जिज्ञासू वृत्ती: स्व:प्रगती आणि स्व:विकास साठी आवश्यक (Inquisitiveness: Essential for self-advancement and self-development)
जिज्ञासू वृत्ती: स्व:प्रगती आणि स्व:विकास साठी आवश्यक (Inquisitiveness: Essential for self-advancement and self-development)
मानवी मेंदू आणि मन आणि त्यातून निर्माण होणारे विविध विचार आणि भावना ह्या मानवी जीवनात कायम जिज्ञासा निर्माण करत असतात. जिज्ञासा म्हणजे काय तर काही तरी असलेले (माहिती किंवा ज्ञान) जाणून घेण्याची लालसा किंवा इश्चा होय. जर मानवी मनामध्ये जिज्ञासू वृतीचा अभाव असता, तर मानवाचा आज पर्यंतचा प्रवास कदापि शक्य नव्हता. कोणत्याही नव्याने आढळणाऱ्या किंवा समोर येणाऱ्या बाबी, गोष्टी आणि घटना यांचा मनाकडे आणि मेंदूकडे प्रवास झाला की, त्यातून जिज्ञासा निर्माण होते हे लक्षात घ्यावे. म्हणून मानवी जीवनात ‘जिज्ञासू वृतीला’ अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. मानवी जीवनात कायम पुढे जात विकासाच्या शिखरावर रूढ होयाचे असेल तर दैनंदिन जीवनात कायम उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा या बाबी जिवंत ठेवाव्या लागतात. जिज्ञासू वृत्ती मुलांमध्ये रूजवणे हे काम पालक आणि शिक्षक यांचे असते मात्र त्या नंतर त्या जिज्ञासू वृत्तीची वाढ मात्र व्यक्तीच्या दृष्टीकोनाच्या जडणघडणवर अवलंबून असते. कोणत्याही व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात त्याला जिज्ञासू वृतीने वाटचाल करावीच लागते. कारण जिज्ञासे मधूनच संधी तयार होते आणि संधी ओळखून तिचे सोने केले, की प्रगतीचा मार्ग सुकर होतो. प्रस्तुत लेखात जिज्ञासा म्हणजे काय ? ती कशा प्रकारे निर्माण होते? तीचे अस्तित्व मानवी जीवनात असेल तर त्याचे कसे फायदे होतात? तसेच ती कशी जागरूक करावी? याबाबत प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
जिज्ञासा म्हणजे काय तर अज्ञाता कडून ज्ञाता कडे होणारा प्रवास होय. जिज्ञासा म्हणजे काय तर जाणून घेण्याची प्रवृत्ती होय. जिज्ञासा म्हणजे काय तर समजून घेण्याची वृत्ती होय. जिज्ञासा म्हणजे अंधारकडून उजेडाकडे होणारा प्रवास होय. जिज्ञासा म्हणजे ज्ञानाची आस होय. अशा प्रकारे जिज्ञासा ही आयुष्याला खर्या अर्थाने डोळस बनवून आकार देण्याचे काम करते. जेवढी जिज्ञासू वृत्ती चांगली तेवढे ज्ञानी आणि बुद्धीमान होण्याकडचा प्रवास आपला सुखर आणि सोपा होतो. जिज्ञासा ही बाल आणि कुमार वयात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. साहजिकच हा काळ म्हणजे मातीच्या गोळ्याला आकार देण्याचा असतो. या काळात मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती खूप उच्च पातळीवर असते. साहजिकच त्यामुळे त्यांना पडणारे प्रश्न असंख्य असतात. या वयात या प्रश्नांना उत्तर देण्याचे काम पालक आणि शिक्षक यांना करावे लागते. मात्र सध्याच्या धावपळीच्या आणि धाकधकीच्या जगात पाल्यांची ही जिज्ञासू वृती जाणीव पूर्वक किंवा अजानतेपणाने दाबली जाते. साहजिकच याचे दुष्परिणाम त्या मुलाच्या जीवन विषयक विकासावर होतात. यामुळे अशी मुले बुजरी आणि आत्मविश्वास हरवलेली होतात. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांनी लहान पणापासून मुलांमध्ये जिज्ञासा कशी जागृत होवून कायम राहील याबाबत दक्ष राहिले पाहिजे. दैनदिन जीवनात आपल्या ठायी जिज्ञासू वृती कायम जोपासावी लागते. आजूबाजूला काय सुरू आहे आणि काय घडतय या कडे जाणीवपूर्वक डोळसपणाने पहावे लागते. जिज्ञासू वृतीने जाणून घेणे आणि समस्या आणि अडचणी निर्माण होत असतील तर त्या प्राथमिकता आणि वेळ व्यवस्थापन या आधारे सोडवणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते.
