रंग आणि आपले भावनाविश्व ( Colors and Our Emotional World ): नवरात्र पहिला दिवस नारंगी रंग

                                   रंग आणि आपले भावनाविश्व ( Colors and Our Emotional World ): नवरात्र पहिला दिवस नारंगी रंग
          नवरात्र उत्सव आणि नऊ रंग याचे अतूट असे नाते आहे. कोणत्या दिवसाला कोणत्या देवीच्या रुपाचे पूजन होते, यावर आधारित हे रंग आहेत. त्यामुळे नवरात्र उत्सवात या रंगाना अनन्यसाधारण असे महत्व आहे. ज्या दिवशी जो रंग असेल त्या रंगाची आरास तर केलीच जाते त्या सोबत विशेषत: महिला त्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. त्यामुळे संपूर्ण वातावरणात जल्लोष तयार होवून ते रंगमय आणि भक्तिमय असे होवून जाते. भारतीय संस्कृतीमध्ये रंगांना धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय असे महत्व आहे. साहजिकच हे रंग आपले विचार आणि भावना याच्याशी जोडले गेले आहेत.तसेच आपल्या जीवनातील अनेक घटना ह्या रंगाशी आपोआप जोडल्या जातात. प्रस्तुत लेखमालेत पुढील नऊ दिवस नवरात्रीचा दिवस , निगडित देवीचे रूप , देवीशी निगडित रंग आणि त्या रंगाचे आपले विचार आणि भावना यावर पडणार प्रभाव आणि महत्व याबाबत माहिती घेणार आहोत.
        नवरात्र उत्सव मधील पहिल्या दिवशी देवी शैलपूत्रीचे रूप पूजले जाते. हिमालयाची कन्या म्हणून या देवीला शैलपुत्री असे म्हणतात. या देवीचा आवडता रंग नारंगी किंवा भगवा असल्याने पहिल्या दिवशी या रंगाला महत्व दिले गेले आहे.रंग आणि भावना याचे अतूट असे नाते आहे. मानवी मेंदू आणि त्याची उच्च अशी आकलन क्षमता हे मानवी प्राण्यास मिळालेले सृष्टीचे मोठे वरदान आहे. आपल्या प्रत्येक इंद्रियांची उच्च क्षमता आपल्याला उत्तुंग आणि उत्कृष्ट बनवत असते. जग सुंदर आहे असे आपण जेंव्हा म्हणतो तेंव्हा आपण या इंद्रियांमार्फत आपल्याला जे आकलन आणि ज्ञान होते त्याचा त्याला आधार असतो.
       आपले अनमोल नेत्र आपल्याला ह्या विशाल सृष्टीचे दर्शन घडवून आणतात. हे दर्शन घडून येत असताना आकार आणि रुपे यांच्या प्रतिमा आपण आपल्या स्मृति केंद्रात साठवून ठेवत असतो. आकार आणि रुपे स्मृतीत साठवून आपण ठेवत असताना आपण त्या वस्तूचे गुणवैशिष्ट्ये सुद्धा स्मृतीत साठवून ठेवतो. समान आकार आणि समान गुणवैशिष्ट्ये असणार्या गोष्टींचे आपण वर्गीकरण करत असतो. चेंडूचा आकार, चेंडूचा टणकपणा आणि चेंडूचा रंग ही वैशिष्ट्य त्या चेंडूंच्या वर्गीकरण करण्यात मदत करतात.जेंव्हा आपण रंगाबाबत बोलतो तेंव्हा आपल्याला रंग म्हणजे काय ? हे समजून घ्यावे लागते. रंग म्हणजे एखाद्या वस्तूवर दृश्य प्रकाश पडल्यानंतर त्या वस्तूतुन परावर्तीत झालेला प्रकाश किरणांचा स्पेक्ट्रम किंवा वर्णपट की जो आपल्या दृष्टीपटलावर पडतो आणि आपला मेंदू मधील विशिष्ट प्रकारचा भाग किंवा केंद्र त्या रंगाचे आकलन करतो. टोमोटोचा रंग लाल आहे कारण टोमॅटो मधील लायकोपिन नावाचे रसायन किंवा पिगमेंटचे अणू हे लाल रंगाचे बनलेले असतात. ज्यावेळी दृश्य प्रकाश टोमॅटो वर पडतो त्यावेळी सात रंगापैकी इतर सहा रंग हा टोमोटोचा अणू शोषून घेतो आणि फक्त लाल रंग आपल्या डोळ्याकडे परावर्तित करतो आणि त्या आधारे आपल्याला टोमॅटोच्या लाल रंगाचे ज्ञान होते. आशा प्रकारे कोणत्याही वस्तूवर दृश्य प्रकाश पडल्यानंतर जो प्रकाशाचा स्पेक्ट्रम परावर्तित होतो तो त्या वस्तूचा रंग असतो.आयझॅक न्यूटनने शोधून काढल्यानुसार पांढरा प्रकाश सात रंगांचा असतो. जर काचेच्या प्रिझममधून पांढरा प्रकाशाचा किरण गेला तर त्याचे सात रंग होतात. हे रंग लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, इंडिगो किंवा पारवा आणि जांभळा (VIBGYOR) हे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ज्या वस्तूमधून जो रंग परावर्तित होतो तो आपल्या डोळ्यांना दिसतो. म्हणजे आपल्या डोळ्यांना वस्तु दिसण्यासाठी आणि तिचा रंग समजण्यासाठी त्या वस्तूवर प्रकाश पडावा लागतो. जर अंधुक प्रकाश असेल तर वस्तु पुसट आणि अस्पष्ट दिसतात त्या यामुळेच.
