चेहरा हरवलेली माणसं( A Man With Lost Face)

चेहरा हरवलेली माणसं ( A Man With Lost Face)

माणूस हा खूप चमत्कारिक आणि तितकाच विस्मयकारी प्राणी आहे. तो दाखवतो एक आणि करतो एक. त्यामुळे आजूबाजूला व अवती भोवती भेदरलेली माणसे दिसतात मात्र ती तशी असतीलच असे नसते. कोविड-१९ साथीचा आजार आणि कोरोना नावाचा विषाणू यांनी मानवाचे सामाजिक जीवन मागील एक वर्षांपासून विस्कळीत करून टाकले आहे. आपल्या सैल व सैराट  वागण्याला कोणता तरी अज्ञात जीव लगाम घालतोय ही वस्तुस्थिती स्वीकारणे मानवाला काही दिवस तरी अवघड गेले.

                 मात्र प्रिंट मेडिया, इलेक्ट्रॉनिक मेडिया आणि विशेषतः सोशल मेडिया वरून जगातील विपरीत व वाईट परिस्थिती वारंवार जेंव्हा अचूकपणे दाखवली गेली. ज्या वेळेस परिस्थिती भयानक आणि नाजूक आहे याची खात्री सर्वांना पटली,त्या वेळेपासून हा मानव बचावात्मक पवित्र्यात आला आणि तोंडावर मास्क लावून समाज जीवनात वावरू लागला.

               चेहरा हा तसा मानवी जीवनातील ओळखीचा मानबिंदू. एखांद्याला आपण ओळखतो म्हणजे त्याच्या चेहऱ्याने हि ओळख अधोरेखित केली जाते. हा अमुक असा दिसतो आणि ती तमुक तशी दिसते, ही आपली ओळखण्याची सर्वसाधारण व्याख्या. मात्र मास्क आले आणि ह्या ओळखी हळू हळू पुसट होत गेल्या. समाजात सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आपल्या अवती भवती कोण आहे ही ओळख जशी कमी झाली, तशी याबातच्या जाणीवा सुद्धा कमी झाल्या आणि समोर आलं ते चेहरा हरवलेल्या माणसाच एक वास्तव.

                खरच! चेहरा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र हाच चेहरा आपण हरवून बसलो आहोत. मानवाचा चेहरा हरवल्या पासून मानवी संवाद हळूहळू कमी झाला. आपल्या आजूबाजूला फक्त कामात यंत्राप्रमाणे व्यस्त असलेली माणस पाहायला मिळायला लागली. या उलट सोशल मेडिया वरील आभासी संवाद व संबध यांनी मानवी जीवन व्यापत गेले. दोन मित्र , पती-पत्नी , भाऊ-बहिण, वरिष्ठ-कनिष्ट समोरासमोर बसून आपापसात संवाद न साधता आभासी जगाशी संवाद साधू लागले. शेजारचा व्यक्ती कोण आहे आणि काय करत आहे हे सुद्धा आता कळायला मार्ग राहिला नाही. गर्दीत हरवणारी माणसे आता मास्क मधेच हरवली. सामजिक अंतर वाढत गेले. ओळखी पुसट झाल्या. बैठका, कार्यशाळा, चर्चा सत्र, सण–वार, लग्न-कार्य आणि भेटी-गाठी मध्ये स्मित हास्य करून आणि हस्तांदोलन करून अंतर वैयक्तिक संबंध दृढ व वृद्धिंगत करणारी माणसे सुद्धा हरवून गेली. व्यक्त होण्यासाठी,भावनांचे आदान प्रदान करण्यासाठी ,मायेचा स्पर्श आणि आधार शोधणारी आणि आधार देणारी माणसे गर्दीत हरवून गेली. उरला फक्त पोकळ आत्मविश्वास आणि कोरडा भावनिक ओलावा.

              हि कोंडी फोडायची असेल तर संवादाचे नवे मार्ग स्वीकारुया. समोर असलेल्या व कामानिमित भेटलेल्या व्यक्तीशी संवाद साधूया. जुन्या जाणत्या मात्र अडगळीत पडलेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या मित्र आणि आप्तेष्ट यांना मोबाईल वरून संवाद साधून विचारूपूस करूया. वारंवार सारख्याच लोकांना व्हाट्सअप  संदेश पाठवण्यापेक्षा विसरून गेलेल्या मित्र व आप्तेष्टांना संदेश पाठवूया. वेळ भेटला तर मित्रांना व आप्तेष्टांना स्व-हस्ताक्षरात पत्र लिहून आणि स्कॅन करून पाठवूया. आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांना जाणीपूर्वक मदतीची विचारणा करूया. हे जर आपण केले नाही तर चेहरा हरवलेल्या या गर्दीत आपणच हरवून जावू आणि मागे उरतील त्या फक्त मानवी संबधाच्या अस्पष्ट खुणा.   

             जीवन अनमोल आहे ! ते अजून सुंदर बनवूया

राजीव  नंदकर , उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७