आनंद सुखात परावर्तीत करा
*आनंद सुखात परावर्तीत करा.* मानव हा एक चमत्कारिक ,गुंतागुंतीचा,क्लिष्ट व समजण्यास- समजून घेण्यास अत्यंत अवघड असा प्राणी आहे. मानवी मन अथांग आहे,तर त्यातील भावनांची खोली गहन आहे. आत्मा (Soul ),मन (Mind) बुद्धी (Brain)यांचा भेद करणे अनेकांना शक्य झाले नाही. मानवी मन व मेंदू मिळून भाव भावनांचा अविष्कार घडून येतो. मानवात प्रामुख्याने राग,लोभ,भिती,दुःख,तिरस्कार,इर्षा,लजा,आनंद,आश्चर्य या भावनांचा समावेश होतो. या सर्व भावनांपैकी आनंद- सुख व त्यांचा परस्पर संबधाबाबत जाणून घ्यायचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत . मला आनंद झाला असे आपण बहुदा ऐकतो पण मला सुख मिळाले असे आपण क्वचित ऐकतो. आपण आनंद व सुख हे एकच आहे अशी गल्लत करून बसलो आहोत. आनंद म्हणजे Joy आणि सुख म्हणजे Happinessअशी सरळ विभागणी इंग्रजी शब्दकोशात केलेली आहे. अजून विस्ताराने पाहिल्यास आनंद म्हणजे feeling of great pleasure at point of time तर सुख म्हणजे A state of feeling joyful for a substantial period of time.आपण आनंद साजरा करतो मात्र तो आनंद सुखामध्ये परावर्तीत करत नाहीत. यामुळे मानवी जीवन समयोजनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते . आनंद व सुख यांचा परस्पर संबध प्रस्तापित न झाल्यास एका ठराविक काळानंतर नैराश्य येते . त्यामुळे आनंद हा क्षण शास्वत सुखामध्ये कसा परावर्तीत करता येईल या बाबतही जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. आनंद सुखामध्ये कसा परावर्तीत होतो हे अजून सविस्तर सांगायचे म्हटले तर लहान बाळापासून सुरुवात करूया, त्याला आई दिसली की आनंद होतो पण जेंव्हा आई त्याला कुशीत घेते तेंव्हा त्याला सुख मिळते. वर्गात आपल्याला चांगले मार्क मिळाले की आपल्याला आनंद होतो मात्र तेच मार्क मिळाल्याची बातमी आपण आपल्या आईवडील यांना सांगतो तेंव्हा आपल्याला सुख मिळते. सुख व आनंद ह्या मध्ये एक पुसटशी रेषा आहे. ‘आनंद साजरा केला जातो तर सुख अनुभवले जाते’. The happiness realized while the joy celebrated. एका छोट्या शहरात एका छोट्या झोपडीत एक कुटुंब राहत असते. नवरा व बायको त्यांची दोन मुले असे हे कुटुंब असते. नवरा व बायको वीटभट्टीवर काबाडकष्ट करतात तर मुले जवळच्या शाळेत शिकत असतात. नवरा व बायको वीटभट्टीवर रोज खूप कष्ट करतात आणि ते काम त्यांचा आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला असतो. मात्र ते छोट्याश्या झोपडीत राहूनही आनंदी असतात कारण वीटभट्टी वर पुढील ५ वर्ष पुरेल एवढे काम असते, भाड्याची खोलीसुद्धा त्यांना काम आहे तोपर्यंत त्यांच्या ताब्यात राहणार असते आणि सर्वात महत्वाचे त्यांची दोन्ही मुलांची शाळेत शिक्षणाची सोय लागलेली असते . ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ते कुटुंब आनंद जरी त्यांच्या दैनंदिन जीवनात साजरे करत नसले तरी ते त्यांच्या पातळीवर सुख अनुभवत आहोत. शेवटी सुखाचा मार्ग हा समाधानाच्या वाटेवरुन जातो. अपेक्षा कमी असल्या की,समाधान लवकर मिळते आणि एकदा समाधान प्राप्त झाले की, सुख मिळण्यास सुरुवात होते. आता हा आनंद साजरा करायचा की त्यातील सुख अनुभवाचे हे ज्याचा त्याचा त्याचा प्रश्न असतो. एका शहरात एक चांगल्या कंपनीत एक व्यक्ती व्यवस्थापक या पदावर काम करत होता एक लाख पगार , गाडी, कंपनीने दिलेले घर असे जे काही हवे ते त्याच्याकडे होते. सुशील पत्नी व गुणी मुले असे सर्व वैभव त्याच्याकडे होते . असे असूनही तो सुखी नव्हता कारण त्याला छान पैकी एक अलीशान बंगला हवा होता ,असलेल्या कारपेक्षा त्याला महागडी कार त्याला हवी होती. जे त्याच्याकडे आहे त्यापेक्षा त्याच्याकडे जे नाही त्याचे आकर्षण त्याला जास्त होते . त्यामुळे तो असलेल्या भौतिक सुविधांचा उपभोग तो घेवू शकत नव्हता . त्यामुळे कधी कधी त्याला नैराश्य यायचे त्याचा राग तो आपल्या पत्नी व मुलांवर काढत असे त्यामुळे घरातील वातावरण अत्यंत नाजूक बनले होते.