वेळेची वेळेमध्ये गुंतवणूक करा ( Invest Time In Your Timeline)
वेळेची वेळेमध्ये गुंतवणूक करा ( Invest Time In Your Timeline)
वेळ हि एक अनमोल बाब आहे. या वेळेला कालचक्र असेही संबोधले जाते. सृष्टीतील प्रत्येक सजीव त्याचे कालचक्र पूर्ण केल्यानंतर मृतवत अथवा नष्टप्राय होतो. मानव सुद्धा त्याला अपवाद नाही. असे कालचक्र भेदणे अजूनही कोणालाही शक्य झाले नाही. प्रत्येक श्वासागणिक आपण क्षण मागे सोडत असतो. कालपरत्वे आपल्या शरीराची झीज होत असते आणि आपण वार्धक्याकडे अथवा आपल्या शेवटाकडे झुकत असतो. अशा प्रकारे या वेळेची अथवा काळाची अपरिहार्यता आणि त्यापुढे मानवाची हतबलता पहिली कि मानवी मन सुन्न व खिन्न होते.
प्रत्येक क्षण,प्रत्येक सेकंद,प्रत्येक मिनिट,प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस मागे पडत असतात आणि आपण पुढे जात असतो, असे आपण म्हणतो पण ते खरे नाही. वास्तविक वेळ व काल चक्र पुढे जात असते आणि आपण मागे पडत असतो हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. वेळ हा कोणालाही थांबवणे शक्य झाले नाही अथवा त्याला धरून ठेवणे शक्य झाले नाही. वेळेची स्पर्धा आपल्या पंच महाभूतानि बनलेल्या नश्वर अशा शरिराशी आणि आपण आपल्यासाठी ठरवलेल्या ध्येयांशी अथवा स्वप्नांशी असते हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
अजून विस्ताराने बोलायचे झाल्यास आपल्या प्रत्येक जन्मदिवसाला आपले शरीर त्याला नेमून दिलेल्या साधारण १०० वर्षातील एक वर्ष मागे टाकते. आपले शरीर जसे वार्धक्याकडे झुकते तसेच आपले ध्येय व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण विचारात घेतलेला वेळही मागे पडत असतो. म्हणजेच शरीर आणि आपले आपण निश्चित केलेले ध्येय व स्वप्ने यांच्याशी वेळ कायम स्पर्धा करत असतो.
आता हि स्पर्धा आपल्याला जिंकायाची असेल तर आपल्याला आपल्या वेळेची आपल्याच वेळेत गुंतवणूक करावी लागणार आहे. हि गुंतवणूक कशी करायची हे आपण पाहूया. तर मित्रानो या साठी आपण आपल्या चोवीस तासाचे गणित सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातील आठ तास झोप हि आपल्यासाठी अनिवार्य आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे आपल्या झोपेबाबत आपण कोणतेही तडजोड करता कामा नये. आता उरले सोळा तास यातील दहा तास आपल्या नोकरी /व्यवसाय /उद्योग या ठिकाणी आपल्याला व्यस्त करावेच लागतात. तसेच आपल्या इतर दैनंदिन विधी व जेवण यावर सरासरी दोन तास व्यस्त होतात. शेवटी उरतात चार तास आणि हेच चार तास बोनस तास समजून आपल्याला आपल्या नियमित वेळेत गुंतवायचे आहेत.
हे चार तास म्हणजे तुमच्याकडे असलेले तुमच्या आयुष्याचे नफारूपी बोनस आहे हे लक्षात घ्या. तसे पहिले तर हे बोनस दिवस अथवा तास आपण टिंगलटवाळ्या, गोस्सिपिंग ,अर्थहीन चर्चा, सध्याच्या युगात आवश्यकतेपेक्षा जास्त वापरण्यात येणारा मोबाईल फोन व सोशल मेडिया यात वाया घालवत असतो. आता हे नफारूपी बोनस जर आपण सध्या ३० वर्षाचे असाल आणि तुम्ही साधारण ७० वर्ष जगणार असाल तर त्याचे एकूण १८३९६० तास व १८२५ दिवस होतात. हे बोनस तास व दिवस आपल्याला आपल्या नियमित वेळेत गुंतवून आपले शरीर हे मानसिक व शारीरिक दृष्ट्या बळकट व मजबूत बनवणे आहे तसेच आपली आपण निश्चित केलेली ध्येये व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर अथवा गुंतवणूक करायची आहे हे लक्षात घ्या.
या चार तासापैकी तुम्ही एक तास आपल्या शरीराच्या व मनाच्या तंदुरुस्ती साठी देणे आवश्यक आहे. जेणेकरून या एक तासामुळे तुम्ही वेळेच्या पुढे हळूहळू निघून जाल. थोडक्यात सांगायचे तर आपल्या आजूबाजूल १०० पैकी ४ लोक असे दिसतात कि आपण त्यांना विचारतो कि सेवानिवृत्त कधी होणार आणि ते सांगतात कि अजून १० वर्ष बाकी आहेत. मित्रानो या लोकांनी त्यांच्या शरीराची स्पर्धा त्यांनी वेळेसोबत जिंकलेली असते.
दुसरी स्पर्धा आहे ती आपले ध्येय व आपली स्वप्न पूर्ण करण्याची या साठी आपण अविरत्र झटत असतो. यासाठी आपण या चार तासातले दोन तास अधिक गुंतवणे आवश्यक आहे. उदाहारण दाखल सांगायचे झाल्यास तुम्ही सध्या ३० वर्षाचे असाल आणि तुम्ही जर कार अथवा घर घेवू इच्छित असाल आणि तुम्ही तुमच्या नेहमीच्या गतीने जात असाल तर कदाचित ती तुम्हाला ४० व्या वर्षी मिळेल. गणिताच्या भाषेत सांगायचे झाल्यास १० वर्षातले प्रती दिवस दोन तास म्हणजे ७३०० तास आणि ३०४ दिवस तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक केले तर तुम्ही तुमचे घर व कार तुम्ही ३५ व्या वर्षी घेवू शकाल. आपल्या आजूबाजूला १०० पैकी २ लोक असे दिसतात कि जे ३५ व्या वर्षी घर व गाडी घेतात कारण त्यांनी आपले रोजचे दोन तास बोनस वेळ हा त्यांच्या नियमित वेळेत गुंतवलेले असतात. अशा प्रकारे एकूण चार बोनस तासापैकी एक तास शारीरिक व मानसिकमजबुती व बळकटी साठी , दोन तास आपली ध्येये व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिल्या नंतर शेवटी एक तास राहतो तो आपले कुटुंब , मित्र , नातेवाईक ,समाजसेवा, छंद यात अतिरिक्त गुंतवा. एकंदरच हे बोनस चार तास तुमच्या नियमित वेळेत गुंतवून सोपे, सरळ, सुटसुटीत,यशस्वी आणि सुखी आयुष्य जगा. आपले जीवन अनमोल आहे.
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७