राग नियंत्रित करून तो योग्य मार्गाने प्रवाहीत करा Control the anger and let it flow in the right way 

राग नियंत्रित करून तो योग्य मार्गाने प्रवाहीत करा Control the anger and let it flow in the right way 

        मानवी मन आणि त्या मनातून निर्माण होणार्‍या भावना आपल्या जीवनविषयक वैयक्तिक आणि अंतरवैयक्तिक संबंधावर विविध प्रकारे परिणाम साधत असतात. या मानवी संबंधांवर सर्वात जास्त परिणाम साधणारी भावना असेल, तर ती राग होय. रागाला आपण क्रोध, संताप आणि कोप असेही संबोधतो. राग ही भावना वैयक्तिक आणि अंतरवैयक्तिक संबंधावर फक्त परिणाम साधत नसून ती नातेसंबंधात दुरावा आणते किंवा ते संपुष्टात सुद्धा आणते. वास्तविक मानवी नाते संबंध हे सामाजिक जीवनाचा आधार असल्याने ते जर संपुष्टात येत असतील, तर त्याचा व्यक्तीच्या एकंदर प्रगतीवर आणि विकासावर प्रतिकूल असा परिणाम होतो. राग हा नियंत्रितही करता येत नाही आणि प्रवाहीतही करता येत नाही त्यामुळे ‘कळते पण वळत नाही’ अशी एकंदर सर्वांची स्थिती असते. राग हा कधीही, कोठेही आणि कोणावरही निघत असल्याने मानवी सबंधांमद्धे विविध प्रकारे कटुता येते. त्यामुळे मानवी आयुष्यात राग नियंत्रित करून तो योग्य मार्गाने हळुवार प्रवाहीत करणे ही एक आवश्यक आणि अनिवार्य बाब ठरते. प्रस्तुत लेखात राग म्हणजे काय ? तो कसा निर्माण होतो? त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम काय होतात? तो कसा नियंत्रित आणि प्रवाहीत करावा ? याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. 

         मानवी मन हे मेंदूच्या अंतर्गत विसावलेले असते. आपले आकलन, त्यातून प्राप्त होणारे ज्ञान, विश्लेषण आणि अनुभव याच्या आधारे सहा मुख्य भावना या मनातून निर्माण होतात. या भावनांमद्धे दुख, आनंद, भीती, तिरस्कार, आश्चर्य आणि राग यांचा समावेश होतो. यामध्ये आनंद आणि आश्चर्य या दोन भावना सकारात्मक असून शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर त्या अनुकूल परिणाम करतात. मात्र दु:ख, भीती, तिरस्कार आणि राग या भावना काही अंशी आपल्याला जिवनविषयक कौशल्ये हस्तगत करण्यात जरी मदत करत असल्या तरी या मात्र नकारात्मक असून त्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर प्रतिकूल परिणाम करतात. या भावनांमधील राग ही भावना तीव्र स्वरूपाची असून ती शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असते.

      माझ्या मनाविरुद्ध अथवा इश्चेविरुद्ध कोणी वागले की, मला राग येतो असे आपण सर्वसाधारण प्रतिपादन करत असतो. त्यामुळे मनाविरुद्ध वागणे म्हणजे काय? हे आपण आधी पाहणे आवश्यक ठरेल. मन म्हणजे काय तर आपली भावना आणि विचार याचा संग्रह होय. आपली उदीष्टे ,ध्येये , इश्चा आणि आकांक्षा ह्या मनातील भावना आणि विचार याच्या संयोगातून तयार होतात. साहजिकच आपली उदीष्टे, ध्येये, इश्चा आणि आकांक्षा यांच्या विरुद्ध कोणी वागते तेंव्हा मनातील राग ही भावना उफाळून येते. तुम्हाला मुव्ही पाहायला खूप आवडते. म्हणून तुम्ही तुमच्या इश्चेने ऑनलाइन तिकीट बुक करता. त्यानंतर तुमच्या जोडीदाराला सांगता की मी उद्याचे तिकीट बुक केले आहे. मात्र त्यावेळी तो सांगतो की मला उद्या कार्यालयात काम खूप प्रलंबित असल्याने साहेबांनी बोलावले आहे. साहजिकच तुमची इश्चा आणि तुम्ही ठरवलेली गोष्ट होत नसल्याने तुम्हाला राग येतो. एका मित्राच्या घरी एक महत्वाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा दूसरा मित्र असे दोघे कार घेवून एका दुपारी दोन वाजता त्याच्या घरी जाण्याचे ठरवतात. मात्र त्या दिवशी तो मित्र कार घेवून चार वाजता येतो. कार्यक्रमाला पोहचता पोहचता कार्यक्रम संपलेला असतो. साहजिकच अशा वेळी आपला राग उफाळून येतो. हा राग कधी कधी एवढा टोकाला जातो की, तो मैत्री सुद्धा आपण संपुष्टात आणतो. सहजिकच आपण ठरवली ध्येये आणि त्या ध्येयेपर्यन्त पोहचण्याची उदीष्टे तसेच आपल्या इश्चा आणि आकांक्षा तसेच इतरांकडून असलेल्या अपेक्षा या मध्ये अडथळे येतात त्या वेळी राग या भावनेचा उगम होतो.

