तुमची बुद्धिमत्ता समजून घ्या ! Understand your Intelligence!
तुमची बुद्धिमत्ता समजून घ्या ! Understand your Intelligence!
दोन व्यक्तिमद्धे असलेले वेगळेपण आणि मानवाची अगम्य बौद्धिक क्षमता याचे कुतूहल प्राचीन काळापासून संशोधक आणि तत्ववेत्ते यांना राहिले आहे. आपल्या या बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने पृथ्वी पाद्क्रांत केली असून, तो आता अवकाशाला गवसणी घालत आहे. माणसाकडे असलेली अफाट अशी बुद्धिमता त्याला उच्च असे स्थान प्राप्त करून देते. आज तो जो काही आहे आणि आज त्याने जी काही प्रगती केली त्यामध्ये त्याच्या बुद्धीमत्तेचा खूप मोठा वाटा आहे. साहजिकच आपल्या अफाट अशा बुद्धीमत्तेच्या जोरावर तो या भूतलावर राज्य करीत आहे. बुद्धिमत्ता ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही. बुद्धिमत्ता हे अनेक गुणवैशिष्टे याचे संयोजन आणि समयोजन आहे. काही अंशी बुद्धिमत्ता ही अंनुवंशिक तर काही अंशी ती बाह्य विकसित असते. साहजिकच योग्य कष्ट आणि परिश्रम घेवून बुद्धिमत्त्तेला आकार देता येतो किंवा ती योग्य दिशेने ती प्रवाहीत करता येते. बुद्धिमत्तेचे महत्व हे तेंव्हाच अधोरेखित होते जेंव्हा ती काहीतरी उत्पादन आणि उदपादकत्ता घडवून आणते की जी तमाम मानवजातीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरते. प्रस्तुत प्रकरणात बुद्धिमत्ता म्हणजे काय? ती कशी निर्माण होते ? तिचे प्रकार कोणते आहेत? तिचा वापर आपण कसा करतो? तिच्या मापणाच्या पद्धती कोणत्या आहेत ? तिची भविष्यातील दिशा काय राहील? असा अनेक बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनिक जगात बुद्धिमत्ता चाचणी किंवा मानसिक चाचणी बाबत प्रयोग करण्यास एकोणीसाव्या शतकात सुरुवात झालेली दिसून येते. चार्ल्स डार्विनचा पुतण्या फ्रान्सिस गाल्टन याने सर्वात आधी मानसिक चाचणीस सुरुवात केली. त्याच्या या मानसिक चाचणीस तो सर्वसाधारण बुद्धिमत्ता आणि मानवी क्षमता मोजण्याचा प्रयत्न करे. यात स्नायू मजबुतता, वजन, ऊंची इत्यादि समावेश असे. गाल्टनची अशी धारणा होती की शारीरिक गुण वैशिष्टे प्रमाणे बुद्धिमत्ता सुद्धा अनुवंशिक आहे. त्यानंतर गाल्टनचा विद्यार्थी कार्ल पियरसन याने मानवी बुद्धिमत्तेसंबधी संशोधनास सुरुवात केली. त्याला मानसशास्त्रीय चाचणीचा पिता म्हटले जाते. त्या नंतर अल्बर्ट बिनेट याने बुद्धिमत्ता चाचणीवर काम सुरू केले. फ्रांस मध्ये मानसिकरित्या दुर्बल असलेली मुले शोधण्याचे काम त्याला सोपविण्यात आले होते. थेओडर सेमन यानेही बुद्धिमत्तेवर काम केले. विल्यम स्टर्न याने बुद्धिमत्ता निर्देशांक हा प्रकार समोर आणला.
