स्व: चा शोध; आत्मभान आणि आत्मज्ञान Self-Discovery; Self-Awareness and Self-Knowledge

स्व: चा शोध; आत्मभान आणि आत्मज्ञान

Self-Discovery; Self-Awareness and Self-Knowledge

      मी जेव्हा माझ्यातूनच हरवलेला असतो, मी जेव्हा माझ्यातुनच दूर गेलेला असतो, मी जेंव्हा माझ्यातूनच रिक्त झालेला असतो, तेंव्हाच मी मला निरर्थक शोधत राहतो, इतरांच्या डोळ्यात आणि इतरांच्या मनात. म्हणून स्वतःला हरवू नये, स्वतःतुन दूर जाऊ नये आणि स्वतः तुन रिक्त कदापि होऊ नये. म्हणून आजचा प्रस्तुत लेख.

      स्व: हा तसे पहिले तर एक अक्षरी शब्द, परंतु तो खूप व्यापक अर्थाने वापरला जातो. स्व:ची जाणीव आपल्याला असणे आणि त्याची वेळोवेळी अनुभूती होणे, हे एक मानव म्हणून आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. जो पर्यंत स्व: म्हणजे स्वत:चा शोध लागत नाही तो पर्यंत सर्व गोष्टी शून्यवत असतात. त्याच बरोबर नुसता स्व:चा शोध लावून उपयोग नसतो तर त्या सोबतच आपल्याला आपले आत्मभान आणि आत्मज्ञान जागृत करावे लागते. ही जागृती साधली की आपले जीवन अर्थपूर्ण बनते. प्रस्तुत लेखात आपण आपला स्व:चा शोध कसा घ्यावा आणि त्याला आत्मभान आणि आत्मज्ञानाची जोड कशी द्यावी या बाबत ऊहापोह करणार आहोत.

        मानवी जीवन हे सर्वश्रेष्ट आहे. ते सर्वश्रेष्ट आहे, कारण ते तीनही काळावर आपली छाप सोडते. भूतकाळातून ते स्फूर्ती आणि प्रेरणा घेते, वर्तमान काळात ते कार्यक्षिल आणि कार्यमग्न राहून परस्पर सहकार्याच्या जोरावर विकास साधते, भविष्याबद्दल ते आशावादी राहून आपला आणि इतरांच्या जगण्याचा अर्थ शोधत राहते. मात्र असे दिसून येते अनेक लोक संपूर्ण मानवी जीवन व्यतीत करतात, मात्र ते स्व:ताला शोधत नाहीत आणि स्वतःला ओळखतही नाहीत. जसे  मी कोण आहे ? माझे कर्तव्य काय आहे ? आणि मी काय करायला हवे? हे तीन प्रश्न तसे खूपच सूचक आहेत. जो पर्यंत मी कोण आहे? याचा शोध लागत नाही तो पर्यंत आपले जीवन म्हणजे शीड नसलेले भरकटलेले जहाज किंवा वावटळ मध्ये भरकटलेला कागदाचा तुकडा या प्रमाणे आहे. आज आपण पाहतो की अनेकांची अवस्था अगदी या प्रमाणे झाली आहे. ना खाण्याची भ्रांत, ना जगण्याची आस, आहे तो दिवस मोबाइलच्या स्क्रीन वर मनोरंजन करून मागे ढकला एवढेच काय ते ध्येय आणि उदिष्ट सभोवताली दिसून येत आहे. तर मग स्व:चा शोध कसा लागणार आणि स्व:चा शोध लागणार नाही तर जीवन प्रवाही कसे होणार. जीवनाचा प्रवाह थांबला की ते गढूळ होणार आणि त्यातून नैराश्य आणि चिंता याची वाढ होणार. अशी ही वाढ सुसंस्कृत समाजास कायम धोकादायकच. आपण जे काही बोलतो, आपण जे काही वागतो आणि आपण जे काही करतो, हे बरोबर आहे की चूक याची चिकित्सा करण्याची तसदी घेण्याचे आपण सोडून दिले आहे. या मागे आपल्या मनाचा खूप मोठा स्वार्थ आणि अहंकार दडलेला आहे हे लक्षात घ्यावे. कारण असे करण्याचे आपण सोडून दिले की, आपण आपली कर्तव्ये, कामे आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्यास मोकळे होतो. मात्र असे खूप दिवस चालत नाही अथवा टिकत नाही हळू हळू या गोष्टी इतरांच्या लक्षात येतात आणि ते तुम्हाला आहे तेथेच सोडून ते पुढे निघून जातात.