         राग निर्माण होण्यामागे आपली मानसिक आणि बौद्धिक जडणघडण कशी झाली आहे, आपण कोणत्या वातावरणात वाढलेले आहोत, झालेल्या घटनेने आपले नुकसान किती होणार आहे आणि आपली अनुवंशिक गुणधर्म जे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होतात ते कसे आहेत ही बाब महत्वाची असते. अशा प्रकारे अनेक बाबींचा एकत्रित परिणाम राग प्रकट करण्यामध्ये होत असतो. राग ही भावना ज्वालामुखी सारखी असते. जसे काही ज्वालामुखी शांत, काही धगधगनारे आणि काही उग्र असतात, तशी राग ही भावना व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. काहींना खूप राग येतो, काहींना मध्यम राग येतो, तर काहींना सौम्य राग येतो.

         मात्र राग व्यक्त होण्याचे तीन प्रकार आपल्याला दिसून येतात. काही लोक आटोक्लेव सारखे असतात. त्यांना आतून खूप राग आलेला असतो मात्र ते तो राग आतच दाबून ठेवतात. काही लोक प्रेशर कुकर प्रमाणे असतात. प्रेशर कुकर मध्ये ज्या प्रमाणे वाफ भरत राहते आणि एकदम शिट्टी होते तसे ते असतात. काही लोक झाकण ठेवलेल्या पात्याले सारखे असतात. त्या झाकणा खालून ज्या प्रमाणे हळू हळू वाफ निघते तसा राग आला की हळू हळू ते आवाज करतात आणि राग बाहेर काढतात. साहजिकच ह्या तिन्ही अवस्था आपल्या शरीरावर आणि मनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिकूल परिणाम करतात.

           जेंव्हा राग व्यक्त होत नाही ही परिस्थिती मात्र आपल्या स्वत:साठी अत्यंत क्लेशदायक असते. मनातील राग बाहेर पडत नसल्याने तो आपल्या विचार शक्तिवर आघात करून ती क्षीण करतो. त्यामुळे मानसिक विफलता तयार होते. साहजिकच हार्मोनल असमतोल तयार होतो. हार्मोनल असमतोल तयार झाला की त्याचे आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतता. जेंव्हा राग एकदम व्यक्त होतो. तेंव्हा त्याची तीव्रता खूप भयानक असते. कारण एका झटक्यात संबध संपुष्टात येतात. पुढचा व्यक्ती यामुळे जास्त प्रमाणात दुखवला जातो. संबंध संपुष्टात आले की, आपल्यालाही नंतर काही तरी चुकीचे झाले आहे असे वाटते. संबंधातून प्राप्त होणारे आपले फायदे हे कमी होतात आणि त्यातून एक नकारतमक्ता निर्माण होते. जेंव्हा राग हा हळू हळू व्यक्त होतो त्यावेळी आपली सारखी चिडचिड होते. समोरच्या व्यक्तिला आपली भून भून सहन होत नसल्याने. तो आपल्याला टाळायचा प्रयत्न करतो. हळू हळू तो दूर जातो. आपले संबंध कधी संपुष्टात आले ते आपल्यालाही कळत नाही. आणि आपण एक चांगल्या संबंधाला आणि त्यातून मिळणार्‍या सहकार्याला मुकलेले असतो.

