शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन : एक नवी सुरुवात

शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन : एक नवी सुरुवात

   पुण्यातील प्रतिष्ठित अशा बालगंधर्व रंगमंदिरात दिनांक 20,21,22 डिसेंबर 2024 या कालावधीत तीन दिवसीय राज्यस्तरीय ‌‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन‌’ पार पडले. या संमेलनातील एकूण दहा परिसंवादांत राज्यातून आणि परराज्यातून अनेक वरिष्ठ अधिकारी सामील झाले होते. हे संमेलन मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि ‌‘संवाद‌’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातील साहित्य वर्तुळात चर्चा झाली, तसेच शेवटच्या दिवशी एकूण पाच ठराव मांडण्यात आले. प्रत्येक शासकीय कार्यालयात येणारे अभ्यागत हे अनुभवाचा खजिना असतो आणि त्यातूनच संवेदनशील शासकीय साहित्यिक अधिकारी विवेकी वृतीने साहित्य निर्मिती करू शकतात,त्यामुळे सरकारी सेवेतील बंधनांची सबब न सांगता अधिकारी कर्मचारी यांनी लेखन करावे, असे प्रतिपादन संमेलन अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी केले.  

   नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने घोषित केला आहे. त्या अनुषंगाने राज्यात विविध क्षेत्रांत आणि स्तरांवर मराठी भाषेचा प्रसार, प्रचार, वाढ, विकास आणि संवर्धन याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आणि विचारविनिमय सुरू झाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने तिचे प्राचीनत्व, मौलिकता, सलगता,परंपरेचे स्वंयभूषण,प्राचीन व आधुनिक रुपामधील अखंड नाते याबाबत आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाषा ही कोणत्याही समाजाच्या वैचारिक देवाणघेवाणीचे मुख्य साधन आहे. साहित्य व संस्कृती ही कोणत्याही समाजाची मूलभूत अंगे असून, त्यामुळे समाजाच्या ऊर्ध्व विकासात मोलाची भर पडत असते. अशा साहित्याला व संस्कृतीला शाश्वत अधिष्ठान मिळवून देण्याचे काम भाषा करत असते. तसेच, भाषेच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृतीचे वहन सुलभ रीतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करणे शक्य होते.

   समाज हा अनेक घटकांचा एक समूह आहे. त्यापैकी नोकरशाही हा समाजाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक होय. साधारण हा घटक एकूण लोकसंखेच्या 2 ते 3 टक्के असतो. समाजातील प्रत्येक घटक त्याच्या परीने साहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा या क्षेत्रात आपले योगदान देत असतो. मागील शंभर वर्षांचा इतिहास पाहिला, तर अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी साहित्य निर्मितीत योगदान दिले आहे. याची दखल अनेक वेळा देश व राज्य पातळीवर घेण्यात आली असून, अनेक शासकीय अधिकाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद शासकीय अधिकाऱ्यांनी भूषवलेले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे लिखाण समाजापुढे यावे आणि मराठी साहित्य निर्मितीत त्यांचे योगदान वाढावे, हे तीन उद्देश समोर ठेवून मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि ‌‘संवाद‌’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन पुण्यात आयोजित केले होते.

   एकूण दहा परिसंवाद आणि उद्घाटन व समारोपाची दोन सत्रे असे या संमेलनाचे स्वरूप होते. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव नितिन करीर, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक व सनदी अधिकारी भारत सासणे, ज्येष्ठ सनदी अधिकारी व पानिपतकार विश्वास पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, स्वागताध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले आणि ‌‘संवाद‌’, पुणे या संस्थेचे सुनील महाजन हे निमंत्रक होते. संमेलनाच्या समारोप प्रसंगी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आबा महाजन व आयपीएस आनंद पाटील उपस्थित होते. लेखक-अधिकारी यांच्यासाठी आयोजित केलेले हे राज्यस्तरीय पहिलेवहिले साहित्य संमेलन ठरले. या साहित्य संमेलन दहा परिसंवादांसोबतच बालगंधर्व रंगमंदिरात कला दालनात अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन, काढलेली चित्रे आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन या गोष्टी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. कलादालनाचे उद्घाटन हे एक दिवस आधी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू यांच्या हस्ते करण्यात आले.

   संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळापूर्वीही मराठी भाषा अस्तित्वात होती, हे आता सिद्ध झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेची थोरवी गायली व मराठी भाषेला अस्मिता आणि लौकिक मिळवून दिला. चक्रधर स्वामी यांनीही लीळाचरित्र लिहून मराठी भाषेला प्रगल्भता प्राप्त करून दिली. त्यानंतरच्या काळात अनेक संतांनी आपली ग्रंथरचना मराठीत करून मराठी भाषेला अमरत्व प्राप्त करून दिले. यामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास यांचे नाव आदराने घ्यावे लागते. ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि सुधारणांचे वारे वाहू लागले. अनेक समाजसुधारकांनी  साहित्य निर्मिती करून समाजामध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश भारतात संशोधन आणि साहित्य निर्मितीमध्ये अनेक ब्रिटिशकालीन अधिकारी अग्रेसर होते. आलेल्या अनुभवांच्या सातत्याने नोंदी करण्यावर त्यांचा भर असे, त्यामुळे आधीच्या अधिकाऱ्याने शब्दबद्ध केलेले अनुभव नवीन पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यास वारशाने उपलब्ध होत असत. देश स्वतंत्र झाल्यानंतर मागील 75 वर्षांत काही अपवाद वगळता शासकीय अधिकारी यांच्याकडून नोंदी लिहिणे आणि दैनंदिन अनुभव शब्दबद्ध करणे याबाबत भरीव निर्मिती होऊ शकली नाही आणि त्यामुळे नागरिक व प्रशासन यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

   सशोधन आणि समीक्षा या दोन बाबी साहित्य अधिक परिपक्व करण्यास मदत करत असतात. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या मराठी साहित्याचे संशोधन आणि समीक्षा होऊन ते अधिक परिपक्व होण्यास मदत होणार आहे. अधिकाऱ्यांनी लिहावे का, लिहावे तर कसे लिहावे, लिहिले तर ते कसे प्रकाशित करावे, प्रकाशित केले तर त्याचा प्रसार कसा करावा, याबाबतचे मार्गदर्शन विविध सत्रांतून या संमेलनात करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी एक उत्तम वाचक म्हणून माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, नितीन करीर यांनी आपले विचार मांडले. ‌‘वाचन माणसाला अंतर्मुख करते आणि लोकसेवकांना संवेदनशील मनाने अधिक चांगले काम करण्यास प्रवृत करते‌’, असे त्यांनी सांगितले. शासकीय सेवेत मानवी मनाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. त्या दर्शनाची अभिव्यक्ती कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन अशा विविध स्वरुपात घडू शकते. शासकीय अधिकाऱ्यांच्या या संमेलनात यापुढे तरुणाईचा सहभाग वाढावा आणि या क्षेत्रातील प्रतिभा बहरून यावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‌व्यक्त केली.

   पहिला परिसंवाद हा ‌‘शासकीय अधिकारी : साहित्य लेखनातील आव्हाने‌’ या विषयावर होता. या परिसंवादमध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी भारत सासणे, विश्वास पाटील , किरण कुलकर्णी आणि प्रल्हाद कचरे यांनी सहभाग घेतला. यावेळी  साहित्यिक अधिकारी यांना वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून मिळणारी सापत्न वागणूक यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, लेखनातील तांत्रिक अडचणी, इतर सहकारी यांच्याकडून होणारा तिरस्कार, आत्मवंचना यावर भाष्य केले. या वेळी अधिकाऱ्यांनी आत्मसन्मान जागृत ठेवून लेखनाला चळवळ बनवावी असे प्रतिपादन केले.

   दुसरे विचारपुष्प हे ‌‘इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती आणि अनुभव‌’ या विषयावर होते. या परिसंवाद मध्ये सेवानिवृत्त सनदी अधिकारी विशाल सोलंकी, राजस्थान केडरचे आयपीएस संतोष चाळके आणि अरुण उन्हाळे यांनी सहभाग घेतला. देशात प्रादेशिक भाषांना किती महत्त्वाचे स्थान आहे आणि इतर राज्यात पदस्थापना मिळाल्यावर भाषा शिकून घेण्यासाठी किती कष्ट पडतात, याबाबत चर्चा केली. मराठी भाषेचा अभिमान जपणे आणि गौरव वाढविणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

   तिसरे सत्र हे अधिक लक्षवेधी ठरले. या सत्रात पुणे महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी संमेलन अध्यक्ष तथा यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आणि सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची ‌‘प्रशासनातील लक्षवेधी साहित्य निर्मिती‌’ या सत्रात प्रकट अशी मुलाखत घेतली. संमेलनाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी 35 पुस्तके लिहून, विशेषत: मराठी ग्रामीण साहित्यात मोलाची भर घातली आहे. यामागची प्रेरणा आणि अडथळे याबाबत त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. साहित्य निर्मितीत पोलीस अधिकाऱ्यांना अधिक आव्हानांचा सामना  करावा लागतो, असे बी. जी. शेखर यांनी त्यांच्या अनुभवावरून संगितले.

   पहिल्या दिवशी सायंकाळी रंगमदिरात अधिकारी-कवींची मैफल जमली होती. या सत्राचे संचालक म्हणून जेष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी नेतृत्व केले. या मैफलीत जवळपास पंधरा अधिकारी-कवि सहभागी झाले. त्यामध्ये महिला कवियित्रींची संख्या लक्षणीय होती.

   शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या तिसरा दिवसातील पहिला परिसंवाद हा कृत्रिम बुद्धिमत्ता, साहित्य व प्रशासन या विषयाशी निगडित होता. यामध्ये विकास गरड, सतीश बुद्धे, ओमप्रकाश यादव, कमलाकर हट्टेकर, राजेंद्र गोळे हे अधिकारी सहभागी झाले होते. ‌‘शासनाच्या दैनंदिन कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्या वापरातून निर्माण होणारी आव्हाने‌’ यावर या परिसंवादात सखोल अशी चर्चा करण्यात आली. साहित्य निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शक्य असला, तरी मानवी कल्पनाशक्तीची जागा हे तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही, याबाबत सर्वांचे एकमत होते. ‌‘प्रशासनात बदलत गेलेली भाषा‌’ ह्या परिसंवादात शेखर गायकवाड, अशोक काकडे, सजंयसिंह चव्हाण, किरण केंद्रे सहभागी झाले होते. सर्वसामान्यांना समजेल-उमजेल अशा भाषेत शासकीय अध्यादेश, नियम आणि निर्णय असावेत, यावर या सत्रात विचारमंथन करण्यात आले. ‌‘माझे वाचन‌’ या सत्रात सनदी अधिकारी महेश झगडे, हेमंत वसेकर, सुनील पाटील, ज्ञानेश्वर  खुटवड आणि आनंद भंडारी सहभागी झाले होते. अधिकारी वाचत नाहीत त्यामुळे नवकल्पना आणि सर्जनशीलता  कमी होत आहे, अशी खंत या परिसंवादात व्यक्त झाली. अधिकारी-कर्मचारी वाचते झाले, तर ते संवेदनशीलतेने जनतेचे प्रश्न हाताळू शकतील, असे मत या परिसंवादात मांडले गेले. ‌‘शासनात घडणारे विनोद‌’ या परिसंवादामध्ये शेखर गायकवाड, रंगनाथ नाईकडे, चिंतामणि जोशी हे सहभागी झाले. या वेळी प्रशासकीय कामकाज हाताळत असताना कसे विनोद होतात, यावर दिलखुलास चर्चा झाली. या वेळी उपस्थितांनी या विनोदांना चांगलीच दाद दिली. ‌‘चांगला साहित्यिक हा चांगला अधिकारी नसतो का?‌’ या परिसंवादात वैशाली पतंगे , राजीव नंदकर, विद्या पोळ, महेश लोंढे, अंजली ढमाळ आणि उल्का नाईक हे अधिकारी सहभागी झाले होते. चांगला लेखक हा चांगला अधिकारी तर असतोच परंतु तो अधिक संवेदनशीलतेने जनतेचे प्रश्न सोडवू शकतो  असे या परिसंवादात सर्वांनी मत मांडले. शेवटचे आणि दहावे सत्र हे कथाकथनाबाबत होते. या सत्रात किरण धांडे, सोनाली हरपळे आणि अभिषेक पराडकर सहभागी झाले होते.

   शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी पाच ठराव संमत करण्यात आले. हे ठराव अध्यक्षांच्या वतीने आनंद भंडारी यांनी मांडले, तर त्याला अनुमोदन निमंत्रक सुनील महाजन यांनी दिले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे अभिनंदन, मराठी बोलीभाषेची ऑक्सफोर्ड शब्दकोश धर्तीवर शब्दकोश निर्मिती, शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य निर्मितीला शासनाकडून पुरस्कार, सामान्यांना समजतील अशा सुलभ भाषेत कायदे, नियम व शासन निर्णय आणि शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या आयोजनसाठी शासनाकडून अनुदान मिळावे, असे पाच ठराव या वेळी मांडून शासनाचे त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. पुढील काळात या संमेलनाचे स्वरूप अधिक व्यापक आणि विस्तृत करण्याचा मनोदय संयोजकांनी व्यक्त केला. या समेलांनातून शासनात लेखनाची एक चळवळ निर्माण व्हावी आणि त्यातून प्रशासकीय कामकाज सोपे व सुटसुटीत होण्यास मदत व्हावी, असे मत अनेक नागरिक व्यक्त करत होते. ललित लेखन आणि कथा व कादंबऱ्या, कविता यातच न अडकता प्रशासकीय कामकाज कार्यपद्धती ही सर्वसामान्य नागरिकांना समजेल यासाठी काही माहितीपर लेखन अधिकाऱ्यांनी करावे, अशाही सूचना या संमेलनात केल्या गेल्या. प्रशासनाची दारे सर्वांसाठी खुली करण्यासाठी साहित्य हे एकमेव माध्यम आहे असे प्रतिपादले गेले. प्रशासनातील बोजड वाटणारी भाषा आणि क्लिष्ट अशी कार्यपद्धती यातून बाहेर पडण्यास अशा साहित्य संमेलनाची मदत भविष्यात होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला. हे संमेलन म्हणजे सर्वांसाठी एक बौद्धिक मेजवानी आणि पर्वणी होती. तिचा लाभ नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी मनमुराद घेतल्याचे दिसून आले.

-राजीव नंदकर
(लेखक हे उप आयुक्त, पुणे महानगरपालिका या पदावर कार्यरत असून शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन व समन्वय समितीचे ते सदस्य आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *