प्रेरणा आणि प्रोत्साहन Motivation and Encouragement

प्रेरणा आणि प्रोत्साहन Motivation and Encouragement

        मानवी जीवनाचा प्रवास हा कधीच एकसारखा नसतो. तर तो कधी नदीसारखा संथ आणि कधी ओढ्यासारखा जलद तर कधी धबधब्या सारखा उंच आणि कधी दरी सारखा सखल असा असतो. या जीवनरूपी प्रवासात अनेक बाह्य घटक आणि अंतर्गत घटक आपल्या जीवनशैली वर प्रभाव टाकत असतात. आपल्याला झालेले विविध वस्तु, बाबी आणि घटना याचे आकलन आणि आलेले अनुभव या आधारे आपण आपला दृष्टीकोन आणि वागणूक यांचा सातत्याने विस्तार करत असतो. या प्रवासात मानवी मन हे कायम काही तरी शोधत असते आणि स्व-विकास आणि प्रगती साधण्याकडे निरंतर प्रवास करत असते. काही तरी मिळविण्याची दुर्दम्य इश्चाशक्ती आणि त्यासाठी होणारी धडपड या मागे दोन बाबी सातत्याने काम करत असतात त्या म्हणजे प्रेरणा आणि प्रोत्साहन होय. जर प्रेरणा आणि प्रोत्साहन मानवी जीवनात नसतील तर मानवी जीवन हे निरस आणि निरर्थक होवून जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणा निर्माण होणं आणि प्रोत्साहन मिळवणं अनिवार्य आणि आवश्यक ठरते. प्रस्तुत लेखात आपण प्रेरणा आणि प्रोत्साहन या दोन बाबींवर विस्तृतपणाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

        मानवी जीवनाचा प्रवास जन्म आणि मृत्य या दोन बिंदू मध्ये सामावलेला आहे. हा प्रवास सोपा आणि सुटसुटीत असा कधीच नसतो. धन, दौलत आणि संपत्ती घेवून ज्यांचा प्रवास सुरु होतो. त्यांच्या साठी हा प्रवास आलोकिक आणि भौतिक दृष्ट्या जरी सुसह्य असला तरी भावनिक आणि मानसिक दृष्ट्या सुसह्य असेलच असे नसते. मात्र ज्यांचा जीवनप्रवास गरिबी, निर्धनता, आर्थिक आणि सामाजिक विषमता, अडथळे आणि समस्या याच्यासह सुरवात होतो त्यांना मात्र कमालीचे परिश्रम आणि पराकष्ट करावे लागते. जीवन हा एक संघर्ष असतो असे असले तरी जीवन जगणे म्हणजे फक्त शारीरिक गरजा पूर्ण करणे इतपर्यंत हा प्रवास मर्यादित कधीच नसते. तर त्या पुढेही जावून भावनिक, मानसिक ,संस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यावर या प्रवासाची परिपूर्णता अवलंबून असते. साहजिकच या प्रतिकूल प्रवासात प्रेरणा आणि प्रोत्साहन आपल्याला गती, ऊर्जा, बळ आणि शक्ती देवून आपला जीवन प्रवास सुसह्य करत असतात.

        प्रेरणा म्हणजे काय? हे आपण प्रथम समजावून घेवूया. प्रेरणा म्हणजे काय तर ध्येये साध्य करण्यासाठी पाठीमागून काम करणारी इस्चा आणि आकांक्षा होय. ज्या प्रमाणे भूक लागणे ,तहान लागणे इत्यादि शारीरिक गरजा प्रेरणा निर्माण करतात. त्या प्रमाणे प्रेम, माया इत्यादि मानसिक गरजा सुद्धा प्रेरणा निर्माण करतात. प्रेरणा ही अशी शक्ति आहे की ती आपल्याला कार्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कायम उद्युक्त करत असते. प्रेरणा ही एक टेकू असते कि जी आपल्याला पुढे ढकलण्यास साहाय्य करते. प्रेरणा आपले लक्ष विचलित होवू न देता आपल्या जीवनाला एक दिशा देते. या प्रेरणेच्या आधारे आपण आपल्या ध्येयाकडे एका सरळ रेषेत मार्गक्रमण करतो. प्रवासातील येणारे विविध अडथळे आणि समस्या यांच्यावर मात करण्यासाठी प्रेरणा खूप महत्वाची भूमिका बजावते.