      राग व्यक्त होण्याचे हे तीन प्रकार सर्वसाधारणपणे दिसून येतात. ज्यामधे आलेला अथवा निर्माण झालेला राग मनात दाबून ठेवणे, सारखे दुसर्‍याला दोष देणे अथवा तुणतुणे वाजवणे आणि एकदम रागाचा विस्फोट करणे हे प्रकार दिसून येतात. या तीनही प्रकाराचे वेगवेगळे वाईट आणि नकारात्मक शारीरिक आणि मानसिक परिणाम घडून येतात. पहिल्या प्रकारात राग मनात दाबून ठेवल्याने त्याचे आपल्या मनावर आणि मेंदूवर विपरीत परिणाम होतात. यात व्यक्ति स्वत:ला दोष देत राहतो, असंबद्ध बडबड करत राहतो, एकलकोंडा होतो, कायम भीतीच्या सावटाखाली राहतो, स्वत:ला इजा करून घेण्याचा विचार करतो. दुसर्‍या प्रकारात मात्र लोक तुम्हाला घाबरून असतात. या प्रकारात तुम्हाला कोणी सल्ला देत नाही आणि मदतही करत नाही. सर्वच लोक यात दबावात असतात. त्यामुळे अपेक्षित ध्येय गाठण्यात अडथळे येतात. या प्रकारात निर्णय क्षमता विकसित होत नाहीत. त्यामुळे सर्व लोक आपल्या आपल्या पुरते पाहून कोणतेही नावीन्यपूर्ण काम न करता आहे त्या परिस्थितीत राहणे पसंद करतात. तिसर्‍या प्रकारात काय कटकटी माणूस आहे असे महणून लोक तुमचं तिरस्कार करायला सुरुवात करतात. तुमच्या पासून दूर राहणे पसंद करतात. एकंदर पहिल्या प्रकारात आपल्या अंतर्गत परिणाम आणि घालमेल होते तर दुसर्‍या दोन प्रकारात आपल्या बाह्य जगावर परिणाम होतात. त्यामुळे राग हा कोणत्याही अवस्थेतील असला तरी तो तुमचे बाह्यजग आणि अंतरग यावर दूरगामी परिणाम करत असतो.

         काही लोक रागाच्या भरात स्वत:ला किंवा दुसर्‍याला इजा करतात. दुसर्‍याला इजा करण्याच्या घटनामध्ये रागात समोरच्याला मारझोड करणे किंवा शेवटची पातळी म्हणजे खून करणे या गोष्टी सुद्धा घडून आलेल्या आपण पाहतो. मात्र काही अंतर्मुख व्यक्ती ह्या स्व:ताला इजा करून घेतात. यात स्वत:ला मारणे, डोके अफाटणे ,हात अफटणे, पाय अफटणे, टोचून घेणे, चिमटे घेणे, इत्यादि प्रकार होतात आणि यातील शेवटची पातळी म्हणजे आत्महत्या सारख्या गोष्टी घडून आलेल्या आपण पाहतो. मानसिक स्तरावर सुद्धा राग या भावनेचे विपरीत असे दूरगामी परिणाम होतात. राग ही भावना वारंवार उफाळून येत असेल तर आपण चिडचिडे होतो. कोणतेही काम एकाग्रतेने होत नाही, चिडचिड आणि त्यामुळे हळू हळू नैराश्य आणि ओदासिन्न याच्याकडे आपला मार्ग जातो. रागाचे कोणतेही परिणाम मग ते शारीरिक असू अथवा मानसिक एकंदर जीवनावर त्याचे वाईट आणि प्रतिकूल असे परिणाम होतात.

