जलयुक्त शिवार अभियान रुजले जनमानसात
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण महाराष्ट्रात 5000 गावे निवडली जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून 20 ते 25 एवढीच गावे हे कळल्यावर गावे निवडण्यासाठी दबाव आमच्यावर येणार हे अपेक्षित होते. शासनाकडून गावे कशी निवडायची यांचे निकष प्राप्त झाल्याने थोडे हायसे वाटत असले तरी दबाव कायम होता. सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व तालुका स्तरीय अधिकारी यांची बैठक बोलावली. त्यांना निकष वाचून दाखवले आणि सर्वांशी मनमोकळी चर्चा करून गावे निश्चित केली. त्याच दिवशी यादी जिल्हाधिकारी यांना सादर केली. साहजिकच सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांचे विचारातून गावांची निवड झाल्याने म्हणावा तसा विरोध झाला नाही.
दृष्टिक्षेपात कन्नड तालुका
कन्नड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असा तालुका आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1.50 लक्ष हेक्टर असून, लागवडीखालील क्षेत्र 1.06 हेक्टर लक्ष आहे. तसेच गौताळासारखे अभयारण्य असल्याने 28000 हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत आहे. सरासरी पाऊस हा 750 मी.मी. वार्षिक असल्याने तालुक्याच्या काही भागात पाणीटंचाई समस्या उग्ररूप धारण करते. तालुक्याची लोकसंख्या 3.49 लक्ष असून, त्यापैकी 41000 लोक नागरी भागात राहतात. एकूण 212 महसुली गावे असून, 139 ग्रामपंचायती आहेत. 80000 शेतकरी खातेदार आहेत. कापूस व मका ही पिके प्राधान्याने घेतली जातात. 5 मध्यम सिंचन प्रकल्प असून, 27 लघू सिंचन प्रकल्प आहेत.
आता पुढचा टप्पा होता निवडलेल्या गावाच्या क्षेत्रीय कर्मचारी यांच्या मार्फत शिवार फेरी करणे, गावात माथा ते पायथा या तत्त्वानुसार कोणत्या उपचार पद्धती घेता येतील याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करणे. प्रत्येक गावासाठी कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांना सहायक अधिकारी तर मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून निवड केली. गावात पोचणे व वस्तुस्थिती दर्शक शिवार फेरी ग्रामपंचायत व ग्रामसभा यांना विश्वासात घेऊन करणे आवश्यक होते. सर्वांनी कामगिरी चोख बजावली व वस्तुस्थिती दर्शक माहिती समोर आली.
आम्ही निवडलेल्या सर्व गावांतील सरपंच, सदस्य व नामनिर्देशित शेतकरी यांची अर्ध्या दिवसाची कार्यशाळा घेतली. गावातील प्रत्येक शेतकऱ्याला व लोकप्रतिनिधीला आम्ही विश्वासात घेतले होते. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत करण्यात आलेली शिवार फेरी, त्या अनुषंगाने गावातून जमा करण्यात आलेली पायाभूत माहिती कार्यशाळेत संबंधित लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी सादर केलेले अभिप्राय विचारात घेण्यात आले. गाव व शिवारात असलेली पूर्वीची जलसाधने जसे गाव तलाव, माती नाला बांध, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, लघू प्रकल्प त्या आधारे उपलब्ध पाणीसाठा त्याखाली जलसिंचित केले जाणारे क्षेत्र भविष्यात आवश्यक असणारे जलसाधने, पीक पद्धती, जमिनीचा उतार या बाबीचा सर्वंकष विचार करून अभियान कृती आराखडे तयार करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान कृती आराखडे तयार करण्यासाठी 36 विविध प्रकारची कामे 12 योजना व 9 तालुकास्तरीय कार्यालये यांचा विचार करून जायमोक्यावरील परिस्थिती विचारात घेऊन काम केले.
साहजिकच अशा कामासाठी लोकांचा सहभाग घेणे आम्हाला फारसे अवघड गेले नाही व फायदे दृष्टिक्षेपात असतील तरच लोक सहकार्य करतात याची अनुभूती आम्हास आली. त्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या शेतातच पाणी अडवले जाऊन ते मुरेल याकरिता बांधबंधिस्तीसारखे काम निवडले. गावाचे पाणी वापर अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक होते. कारण योजना आणि काम अशी कोणतीही सांगड जलयुक्त शिवार अभियानात घातलेली नव्हती. या सर्व बाबी विचारात घेऊन आम्ही क्षेत्रीय स्तरावर राबवत असलेल्या खालील योजना विचारात घेतल्या.
