स्पर्धा परीक्षा – ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करावे
स्पर्धा परीक्षा व्यवस्थापन कौशल्ये
१.प्रस्तावना:
स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रात दहा लक्ष विध्यार्थी आपले नशीब विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अजमावत असतात. ग्रामीण भागातील विध्यार्थी हा गुणवत्ता असूनही उचित मार्गदर्शना अभावी या स्पर्धेत मागे पडतो हे आता लपून राहिले नाही. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व संधी तसेच बदलत जाणारा अभ्यासक्रम या बाबतचा परामर्श या चिंतनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धा परीक्षा हे एक आव्हान आहे आणि ते पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन, अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड या शिवाय पर्याय नाही.
२.वस्तुस्थिती :
महाराष्ट्र राज्यात दर वर्षी सरासरी ग्रामीण भागात १० लाख व शहरी भागात १० लाख अशी २० लाख मुले जन्माला येतात. दर वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा सरासरी १८ लाख मुले देतात तर इयत्ता बारावीची परीक्षा १४ लाख मुले देतात. पदवीधर बाबत माहिती घेतली असता ८ लाख मुले हे कॉमर्स-आर्ट सारख्या नोन प्रोफेशनल कोर्स घेवून पदवीधर होतात तर २ लाख मुले टेक्निकल पदवीधर होतात. म्हणजे एका वर्षात साधारण १० लाख मुले पदवीधर होतात. या पैकी साधारण ३ लाख लाख mule नोकरी –उद्योग –व्यवसाय- संघटित क्षेत्र यात प्रवेश करतात. तर ७ लाख मुले ही शेती , शेतमजुरी , असंघटित क्षेत्र यात पर्याय नाही म्हणून सामावून घेतली जातात. या क्षेत्रात अर्ध बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, निम्न बेरोजगारी कायम स्थिरावलेली असते. या प्रकारच्या बेरोजगारी मुळे प्रत्येकाला जगण्याचा आणि रोजीरोटीचा संघर्ष करावा लागतो. डार्विनचा सिद्धांत सांगतो हे की जे जगण्या लायक असतात ते आपला स्वतचा विकास करून घेतात व पुढे जातात आणि जे स्वतचा विकास व बदल घडवून आणत नाहीत ते मागे पडतात. सबब आपण डार्विन च्या सिद्धांत प्रमाणे जगण्या लायक आपण बनले पाहिजे व आपला विकास करून घेतला पाहिजे .
३. सद्यस्थिती:
स्पर्धा परीक्षा म्हणजे अशी परीक्षा की जेथे एक पोस्ट /नोकरी/ संधी असते व ती मिळवण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक स्पर्धा करत असतात. स्पर्धा हा कोणत्याही प्राण्याचा व साहजिकच मनुष्य प्राण्याचा स्थायीभाव आहे. शेतीचा शोध लागला त्याला बारा हजार वर्ष झाली तेंव्हा पासून हा संघर्ष अविरत्र चालू आहे. स्पर्धा परीक्षा द्वारे २०१९-२०२० मध्ये देशात ३ते ३.५० लाख शासकीय सेवेत नोकर्या दिल्या गेल्या आहेत. पुढील ५ वर्षात केंद्र व राज्य सरकारे १० लाख पदे भरू शकेल असा अंदाज बर्याच संस्थांनी वर्तवला आहे.
४. शासकीय नोकरीच का :
शासकीय नोकरीला घटनेचे संरक्षण असून राज्यघटणेनुसार कोणत्याही लोक सेवकाला त्याचे म्हणणे मांडण्याची योग्य संधी दिल्या शिवाय त्याला नोकरी वरून कमी करता येत नाही. त्याच सोबत मान सन्मान ,चांगला पगार व शासकीय निवास या सुविधा जमेच्या बाजू ठरतात.
५. स्पर्धा परीक्षा समज-गैरसमज :
स्पर्धा परीक्षेबाबत ग्रामीण भागातील विध्यार्थी यांचे मनामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरले दिसून येतात.
- स्पर्धा परीक्षा हे हुशार मुलांचे क्षेत्र आहे.
- क्लास लावावेच लागतात.
- इग्रजी येत नसेल तर स्पर्धा परीक्षा शक्य नाही.
- खूप अभ्यास करावा लागतो.
- पैसे दिल्याशिवाय काम होत नाही.
