तुमचे व्यक्तिमत्व समजून घ्या ! Understand your Personality !
तुमचे व्यक्तिमत्व समजून घ्या ! Understand your Personality !
आपले व्यक्तिमत्व हाच आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. मात्र या भौतिक जगात आपण व्यक्तिमत्वाची अत्यंत अपुरी आणि चुकीची व्याख्या केली आहे. बर्याच वेळा चांगले राहणे, चांगले दिसणे आणि आकर्षक असणे एवढीच अर्धवट व्याख्या व्यक्तिमत्वाची केली जाते. अनेक तत्ववेत्ते आणि विचारवंत यांनी व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या परीने व्याख्या केल्या आहेत. या सर्व व्याख्यांचा सार काढला असता व्यक्तीच्या सोबत कायम राहणारे गुण वैशिष्टे आणि त्याच्या मनाचा कल आणि त्यातून तयार होणारा स्वभाव आणि वागणे म्हणजे व्यक्तिमत्व होय. आपले नक्की व्यक्तिमत्व कसे आहे? याचाच शोध अनेकांना मरेपर्यंत लागत नाही. साहजिकच त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचे स्थान समाजात काय आहे याचाही त्यांना उलगडा होत नाही. त्यामुळे ते कायम भरकटत राहतात आणि त्याचा विपरीत असा परिणाम त्यांच्या विकास आणि प्रगती यावर होतो. प्रस्तुत लेखात व्यक्तिमत्व म्हणजे काय? ते कसे तयार होते? त्यावर कोणते घटक प्रभाव आणि परिणाम करतात? व्यक्तिमत्व मध्ये इष्ट बदल कसे करावेत ? व्यक्तिमत्व विकासातून सुखाचा शोध कसा घेणार? अशा अनेक बाबीवर प्रकाश टाकणार आहोत.
व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व विकास हा आजच्या या जलदगतीने बदलणार्या जगात चर्चेचा विषय आहे. आज कोणत्याही क्षेत्रात जर प्रवेश करायचा असेल तर सर्व प्रथम तुमचे व्यक्तिमत्व पडताळून मगच तुम्हाला त्या क्षेत्रात प्रवेश दिला जातो. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात यशस्वी होयचे असेल तर सर्वसमावेशक अशा व्यक्तिमत्वाशिवाय पर्याय नाही. आपली वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक यापैकी कोणतीही प्रगती साधायची असेल तर तुमचे व्यक्तिमत्व तुम्हाला एका उत्तुंग अशा पातळीवर घेवून जावे लागते. साहजिकच व्यक्तीचे जीवन आणि त्याचे व्यक्तिमत्व ह्या दोन बाबींचा विचार वेगळेपणाने करता येत नाही. तर त्यांना एकत्रितरित्या समजून आणि उमजून घ्यावे लागते. आपले व्यक्तिमत्व विकास ही काही क्रिया नाही तर ती अखंड अशी प्रक्रिया आहे.त्यामुळे व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला जाणीवपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे लागतात. बरेच लोक असेही म्हणतात की व्यक्तिमत्व हे वाढत्या वयासोबत घडते परंतु आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून रहावयाचे असेल तर व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी आत्मसाद करून काळाच्या पुढे राहावे लागते.
आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध घेत असताना आपले व्यक्तिमत्व जीवशास्रीय, मानसशास्रीय आणि सामाजशास्रीय दृष्ट्या समजून घ्यावे लागते. साहजिकच कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन आणि मोजमाप करणे ही एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ वेगवेगळ्या दृष्टीकोणातून आणि वेगवेगळे तंत्र वापरुन व्यक्तिमत्व निश्चित करत असतात. व्यक्तिमत्वामध्ये आपण इतरांशी कसा संवाद साधता आणि इतरांशी कसे सहचर्य साधता ही महत्वाची बाब ठरते. आपण कसा विचार करतो, आपल्याला काय वाटते आणि आपण काय कृती करतो हे व्यक्तिमत्व निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. जर आपण रस्त्याने जात असतांना आपल्याला रस्ता पार करतांना एक वृद्ध असा माणूस दिसला तर त्याला मदत करावी हा विचार येणे आणि त्यातून त्याच्या बद्दल दया वाटणे आणि कृती करून त्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करणे हा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग होय. एकंदर अनेक बाबी आणि गोष्टी याचा परिपाक म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व असते. आपली वर्तणूक आणि वागणे हे काळाच्या ओघात आणि येणार्या अनुभवातून कायम बदलणारे असते. जसे ते बदलते तसे व्यक्तिमत्वही बदलत असते. आपल्या भावना आणि त्या व्यक्त आणि प्रदर्शित करण्याची आपली पद्धती यावरूनही आपले व्यक्तिमत्व ठरत असते. काही लोक एकदम भावना प्रकट करतात तर काही लोक आपल्या भावना दाबून ठेवतात.