मानवी स्वभाव असाच आहे , जे स्वतःकडे नाही त्याबदल त्याला नेहमीच आकर्षण राहिले आहे. तिसरी गोष्ट अशी की एका व्यक्तीला लॉटरी लागली म्हणून त्याला खूप आनंद झाला . त्याला नंतर कळले की लॉटरीच्या रकमेवर 30 टक्के टॅक्स लागतो. मिळणारे पैसे कोठे ,कसे व केव्हा गुंतवायचे याची त्याला काळजी वाटायला लागली. पैसे मिळणार म्हणून आपल्याला कोणी मारणार तर नाही ना याची त्याला भीती वाटायला लागली. आपले कुटुंब,नातेवाईक व मित्र यांच्यामध्ये तो स्वतःला असुरक्षित समजू लागला. हळू हळू त्याच्या आनंदाची जागा भीती Fear आणि काळजीWorried यांनी घेतली. त्या लॉटरी च्या पैशातून निर्माण होणारे सुख Happiness अजून त्याच्या आयुष्यात येणार होते . त्यापूर्वीच तो दुःखी व असह्य झाला. नंतर पैसे मिळाले पण त्याचा त्याला उपभोग घेवुन त्यातून त्याला सुख निर्माण करता आले नाही . व्यसनाधिनता, वाईट सवयी याच्या चक्रव्युहात तो फेकला गेला. हळू हळू यातच त्याचा अंत झाला . म्हणजेच त्याने आनंद साजरा केला परंतु त्याचे समयोजन तो सुखात करू शकला नाही . आपल्या अवतीभोवती अनेक लोक असे असतात की त्यांना खूप संपत्ति मिळते परंतु तिचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे त्यातून फक्त आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र सुख खूप दूर राहून जाते . उपरोक्त तीनही घटनांवरून आपल्या असे निदर्शनास येते की, सर्व प्रथम जे आपल्या जवळ आहे त्याचे आपल्याला महत्व असले पाहिजे त्याबाबत आपण समाधानी राहिले पाहिजे . याचा अर्थ असा कदापि होत नाही की आपली महत्वाकांक्षा , आपले ध्येय , आपले लक्ष याकडे आपण मार्गक्रमन करणे सोडून दिले पाहिजे . उलट असा प्रवास व मार्गक्रमण होत असताना आपण आपल्याजवळ आहे त्याचे सुख घेण्यास विसरले नाही पाहिजे . चांगले दिवस कधीच येत नसतात जे दिवस आपल्या हातात आहेत ते आपण चांगले बनवायचे असतात . काही लोक मला नंतर चांगले दिवस येतील यासाठी आपले आरोग्य आपले कुटुंब याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात आणि आयुष्यभर नुसती स्पर्धा व धावपळ करत राहतात अगदी आयुष्याचा शेवटचा क्षण येतो तरीही त्त्यांची धावपळ थांबलेली नसते . वास्तविक मानवी जीवन हा एक प्रवास आहे या प्रवासात येणारे दुख: :आपण पचवले पाहिजे तर प्राप्त होणारा आनंद सुखं मध्ये परावर्तीत केला पाहिजे. आनंद हा एखादी ठराविक घटना घडल्यानंतर एका ठराविक अशा वेळी निर्माण होत असतो. The joy will be emerge out and celebrated at point of time but the happiness give you internal immense pleasure forever. It will stay for a long time. मला आनंद झाला असे आपण म्हणतो म्हणजे त्याची जाणीव तुमच्या मेंदुस होते. मात्र जेंव्हा तुम्हाला सुख मिळते त्याची अनुभुती Realization तुमच्या आत्म्यास व मनास होते . हळू हळू या सुखाचा प्रभाव तुमच्या शरीरावर सुद्धा होतो. जे लोक आनंदी राहतात त्यांच्यापासून अनेक आजार दूर पळून जातात हे आपण ऐकतो व वाचतो