      काही लोक हे त्यांच्यावर कोणी तरी काढलेला राग हा दुसर्‍यावर काढण्यात माहीर असतात. बॉसचा राग कनिष्ठ यांच्यावर काढणे, कार्यालय किंवा व्यवसाय येथील राग घरी मुलांवर अथवा बायकोवर काढणे. याला ‘वांग्याचे तेल वाड्यावर काढणे’असे म्हंटले जाते. परंतु या प्रकारात ज्याचा काही एक संबध नाही तो यात भरडला जातो. तसेच यामुळे आपल्याबद्दल त्यांच्या मनात एक अढी निर्माण होते आणि संबध सुद्धा खराब होतात. वर नमूद केल्या प्रमाणे असेही काही लोक असतात की ते त्यांना आलेला राग स्व:तावर काढतात. मीच वाईट आहे.  मीच मूर्ख आहे.  आशा प्रकारचे अर्धवट वाक्य ते पुटपुटतात आणि स्वत:ला टोचत राहतात आणि दोष देत राहतात. या मुळे रागातुन निर्माण होणार्‍या वेदना ह्या शरीरात दाबून ठेवल्या जातात. साहजिकच यामुळे हृदयाचे ठोके वाढतात किंवा अनियमित होतात. उच रक्तदाब कधी कधी निर्माण होतो. यामुळे हे प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे संबधित लोक हे स्वत:ला शारीरिक इजा पोहचवू शकतात.तसेच ते गंभीर मानसिक आजाराकडे झुकू शकतात. सबब आपल्याला आलेला राग हा आपल्यावर काढणे म्हणजे ‘आपल्या हातानेच आपल्या अंगावर गरम पाणी ओतून घेणे आहे’. त्यासाठी आलेला राग हा आपल्याला स्वत:वर न काढता तो योग्य रीतीने प्रवाहीत कसा होईल यावर लक्षं केन्द्रित करायचे आहे.

      आपल्या आपल्या चुका, अपयश आणि चुकीचे निर्णय यातून निर्माण होणारा राग हा स्वत:वर काढणे किंवा दुसर्‍यावर काढणे सर्वार्थाने चूक आहे. कारण यातून नुकसान होते ते आपलेच. वास्तविक चुका, अपयश आणि चुकीचे निर्णय का घडले, याची चिकित्सा आणि मीमांसा होणे आवश्यक ठरते. मात्र विषयाची चिकित्सा आणि  मीमांसा आपण जाणीवपूर्वक टाळतो. कारण आपल्याला भीती असते की आपण ते जर अस केल तर इतरांसमोर आणि स्वत:समोर उघडे पडू. साहजिकच ‘येड गाव सोडून पेड गावला जाण्याचा” हा हमखास आणि जाणीव पूर्वक केलेला प्रयत्न असतो. राग आणि शारीरिक हार्मोन्स बाबत सांगायचे झाल्यास आपल्या शरीरात राग आल्यानंतर टेस्टस्टेरोन नावाचे हार्मोन की जे वर्चस्व आणि आक्रमक्ता याचेशी संबधित आहे त्यात वाढ होते. या उलट कोर्टीसोल नावाचे हार्मोन्स व्यस्त प्रमाणात कमी होते. साहजिकच याचे विपरीत परिणाम होतात.

     उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता राग नियंत्रित करून तो योग्य मार्गाने हळुवार प्रवाहीत करणे तमाम मानवजाती साठी आवश्यक आणि अनिवार्य ठरते. आपण पहिले की, राग ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात वास आणि वास्तव्य करते. परंतु आपल्या इश्चा, अपेक्षा आणि आकांक्षा यांना धोका पोहचला की ती बाहेर येते. त्यामुळे आपला राग नियंत्रित करून कसा प्रवाहीत करावा हे मोठे आव्हान आपल्या समोर असते. जर आपण नेहमी फक्त राग संपूर्ण नियंत्रित करायचा प्रयत्न केला आणि तो मनातल्या मनात दाबून जर ठेवला तर आपल्या मनावर एक दबाव तयार होतो की जो आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. याउलट जर आपण आपला राग मोठ्या प्रमाणावर बाहेर इतरांवर काढत असलो तर वैयक्तिक आणि अंतर वैयक्तिक संबध खराब होवून लोक दूर होतात. त्यामुळे नक्की काय करायचे? हा प्रश्न सर्वांना सतावतो. त्यामुळे रागाला नियंत्रित करणे आणि प्रवाहीत करणे ही आपल्या सर्वांच्या उज्वल आयुष्यासाठी काळाची गरज ठरते