व्यक्तिमत्व विकास साधत असताना अनेक बाबीवर आपल्याला काम करावे लागते. त्यामध्ये तुमची शरीरयष्टी, शरीराची ठेवण आणि शरीराची बांधणी कशी आहे हे सर्व प्रथम महत्वाचे ठरते. जरी आपल्याला आपली ऊंची आणि ठेवण ही अंनुवंशिक रीतीने मिळत असली तरी आपली शारीरिक बांधणी बहुतांशी आपल्या हातात असते. त्यामुळे उंच आणि सडपातळ, गुबगुबीत आणि गोलाकार आणि मजबूत आणि भक्कम यापैकी आपण नक्की कोणत्या व्यक्तिमत्वात समाविष्ट होतो हे आधी पडताळावे लागते. उंच आणि सडपातळ व्यक्तिमत्वाचे लोक अधिक गतीमान आणि सहनशील असतात. गुबगुबीत आणि गोलाकार व्यक्तिमत्वाचे लोक सुस्त आणि वेळकाढू असतात. मजबूत आणि भक्कम व्यक्तिमत्वाचे लोक गतिशील, सहनशील आणि चपळ असतात. त्यामुळे ते सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात जास्त यशस्वी होतात. त्यामुळे शक्य होईल तेवढे शारीरिक दृष्टीने मजबूत आणि भक्कम होण्यासाठी प्रयत्न हवेत.
आपले दिसणे हे जरी अंनुवंशिक असले तरीही त्यात आकर्षकपणा आणणे हे आपल्या हातात असते. त्यासाठी आपली केसांची ठेवण आणि आपला पेहराव यावर काम करावे लागते. आकर्षक लोक सर्वांना आवडतात आणि त्यांना संधीही लवकर मिळते. त्याच सोबत तुमची शारीरिक प्रतिकार क्षमता कशी आहे यावरही व्यक्तिमत्व ठरत असते. तुमची रक्तातील साखर आणि तुमचा रक्तदाब जर योग्य असेल तर तुमच्या दैनदिन जीवनात उत्साह निर्माण होतो. तुमची रोजची तीच चिंता, तोच तणाव, दबाव, आणि उदासिनता, चिडचिडेपणा या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम साधत असतात. तुमच्या दैनदिन आयुष्यात या गोष्टी असतील तर तर तुमचे व्यक्तिमत्वात दोष निर्माण होतात. हे दोष वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रकट झाल्याने तुमचा स्विकार होणेमध्ये अडचणी निर्माण होतात. सामाजिक संयोजन आणि समायोजन मध्ये अडथळे येतात आणि त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व खुलत नाही.
मानसशास्त्रीय घटक जसे तुमची बुद्धिमता ही सुद्धा व्यक्तिमत्वावर परिणाम आणि प्रभाव साधत असते. तुमची बौद्धिक क्षमता कशी आणि किती आहे? या वरुन लोक तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमच्या विषयी मत बनवत असतात. उत्तम बौद्धिक क्षमता असलेले लोक हे सामाजिक पातळीवर उत्तम समायोजन साधतात असे दिसून येतात. तसेच बुद्धीमान लोक हे काही अंशी आत्मपरीक्षण करणारे, विचारी, सृजनशील आणि धाडशी असतात असेही दिसून येते. तसेच अशा व्यक्तींना समस्या काय आहेत, समस्याचा अर्थ काय आहे? हे समजते. बुद्धिमत्ता ही संपूर्णत अंनुवंशिक नसते तर ज्याप्रमाणे हिर्याला पैलू पाडून त्याची किमंत वाढते त्या प्रमाणे आपली गुणवत्ता साधारण असली तरी तिला पैलू पाडून तिला असाधारण करणे शक्य होते. त्यातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
आपले भावनाविश्व हा सुद्धा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा घटक आहे. भावनविश्व हे सामाजिक आणि वैयक्तिक समायोजन वर प्रभाव आणि परिणाम साधत असते. व्यक्तीच्या ठायी असलेले भावनांचे वर्चस्व, संतुलन, अभिव्यक्तीची रीत, भावनांचा तणाव ह्या बाबी व्यक्तिमत्वावर बर्याच अंशी प्रभाव टाकतात. भाव विश्वाचे योग्य समायोजन होत नसल्याने धास्तवलेला व्यक्ती हा आनंदाचे क्षण असेल तरीही भीतीमय राहतो, या उलट सक्षम व्यक्ति हा अडचणीचे क्षण असतील तरीही आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच यात भावनिक संतुलन महत्वाचे ठरते. जेवढे भावनिक संतुलन अधिक तेवढा व्यक्तिमत्व विकास होतो.
आपण ज्या परिसरात, वातावरणात आणि समाजात राहतो आणि वाढतो तेथील अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटक आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आणि परिणाम साधत असतात. आपली कुटुंबात आणि समाजात स्वीकार्यता किती आहे? हे आपल्या व्यक्तिमत्त्वावरून ठरते. आपल्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून जशा अपेक्षा असतात, तशा अपेक्षा कुटुंबाकडून आणि समाजाकडूनही आपल्याकडे असतात. कुटुंबाला आणि समजाला अनुरूप आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपण वागतो का? हे ते पाहत असतात. समाजात तुमचे संबध किती मैत्रीपूर्ण आहेत, यावरूनही तुमची व्यक्तिमत्व पडताळणी होत असते. समाज एखन्द्या व्यक्तिला कशा प्रकारे स्विकारतो यावर त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो. लवचिक, साहसी, कार्यशील आणि धाडशी लोकांना समाजात लगेच स्वीकारले जाते. बर्याच वेळा सामाजिक संधी पासून काही लोक वंचित राहतात त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रतिकूल असा परिणाम होतो.