अशी ही प्रेरणा आपण कायम शोधत असतो. काहींना ती मिळते, तर काहींना ती दिसत नाही तर काहींना ती हुलकावणी देते. प्रेरणा दोन प्रकारची असते एक स्वयं-प्रेरणा किंवा अंत प्रेरणा आणि दुसरी म्हणजे बाह्य प्रेरणा. स्वयं-प्रेरणा किंवा अंत-प्रेरणा ही आपले भावना आणि विचार याच्या मिलनातून तयार होते. जो पर्यंत विचारांना भावनेचे पाठबळ मिळत नाही, तो पर्यंत प्रेरणा निर्माण होत नाही. प्रेरणा ही आकलन आणि अनुभव यावर सुद्धा बर्‍याच अंशी आधारित असते. नाविण्याची ओढ आणि सर्जनशीलता आणि त्याच सोबत कुतूहल आणि जिज्ञासा सुद्धा प्रेरणा निर्माण करतात. सकाळी उठून एक तास व्यायाम करायचा आहे. यासाठी स्वयं-प्रेरणा खूप आवश्यक असते. व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे हा विचार आणि व्यायामातून आनंदाची अनुभूति मिळेल ही भावना यातून रोज व्यायाम करण्याची प्रेरणा तयार होते. साहजिकच आशा अनेक प्रेरणा ह्या विचार आणि भावना यातून प्रकट होत असतात. असे असले तरी प्रेरणा आणि कृती यात बर्‍याच वेळा अंतर पडते. त्यामुळे प्रेरणा ही जो पर्यंत कृतीत उतरत नाही तो पर्यंत तिचे मूल्य शून्य असते. माझे एका मुलीवर आणि तिचे माझ्यावर प्रेम आहे ही झाली भावना आणि त्यासाठी मला खूप अभ्यास करून नोकरी प्राप्त करावी लागेल हा झाला विचार. साहजिकच या प्रेरणेतून अभ्यासाची कृती होणे खूप आवश्यक असते तरच ही प्रेरणा फलदायी ठरते.

आपण ज्या समाजात वावरतो त्या मध्ये आपण रोज अनेक व्यक्तींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्कात येतो. सध्याच्या ग्लोबल जगात व्यक्तीशी प्रत्यक्ष रीतीनेच संबध आणि संपर्क यायला हवे असे काही नसते. अनेक माध्यमे हा संबंध आणि संपर्क घडवून आणत असतात. त्यामुळे बाह्य घटक अनेक प्रकारच्या प्रेरणा आपल्याला देत असतात. म्हणजे जे घटक आपल्या जीवनात बाहेरून प्रेरणा निर्माण करतात, त्यांना बाह्य प्रेरणा असे म्हणूया. उदाहरण दाखल सांगायचे झाल्यास या बाबत भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम हे सर्वांसाठी प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे. साहजिकच ज्यावेळी आपण आशा महान व्यक्तींना समजून उमजून घेतो आणि त्याचे विचार आत्मसाद करतो. त्यावेळी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. लहान मुलांमध्ये मिलिटरी, पोलिस, डॉक्टर यांच्या बाबत एक बाह्य प्रेरणा असते. त्यातून ते त्यांची ध्येय रंगवताना आपल्याला दिसत असतात. साहजिकच प्रेरणा ही अंतर्गत असो किंवा बाह्य ती आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी निरंतर आवश्यक आणि अनिवार्य  राहते. प्रेरणा आपल्याला सुरुवात देते, गती देते, ही गती कायम राख्नायचे काम करते , कोठे थांबायचे आणि कोठे चालायचे या मागेही प्रेरणा काम करत असते. प्रेरणा शिवाय आपण नाही आणि तिच्या शिवाय वाटचाल शक्य नाही.