ज्ञानेंद्रिये यांच्या मार्फत घटना, बाबी आणि वस्तू यांचे आकलन होते. या आकलनाची तार्किक चिकित्सा करून अर्थ लावला जातो. या अर्थाचे आधारे घटना, बाबी आणि वस्तू पृथक्करण किंवा वर्गीकरण केले जाते. शेवटी विश्लेषण करून निष्कर्ष काढून अमूर्तीकरण(Abstraction)आणि सामान्यीकरण(Generalization)केले जाते. अमूर्तीकरण म्हणजे एखांदी बाब किंवा वस्तु बाबत संक्षेप रूपाने जाणून घेणे होय. उदाहरण दाखल सांगायचे तर मुंगी, झुरळ आणि डास हे किडे आहेत. यात आपण या सर्वांचे काही समान तत्व गृहीत धरून किडे ही अमूर्त संकल्पना तयार करतो. तर सामान्यीकरण म्हणजे ज्ञात असलेल्या बाबी एक समान गुण धारण करतात त्या आधारे अज्ञात असलेल्या त्या प्रकारच्या सर्व बाबी समान गुण धारण करत असतील असे मानणे होय. उदाहरण द्यायचे झाल्यास आपण कावळ्याचा रंग काळा आहे असे पाहतो त्यावरून आपण असे सामान्यीकरण करतो की सर्व कावळे काळे आहेत. मात्र अमूर्तीकरण आणि सामान्यीकरणच्या या संपूर्ण प्रवासात एक बाब कायम असते, ती म्हणजे जिज्ञासा होय ती नसेल तर आकलन ते अमूर्तीकरण आणि आकलन ते सामान्यीकरण हा प्रवास पूर्ण होत नाही. निर्माण होणारी जिज्ञासा आणि तिला आलेले अडथळे यामुळे नमूद केलेले वर्तुळ पूर्ण होत नाही. वर्तुळ अपूर्ण राहिले की अनेक बाबी आयुष्यात अर्धवट राहतात किंवा अपूर्ण राहतात. जीवनात बरेच काही करायचे राहून गेले, हा जो सुर आळवला जातो तो यामुळेच.
मानवाचे निसर्गातील स्थान त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर मजबूत आणि भक्कम करून तो निसर्ग जीवनसाखळीत वरच्या स्तरावर विराजमान झाला आहे. निसर्गाच्या जीवन साखळीत वरच्या स्तरावर जे मांसाहारी प्राणी जसे वाघ आणि सिंह होते, त्यांना तर त्याने कधीच जीवन साखळीत खालच्या स्तरावर ढकलले आहे. मात्र हा प्रवास काही अचानक झाला नाही, त्यासाठी मानवाला २५००० पेक्षाही जास्त पिढ्या वाटचाल करावी लागली आहे. साहजिकच या जीवन साखळीत अगम्य बुद्धीच्या जोरावर स्थान निर्माण करत असतांना त्याला आकलनातून अमूर्तीकरण आणि सामान्यीकरण कडे प्रवास करणेसाठी उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा या बाबी खुप महत्वाच्या ठरल्या आहेत. साहजिकच त्यामुळे मानवी उत्क्रांती आणि मानवी प्रगती यात उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा या बाबींना अनन्यसाधारण महत्व आहे.
उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने इंग्रजी भाषेत येतो. तो म्हणजे Curiosity होय. मात्र मराठी मध्ये हे तीनही शब्द समान असले तरीही वेगवेगळ्या अर्थाच्या छटा दर्शवितात. काही तरी जाणण्याची इस्छा म्हणजे जिज्ञासा होय. जेंव्हा इस्छा प्रबळ आणि उत्कट होते त्यावेळेस मानवी मनात उत्सुकता जागृत होते. कुतूहल मात्र फक्त जाणून घेण्याबाबतची एक सर्वसाधारण आणि सामान्य इच्छा असते. अग्नीचा शोध ,चाकाचा शोध आणि शेतीचा शोध ह्यासारख्या अनेक उपलब्धी ह्या मानवाच्या ठायी असलेले उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा या मुळे शक्य झाल्या आहेत.
