आत्मभान (Self Awareness) आणि आत्मज्ञान (Self Knowledge )
आत्मभान (Self Awareness) आणि आत्मज्ञान (Self Knowledge)
आत्मा व मन मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या अत्यंत किचकट व गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत. आज आपण आत्मभान आणि आत्मज्ञान या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. आत्मा हे एक चैतन्यमय उर्जेचे रूप असून तो आपले संपूर्ण शरीर व्यापतो. मन हे भावनांची व विचारांची एक बैठक असून, हे मन मेंदूच्या आसपास विसावलेले असते. आत्मा हा ऊर्जेचे रूप असल्याने तो नेहमी जागृत असतो मात्र मन हे नेहमी जागृत असतेच असे नाही. आत्मा हा जेवढा संयमी, शांत, शीतल आणि सात्विक असतो या उलट मन हे अधीर, गतिशील, आंनियंत्रित आणि सैरभैर असते. आत्म्याचा संबध हा अध्यात्माशी अथवा जीवन व मृत्युशी जोडला जातो. आत्मा हा निर्मळ व नितळ असून तो आपल्या शरीरात कायम वास करत असतो.
आत्मभान म्हणजे आपण आपल्या स्व:ताला आणि अजून खोलवर सांगायचे झाल्यास आपल्या आत्म्याला जाणून घेणे होय. तुम्ही जेंव्हा आत्मभान विसरून कार्य करता त्या वेळी तुमची सर्व ऊर्जा एकवटली जाते. एकदा आत्मभान विसरले कि तुमचे शरीराचे अस्तित्व राहत नाही तर फक्त तुमच्या आत्म्याचे अस्तित्व राहते. त्यामुळे आत्मभान विसरून आपण जेंव्हा कार्य करतो तेंव्हा ते सिद्धीस अथवा तडीस जाण्याची शक्यता अधिक वाढत असते. लहान मूले, संत, योगी हे आपले कार्ये आत्मभान विसरून करत असतात. त्यामुळे लहान मूले, संत,योगी हे आपल्या कार्यसिद्धीत तल्लीन होवून जातात आणि खर्या अर्थाने यशस्वी, आनंदी व सुखी होत असतात.
आत्मज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचा आवाज आणि संदेश ऐकणे होय. सर्वसाधारणपणे आपण आपल्या मेंदूचे ऐकतो आणि त्या प्रमाणे आपण निर्णय घेतो किंवा कार्ये अथवा कामे करत असतो. मात्र आपण बर्याच वेळा आपल्या आत्म्याशी म्हणजे शरीरात अस्तीत्वात असलेल्या उर्जेशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे निर्णय एका दिशेला जातो व ऊर्जा एका दिशेला जाते आणि आपल्याला अपयश येते. मित्रांनो आत्म्याचा आवाज हा खूप खोलवर असतो तो ऐकण्यासाठी आपल्याला आपले मन, मेंदू आणि शरीर ऊर्जा हे योग्य अशी साधना करून एका रेषेत व एका दिशेला आणावे लागते. मात्र आत्म्याचा हा आवाज सरासरी एक ते तीन शब्दांच्या पलीकडे राहत नाही हे लक्षात असू द्यावे. तो आवाज काळजीपूर्वक ऐकणे आणि त्याप्रमाणे आपण योग्य दिशेने कार्यप्रवण होणे खूप आवश्यक असते. अनेक व्यक्तींना हा आत्म्याचा आवाज ऐकायला येतोही परंतु त्या अनुषंगाने मन व मेंदू यांना योग्य दिशेने कार्यप्रवण करण्याचे कसब प्रत्येक व्यक्तीच्या हातात नसल्याने त्याचा काही उपयोग होत नाही.
असे हे आत्मभान व आत्मज्ञान जर प्राप्त करायचे असेल तर आपल्याला शक्ति व ऊर्जेची उपासना, निरंकार व निर्गुण अशा ईश्वराचे नामस्मरण, जप, योग, प्राणयाम आणि ध्यानधारणा याचा अंगीकार करावा लागतो. शक्तीची व ऊर्जेची उपासना अथवा साधना ही शक्यतो भल्या पहाटे केली जाते. नामस्मरण हे सकाळी अथवा सायंकाळी केले जाते. यात आपण आपली निरंकार व निर्गुण देवता जिच्यावर आपली श्रद्धा आहे तिचे नामस्मरण करायला हवे. जपात आपण एखांदे स्तोत्र व मंत्र याचा हळुवार अथवा मनातील मनात ऊचार केला जातो , योग व प्राणायाम मध्ये आपल्या श्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळवून त्या आधारे आंतरिक ऊर्जेचा प्रवाह हा नियंत्रित केला जातो. तर ध्यानधारणा मध्ये आपला आत्मा, मन व शरीर यांचे एकीकरण एका दिशेत साधले जाते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले आत्मभान व आत्मज्ञान जागृत करूया आणि त्यायोगे एक सोपे, सरळ, सुटसुटीत ,सुंदर आणि सुखी आयुष्य जगूया ! जीवन अनमोल आहे.
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
9970246417