- पुस्तक व नोट्स ही खर्चिक बाब आहे,
असे अनेक नानाविध गैरसमज ग्रामीण भागात प्रचलित आहेत किंवा जाणीव पूर्वक पसरवले गेलेले आहेत.
६.ग्रामीण भागातील मुले या स्पर्धा परीक्षेपासून दूर राहण्याचे अथवा तिच्या मध्ये यशस्वी न होण्याची खालील कारणे बहुतांशी करून आढळून येतात :
- मार्गदर्शनाचा अभाव.
- अफवाला बळी.
- भ्रष्टाचार.
- अपयशाची भीती.
- पाठबळ नसते .
- पालकांचे सहकार्य नाही.
- आर्थिक चणचण.
- अवांतर वाचन नाही- कथा कांदबरी.
- शहरापासून दूर-बदल किंवा माहिती उशिरा पोहचते.
- पाठांतर शिक्षण पद्धती –घोकमपट्टी.
- विश्लेषणाचा अभाव- वस्तुस्थिती तपासायची नसते.
- संगणक क्रांती पासून दूर.
- आपले काही नातेवाईक मागे ओढत असतात.
- आपले काही संकुचित मित्र पुढे जावून देत नाहीत.
- आपण आपले गाव सोडत नाहीत.
७.स्पर्धा परीक्षा अभ्यास करतांनी प्रत्यक्ष येणार्या अडचणी:
- मार्गदर्शन अभाव आपल्याकडे असतो.
- वाढत असलेले वय हि सुधा अडचण असते.
- घरचा व समाजाचा दबाव असणे.
- १५ दिवसात एकदा नैराश्य चक्रव्यह येते.
- घराची जबाबदारी आपल्यावर असणे.
८.बलस्थाने :
असे असले तरी ग्रामीण विध्यार्थी हा
- कष्टाळू
- परिस्थितीची जाणीव असलेला
- बुद्धिमता असलेला
- प्रामाणिक व समर्पित भावनेने काम करणारा असतो.
त्यामुळेच एकदा त्याला योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली की त्याचा यशाचा मार्ग सुकर झाल्या वाचून राहत नाही.
९.निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात:
- आपले वय किती आहे – (18,22,24,26,28)
- आपले व्यक्तिमत्व कसे आहे– Thinkers/Perceivers/Judger/Intuitive/Extroverts /introverts’/sensor/feelers ,
- आपली परिस्थिति कशी आहे – Poor/Average/ Medium/ Good
- आपले शिक्षण कोणत्या शाखेत झाले – Professional/ Technical /Non Professional,
- आपली बुद्धिमत्ता क्षमता कशी आहे-Intra-Personal/Interpersonal/Naturalist /kinesthetic /Logical/linguistic/Visual/Existential /musical ,
- आपली क्षमता व कष्ट घेण्याची तयारी आहे- Capacity & Hard Work Ability
१०. निर्णय घेतल्यावर काय करावे :
- ठाम निर्णय घेणे( Firm Decision)
- कष्टाची तयारी असणे(Hard Work)
- व्यवस्थेवर विश्वास असणे (Faith on system)
- सातत्य ठेवणे (Continuity)
- धीर धरणे आवश्यक(Patience)
११. स्पर्धा परीक्षा अभ्यास प्रत्यक्ष सुरुवात झाल्यावर :
- योग्य व्यक्तींचे ज्यांनी यश मिळवले आहे त्यांचे मार्गदर्शन(Guidance)
- नियोजन(Planning )नियोजन साठी वेळ घ्यावा व अचूक करावे.
- योग्य पुस्तके निवड करावी(Selection) एका विषयाची किमान 5 पुस्तके.
- अभ्यास हा सुयोग्य पद्धती(Right Way) नुसार करावा.
- संगणकाचा व मोबाइल वापर आवश्यकते पुरता करावा – काय शोधायचे ते आधी लिहून काढा मग शोधा–Authentic Source चा वापर करावा .
