स्व: चा शोध
स्व: चा शोध
स्व: हा तसे पहिले तर एक अक्षरी शब्द परंतु खूप व्यापक अर्थाने वापरला जातो. स्व: ची जाणीव आपल्याला असणे आणि त्याची अनुभूती होणे हे एक मनुष्य प्राणी म्हणून आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. जो पर्यंत स्व: म्हणजे स्व:ताचा शोध लागत नाही तो पर्यंत सर्व गोष्टी शून्यवत आहेत.
आपण संपूर्ण दुनिया पाहतो, मात्र स्व:ताला शोधत नाहीत आणि स्वतःला ओळखत नाहीत. मी कोण आहे ? माझे कर्तव्य काय आहे ? आणि मी काय करायला हवे? हे तीन प्रश्न तसे खूपच सूचक आहेत. आपण जे काही बोलतो, आपण जे काही वागतो आणि आपण जे काही करतो हे बरोबर आहे कि चूक याची चिकित्सा करण्याची तसदी घेण्याचे आपण सोडून दिले आहे. या मागे आपल्या मनाचा खूप मोठा स्वार्थ दडलेला आहे हे लक्षात घ्यावे. कारण असे करण्याचे आपण सोडून दिले कि आपण आपली कर्तव्ये, कामे आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्यास मोकळे होतो. मात्र असे खूप दिवस चालत नाही अथवा टिकत नाही कारण हळू हळू या गोष्टी इतरांच्या लक्षात येतात आणि ते तुम्हाला आहे तेथेच सोडून पुढे निघून जातात.
साहजिकच अश्या वेळी आपल्याला राग येतो, आपल्याला चीड येते आणि आपण दुसऱ्याला दोष देण्यास सुरुवात करतो. तस पाहिलं तर आपण इतरांवर चिडण्यात व रागवण्यात माहीर असतो. कारण प्रत्येक अपयशाचा खापर दुसऱ्यावर फोडून आपण आपली सुटका करून घेत असतो. मात्र अशी सुटका करून घेत असताना समोरची व्यक्ती आपल्याला सोडून देत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. तसेच असे करून उलट आपण आपल्या मनाला समजावत असतो कि यात आपली चूक नाही आणि समोरचेच वाईट आहेत. त्यामुळे मन आणि मेंदू यांचा संयोग होत नसल्याने त्या चुका मेंदू परत परत करत राहतो आणि आपण अजून अपयशाच्या गर्तेत फेकले जातो.
वास्तविक आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्ती , आपल्याला आलेले अपयश व हुकलेली संधी या मध्ये आपली चूक किती आहे हे आपण पडताळले पाहिजे. या साठी आपण आपल्या मधील स्व: चा शोध घेतला पाहिजे. आलेले अपयश व झालेली चूक यावर खोलवर विचार करायला हवा. एकदा विचार प्रक्रिया सुरु झाली कि ती कागदावर उतरवायला हवी आणि त्यावर काही उपाय आपण शोधायला हवेत, काही आपल्या प्रियजणांकडून तर काही आपल्या मार्गदर्शकाकडून. एकदा या प्रकारे सुरुवात झाली कि तुमचा इतरांबद्दल निर्माण झालेला राग व चीड हळू हळू कमी होत जाते. तुम्ही त्या चुका वारंवार करत नसल्याने तुमच्या समोर अनेक संधी उपलब्ध होतात. तुमचा यशाचा मार्ग सुकर होत जातो. तुम्ही एक सोपे, सुटसुटीत, सरळ आणि सुखी आयुष्य जगायला सुरुवात करता, कारण आपले जीवन अनमोल आहे.
२/१०१ (दि. १२.०२.२०२१ )
राजीव नंदकर उपजिल्हाधिकारी मुंबई ,9970246417