        आता निर्माण झालेला राग कसा प्रवाहीत करायचं ते पाहूया. आपण नदीचा प्रवाह हा मैदानी किंवा सखल आशा भागातून वाहतांना पाहिला असेल. तो किती शांत ,संयमी आणि संथ वाहत असतो. आवाज नाही, खदखद नाही,खडखड नाही,गढूळपना नाही आणि एकसारखा तो वाहत असतो. अगदी आपल्याला जेंव्हा राग येतो त्यावेळी आपण संथ आणि शांत वाहणारी नदी आठवायला शिकायला हवे. अशी नदी तुम्हाला ज्या वेळी तीव्र राग येईल त्यावेळेस आठवली, की तुम्ही त्या रागाला नदी प्रमाणे संथ आणि शांत करायाला शिकायला हवे. ज्या कारणाने,ज्या विषय वस्तूमुळे किंवा ज्या घटकामुळे आपल्याला राग आला आहे. त्याच्या मागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा ती कारणे आपण शोधायला लागलो आणि ती सापडायला लागली की स्वत:ला म्हणजे स्वत:च्या मनाला समजून सांगा की राग करून समोरच्याचे जेवढे नुकसान होणे आहे, त्या पेक्षा कित्येक पटीने माझे नुकसान होणार आहे. मग मी रागाला एवढा तीव्र का करू. त्याला एवढ्या तीव्र प्रमाणात प्रतिसाद का देवू. मी ते विसरायला हवे. मी याबाबत समोरच्याला शांतपणे जाणीव करून देवून माफ करायल हवे. एकदा आशा प्रकारे मनाची समजूत आपण घालायला लागलो की राग नदी सारखा शांत आणि संथ पणाने प्रवाहीत होईल. एकदा तो प्रवाहीत झाला की, त्या पासून होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम शून्य होण्यास मदत होईल. तसेच आपण चांगले विचार करणे, व्यायाम, योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यातून रागाची तीव्रता कमी करू शकतो. 

           राग नियंत्रित करून तो योग्य मार्गाने हळुवार प्रवाहीत करणे याचे कौशल्य हे तुमचे आकलन, ज्ञान, अनुभव, कौशल्ये आणि विश्लेषण या पंच सूत्रीवर आधारलेले आहे. विषयाचे आकलन चांगले असले, त्या बाबत चांगली माहिती आणि ज्ञान आपले स्वत:जवळ असली की राग उत्पन्न होण्यास मर्यादा येत असतात. त्यामुळे तुमच्याकडून होणार्‍या चुका कमी होतात आणि साहजिकच तुम्हाला कोणाच्याही रागाचा सामना करायला लागत नाही. तुमचे कुटुंब, नातेवाईक, मित्र , वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्या बद्दल या ना त्या कारणाने आपल्या मनात राग निर्माण होत असतो. मात्र हा राग प्रत्येक वेळी उत्सर्जित करणे अथवा दाखवणे हितवाह ठरते असे नसते. साहजिकच असा राग निर्माण होणार नाही. या बाबत या सर्वांसोबत आपण सोहदपूर्ण संबध ठवावेत. मात्र एवढे करूनही ‘कडू कारले ते कडुच’ या उक्ती प्रमाणे जर काही अघटित आणि अडचणीचे घडले किंवा घडून आणले आणि त्या मुळे राग निर्माण झाला तर थोडावेळ शांत रहा आणि लांब आणि दीर्घ स्वास घ्या, एक ग्लास पाणी घ्या ,शरीर सैल सोडा आणि मग अत्यंत शांतपणे आपला राग हळू हळू कमी करा.

     उपरोक्त सर्व विवेंचन मधून राग हा तीन प्रकारे व्यक्त होत असतो हे आपण पहिले. त्या पैकी आपण राग प्रकट करण्याच्या कोणत्या प्रकारात येत आहोत हे पाहणे आवश्यक आहे. राग नियंत्रित करून तो योग्य मार्गाने हळुवार प्रवाहीत करण्यासाठी संथ आणि शांतपणे वाहणार्‍या नदीचा आदर्श घेण्यास शिकून घेयला हवे. आपले मन शांत आणि संयमी करण्यासाठी चांगले विचार करणे, व्यायाम, योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यातून मनाची आणि तनाची शुद्धी साधने आवश्यक ठरते. राग हा निश्चितच उपाय नाही तर तो एक अपाय आहे. त्यामुळे राग ही भावना आपल्यामधून योग्य प्रवाहीत करायला शिकून साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगा.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर करा.

०३८/१०१ दि. ०९.०१.२०२२ सुखाच्या शोधात©

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी मुंबई

९९७०२४६४१७