१२. स्पर्धा परीक्षा नियोजन:
स्पर्धा परीक्षेच्या तयारीस सुरवात करतानी आपले बुद्धिकौशल्य, क्षमता व आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ याचे गणित परीक्षार्थीला प्रथम सोडवावे लागते. एकदा निश्चय पक्का केला की अभ्यासाचे नियोजन करावे. असे नियोजन करतानी छोटे नियोजन ,मध्यम नियोजन ,मोठे नियोजन अशी सर्वसाधारण वर्गवारी करावी. छोटे नियोजन हे किमान सहा महिन्याचे असावे,मध्यम नियोजन हे किमान एक वर्षाचे असावे तर मोठे नियोजन हे किमान तीन वर्षाचे असावे.बऱ्याच वेळा असे नियोजन न करता परीक्षार्थी फक्त समोर असलेली परीक्षा विचारात घेवून दोन ते सहा महिन्याचे नियोजन करतात. बाजारात उपलब्ध असलेली दोन ते तीन पुस्तके विकत घेवून वाचतात. अश्या नियोजनाचा शेवट शेवटी अपयशात होतो. वास्तविक स्पर्धा परीक्षा तयारी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने करणे आवश्यक असते. एकदा की सहा महिने,एक वर्ष व तीन वर्षाचे नियोजन केले की त्या प्रमाणे परीक्षार्थीला यशाकडे हळुवार मार्गक्रमण करून यशस्वी होता येते. काय वाचावे ,किती वाचावे व कोठून वाचावे ही त्रीसूत्री एकदा परीक्षार्थीला उमजली की त्याचे पर्यावसन स्पर्धा परीक्षा मार्फत निवडी मध्ये होते.
१३. स्पर्धा परीक्षा – अभ्यास पद्धती
- वाचन – Reading
- समजून घेणे –Understanding/conceptualization
- वर्गीकरण-Classification
- पृथकरण- Separation
- नोट्स- Note down
- पठन- Recite /Remember
- मनन- Thinking/ cognition
- चर्चा- Discussion
- विश्लेषण-Analysis
- अनुमान-Presumption
- निष्कर्ष-Conclusion
स्पर्धा परीक्षेची एक सर्वसामान्य असी अभ्यास पद्धती असते. वाचन करणे, नोट्स काढणे ,पठन करणे , मनन करणे, आकलन करणे व विश्लेषण करणे या पद्धतीने अभ्यासाचा क्रम ठेवल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. वर्गीकरण व पृथक्करण ही अभ्यासाची पुढची पायरी असून अभ्यास करत असताना उपलब्ध असणाऱ्या विषयाच्या माहिती चे संस्करण करून तिच्यावर संस्कार करावे लागतात. वास्तविक ग्रामीण भागात वाचन व पठन या मर्यादेतच अभ्यास केला जातो त्यामुळे ग्रामीण विध्यार्थी स्पर्धा परीक्षेतील यशापासून दूर राहतो . त्यामुळे नियोजन सोबतच वर नमूद केलेली अभ्यास पद्धती आत्मसाद करून तीची अंमल बजावणी करावी लागते .बाजारात सध्या अनेक क्लास व अनेक पुस्तके उपलब्ध झाली आहेत मात्र त्यातील कोणते पुस्तक निवडावे हीच कोशल्याची बाब ठरते आणि हे योग्य मार्गदर्शन शिवाय शक्य होत नाही . राजहंस जसा दुध व पाणी यातून दुध फक्त पितो अगदी त्या प्रमाणेच परीक्षार्थी यांनी आवश्यक तेच ज्ञान प्राशन करण्याची कला आत्मसाद करणे अनिवार्य ठरते . एकदा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी या पूर्वीच्या त्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नापुस्तिका व आलेले प्रश्नाचे स्वरूप याचा अभ्यास करणे ही पहिली पायरी ठरते . मात्र असे ग्रामीण भागातील विद्यार्थी सहसा करत नाही. अभ्यास पूर्ण झाल्यावर परीक्षेच्या काही दिवस आधी या पूर्वी कोणते प्रश्न विचारले होते हे पहिले जाते. वास्तविक कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी त्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका याचे विश्लेषण करणे ही अनिवार्य बाब आहे.
