मानवी जीवन व वर्तन
मानवी जीवन व वर्तन
मानवी जीवन व त्याचे वर्तन हा एक गहन विषय आहे. मानवी जीवन व त्यांचे वर्तन यामुळे तो कधी स्वताशी, कधी आपल्या मित्र परिवार व अप्तेष्टांशी, कधी समाजाशी, कधी सृष्टीशी, आणि कधी स्वकियांशी संघर्ष करत असतो व हा संघर्ष हा अनंत काळापासून चालत आलेला आहे. संघर्ष व विकास याचा खूप जवळचा संबध आहे. संघर्ष वाढला की विकास खुंटतो. मानवी जीवन हे अनंत घटनांचा व घटकांचा संचय व समुचय आहे. ह्या घटना व घटक मानवी जीवनावर व त्याच्या वर्तनावर प्रभाव टाकत असतात. ह्या घडणाऱ्या घटना व प्रभाव पाडणारे घटक यांचे योग्य प्रकारे संयोजन व समायोजन केले तरच मानवी जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो.
मात्र हे संयोजन व समायोजन करता असतांना मानवी मन व मानवी बुद्धी याचा संघर्ष निर्माण होतो. मानवी मनाची असलेली स्वैरता व मानवी बुद्धीची असलेली अथांग खोली या मुळे प्रत्येक मानवी स्वभावाला वेगळेपण व विविधता प्राप्त होते. मानवाच्या अंतरमनातून निर्माण होणारे विचार व त्याला मिळणारा बुद्धी कडून मिळणारा प्रतिसाद त्या अनुषंगाने आपले निर्णय आणि निर्णयाच्या अनुषंगाने होणारी कृती याचा समुचय होवून आपले वागणे व स्वभाव तयार होत असतो .
आपण म्हणतो कि मी असा का वागतो ? तो तसा का वागतो ? याचे मूळ मन, बुद्धी, विचार व कृती याच्या समुचयात व संयोजनात आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची होणारी कृती हि इतर व्यक्तीपेक्षा वेगळी आहे हे आपल्या दृष्टीक्षेपात पडते. व्यक्तीचे वर्तन व स्वभाव अनेक बाबी नियंत्रित करत असतात, जसे कि त्याची जनुकीय संरचना, त्याचे ज्ञान, त्याची क्षमता, त्याचे कौशल्य ,त्याचे संस्कार, त्याचे मूल्य, त्याचे कुटुंब व मित्र परिवार , घडलेल्या घटना , घटनातून त्याला आलेले अनुभव इत्यार्दी. या सर्व बाबींचा संयोगाने मानवी वर्तन व स्वभाव तयार होतो. असे वर्तन पूर्णतः नियंत्रित करणे हे आपल्या हातात नसले तरी आपल्या कृतीतून आपण ते काही अंशी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतो.
बऱ्याच वेळा आपला ग्रह असतो कि समोरचा व्यक्ती चुकीचे वर्तन अथवा चुकीचे वागत आहे. त्यानुरूप आपण त्याच्या विषयी आपले एकाकी मत बनवून टाकत असतो. वास्तविक कोणताही व्यक्ती पूर्णतः समजून घेणे हे एक अशक्यप्राय गोष्ट जरी असली तरीही अगदी वरवर पणे आपण एखान्द्या व्यक्ती विषयी आपले मत बनवणे संयुक्तिक ठरत नाही. अनेक वेळा जर आपण पूर्वग्रह दुषित असू तर मात्र आपल्या मनाप्रमाणे आपण आपले मत बनवून मोकळे होत असतो. कारण एकदा मत बनवले कि दुसऱ्या व्यक्तीस समजून घेण्याची आपली शक्ती क्षीण होवून जाते . त्या मुळे आपल्या व्यक्ती विषयक संबधात अनेक अडथळे निर्माण होतात. अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे मत बनवायला लागता किंवा कदाचित तुम्हाला त्याची सवय होवून जाते . त्यामुळे तुम्ही लोकांपासून दूर व्हायला लागले कि हळू हळू लोक तुमच्या पासून दूर होतात . शेवटी तुमच्या आजूबाजूला कोणीही शिलक राहत नाही . एक दिवस असा येतो कि तुमचे आप्तेष्ट व मित्र परिवार तुमच्या पासून खूप दूर गेलेले असतात.
या पाठीमागचे कारण अगदी सोपे आहे ते म्हणजे एक मेका विषयी असलेला दुराग्रह, पूर्व ग्रह दुषितपणा आणि मी श्रेष्ठ आहे हि दाखवण्याची जिज्ञासा. यामुळे आपोआप वर्तन बदलत जाते आणि जाणीव पूर्वक अपेक्षा लादल्या जातात आणि त्या पूर्ण नाही झाल्या कि नातेविषयक संबध ताणले जातात. हे कधी कधी नकळत होते तर कधी जाणीवपूर्वक घडवून आणले जाते. सबब आपल्या सभोवताली माणसे ओळखणे त्यांचे वर्तनाची थोडक्यात चिकित्सा करणे आणि त्यांचे वर्तन पुर्णपणे नियंत्रित न करता त्या प्रमाणे आपण काही बदल आपल्या वर्तनात व वागणुकीत घडवून आणले तर आपली प्रगती तर होतेच परंतु असा व्यक्तीही त्याचे वर्तनात बदल करण्याचा प्रयत्न करतो.
या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती ती स्री असो व पुरुष यांनी आपल्या शारीरिक , भावनिक व मानसिक गरजा व अपेक्षा ह्या कश्या नियंत्रित करता येतील यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकदा यावर नियंत्रण प्रस्तापित झाले कि माणूस माणसा सारखा वागण्यास सुरुवात करतो व त्या अनुषंगाने त्याचे वर्तनात इष्ट असे बदल होतात. त्या साठी प्रत्येकाने आपली विचार प्रक्रिया सुदृढ व सकारात्मक करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. एकदा विचार प्रक्रिया नियंत्रित केली कि त्याचा प्रभाव आपल्या वागणुकीवर व वर्तनावर होतो. चांगले वागणे व सुयोग्य असे वर्तन आपल्या अंगी आले कि आपला इतरांविषयी होणारा तिरस्कार हळू हळू कमी होवू लागतो व ताणले गेलेले नाते संबध हळू हळू दृढ होवू लागतात. परंतु या साठी पण सर्वांनी खूप कल्पकतेने विचार व प्रयत्न करायला पाहिजेत. काळाच्या ओघात तयार झालेली अनेक उन-पाउस, सुख-दुख पाहिलेली व सर्वात दृढ असलेली हि सामाजिक नाते संबंधाची विन अशीच घट्ट राहावी यासाठी आपण सर्वांनी जाणीव पूर्वक प्रयत्न करायला हवेत.
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी, मुंबई . 9970246417