बुद्धिमत्तेबाबत अनेक युग प्रवर्तक अशा मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषणकार यांनी विविध संकल्पना आणि सिद्धांत मांडले. कार्ल पियरसन याने सहसंबंध विश्लेषण आणि घटक विश्लेषण या सांख्यिकीय पद्धतीचा वापरु करून टू फैक्टर सिद्धांत मांडला. त्याने सामान्य घटक की ज्याला ‘जी’ म्हणावे आणि विशिष्ट घटक की ज्याला ‘एस’ म्हणावे यावर भर दिला. त्याच्या मते सर्व लोक यांच्या मध्ये ‘जी’ घटक कॉमन आहे तर ‘एस’ घटक वेगवेगळा आहे. त्या नंतर थार्नडाइक यांनी कार्याच्या आधारे सामाजिक बुद्धिमत्ता, ठोस बुद्धिमता, अमूर्त बुद्धिमत्ता असे वर्गीकरण केले. पुढील काळात गिलफोर्ड, गार्डनर आणि स्टेनबर्ग यांनी बुद्धिमत्तेच्या एकाधिक सिद्धांत मांडले. त्यांनी प्रतिपादन केले की बुद्धिमत्ता ही एकाधिक अशी आहे. एकाधिक म्हणजे एका पेक्षा जास्त बाबी आणि घटक समाविष्ट असलेली.
त्यापूर्वी दोन प्रवाह होते त्यातील एक म्हणजे बुद्धिमत्ता ही एक एकल अस्तित्व दाखविणारी जीव विज्ञान गोष्ट आहे आणि मज्जातंतू मधील होणार्या क्रिया ह्या बुद्धिमत्ता निर्माण करतात. दूसरा मतप्रवाह असा होता की बुद्धिमत्ता ही एकाधिक आहे. बुद्धिमता दर्शविण्यासाठी गार्डनरने पाच प्रकारची सामग्री, पाच प्रकारच्या क्रिया आणि सहा प्रकारचे उत्पादन घटक असा १५० निर्देश आधारित बुद्धिमत्ता अधोरेखित केली. त्यानंतर गार्डनर यानेही गिलफोर्डची रि ओढली आणि सांगितले की बुद्धिमत्ता हा अनेक बाबी, घटक याचा समहू आणि संश्लेषण आहे. त्याने फ्रेम ऑफ माइंड नावाचे पुस्तक लिहले आणि प्रतिपादन केले की एकूण नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता अस्तित्वात असतात. यात भाषा विषयक बुद्धिमत्ता, तार्किक किंवा गणितीय बुद्धिमत्ता, कलात्मक बुद्धिमत्ता, शारीरिक बुद्धिमत्ता, अवकाशीय किंवा स्थानिक बुद्धिमत्ता, अंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता, अंतर्गत बुद्धिमत्ता, जोडणारी बुद्धिमत्ता आणि अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता असे हे प्रकार होत. स्टेनबर्ग हा मानसशास्रज्ञ आणि मानसोपचार तज्ञ होता. त्याने सामाजिक ,विश्लेषणात्मक आणि व्यावहारिक असे घटक गृहीत धरले. त्याचा ट्राय आर्चीक सिद्धांत हा सर्वसमावेशक असून या बुद्धिमतेत त्याने अनिवार्य, अनुभवात्मक आणि संदर्भिय तीन पैलू गृहीत धरले आहेत.
बुद्धिमत्ता ही एक बाब किंवा गोष्ट नसून ती एकाधिक म्हणजे अनेक बाबी आणि गोष्टी याचा समावेश असलेली आहे. तसेच बुद्धिमत्ता ही काही अंशी अनुवंशिक आणि काही अंशी सामाजिक किंवा बाह्य स्वरूपाची आहे. तसेच बुद्धीमत्ता ही एक समग्र, सर्व समावेशक आणि एकात्मिक अशी संकल्पना असून ती स्थायी नसून कायम बदलणारी आहे. बुद्धिमत्तेमध्ये अनेक बाबींचा समावेश होतो त्यापैकी महत्वाच्या बाबी आपण पाहूया.