शिक्षण हे आपल्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा प्रभाव टाकत असते. शिक्षणातुण फक्त ज्ञानाची निर्मिती न होता प्रज्ञा, करुणा आणि शील याची निर्मिती झाली तर ते परिपूर्ण असे शिक्षण ठरते. विद्यार्थी दशेत विद्यार्थी आपले पालक, शिक्षक आणि सहविद्यार्थी यांच्या विषयी कसा दृष्टीकोण आणि वागणूक आहे यावरही त्यांचे व्यक्तिमत्व अवलंबून असते. स्व-आत्मविश्वास अणि स्व-सन्मान याची वाढ खर्या अर्थाने शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन जीवन यात तयार होणारे व्यक्तिमत्व पुढील आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असे असते. कुटुंब सुद्धा अत्यंत प्राथमिक असा घटक असून कुटुंबातील वातावरण हे आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकत असते. कुटुंबाचा तुमच्या सोबत आणि तुमचा कुटुंबासोबत कसा संवाद आहे यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे निर्धारण होत असते. कुटुंबात जर प्रेम, आपुलकी,स्नेह असेल तर तेच तुमच्या व्यक्तिमत्वात येवून तुम्ही समाजात आणि समाजासाठी तसेच वागता. एकंदर कुटुंबातील भावनिक वातावरण कसे आहे यावर व्यक्तिमत्व अवलंबून असते
व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न हिप्पोक्रेटस याने केला. त्याने वात-रक्त प्रकृती व्यक्तिमत्व, कफ प्रकृती व्यक्तिमत्व, काळे पित्त प्रकृती व्यक्तिमत्व आणि पिवळे पित्त प्रकृती व्यक्तिमत्व असे चार व्यक्तिमत्वाचे प्रकार मांडले. व्यक्तीच्या शरीरात या पैकी ज्याचे प्राबल्या आहे तसे व्यक्तिमत्व हा त्याचा आधार होता. ज्या व्यक्ति मध्ये वात आणि रक्त जास्त आहे ते व्यक्तिमत्व हे उत्साही आणि कार्याक्षिल असे होय. कफ प्रकृती व्यक्तिमत्व हे निरुस्थायि व मंदगती असे असते. काळे पित्त प्रकृती व्यक्तिमत्व हे दु:खी असते तर पिवळे पित्त प्रकृती व्यक्तिमत्व चिडचिड आणि शीघ्रकोपी असते असे त्याने प्रतिपादले. मात्र आता आधुनिक विज्ञान मध्ये या संकल्पनेला तसा काहीही आधार नाही. कार्ल जुंग यांचे सिधांतनुसार चार प्रकारच्या जोड्या आणि आठ प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. यात बहिर्मुख- अंतर्मुख, बाह्यज्ञानी-अंतर्ज्ञाणी, वैचारिक-चिंतनशील, निर्णयशील-समाजशील असे व्यक्तिमत्व येतात. हा सुधा विचार मागे पडला कारण व्यक्तिमत्व हे प्रकारानुसार न करता वैशिष्ट्यानुसार करावा असा नवा विचार आधुनिक मानसशास्त्रात समोर आला. अल पोर्ट नावाचे मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्व हे काही अद्वितीय आणि काही सामान्य गुण वैशिष्टे यातून तयार होते असा नवा विचार मांडला.
अशा प्रकारे जीवनात विकास आणि प्रगती साधायची असेल तर तुमचे व्यक्तिमत्व तुम्हीच समजून घ्यावे लागते. व्यक्तिमत्व समजून घेणेसाठी स्व-संकल्पना, स्व-सन्मान, स्व-आत्मविश्वास, स्व- प्रकटीकरण आणि स्व- मूल्यांकन यावर काम करावे लागते. तसेच स्वतचे व्यक्तिमत्व हे शारीरिक , मानसिक आणि भावनिक पातळीवर पडताळून पहावे लागते. एकदा व्यक्तिमत्व समजले की त्याचा सुयोग्य असा विकास होणेसाठी शारीरिक बांधणी, आकर्षकपणा, बुद्धिमत्ता, भावनांचे संतुलन, विद्या, ज्ञान, प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री, संबध, संवाद इत्यादि बाबी आणि गोष्टीवर जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक काम करावे लागते तेंव्हा कोठे प्रगती आणि विकासास सुरुवात होवून तुम्ही एक साधे, सोपे , सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता.
जीवन अनमोल आहे. ते अधिक सुंदर बनवूया.
६०/१०१ दिनांक २७.०३.२०२३
सुखाच्या शोधात ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७