अश्रूंची किंमत (Value of Tears)
*अश्रूंची किंमत (Value of Tears)*
मानव व त्याची पाच ज्ञानेंद्रिये त्याला अदभुत व अद्वैत बनवतात. डोळे, कान, नाक,जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये मानवी शरीररचने मध्ये महत्वाचे स्थान प्राप्त करतात. या पाच ज्ञानेंद्रिये पैकी डोळे आणि त्याच्याशी निगडित असलेल्या अश्रूंना मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
डोळ्यांच्या वरच्या बाजूला असणाऱ्या लाक्रीमल ग्रंथीतून अश्रू बाहेर पडतात. रासायनिक दृष्ट्या अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
आपल्या डोळ्यांतून तीन प्रकारचे अश्रू बाहेर पडतात. डोळ्याला काही इजा झाल्यास अथवा कचरा गेल्यास रिफ्लेक्स अश्रू बाहेर पडतात .आपले डोळे स्वच्छ राखणे साठी बेसल अश्रू बाहेर पडतात. दुख व आनंद या दोन भावना जेंव्हा तीव्र होतात तेंव्हा भावनिक अश्रू (Emotional Tears) बाहेर पडतात.
विज्ञान असे सांगते की या तिन्ही अश्रूंची रासायनिक गुणधर्म व चव वेग वेगळी असते. बेसल अश्रू पाणचट असतात, रिफ्लेस अश्रू हे आम्ल असतात, तर भावनिक अश्रू हे खारट असतात.
डोळे व अश्रू यांचा संबंध हा भाव- भावनेशीही असतो हे आपण लक्षात घ्यावे.अश्रू हे मानवी मनाला व त्यातील भावनांना एक वेगळा अर्थ देतात. रडणे आणि हसणे ह्या दोन शारीरिक क्रिया ह्या दुःख व आनंद या भावनाशी निगडित असतात. अश्रू हे दुःखाचे प्रतीक असते तेंव्हा त्यांना दुखा:श्रु असे म्हटले जाते तर जेंव्हा ते आनंदाचे प्रतीक असते तेंव्हा त्यांना आनंदाश्रू असे म्हटले जाते.
अश्रू हे मानवी संवादाचे माध्यम म्हणून काम करतात. अश्रू हे मानवी मनातील अंतर कमी करतात. अश्रू हे लक्ष वेधण्याचे काम करतात. अश्रू हे मदतीची याचना करतात. असे हे बहुरंगी व बहुआयामी अश्रू खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देत आले आहेत.
काहीवेळा अश्रू हे दुबळेपणाशी जोडले जातात. वास्तविक हा संबंध दुबळेपणाशी नसून संवेदनशीलता व भावनेकतेशी जोडला जाणे आवश्यक ठरते.अश्रू हे दुबळेपणाचे प्रतीक नसून ते एक संवेदनशील मनाचे प्रतीक आहे.
आपल्या मराठीत भरून येणे किंवा गहिवरून येणे हा एक शब्द प्रयोग आहे . बर्याच वेळा आपल्याला भरून आल्याने अथवा गहिवरून आल्याने सुद्धा अश्रू निर्माण होतात याचाही संबंध भावनेशी निगडित असतो.
व्यक्तीला तीव्र स्वरूपाचा आनंद अथवा अतीव दुःख होते तेंव्हा मेंदूतील भावना केंद्रातुन लाक्रीमल ग्रंथींना संदेश जातो आणि आनंदाश्रू व दुखाश्रु निर्माण होतात. एकदा असे अश्रू बाहेर पडले कि तुमचा शरीराचा भावनिक आणि हार्मोनल ताळमेळ साधला जावून तुमच्या मध्ये एक हलके पणाची लहर निर्माण होवून तुम्हाला अजून बरे अथवा मोकळे वाटायला सुरुवात होते. असे अश्रू बाहेर पडणे आपल्या सर्वांसाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या खूप महत्वाचे असते.दुःख झाल्यानंतर आपल्या दुःखदायक भावना अधिक गडद होतात. या भावनांना वाट मोकळी करून देण्याचे काम आपले अश्रू करत असतात .
काही व्यक्ती अशा असतात की त्यांना रडायला येत नाही व त्यांच्या डोळ्यातून अश्रूही बाहेर येत नाहीत हे नक्कीच त्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहत नाही. त्यांच्यात वारंवार मानसिक तणाव निर्माण होतो.त्यामुळे एक बधिरता निर्माण होते आणि शारीरिक हार्मोनल समतोल बिघडला जाऊन हृदयविकार व मधुमेह कडे त्यांची वाटचाल सुरू होते.
आपल्या भावना मग त्या आनंददायी असो किंवा दुःखदायक असो आपण त्या आधारे निर्माण होणाऱ्या डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी करून देयला हवी. त्यामुळे आपले जीवन साधे, सरळ ,सोपे, सुटसुटीत आणि सुखी होईल. शेवटी जीवन अनमोल आहे.
००४/१०१ दिनांक १७.०३.२०२१
राजीव नंदकर©
उपजिल्हाधिकारी मुंबई.
९९७०२४६४१७