               स्व: ला म्हणजे आपल्याला आपण समजून घेत नसू तर अगदी लहान सहान कारण आणि घटना या मुळे आपल्याला राग येतो, आपल्याला चीड येते आणि आपण दुसऱ्याला दोष देण्यास सुरुवात करतो. तस पाहिलं तर आपण नेहमी इतरांवर चिडण्यात व रागवण्यात माहीर असतो. कारण प्रत्येक अपयशाचा आणि घटनेचा खापर दुसऱ्यावर फोडून आपण आपली सुटका करून घेत असतो. मात्र अशी सुटका करून घेत असताना समोरची व्यक्ती आपल्याला सोडून देत आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. तसेच असे करून उलट आपण आपल्या मनाला समजावत असतो की यात आपली चूक नाही आणि समोरचेच वाईट आहेत. त्यामुळे मन आणि मेंदू यांचा संयोग होत नसल्याने त्या चुका मेंदू परत परत करत राहतो आणि आपण अजून अपयशाच्या गर्तेत फेकले जातो. हे का होते? कारण आपण आपल्यातल्या स्व: ला जाणलेले नसते.   

          वास्तविक आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्ती, आपल्याला आलेले अपयश व हुकलेली संधी या मध्ये आपली चूक किती आहे? हे आपण पडताळले पाहिजे. या साठी आपण आपल्या मधील स्व:चा शोध घेतला पाहिजे. आलेले अपयश व झालेली चूक यावर खोलवर विचार करायला हवा. एकदा विचार प्रक्रिया सुरु झाली की ती कागदावर उतरवायला हवी आणि त्यावर काही उपाय आपण शोधायला हवेत. एकदा या प्रकारे सुरुवात झाली कि तुमचा इतरांबद्दल निर्माण झालेला राग व चीड हळू हळू कमी होत जाते. तुम्ही त्या चुका वारंवार करत नसल्याने तुमच्या समोर अनेक संधी उपलब्ध होतात. तुमचा यशाचा मार्ग सुकर होत जातो.

      एकीकडे स्व:चा शोध घेत असतांना आपले आत्मभान आणि आत्मज्ञान मात्र जागृत करावे लागते.  आत्मभान म्हणजे आपण आपल्या स्वत:ला आणि अजून खोलवर सांगायचे झाल्यास आपल्या आत्म्याला आणि मनाला जाणून घेणे होय. तुम्ही जे काही करता त्यावेळी तुम्ही काय करत आहात याची जाणीव असणे म्हणजे आत्मभान होय. आत्मभान मध्ये आपण काय करतोय त्याचे चांगले आणि वाईट परिणाम याबाबत जाणीव असणे. तुम्ही जेंव्हा कार्य करता त्या वेळी तुमची सर्व ऊर्जा एकवटली जाते. एकदा आत्मभान जागृत झाले कि तुमचे शरीराचे अस्तित्व राहत नाही तर फक्त तुमच्या आत्म्याचे अस्तित्व राहते. त्यामुळे आत्मभान ठेवून जेंव्हा कार्य करतो तेंव्हा ते सिद्धीस अथवा तडीस जाण्याची शक्यता अधिक वाढत असते. लहान मूले, संत, योगी, ऋषि, तत्ववेत्ते हे आपले कार्ये आत्मभान जागृत ठेवून करत असतात. त्यामुळे लहान मूले, संत, योगी, ऋषि, तत्ववेत्ते हे आपल्या कार्यसिद्धीत तल्लीन होवून जातात आणि खर्‍या अर्थाने यशस्वी, आनंदी व सुखी होत असतात.  

        आत्मज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचा किंवा मनाचा आवाज आणि संदेश ऐकणे होय. आत्मज्ञान मध्ये आपल्या शरीराला काय हवे या पेक्षा आपल्या आत्म्याला किंवा मनाला काय हवे याचा शोध घेतला जातो. हा शोध आत्मवाचक आणि ज्ञानवाचक असतो. यात आज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञान प्राप्त केले जाते. सर्वसाधारणपणे आपण आपल्या मेंदूचे किंवा बुद्धीचे ऐकतो आणि त्या प्रमाणे आपण निर्णय घेतो किंवा कार्ये अथवा कामे करत असतो. मात्र आपण बर्‍याच वेळा आपल्या आत्म्याशी किंवा मनाशी म्हणजे शरीरात अस्तीत्वात असलेल्या उर्जेशी संवाद साधत नाहीत. ही ऊर्जा प्रेरणा आणि जाणीव स्वरुपात अस्तीत्वात असते. आपली प्रगती आणि विकास यासाठी स्वंय प्रेरणा खूप महत्वाची भूमिका बजावत असते. जाणीव मात्र दोन प्रकारची असते त्यात पूर्ण जाणीव आणि अपूर्ण जाणीव याचा समावेश होतो. पूर्ण जाणीव मध्ये आपले दैनदिन दिनक्रम आपण करत असतो. अपूर्ण जाणीव ही अर्धी जागरूक आणि अर्धी मूर्छित अवस्था यात येते. यालाच आपण आत्मअवस्था असे म्हणतो. साहजिकच आत्मज्ञान जागृत करणे आणि त्याची दिशा ही कायम ऊर्ध्व दिशेने आणि एका सरळ रेषेत ठेवणे तितकेच आवश्यक असते.    