१. संकल्पनाचे अमूर्तीकरण: कल्पनेत असलेला मात्र प्रत्यक्षात नसलेला म्हणजे अमूर्त होय. चेंडू गोल आहे. या वाक्यात चेंडू ही वस्तु अस्तित्वात आहे. मात्र गोल ही वस्तु नाही तर ती एक अमूर्त अशी संकल्पना असून ती आपण समजून आणि उमजून घेवून तिचा वापर अनेक ठिकाणी करतो. जसे पृथ्वी गोल आहे, चंद्र गोल आहे, कलिंगड गोल आहे, बांगडी गोल आहे. म्हणजेच अमूर्त संकल्पना समजणे ही बुद्धिमत्तेची पहिली पायरी ठरते.आकलनाचा पाया अमूर्तीकरण आहे.
२. तार्किक क्षमता: या क्षमतेत एखांदी घटना, वस्तु आणि बाब याविषयी तर्कशील असा विचार करून निष्कर्ष किंवा अनुमान काढले जातात. नदीला ज्या बाजूला खोल आहे त्या बाजूने ती पार करू नये.रात्री माणसाला अचानक झोप येवू शकते त्यामुळे रात्री वाहन चालवू नये.
३. ज्ञानग्रहण क्षमता: या क्षमतेमध्ये आपली पंच ज्ञानेंद्रिये यांच्या मार्फत माहिती घेतली जाते. प्राप्त माहितीचे वर्गीकरण करून तिची रीहर्सल करून ती स्मृति मध्ये साठवून गरजेनुसार तिचे प्रकटीकरण केले जाते. अध्ययन प्रक्रियेत विषयाची माहिती प्राप्त केली जाते. ती माहिती अधिग्रहण आणि मजबुतीकरण करून दीर्घ स्मृति मध्ये साठविली जाते आणि परीक्षेत तिचे पुन्हा प्रकटीकरण करून उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिली जातात.एकंदर माहिती आणि ज्ञान ग्रहण करून साठवूणूक करण्याची क्षमता सुद्धा बुद्धिमत्ते मध्ये येते
४. सामान्यज्ञान क्षमता:जे आजूबाजूला घडत आहे. जे आजूबाजूला चालले आहे. आणि जे स्थायी आहे. जे घडत आहे आणि जे चालले आहे त्याचा अनुकूल आणि प्रतिकूल तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यकक्ष असा परिणाम आपल्यावर होत असतो. साहजिकच जे घडते किंवा जे चालू आहे किंवा जे स्थायी आहे त्याची माहिती असणे म्हणजे सामान्य ज्ञान होय. पाणी उकळते म्हणजे किती अंश डिग्री त्याचे तापमान असते या प्रकारचे सामान्य ज्ञान होय.
५. स्मृति क्षमता: स्मृति क्षमता सुद्धा बुद्धिमतेच्या दृष्टीने महत्वाची आहे. आपल्या मेंदू मध्ये एकूण तीन स्मृति असतात एक संवेदना स्मृति , दुसरी अल्प काळ स्मृति आणि तिसरी दीर्घ काळ स्मृति. या स्मृति मध्ये प्राप्त झालेली माहिती किती वेळ टिकते किंवा राहते हे बुद्धीमातेच्या दृष्टीने महत्वाचे असते.
६. जुळवून घेणे क्षमता: बुद्धिमतते मध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूची वातावरणाशी किंवा परिसराशी कसे जुळवून घेता याची क्षमता होय. तुम्हाला नोकरी निमित्त नवीन जॉब आणि नवीन शहर येथे जावे लागले तर तेथील वातावरण आणि परिसर याच्याशी तुम्ही किती लवकर जुळवून घेता ही सुधा एक बुद्धिमत्ता आहे.
७. मानसिक गती: व्यक्तीची मानसिक गती कशी आणि किती आहे हे पहिले जाते. मानसिक गती म्हणजे तुम्ही किती सहजपणे आणि जलदपणे एखांदी समस्या सोडवता हे होय. तुमची गाडी रस्त्यात बंद पडली तर ती पुन्हा सुरू करून निश्चित स्थळी कसे जाणार यासाठी बुद्धिमत्ता लागते आणि ती मानसिक गती मधून प्राप्त होते.