नारंगी रंग हा दृश्य प्रकाशाचे स्पेक्ट्रम आहे. हा रंग पिवळा आणि लाल रंगाच्या मध्यभागी येतो. या रंगाची तरंगलांबी ही ५८५ ते ६२० नॅनोमीटर असते. तरंगलांबी म्हणजे तरंगाच्या दोन शिखरमधील अंतर होय. तर या केशरी किंवा नारंगी रंगाची वारंवारता ही ५०५ ते ४८० किलो हर्ट्झ एवढी येते. वारंवारता म्हणजे एका ठराविक वेळी होणारी तरंगाची आंदोलने होय. जेवढी तरंगलांबी कमी तेवढी वारंवारता जास्त असते आणि जेवढी वारंवारता अधिक तेवढी जास्त उष्णता तयार होते .नारंगी म्हणजे इंग्रजी मध्ये ऑरेंज होय.ऑरेंज हा शब्द इंगजी भाषेत फ्रेंच भाषेतून आला आहे. अरब आणि पारशी भाषेत मध्ये नारंग या शब्द आहे. भारतात संस्कृत भाषेत नारंग शब्द आहे. त्यातून तो मराठी भाषेत नारंगी असा आला आहे.तसेच द्रविड भाषेतही नारंगी हा शब्द नारनदम किंवा नारंजा असा दिसून येतो.
         नारंगी हा रंग भारत देशाच्या ध्वजात विराजमान आहे. त्याला आपण केशरी म्हणतो आणि भगवा असेही म्हणतो. हा रंग सामर्थ्य आणि धेर्ये याचे प्रतीक आहे. केशरी रंग त्याग आणि बलिदान सुद्धा दर्शवतो. समर्पण सुद्धा या रंगातून प्रतीत होते. साधू जो पोशाख परिधान करतात त्याचाही रंग सुद्धा भगवा आहे त्यातून त्याग आणि बलिदान प्रतीत होते. भगवा रंग एक पवित्र असा रंग आहे.नारंगी रंग हा भावनिक भक्कमता दाखवतो, हा उबदार असा रंग आहे. तो आधार देतो आणि उत्साह वाढवतो.त्यामुळे प्राचीन काळी भगवा रंगाचे ध्वज हे अनेक राजवटीचे ध्वज होते.भगवा रंगाचे ध्वज युद्धात वापरल्यामुळे सैन्य त्वेषाने शत्रूपक्षावर तुटून पडे आणि विजयश्री खेचून आणत असे.
नेदरलँड देशाचा हा राष्ट्रीय रंग आहे हे अनेकांना माहीत नसेल . भारतीय अध्यात्म आणि योग नुसार सक्रल चक्र हे अभिव्यक्ती आणि कामभावना याच्याशी निगडीत आहे हे चक्र नारंगी रंगाचे आहे असे मानले जाते. जेवढी रंगाची तरंगलांबी जास्त तेवढं तो रंग उत्साह वाढवतो आणि जेवढी रंगाची तरंगलांबी कमी तेवढी तो आरामदायी आणि शीतल असतो असे विज्ञान सांगते. एकूण सात रंगात केशरी हा रंग दोन क्रमांकाची तरंगलांबी असणारा रंग आहे.त्यामुळे या रंगामुळे उत्साह द्विगुणित होतो आणि व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो.लाल रंगाची आक्रमकता आणि पिवळ्या रंगाची सावधगिरी याचा मध्य केशरी रंगात दिसून येतो. केशरी रंगात आक्रमकता आणि सावधगिरी याचा समन्वय साधला जातो.
         एकंदर रंग आणि त्याचे आपले विचार आणि भावना यावर पडणारा प्रभाव हे शास्र समजून घ्यावे लागते. रंग आणि रंगसंगती याचा सुयोग्य असा वापर करून आपल्याला विचार आणि भावना याची लयबद्धता साधता येते. योग्य आणि सुयोग्य आशा रंगाचा वापर करून आपल्याला आपले घर , कार्यालय आणि आपली वेशभूषा आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मकता याचा सुयोग्य वापर करून आपले जीवन अधिक सुखकर करण्याकडे वाटचाल करता येते.
राजीव नंदकर ,उपजिल्हाधिकारी
रंग आणि आपले भावनाविश्व
दिनांक :१५ ऑक्टोबर २०२३
घटस्थापना.