*मानव आपले अस्तित्व आणि प्रभुत्व टिकवणार.*

*मानव आपले अस्तित्व आणि प्रभुत्व टिकवणार.*
                                
            मानवी जीवन हे मानवानेच त्याच्या कर्तुत्वाच्या जोरावर “अमूल्य” असे बनवले आहे. मानवी जीवन हे निरंतर आनंद व सुख शोधत असते, मात्र अशा सुखाची व्याख्या ही व्यक्ति सापेक्ष म्हणजे व्यक्तीनुसार बदलणारी असते. ज्ञान, विज्ञान, शोध, संशोधन व तंत्रज्ञान याचा योग्य वापर करून मानवाने आपले जीवन सोपे व सुखकर करण्याचा प्रयत्न निरंतर पणे केला आहे. असे असले तरी मानवाचा मागील तीन लाख वर्षाचा प्रवास हा तेवढाच संघर्षमय व कष्टसाध्य राहिला आहे. सध्या हा मानव कोविड १९ या भयंकर अशा महामारी चा मुकाबला करत आहे. या अनुषंगाने आपले अस्तित्व व प्रभुत्व या सृष्टीवर टिकवण्याचा सर्वसमावेशक व एकत्रित असा प्रयत्न सर्व देश भौगोलिक व सामाजिक सीमा विसरून करत आहेत आणि कदाचित हे मानवाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावे.
 
          संघर्ष हा मानवाचा पिंड आहे आणि अशा अनेक संकटांवर त्याने मात केली आहे, याला इतिहास साक्षी आहे. संकटाला सामोरे जाणे, संघर्ष करणे आणि संकटांवर विजय मिळवणे हे कदाचित मानवाच्या रक्तातच आहे म्हणून की काय अगदी अनादि काळापासून तो या सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. त्याच्या ३ लाख वर्षाच्या इतिहासात जी काही मोठी संकटे आली त्याने त्यांचा निकराने सामना केला व आपले अस्तित्व या सृष्टीवर कायम राखले या मागे त्याची कोणती गुण वैशिष्टे व तत्वे आहेत याबाबतचे विचार मंथन आपण या लेखात करणार आहोत.
 
       आधी विश्व मग पृथ्वी आणि त्या नंतर सृष्टी असा सर्वसाधारण प्रवास आहे. विश्वाची निर्मिती साधारण १३८० कोटी वर्षापूर्वी बिग बैंग महाविस्फोटने झाली हे सर्वश्रुत आहे. पृथ्वीच्या निर्मितीला ५०० कोटी वर्ष तर सृष्टीची निर्मितीला साधारण ३५० कोटी वर्ष पूर्ण झालेली आहेत. पृथ्वीवर प्राणी जीवन ८.५० कोटी वर्षापूर्वी तर मानवी जीवन (होमो सेपियन्स) सरासरी तीन लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आले. शेतीचा शोध ११००० वर्षापूर्वी लागला तर हडप्पा संस्कृती हि ४७०० वर्षापूर्वी अस्तित्वात होती.
 
       होमो सेपियन्स म्हणजे विचार करणारा व त्या प्रमाणे कृती व कार्य करणारा हुशार माणूस अशी सर्वसाधारण व्याख्या अस्तित्वात आहे. मात्र आताचा मानव व ३ लाख वर्षापूर्वीचे होमो सेपियन्स याच्या शरीरयष्टी, विचार शक्ती व बुद्धिमत्ता यात निश्चितच खूप मोठे अंतर होते. हळू हळू हा मानव विकसित होत गेला. त्याच्या विचारात व बुद्धिमत्तेत काळाच्या ओघात भर पडत गेली. विज्ञान व त्या अनुषंगाने आलेले तंत्रज्ञान याचा त्याने सुयोग्य वापर करून आपले जीवन अधिक सोपे व सुखकर करण्याचा प्रयत्न केला.
 
        मानव प्राणी भूतलावर निर्माण झाल्यापासून एका संशोधनाप्रमाणे साधारणपणे ११००० कोटी मनुष्य प्राणी जन्माला आले. त्यापैकी १०२५० कोटी मनुष्य प्राणी यांचा अंत झाला आणि सध्या ७५० कोटी मनुष्य प्राणी जिवंत आहेत. हळू हळू जे जिवंत आहेत त्यांचा अंत होईल आणि काही नवीन मानव जीव जन्माला येतील, हे चक्र अविरात्रपणे चालत राहणार आहे. विश्वाची निर्मिती ,पृथ्वीची निर्मिती, जैव सृष्टीचे अस्तित्व आणि या सृष्टीवर अधिराज्य गाजवणारा मनुष्य प्राणी हे निश्चितच सर्वांना अचंबित करणारे आहे.मनुष्य प्राणी हे बिरुद आपला वंशज होमो सेपियन शी निगडीत आहे हे वाचकांनी लक्षात ठेवावे. सरासरी एक पिढी २५ वर्षाची म्हणून विचारात घेतली तर या होमो सेपियन ची सर्वसाधारण २५००० वी पिढी सध्या पृथ्वीवर अस्तित्वात आहे. एका संशोधन नुसार एका पिढीतून दुसर्‍या पिढीत मानव प्राणी जात असतांनी त्याचा बुद्ध्याक हा ३ पॉइंट ने वाढतो असे नमूद आहे. याचा अर्थ सरळ निघतो की पहिली पिढीतील होमो सेपियन व २५ हजाराव्या पिढीतील होमो सेपियन म्हणजे आजचा मानव याच्या बुद्धिमतेत ७५००० पॉइंटची वाढ समजण्यास वाव आहे. कदाचित एवढी अफाट बुद्धिमतेत वाढ इतर कोणत्याही सृष्टीवरील प्राण्यात झाली नसावी म्हणूनच हा मानव प्राणी स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे, त्या सोबत तो या सृष्टीवर अधिराज्य सुद्धा गाजवत आहे .
 