८. भाषा आणि संवाद कौशल्ये: भाषा आणि संवाद कौशल्ये याचा सुद्धा बुद्धिमतेत समावेश होतो. परिणामकारक रीतीने भाषा वापरता येणे आणि तुम्हाला त्या भाषेतून तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होता किंवा कसा संवाद साधता हा सुधा एक बुद्धिमत्तेचा प्रकार आहे. समजून आणि उमजून घेण्याची कुवत वाढते. जेवढी भाषा सोपी आणि हृदयस्पर्शी तेवढे लोक तुम्हाला स्विकारतात यात तुमचे नेतृत्व गुण दिसून येतात.
९. अंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता: अंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता हा सुद्धा बुद्धिमत्तेचा भाग आहे. यात समोरच्याचा हेतु काय आहे, प्रेरणा काय आहे, इछा काय आहे हे जाणून घेता येते. मनकवडे लोक याच्यात येतात. या बुद्धिमत्ता असलेले लोक इतरांशी जुळवून घेण्यात आणि त्यांच्या सोबत काम करण्यात महिर असतात. असे लोक बहिर्मुख, संवेदनशील, प्रेरणादायी, सहकार्य करणारे आणि संवाद परिणामकारकपणे साधणारे असतात. हे लोक कायम इतरांशी सहानभूती दाखवतात, चर्चा आणि वादविवाद यात हे सहभाग घेतता.
१०. अंतर्गत बुद्धिमत्ता: यात स्व:चिंतनशील राहणे , आत्मपरिक्षण करेन, समजून घेणे , आपल्या भावनांची कदर करणे हे भाग येतात. असे लोक अंतर्ज्ञाणी आणि अंतर्मुखी असतात. ते स्वताला खोलवर ओळखतात , ते एकटे काम करण्यास उत्सुक असतात
११. गणितीक आकडेमोड क्षमता: गणितीक आकडेमोड क्षमता या मध्ये गणितीय आणि भूमितीय संकल्पना याचा समावेश होत असतो. यामध्ये आकृतीबंध कळने, पर्याय निवडता येणे इत्यादि बाबी समाविष्ट होतात
१२. सृजनशीलता: सृजनशिलता हिचा समावेश बुद्धिमत्तेत होतो. कौशल्ये आणि कल्पकतेचा वापर करून नवीन काही निर्माण होणे म्हणजे सृजनशीलता होय. कार्याच्या किंवा कामाच्या मध्ये कल्पनाशक्तीचा वापर म्हणजे सृजनशीलता होय. काहीतरी नवीन किंवा मौल्यवान तयार होणे म्हणजे सृजनशीलता होय. एकंदर सृजनशीलता म्हणजे काही तरी नवीन आणि वेगळे असे कार्य करणे किंवा निर्माण करणे होय.
१३. संवेदनशीलता: संवेदना जाणून आणि समजून घेण्यात तुम्ही किती निष्णात आहेत हे सुद्धा बुद्धिमत्तेत येते. यात निरीक्षण आणि चौकसपणा याचा समावेश होतो.
१४. स्व: प्रेरणा : तुमचे कर्तुत्व आणि कामकाज मधून तुम्ही कशी आणि किती प्रेरणा घेता हे सुद्धा बुद्धिमत्ते समाविष्ट होते. तसेच तुम्ही किती ध्येय प्रती समर्पित आहत हे सुद्धा बुद्धिमते मध्ये येते.
१५. कलागुणता : तुमच्यामधील कलागुण जसे वाद्य वादन आणि गायन याचाही बुद्धिमते समावेश होतो.
१६. शारीरिक कौशल्ये: याचाही समावेश बुद्धिमत्तेमद्धे होतो. आपले अवयव वापरुन आपण किती कुशलतेने काम करतो हे सुद्धा बुद्धिमतेत येते. या मध्ये तुमच्या स्नायू कसे काम करतात हे ठरते.यामध्ये स्वेटर विणणे किंवा चित्र काढणे.