परंतु त्याचा स्वीकार आपण करत नाहीत किंवा त्या प्रमाणे आपले वर्तन आपण ठेवत नाही . आनंद द्विगुणित झाला व तो इतरांसोबत वाटून घेतला की सुखाची अनुभूती सुरू होते . एखान्दी मनासारखी गोष्ट घडते , आपल्याला काही अनेपेक्षित लाभ होतो, आपल्याला यश मिळते , आपली अपेक्षा पूर्ण होते, आपण जिंकतो अशा अनेक प्रसंगात आपल्याला आनंद होतो . परंतु असा आनंद सुखात परावर्तीत करण्याचे आपण लोक विसरून गेलो आहोत . आपल्या बुद्धीला सोशल मिडीयाचा गंज चढला आहे त्यामुळे आपले मन असंवेदनशील बनले आहे. याचा परिणाम आपल्याला प्राप्त झालेला आनंद खूप वेळ आपण टिकवत नाहीत किंवा आपलायला टिकवता येत नाही . त्यामुळे आयुष्यात अनेक चांगले प्रसंग व घटना घडून सुद्धा आपण दुखी राहतो किंवा दुखी होत आहोत . इतर व्यक्तीच्या आयुष्यात घडणारा आनंदी क्षण आपण सहन करू शकत नाही . दुसर्याला आनंद झाला तर आपल्या मनात इर्षा, तिरस्कार ह्या भावना आपोआप का निर्माण होतात . एथेच तर खरी गोम व मेख आहे . आपण स्वत: आपल्या अंर्तमनात डोकावून पाहणे , आपला आत्मा व आपले मन यांचेशी संवाद साधने या गोष्टी या धावपळीच्या युगात आपण विसरून गेलो आहोत . त्यासाठी आपण सर्व प्रथम आपण कोण आहोत. आपली धाव कुठपर्यंत आहे, आपण काय करू शकतो , याची प्रथम निश्चिती करा. म्हणजे आपली रेषा आखून घ्या . एकदा अशी रेषा आखली की इतरांचे यशाची रेषा तुमच्या रेषेपेक्षा मोठी झाली तरी तुम्हाला फरक पडणार नाही . आणि त्यामुळे इतरांचे यश किंवा आनंद किंवा सुखं आपल्या डोळ्यात खुपणार नाही . वास्तविक प्रत्येक व्यक्ति हा निसर्गाचा एक स्वतंत्र आविष्कार असून त्याप्रमाणे त्याला आपल्यापेक्षा वेगळी बुद्धी , मन, आत्मा, क्षमता,परिस्थिती सृष्टीने त्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यानुरूप त्याचे यश व कर्तृत्व फुलते व बहरते . सांगण्याचे तात्पर्य एवढेच की , जो पर्यन्त दुसर्याचा आनंद आपण साजरा करायला आपण शिकत नाहीत किंवा तसे आपल्याला मनापासून वाटत नाही तोपर्यन्त आपण आनंदी व्हाल मात्र सुखी होणार नाहीत. आनंद हा फुलाच्या किंवा अगरबत्तीच्या सुंगंधासारखा असतो कालानुरूप ,वेळेनुसार व जागेनुसार त्याची तीव्रता कमी कमी होत जाते तर सुख हे खूप गडद व घट्ट असते सहसा ते कालानुरूप कमी कमी होत असले तरी ते अंर्तमनास समाधान देते व ते खोलवर जाते. एखादी आनंददायी घटना किंवा बाब, घडली तर ती वाटायला शिका . ती जेंव्हा वाटायला जाणार तेंव्हा ती द्विगुणित होवून सुखा मध्ये परावर्तीत होईल . उदाहरणादाखल आपल्या पाल्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले तरीही काही लोक आपल्या मित्राच्या पाल्याला किती गुण मिळाले हे आधी तपासतात . काही लोक अजून थोडे जास्त गुण मिळायला हवे होते असे म्हणतात . मात्र असामान्य लोक मिळालेल्या गुणांबाबत पाल्याला शाबासकी देतील, चार चौघात माझा पाल्य कसा कष्टाळू आहे याची स्तुती करतील, पाल्याच्या मित्रांना बोलवून घरी जेवण ठेवतील आणि मित्र व आप्तेष्ट यांना घरी बोलवून भोजन देतील. सांगण्याचे तात्पर्य हे की आनंद हा एका क्षणासाठी साजरा करायचा की तो सुखामध्ये रूपांतरित करायचा हे आपल्या हातात असते . यातून हे कळते की प्रत्येक आनंदाचा क्षण आपण सुखामध्ये रूपांतरित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा त्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सोपे , सुटसुटीत व सुसय्य होईल . *राजीव नंदकर*© उपजिल्हाधिकारी,जालना. 9970246427 rsnandkardc@gmail.com