आपल्या अवती भोवती जे घडते त्याचे निरीक्षण आपण करत असतो. काय चांगले आणि काय वाईट याचे विश्लेषणात्मक वर्गीकरण करण्याची आपल्याला कुवत प्राप्त झालेली असते. काय केल्यावर काय साध्य होते आणि काय घडण्यास काय कारण कारणीभूत होते, याबाबतही एक विचारांची बैठक आपली तयार झालेली असते. या विचाराच्या बैठकीवर आपली प्रेरणा आपल्याला मिळते, ही प्रेरणा घेवून आपण मार्गस्थ होतो. काही तरी मिळविण्यासाठी धडपड करतो आणि ते मिळाल्यावरही नवीन प्रेरणा शोधून परत काही तरी मिळविण्याची धडपड ही निरंतर चालू राहते.

म्हणून आपण नेहमी अंतर्मनात प्रेरणा कशी उगम पावेल यासाठी काम करायला हवे. प्रेरणेचे दोन दुवे असतात त्याला सोमाटिक प्रेरणा आणि इंसेंटिव प्रेरणा. सोमाटिक प्रेरणा ही शरीराशी निगडीत असते तर इंसेंटिव प्रेरणा ही बक्षीस किंवा लाभ याच्याशी निगडीत असते. त्या सोबतच बाह्य जगातून आपल्याला प्रेरणा कशी मिळेल, यासाठी तेवढेच डोळस आपण असायला हवे. अंतर्मन जेवढे शुद्ध आणि शांत ठेवलं, तेवढी प्रेरणा जागृत होण्यास मदत होते. भावना ह्या निकोप आणि स्थिर असल्या की प्रेरणा तयार होते. आपले विचार हे सकारात्मक, सुस्पष्ट आणि वस्तुस्थितीला धरून असले की प्रेरणा तयार होते. आपले मन शांत ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार, झोप, व्यायाम आणि ध्यान निरंतर ठेवावा लागतो. मनाची शुद्धता ही आपल्या भावनांच्या शुद्धते वर अवलंबित असते. त्यामुळे भावना एका सरळ आशा रेषेत जास्त चढ उतार न देता स्थिर कराव्या लागतात. विचारांचा कल्लोळ न होणे, नाकारत्मकता तयार न होणे, तेच तेच विचार न येणे यातून एक सुस्पष्टता येते आणि ती प्रेरणेला जन्म देते.

प्रेरणे इतकेच आपल्याला पुढे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा गरजेचे असते. प्रेरणा सुरुवात करून देते. मात्र त्या नंतर गती मिळविण्यासाठी प्रोत्साहन खूप आवश्यक असते. प्रोत्साहन हे उत्प्रेरक सारखे असते. ते प्रेरणेतून सुरू झालेल्या कामाला गती देण्याचे काम करते. त्या मुळे नुसती प्रेरणा असून भागत नाही, तर त्यासाठी प्रोत्साहन तेवढेच महत्वाचे असते.  प्रोत्साहन हे शब्द किंवा वागणे या स्वरुपात असते. हे शब्द किंवा वागणे समोरच्याला कामकाज करण्यासाठी उद्युक्त करणे, पुढे जाण्यास मदत करणे, प्रगती आणि कार्यास गती आणि ऊर्जा देणे यासाठी कामकाज करतात. प्रोत्साहन हे मौखिक किंवा अमौखिक असू शकते. जसे ‘खूप छान’ हे मौखिक प्रोत्साहनाचे विकसित असे रूप आहे. तर पाठीवरची ‘शाबासकीची थाप’ हे अमौखिक प्रोत्साहनाचे रूप आहे. मात्र बर्‍याच वेळा मौखिक पेक्षा अमौखिक प्रोत्साहन जास्त भाव खावून जाते.

