनेच्या अंमलबजावणी मधील दोष निराकरण करण्यास त्याची मदत होते. तसेच योजनेच्या अंमलबजावणी मधील क्लिष्टता दूर होण्यास सुद्धा या क्षेत्रीय भेटी आणि दौरे मुळे मदत होते. बर्‍याच वेळा शासन निर्णय मधील विविध परिच्छेद आणि सुचना याचा अर्थ लावणे हे कनिष्ठ आणि जनता यांना शक्य होत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याबाबत त्यांच्या भेटी आणि दौरे यात निराकरण केल्यास प्रशासकीय कामकाज अजून गतीने पुढे स्वार होते.क्षेत्रीय भेटी आणि दौरे यात समाजातील संवेदनशील असा घटक की जो अजूनही प्रशासकीय यंत्रनेपासून दूर आहे . त्यांचे आणि प्रशासन यातील अंतर कमी करता येते. यात प्रामुख्याने अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, महिला , दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांचा समावेश होतो.

स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासा करिता अनेक ग्रामीण विकासाचे विविध कार्यक्रम आखण्यात आले. त्यातील काही बंद करण्यात आले तर काही इतर कार्यक्रमात समावेशन करण्यात आले आणि काही दुरुस्तीसह अजूनही चालू आहेत. मागील ७५ वर्षात जे काही योजना , कार्यक्रम , अभियान राबविण्यात आल्या त्याच भार निश्चितच प्रशासकीय यंत्रणा यांचेवर होता.हे कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर राबवत असताना भेटी आणि दौरे यांना अनन्यसाधारण महत्व होते आणि आताही आहे. आजही योजनेच लाभ प्राप्त करून घेयचा असेल तर निरीक्षण किंवा पडताळणी अहवाल शिवाय प्रत्यक्ष लाभ खात्यावर प्राप्त होत नाही.

त्यामुळे भेटी आणि दौरे हे फक्त वरिष्ठ अधिकारी यांचे पुरतेच मर्यादित नसून कनिष्ठांना सुद्धा याबाबत अत्यंत दक्ष आणि जागरूक राहावे लागते. विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरूपात थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा करणेबाबतची संकल्पना बर्‍याच अंशी प्रशासनात पारदर्शकता निर्माण करण्यात सहायभूत ठरली आहे. तरीही जेथे मानवी हस्तक्षेप याला वाव तयार होतो तेथे चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यता वाढते. मानवी हस्तक्षेप हा चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याला पायबंद घालण्याचे काम क्षेत्रीय भेटी आणि दौरे याच्या माध्यमातून होवू शकते.

कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे क्षेत्रीय भेटी, संवाद वाढविणे बाबत शासनाने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सूचना दिल्या आहेत.आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत घ्यावयाची दक्षता व त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना भेटी देऊन करावयाची तपासणी याबाबत मार्गदर्शक सूचना शासनाने १२ मार्च २०२० दिल्या आहेत.तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील बैठकांमध्ये वृक्ष लागवड आणि संगोपन हा मुद्दा स्थायी विषय म्हणून बैठकांच्या विषयसूचीमध्ये आणि क्षेत्रीय स्तरावरील निरक्षण भेटीमध्ये अंतर्भूत करण्याबाबत शासनाच्या विविध विभागांनी सूचना सन २०१८ मध्ये देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय अधिकारी/कर्मचा-यांनी कार्यालयातील उपस्थिती तपासणीसाठी अचानक भेटी देणेबाबतदेणेबाबत शासनाने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत.जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या भेटी व दौ-याबाबत सर्वसाधारण सूचना ग्रामविकास विभागाने १० मार्च २००८ मध्ये दिल्या आहेत.नागरी स्थानिक संस्थाच्या कामकाजात पारदर्शकता (Transparency), उत्तरदायित्व (Accoumtability) व कार्यक्षमता (Efficiency) आणण्याच्या दृष्टीकोनातून करावयाच्या उपायोजनांबाबत शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.शासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता यावी तसेच निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी सर्वसाधारण सूचना शासन निर्णय ३० जानेवारी २०१४ रोजी देण्यात आल्या आहेत.

एकंदर क्षेत्रीय भेटी आणि दौरे हा प्रशासनाचा मुख्य आधार आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन बैठका आणि कामाचा वाढलेला व्याप यामुळे क्षेत्रीय भेटी आणि दौरे यावर निश्चितच परिणाम झाला आहे. शासन आणि जनता यातील दुवा म्हणून प्रशासन काम करत असते निश्चितच क्षेत्रीय भेटी आणि दौरे कमी झाल्यास या दुव्यांमध्ये दुरावा तयार होतो. जनतेमध्ये शासनाबद्दल अविश्वास वाढून ही दरी वाढत जाते.या परिस्थितीचा फायदा एजंट आणि मध्यस्थ घेऊन शासनाची प्रतिमा मालिन करतात.म्हणून क्षेत्रीय भेटी आणि दौरे याबाबत प्रशासकीय यंत्रणेने खूप दक्ष आणि जागरूक राहायला हवे. नेमून दिलेल्या तपासण्या आणि दौरे हे पूर्ण करायला हवे. जनतेपर्यंत पोहचून त्यांच्यात प्रशासनाबाबत आत्मीयता निर्माण करावी लागते. वरिष्ठ ते कनिष्ठ ही उतरंड तपासणी, दौरे, भेटी यातून अजून मजबूत करावी लागते.लाभार्थ्यांना त्यांच्या डोअरस्टेप वर योजनेंचा लाभ दयावा लागतो.जनतेच्या विविध अडचणी, प्रश्न आणि समस्या ह्या जागेवर सोडवाव्या लागतात.यातून एक लोकाभिमुख, जबाबदार, उत्तरदायी, पारदर्शक ,गतिमान आणि परिणामकारक असे सुप्रशासन अस्तित्वात येते.

००९/०५१ दिनांक १५.१०..२०२२
सुप्रशासन संधी आणि आव्हाने©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी मुंबई
९९७०२४६४१७