१४. स्पर्धा परीक्षा बदलते स्वरूप कसे बदलले आहे
- विध्यार्थी मोठी संख्या-14 लाख
- UPSC व MPSC एकच पॅटर्न
- प्रत्येक प्रश्नाला Current Touch देण्याचा प्रयत्न
- काठिन्य पातळीत वाढ
- पाठांतरा पेक्षा विश्लेषण भर
- Negative मार्किंग system
- UPSC Conceptual Clarity वैचारिक स्पष्टता
- Analytical Knowledgeविश्लेषणात्मक ज्ञान
- MPSC focuses more on knowledge and facts ज्ञान आणि तथ्य
१५. स्पर्धा परीक्षा अभ्यास करताणी खालील कौशले आत्मसाद करणे अनियार्य व आवश्यक आहे
- Comprehension skills( आकलन कौशल्ये)
- Interpersonal skills (वैयक्तिक कौशल्य)
- Communication skills (संभाषण कौशल्य)
- Logical reasoning (तार्किक कौशल्य)
- Analytical ability (विश्लेषणात्मक क्षमता)
- Decision-making (निर्णय घेणे क्षमता)
- Problem-solving (समस्या सोडवणे कौशल्य)
- General mental ability (सामान्य मानसिक क्षमता)
- Basic numeracy (मूलभूत संख्या अर्थ लावणे)
- Data Interpretation (महितीचा अर्थ लावणे) या मुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात तुम्ही पारंगत होता.
१६.अभ्यासाचे नियोजन:
- स्वतचे वेळापत्रक स्वत तयार करावे
- छोटे नियोजन – सहा महीने
- मध्यम नियोजन – एक वर्ष
- मोठे नियोजन- तीन वर्ष
- अभ्यासात सातत्य असावे
- नोकरी करत असाल तर ४ ते ६ तास ,
- फक्त अभ्यास असेल तर ८ ते १२ तास
अनेक ठिकाणी अनेक पुस्तकात वेगवेगळी माहिती उपलब्ध होत असल्याने पुस्तक वाचन करून संक्षिप्त नोट्स काढणे हे कमप्राप्त ठरते. स्वताच्या नोट्स उपलब्ध असल्या की परीक्षेपुर्वीची उजळणी सोयीची व कमी कष्टाची तशीच अचूक होते. संगणकाचा योग्य वापर करणे ,अभ्यासक्रमातील विषयाचे तत्कालीन संदर्भ व त्या संदर्भाचा चालू संदर्भ ,अवांतर वाचन करणे ह्या मुळे आपला अभ्यास समृद्ध तर होतोच शिवाय त्यामुळे एकंदर स्पर्धापरीक्षेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन विस्तीर्ण होतो. अवांतर वाचन किमान एक तास करणे आवश्यक आहे यात पेपर वाचन, नियतकालिके वाचन व तसेच कथा कादबरी वाचन आपल्याला वैचारिक दृष्ट्या समृद्ध करते.
१७. पाच प्राण्याचा आदर्श अभ्यास करताना ठेवने आवश्यक आहे
- मुंगी – Consistency-Humility-Flexibility-Commitment
- कासव- True Spirit-Consistency
- उंट- Adversity –Storage of fat and water
- हत्ती-Attentiveness-Principled- loyal to work
- राजहंस- Filter feeder-long flight
शालेय अभ्यासक्रम पुस्तके, स्कॉलरशिप परीक्षा पुस्तके,बाजारात असलेले विविध लेखकांची व प्रकाशकांची पुस्तके, नोट्स, प्रश्न पुस्तिका ही स्पर्धा परीक्षेला सामोरी जाण्या साठीची आयुधे आहेत . मात्र योग्य आयुधांची निवड करून या आयुधाना चालू संदर्भ देवून धारधार ठेवावे लागते हे ग्रामीण विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवावे. एकदा पुस्तक वाचून नोट्स काढल्या की परत ते पुस्तक वाचणेची गरज पडणार नाही याची दक्षता घ्यावी. अवघड विषय अभ्यासला अगोदर घेणे कधीही चांगले. पूर्ण दिवस एकाच विषयाचा अभ्यास न करता किमान दोन ते तीन विषयाचा अभ्यास केल्याने अभ्यास कंटाळवाणा होत नाही .
अभ्यास किती वेळ करावा हा एक प्रश्न विध्यार्थ्यांना सतावत असतो साधारणपणे परीक्षेपूर्वी साठ दिवस बारा ते चौदा तास अभ्यास करावा तर इतर वेळी सरासरी आठ ते दहा तास अभ्यास करावा .नोकरी व्यवसाय सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान चार ते सहा तास रोज अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विध्यार्थी हा सोशल मेडिया पासून दूर असला पाहिजे. वाटस अप ,फेसबुक ,इंष्टाग्राम ,ट्वीटर इत्यार्दी साईट पासून त्याने दूर राहणे पसंद करणे आवश्यक व अनिवार्य आहे. मात्र बातम्या ,पेपर वाचन , इंटरनेट सर्फिंग साठी दिवसातून कमाल एक तास देणे आवश्यक आहे .