         असे दिसून येते की आपला निर्णय एका दिशेला जातो व आणि मनाची ऊर्जा एका दिशेला जाते आणि आपल्याला अपयश येते. मनाचा आणि आत्म्याचा आवाज हा खूप खोलवर असतो तो ऐकण्यासाठी आपल्याला आपले मन, मेंदू आणि शरीर ऊर्जा हे योग्य अशी साधना करून एका रेषेत व एका दिशेला आणावे लागते. मात्र मनाचा किंवा आत्म्याचा हा आवाज ऐकण्यासाठी स्व: ला जाणणे आवश्यक असते. अनेक व्यक्तींना हा आत्म्याचा आवाज ऐकायला येतोही, परंतु त्या अनुषंगाने मन व मेंदू यांना योग्य दिशेने कार्यप्रवण करण्याचे कसब प्रत्येक व्यक्तीच्या हातात नसल्याने त्याचा काही उपयोग होत नाही.  तो आवाज काळजीपूर्वक ऐकणे आणि त्याप्रमाणे आपण योग्य दिशेने कार्यप्रवण होणे खूप आवश्यक असते.

             असे हे आत्मभान व आत्मज्ञान जर प्राप्त करायचे असेल तर आपल्याला सकारात्मक विचार शैली, भावनांचे व्यवस्थापन, शक्ति व ऊर्जेची उपासना, निसर्ग प्रती प्रेम, भूतदया, निरंकार व निर्गुण अशा ईश्वराचे नामस्मरण, जप, योग, प्राणयाम आणि ध्यानधारणा याचा अंगीकार करावा लागतो. सकारात्मक विचार शैली ही बुद्धी आणि मन एका सरळ रेषेत आणल्याने निर्माण होते. भावनांचे व्यवस्थापन हे अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी केले का होते. शक्तीची व ऊर्जेची उपासना अथवा साधना केल्याने आपली काया आणि मन हे अंतर्बाह्य स्वच्छ होते. ही उपासना अथवा साधना शक्यतो भल्या पहाटे केली जाते. निसर्ग हा सर्व सृष्टीला जीवन देतो त्याप्रती आपण कायम नतमस्तक आणि त्याच्या सानिध्यात राहावे. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम, सहानभूतीचा भाव म्हणजे भूतदया. नामस्मरन म्हणजे नामोच्चाराने किंवा मनातल्या मनात ईश्वराचे वारंवार स्मरणकरणे होय. नामस्मरन केल्याने आपले भरकटलेले मन शांत होते.  नामस्मरण हे सकाळी अथवा सायंकाळी केले जाते. यात आपण आपली निरंकार व निर्गुण देवता जिच्यावर आपली श्रद्धा आहे तिचे नामस्मरण करायला हवे. जप म्हणजे एका विशेष अशा नावाची ध्यानात्मक पुनरावृती होय. जपात आपण एखांदे  स्तोत्र  व मंत्र याचा हळुवार अथवा मनातील मनात उच्चारण केला जातो. योग व प्राणायाम मध्ये आपल्या श्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळवून त्या आधारे आंतरिक ऊर्जेचा प्रवाह हा नियंत्रित केला जातो. तर ध्यानधारणा मध्ये आपला आत्मा, मन व शरीर यांचे एकीकरण एका दिशेत साधले जाते. अशा प्रकारे स्व:चा शोध लागून तुमचे आत्मभान आणि आत्मज्ञान जागृत झाले की तुम्ही एक साधे, सोपे, सुटसुटीत, सरळ आणि सुखी आयुष्य जगायला सुरुवात करता.

         आपले जीवन अनमोल आहे. ते अधिक सुंदर बनवूया!

  ०४४/१०१ दिनांक :०२.०४.२०२२

चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४४, गुडी पाडवा

सुखाच्या शोधात ©

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७