प्रोत्साहन ही एक अदृश ऊर्जा आहे, की जी पाठबळ आणि गती देते. प्रोत्साहन हे ऊर्जा आणि शक्ती सारखे काम करते. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिलेले प्रोत्साहन हे नीरस असलेले काम सरस करते. थकललेले आणि भागलेले उर्जाक्षम हे प्रोत्साहन करते. हरलेले आणि पराजित झालेले यांना सुद्धा प्रोत्साहन द्वारे पुन्हा लढण्यास प्रयुक्त करते. प्रोत्साहन ही अशी एक गोळी आहे, की ती कोणताही मानसिक आजार तत्काळ बरा करू शकते. वैयक्तिक पातळीवर प्रोत्साहन हे गती देण्यासाठी काम करत असले तरीही संघटन आणि संघटना यात प्रोत्साहन कमालीचे यशस्वी होते. अनेक मोठी कामे अनेक मोठे स्थित्यंतर हे प्रेरणा आणि त्या नंतर गती पकडण्यासाठी दिले जाणारे प्रोत्साहन हे कमालीचे यशस्वी होताना आपण पाहतो. म्हणून आपल्याला इतरांना कायम कसे प्रोत्साहित करता येवू शकेल यावर साकल्याने आणि काळजीपूर्वक विचार आणि कामकाज करायला हवे. प्रोत्साहन दिल्याने आणि कामाची स्तुती केल्याने कामाच्या उत्पादकतेत ३० टक्के वाढ होते, असे एक संशोधन सांगते. प्रोत्साहन देत राहिल्याने संघटना मधील अंतर्गत कलह हे मोठ्या प्रमाणावर संपुष्टात येतात. प्रोत्साहन जेथे आहे तेथे नेतृत्व गुण आणि टिम बिल्डिंग तत्व मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते.

साहजिकच आपल्या या जीवन प्रवासात अगदी जन्मापासून ते मृत्यू पर्यंत प्रेरणा आणि प्रोत्साहन ह्या दोन बाबी आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असतात. प्रेरणा आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देवून कामकाजाला सुरुवात करून देते. प्रोत्साहन आशा कामाला गती देवून अर्थपूर्ण शेवटाकडे घेवून जाते. प्रेरणा ही अंतर्मनातून निर्माण होते तशी ती बाह्य आकलन, सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभव यातूनही निर्माण होते. अंतर्मनातून प्रेरणा निर्माण होणेसाठी आपला आत्मा, मन, मेंदू आणि शरीर हे एका सरळ रेषेत आणून भावना आणि विचार याचा संयोग करायला लागतो. असा संयोग झाला की विचार आणि भावना यातून एक प्रेरणा उगम पावते. अशी प्रेरणा पुढे आपल्याला कामासाठी प्रयुक्त करते आणि यातून आपण आपली प्रगति आणि विकास याकडे मार्गस्थ होतो. प्रोत्साहन हे शक्यतो समाजातील विविध बाह्य स्रोताकडून मिळते. प्रोत्साहन हे शब्द आणि वागणे यातून प्रतीत होते आणि समोरच्याला त्याची उदीष्टे आणि धेये याला गती मिळवून देण्याचे काम करते. प्रेरणा ह्या अदृश्य स्वरुपाच्या असतात, मात्र प्रोत्साहन हे दृश स्वरुपात आढळून येते. त्यामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन हे परस्पर पूरक असे सुद्धा कामकाज करते. साहजिकच आपल्या या जीवन प्रवासात प्रेरणा ही निर्माण करता आली पाहिजे आणि प्रोत्साहन हे मिळवता आणि शोधता आले पाहिजे जेणेकरू त्या आधारे आपले जीवन अधिक सोपे, साधे, सरळ , सुटसुटीत आणि सुखी होईल.

जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया .

५१/१०१ दिनांक १८.०६.२०२२

सुखाच्या शोधात© 

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७