१८. अभ्यासाचा प्रवास हा खालील स्टेप मधून जातो:
- प्रश्न पुस्तिका तपासणे
- परीक्षेचे स्वरूप तपासणे
- अचूक पुस्तके निवडणे
- चालू संदर्भ तपासणे
- नियोजन करणे
प्रत्येक विषयाची व अभ्यासाची व नोट्स काढण्याची स्वतंत्र पद्धत असते हे लक्षात ठेवावे ज्याला माहीत आहे की माझ्याकडे नियोजन आहे व यशस्वी होण्यासाठीचा आत्मविश्वास व कष्ट घेण्याची तयारी आहे त्याने नोट्स काढाव्यात ,नोट्स स्वता साठी काढाव्यात . त्या साठी आपली एक पद्धत असावी. नोट्स सुट्या कागदावर व पत्रावल्यावर नोट्स काढू नये. 200 पेज ची जाड पुठ्याची वही वापरावी. वहीत एका पेज वर 66 टक्के जागेत लिहावे व 33 टक्के जागा मोकळी ठेवावी सुटसुटीत पणा असावा. कमाल 2 रंगाचे पेन वापरू शकता वहीचे कागदाची क्वालिटी चांगली असावी
१९.नोट्स खालील प्रमाणे काढाव्यात:
- Bullet स्वरुपात
- Table स्वरुपात
- Flow चार्ट स्वरुपात
- Arrow स्वरुपात
- सर्कल , चौकोन व त्रिकोण स्वरुपात
- नोट्स शक्यतो दुपारी जेवणा नंतर व रात्री जेवना नंतर काढाव्यात
स्पर्धा परीक्षा विविध शासकीय अस्थापना –संस्था मार्फत व विविध पदासाठी घेण्यात येतात त्यामुळे कोणत्या संस्थेचा मी फॉर्म भरू व कोणत्या पदाची तयारी करू या बाबत सर्वसाधारण विध्यार्थ्यामध्ये संभ्रम असतो वास्तविक सर्व परीक्षांचा ऐंशी टक्के अभ्यासक्रम सारखाच असतो. त्यामुळे अभ्यास हा एका विशिष्ट पदासाठी किंवा संस्थेसाठी कधीच करायचा नसतो तर तो सर्वव्यापक असा करावा लागतो. त्यामुळे परीक्षार्थी यांनी अगदी सुरुवातीला कोणतीही पद किंवा संस्था समोर ठेवून अभ्यास सुरुवात करू नये एकदा एका ठराविक वेळेनंतर आपण कोणत्या परीक्षेला पात्र ठरू शकतो याची जाणीव परीक्षार्थीला होते आणि तो त्याच्या बौद्धिक क्षमता व तयारी याद्वारे योग्य क्षेत्र, संस्था व पद निवडू शकतो
२०. शेवटी सर्वाना तीन प्रश्न पडतात
- सर्वच अभ्यास करतात मग यश अगदी थोड्याना का मिळते ?
- पुस्तके सर्व सारखीच असतात, सर्व परिक्षार्थी तीच वाचतात मग यश अगदी थोड्याना का ?
- शैक्षणिक पात्रता सर्वांची सारखीच असते मग यश अगदी थोड्याना का ?
तर या तीन प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाणे आहे
- वेळेचे जे योग्य व्यवस्थापन करतात
- जे प्राथमिकता निश्चित करतात
- जे शॉर्ट कटचा वापर करत नाहीत
- चुकांमधून जे शिकतात
- लहान सहान संकटे, प्रलोभने या मुळे जे कधीही विचलित होत नाहीत
अशा प्रकारे योग्य नियोजन व निवड करून कष्टसाध्य रीतीने ही साधना पार पाडावी लागते. शेवटी एक लक्षात ठेवावे की तूमची परिस्थिती कधीही अडसर नसते अडसर असतात ते तुमचे विचार ,विचार बदला परिस्थिती बदलेल आणि शेवटी यश तुमचेच आहे.
राजीव नंदकर ,( B.sc (agri.),MBA(BII), MA(RD),ISTD )उपजिल्हाधिकारी (मुंबई )
rsnandkardc@ gmail.com (9970246417)