माणसाने दिला हात माणसाला नाते जुळले त्या क्षणाला ! जपता जपता कळले सारे नात्यांमधले रंग निराळे !!

माणसाने दिला हात माणसाला नाते जुळले त्या क्षणाला ! जपता जपता कळले सारे  नात्यांमधले  रंग निराळे !!

                माणसाने दिला हात माणसाला नाते जुळले त्या क्षणाला,  जपता जपता कळले सारे  नात्यांमधले रंग निराळे. शनिवारी घडलेली वांगणी रेल्वे स्टेशन वरची घटना माणूस व माणुसकीच्या पुढे निघून गेली. भयाण रेल्वे स्टेशन, त्या रेल्वे स्टेशन वरची निशब्ध अशी स्तब्धता, वायु वेगाने येणारी उद्यान एक्स्प्रेस, रेल्वे रुळावर पडलेल्या साहिलची धडपड आणि विजेच्या लखलखटा प्रमाणे धावलेला देवदूत मयूर शेळके याने सर्वांच्या मनाचा ठाव घेतला.

             वांगणी नावच्या रेल्वे स्टेशनवर पॉइंट्समन म्हणून काम करणार्‍या मयूरचे सत्कार, स्वागत, शाबासकी आणि बक्षीस हे सर्व यथावकाश घडेल आणि ते घडायलाच हवे मात्र मयूरने समस्त मानव जातीसमोर आणि माझ्या युवा मित्रांसोमोर ठेवलेला आदर्श आणि लावलेला माणुसकीचा दिवा कायम तेवत ठेवण्याच्या जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. कोविड साथीच्या भयंकर अशा संकटात जिकडे तिकडे नकारात्मक वातावरण असताना ही घटना सर्वांमध्ये एक सकारात्मक्ता घेवून आली. साहजिकच माझ्या सारख्या संवेदनशील मनाच्या माणसाला  लिहण्याची प्रेरणा मिळाली, म्हणून हा प्रपंच.  

           मयूर हा रेल्वेमध्ये काम करणारा एक पॉइंट्समन पण त्याने दाखवलेले प्रसंगावधान, तत्परता, निर्णयक्षमता, धैर्य आणि त्याचा त्याच्या स्वत:वर असणारा विश्वास की ‘मी त्या मुलाला वाचवू शकतो’, ‘मी हे करू शकतो’  ही गुण वैशिष्टे जर देशातील प्रत्येक युवकाच्या मेंदू आणि मनामध्ये आपण रुजवू शकलो तर बलशाली आणि सर्वसंपन्न भारत हे भारत रत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेले स्वप्न फार दूर नाही. आजच्या  घडीला आपल्या देशाची लोकसंख्या १३५ कोटी असून त्यापैकि जवळपास ५० कोटी युवक या देशात आहेत. साहजिकच युवकांची शक्ति आणि ऊर्जा ही समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रवाहीत करणे ही आपल्या सर्वांची येणार्‍या काळात जबाबदारी राहणार आहे.

           मयूरचा व्हिडिओ हा राज्यातील १०० टक्के युवकांनी निश्चितच पहिला असणार याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ पाहून युवकांमध्ये एक वेगळा उत्साह संचारलेला आहे. मात्र हा उत्साह कायम व शास्वत टिकवणे आवश्यक आहे. आपण समाजाचे, देशाचे आणि या धरती मातेचे देण लागतो हा संस्कार युवकांमध्ये मध्ये पेरणे ,रुजवणे, संवर्धित करणे आणि तो वाढवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

          आपण नेहमी नवीन पिढीला दोष देत असतो. आम्ही असे होतो, आम्ही असे वागत होतो, आताची मुले चांगली वागत नाहीत आणि मुले वाया गेली आहेत, अशी दूषणे आपण देत असतो. मित्रांनो मानवाची सध्याची पंचवीस हजारावी पिढी चालू आहे आणि प्रत्येक पिढीला अशी दूषणे आणि शाप मिळूनही समस्त मानवजातीचा आजपर्यंतचा प्रवास आणि प्राबल्य हे वाखाण्याजोगे आहे.

           त्यामुळे दोष काढणे आणि दूषण देणे यापेक्षा युवा मधील शक्ति व ऊर्जा ही योग्य दिशेने कशी वळवता येईल याकडे आपण जर लक्ष दिले तर अनेक मयूर शेळके तयार होणार आहेत. याची सुरवात सर्वप्रथम आपल्या घरापासून होते हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. माझा तो बाळया आणि दुसर्‍याचे ते कार्ट्ये ही मनोवृती आता आपण बदलायला हवी. आपल्या घरातील युवकांचे मनोबल वाढवणे खूप आवश्यक आहे. तरच ते चांगल्या आणि उत्तम कामासाठी प्रेरीत होवू शकतील .

           पारंपारिक शिक्षणासोबत युवकांना कौशल्यपूर्ण असे शिक्षण कसे देता येईल यावरही प्रत्येक कुटुंबाचा विचार हवा. आम्ही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आत्ता आम्हाला नोकरी देण्याची जबाबदारी सरकारची आहे ही मनोवृती बदलायला हवी. मानवी मूल्यांची जपवणूक आपल्या घरापासून सुरवात होते. त्यासाठी आपण घरातील वातावरण सौहार्दपूर्ण व आनंदी ठेवायला हवे. मोबाइल मुलांकडून काढून घेण्यापेक्षा त्याचा ते परिणामकारक व कार्यक्षम वापर कसा करतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. त्याच सोबत मुलांकडील मोबाइल वर तुम्हाला मुक्त प्रवेश राहील अशी व्यवस्था तयार करायला हवी. त्यासाठी तुम्हाला मुलांचे पालक बनण्यासोबत त्यांचे मित्र बनावे लागेल.  

          साहजिकच मानव आणि त्याची पिढी ही कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी  सक्षम आहे, याबद्दल कोणताही संदेह नाही. फक्त गरज आहे घरातील प्रत्येक तरुण हा मयूर शेळके सारखे बणण्याची की ज्याच्याकडे शिक्षण असेल, कौशल्ये असेल, जिगर असेल, निर्णयक्षमता असेल, प्रसंगावधान असेल, धैर्य असेल आणि स्वतःवर विश्वास असेल. चला, मयूरचे अभिनंदन करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया. जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.

००१५ /१०१ दिनांक १९.०४.२०२१

राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी ,

९९७०२४६४१७