१७. स्थानिक ज्ञान : स्थानिक माहिती किती आहे याचाही समावेश बुद्धिमत्ते होतो. स्थानिक माहिती किंवा तुमच्या अवकाशाची माहिती किती आहे हे यात येते.
१८. सौंदर्य बुद्धिमत्ता: असे लोक निसर्गप्रती एकरूप असतात
१९. अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता: यात खोलवर विचार करण्याची क्षमता असते आणि अनंत आणि अमर्याद असे विचार कौशल्य असते.
बुद्धिमत्ता ही एक एकत्रित, सर्वकष, समग्र आणि एकात्मिक अशी संकल्पना आहे. या मध्ये व्यक्ति उद्देशपूर्ण, तर्कशुद्धपणे आणि प्रभावीपणे वातावरण आणि परिसर याच्याशी संयोजन साधत असतो. आपली वर्तुणूक आणि वागणे हे सभोवताली असणार्या मागणी प्रमाणे बदलत असतो. अंनुभवातून शिकत असतो आणि समोर येणार्या समस्या सोडवत असतो. एकंदर बुद्धिमत्ता हा मानवाचा मानबिंदू आहे. बुद्धीमान लोकच मानवी विकास आणि प्रगतीला सहाय्यभूत ठरत असतात. मानवजातीसाठी काय योग्य आणि काय अयोग्य, काय आवश्यक आणि काय अनावश्यक आणि काय खरे आणि काय खोटे हे ठरविण्याची पात्रता बुद्धिमत्तेच्या जोरावर प्राप्त होत असते. बुद्धिमत्ता हा विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा आधार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी अहोरात्र झटत असते. बुद्धिमत्ता हा अंधारातील प्रकाश आणि वाळवंटातील ओएसिस आहे. हा प्रकाश संपूर्ण मानवी जीवन प्रकाशमान करतो. बुद्धिमत्ता ही कायम ऊर्ध्व असते. मात्र तिचा वापर हा व्यक्तिपरत्वे असतो. बुद्धिमत्तेचा वापर हा कायम मानवजातीच्या भल्यासाठी आणि निर्माणधीनतेसाठी करावा.
आपली बुद्धिमत्ता काय आहे? हे आधी समजून घेणे हे प्रत्यकाचे कर्तव्ये आहे. एकदा आपण काय? आणि कोठे आहोत? हे समजून आले की आपल्या बुद्धिमत्तेचे पैलू पडण्यास सुरुवात करत येते. असे पैलू पडले की आपला सर्वांगीण विकास होवून आपण एक उत्तम मानवी भांडवल म्हणून पुढे येतो. या मानवी भांडवलाचा उपयोग आणि वापर करून राष्ट्र मोठी होत असतात आणि विकास साधत असतात. वैयक्तिक पातळीवर बुद्धिमत्ता ही जीवन सुसह्य करण्यास मदत करते. समस्याची सोडवणूक आणि निर्णय क्षमता ह्या बाबींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर समस्यांची सोडवणूक होते. वर्तन आणि वागणूक ही सुद्धा बुद्धिमतेच्या वर अवलंबून असते. जेवढी आपली बुद्धिमत्ता चांगली तेवढे आपल्या वर्तनात इष्ट असे बदल होतात. बुद्धिमानता असेल तर जगाच्या व्यवहारात आपले नाणे खणाणून वाजते. बुद्धिमत्ता असेल तर लोक आपला आदर करतात. बुद्धिमत्ता असेल तर समस्या आणि अडथळे चुटकी सरसे दूर होतात. स्वत:चा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधण्यासाठी बुद्धिमत्ता ही मोठी भूमिका पार पडते. शेवटी आपल्या कुशल बुद्धिमतेच्या जोरावर आपण एक साधे, सरळ, सोपे सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.
जीवन अनमोल आहे , ते अधिक सुंदर करूया
६२/१०१ दिनांक ०१.०४.२०२३
सुखाच्या शोधात ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७