       अगणित युद्ध, अनेक समस्या, मोठी संकटे याचा सामना या मानवाच्या पिढ्यांनी केला आहे. या कोविड १९ महामारीचा सामना करण्यासाठी मानव नक्कीच तयार आहे व सज्ज आहे हे नव्याने नमूद करायला नको, कारण संघर्ष हा या मानवाच्या रक्तातच आहे. अफाट बुद्धिमता, खोलवर विचार क्षमता ,मोठी  महत्वाकांशा, तीक्ष्ण निरीक्षण क्षमता, अनेक भाषा व संभाषण कला, निरंतर काळापासून त्याच्या ठायी असलेला अपुरेपणा आणि सुखाच्या शोधात असलेली त्याची वृती  ही गुण वैशिष्टे मानवास असाधारण तर बनवतातच शिवाय कोणत्याही संकटाला व समस्येला सामोरे जाण्याची हिम्मत त्याला देत असतात.  
 
      मानवाची बुद्धिमत्ता ही इतर प्राण्यांपेक्षा वेगळी व सर्वसमावेशक अशी आहे. अनेक प्राणी हे मानवी प्राण्या पेक्षा काही विशेष वैशिष्टे घेवून श्रेष्ट असले तरी बुद्धीमत्तेचा योग्य वापर करणे हे मानवा इतके कोणत्या प्राण्याला ज्ञात नाही किंवा त्याला ते जमले नाही. सरासरी एक दिवसात मानवी मन हे 56000 विचार निर्मिती करते. त्याची ही अफाट विचार शक्ति त्याला असाधारण बनवते, मानव हा मोठ्या महत्वाकांक्षा असणारा प्राणी आहे, इतिहास मधील अनेक घटना त्याला साक्षीदार आहेत.
 
        मानवी स्वभाव व त्याची जबरदस्त इच्छाशक्ती त्याला कधीही स्वस्थ बसू देत नाही हे एक सर्वमान्य सत्य आहे. कदाचित त्याचे हे वैशिष्ट्यच त्याला इतर प्राण्यापेक्षा वेगळे करते. म्हणून मागील तीन लाख वर्ष चाललेला हा प्रवास हा एक संघर्षमय इतिहास आहे. यश-अपयश, जय-पराजय ,जन्म-मृत्यू चे चक्रव्यूह काही अंशी भेदण्याचे काम या मानवाने आज पर्यंत केले आहे व ते असेच पुढे चालू राहणार आहे. अनेक संकटे व समस्या यावर मात करत मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याची हि वाटचाल अनंत काळापर्यंत अशीच चालू राहणार आहे. अनेक शोध लागत असताना पूर्णतः मानवी जीवन सुखमय झाले असे कधीही झाले नाही ,हाच मुख्य विकासाचा व उत्क्रांतीचा  धागा आहे. कदाचित काही शोध व सुखाची साधने प्राप्त झाल्या नंतर मनुष्य प्राणी थांबला असता तर तो प्राण्यांच्या अनेक प्रजाती प्रमाणे नामशेष होवून गेला असता. अफाट बुद्धिमता,खोलवर विचारक्षमता,मोठी महत्वाकांशा, अपुरेपणा व असमाधानी वृत्ती त्याची उत्क्रांती व उत्कर्ष घडून येण्यास सहायभूत ठरली आहे. निश्चितच कोविड-१९ सारखी जागतिक महामारी असो किंवा भविष्यात येणारी अशी असंख्य संकटे असो मानव त्यांचा मुकाबला करणे साठी सदैव तयार व तत्पर आहे. कारण मानवी जीवन हे मानवानेच त्याच्या कर्तुत्वाच्या जोरावर “अमूल्य” असे बनवले आहे. असे अमूल्य जीवन टिकवणे व वृद्धिंगत करणे या साठी आम्ही सर्व  कटिबद्ध आहोत.
 
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी मुंबई
BScAgri.MBA(BII),MA(RD),ISTD
9970246417.