मानवी जिज्ञासा चे मूळ हे मानवी मनाचे होणारे आकलन यावर अवलंबून आहे. हे आकलन डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ यातून होत असते. मात्र हे नुसते आकलन होवून उपयोग नसतो तर त्या आकलनाचे पृथक्करण(Separation)आणि विश्लेषण( Analysis) झाल्या नंतरच जिज्ञासा जागृत होते. इतर सजीव प्राणी यांनाही वरील प्रमाणे अवयव आहेत. त्यांना काही बाबीचे आकलन सुद्धा होते. मात्र त्या आकलनाचे पुढे होणारे पृथक्करण, विश्लेषण आणि त्यातून निघणारे निष्कर्ष याची सांगड त्यांना घालता येत नसल्याने त्यांच्या ठायी उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा तयार होण्यास अडथळे निर्माण होतात. किंवा बहुतांशी ती होतच नाही, असे म्हणावे लागते.
जिज्ञासा ही ज्या प्रमाणे आकलनाशी निगडीत आहे तशी ती दृष्टीकोनाशी सुद्धा निगडीत असते. जेवढा दृष्टीकोन सकारात्मक तेवढी जिज्ञासा वाढीस लागते. त्या मुळे जिज्ञासा कायम ठेवण्यासाठी दृष्टीकोण हा सकारात्मक ठेवावा लागतो. सकारात्मक दृष्टीकोण हा हवेतून तयार होत नाही तर त्यासाठी मनात तयार होणारे विचार आणि भावना यांना एका सुयोग्य अशा पातळीवर आणावे लागते. तसे होत नसेल तर सकारात्मकतेत अडथळे निर्माण होतात.
जिज्ञासा ही कायम काही तरी नवीन शोधण्याची आणि काही तरी नवीन करण्याची उर्मी आणि शक्ती प्रदान करते. त्यामुळे मानवी जिवन प्रवाही बनून त्यात चैतन्य निर्माण होते. असे चैतन्य निर्माण झाले की तुमचा उत्साह गगनाला भिडतो आणि काम-कार्ये याला गती प्राप्त होते. ही गती कायम राखली की आपला विकास आणि प्रगती योग्य प्रकारे सुरू होते आणि त्यामुळे तुम्ही सुखावता. त्या साठी कायम जिज्ञासू वृतीने काही तरी शोधत आणि नावीन्यपूर्ण करत राहिले पाहिजे.
न्यूटनच्या पूर्वी अनेक लोकांनी सफरचंद हे झाडावरून खाली पडल्याचे पहिले होते मात्र जे न्यूटनला सुचले ते त्या पूर्वी कोणाला सुचले नव्हते. साहजिकच या मागे जाणून घेण्याची जिज्ञासा काम करत होते. या जिज्ञासेपोटी त्यांनी पुढे सखोल अभ्यास करून गुरुत्वाकर्षण आणि गतीच्या नियमांचा शोध लावला. जगातले अनेक शोध हे कुतुहुल आणि जिज्ञासा या मुळेच लागले आहेत. मागील २५० वर्षात जे काही घडून आले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती झाली तिला सुद्धा मानवी ठायी असलेली जबरदस्त इस्चाशक्ती आणि महत्वाकांक्षा ह्या बाबी जरी जबाबदार असल्या तरी प्राथमिक अथवा मूळ स्तरावर हे काम कुतुहुल आणि जिज्ञासा यांनी केले आहे.
एकंदर जे काही दिसतं आणि ऐकलं जात त्याची अर्थपूर्ण सुरुवात ही जिज्ञासे मार्फत होते. जिज्ञासा ही कायम जागृत ठेवली तर जाणून घेण आणि त्यातून आपला उत्कर्ष करणे शक्य होते. जिज्ञासे मधून माहिती प्राप्त होत असल्याने जीवनात दक्षता आणि अखंड सावधानता ठेवणे शक्य होते. जिज्ञासेपोटी ज्ञानात भर पडून अनुभव आणि कौशल्ये यात वाढ होते. जिज्ञासेतूनच अशक्य ते शक्य होण्याकडे वाटचाल होते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात कायम उत्सुकता, कुतुहूल आणि जिज्ञासा जीवंत ठेवावी लागते आणि त्यातून पुढे पुढे मार्गक्रमण करून स्व:प्रगती आणि स्व:विकास साधावा लागतो. त्या अनुषंगाने आपण एक साधे, सोपे, सरळ, सूटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.
५४/१०१ दिनांक १२.११.२०२२
जीवन विषयक कौशल्ये ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७