या अभियानांतर्गत कामे तत्काळ सुरू करणे गरजेचे होते. तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांना निधीची जुळवाजुळव करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत होती. जिल्हा नियोजनमधून निधी वळवण्यासाठी लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, यामध्ये ते यशस्वी झाले होते. भरीव नाही पण जलयुक्त शिवार योजनेची चळवळ गावा गावात सुरू होणे इतपत हा निधी पुरेसा होता. निधी प्राप्त झाल्यावर तालुक्यात अति महत्त्वाची कामे सुरू करून पूर्ण करण्यात आली ती खालीलप्रमाणे…
उपरोगत कामाची टक्केवारी व प्रगती ही फक्त माहे
एप्रिल 2015 ते जून 2015 या कालावधीतील आहे. पहिल्या वर्षी अभियान राबवण्यासाठी फक्त 3 महिने कालावधी आम्हास उपलब्ध झाला.
1) शेत बांधबंधिस्ती
या जलसंधारण व मृदसंधारण उपचार पद्धती कंपार्टमेंट बंडिंग म्हणून प्रचलित आहे. मूलस्थानी मृदा व जलसंधारण उपचार पद्धतीत याचा समावेश होतो. 750 मि.मी. पावसाच्या प्रदेशात पावसाचे पडलेले पाणी जागेवर मुरवले जाण्यासाठी ही उपचार पद्धती प्राधान्याने हातावर घेतले जाते. जलयुक्त शिवार योजनाची अंमलबजावणी सुरू करायची त्या वेळेस ही उपचार पद्धती आमच्या डोक्यात होती. आम्ही वर्षभरासाठी जवळपास 141 कामे 4500 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित केली होती. आम्हाला जो निधी प्राप्त झाला त्यामध्ये 74 कामे 2000 हेक्टर वर पूर्ण केली. कृषी विभाग व कृषी सहायक यांनी यासाठी खूप मेहनत घेतली.
2. खोल सलग समतल चर
उजाड जमिनीवर 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल 1 मीटर लांब उताराला चर घेतले जातात. हे चर समपातळीत घेतले जातात. जमिनीचा उतार 3 टक्के असेपर्यंत हे चर घेतले जातात. तालुक्यात निवडलेल्या गावात 85 खोल सलग समतोल चर 1874 हेक्टर वर प्रस्तावित केले होते. त्यापैकी 1966 हेक्टर क्षेत्रावर 52 खोल सलग समतल चरांची कामे घेण्यात आम्ही यशस्वी झालो.
3. शेततळे
अलीकडच्या काळात संरक्षण सिंचनाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजल्यामुळे शेततळ्यांबाबत जागृती होत आहे. जलयुक्त शिवार योजनेत 30 मी इतके रुंद 30 मी लांब आणि 3 मी इतके खोल शेततळे घेण्यात आले. लोकजागृतीच्या माध्यमातून 12 शेततळे आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो.
4. विहीर पुनर्भरण
शेतकऱ्याच्या शेतात असलेला महत्त्वाचा जलस्रोत म्हणजे विहीर. असा जलस्रोत पावसाच्या पाण्याने समृद्ध करायचा असेल तर विहीर पुनर्भरण शिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार अभियानमध्ये कन्नड तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 242 विहीर पुनर्भरण कामे पूर्णत्वास नेण्यात आली.
5. माती नालाबांध
माती नालाबांध हा 3 टक्के उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रावर घेतला जातो. माती नाला बांध हा सिमेंट नाला बांधापेक्षा कमी खर्चिक असल्याने जेथे पाण्याचा अपाधव कमी आहे तेथे प्राधान्याने घेतला जातो.
6. नाला खोलीकरण व सरळीकरण
नाला खोलीकरण व सरळीकरण ही उपचार पद्धती सिमेंट बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस घेणे हितावह ठरते. नाला खोलीकरण व सरळीकरण या उपचार पद्धतीमध्ये अस्तित्वात असलेला नाला दोन्ही बाजूंनी रुंद आणि खोल केला जातो. निश्चितच या उपचार पद्धतीमुळे नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता व साठवणूक क्षमता वाढते. असे रुंदीकरण व खोलीकरण सिमेंट बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस असल्यास बंधाऱ्याच्या साठवण क्षमतेत वाढ होते.
7. ठिबक सिंचन
कन्नड तालुका हा प्रथम पासूनच शेतीमध्ये अग्रेसर तालुका म्हणून नावाजला असल्याने आम्ही जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत स्रोत आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत या योजनेखाली 50 टक्के अनुदानावर ठिबक सिंचन सेट बसवण्याबाबत जागृती केली. सहा महिन्यांच्या कालावधीत 215 शेतकऱ्यांच्या शेतावर सरासरी प्रत्येकी 2 एकर क्षेत्रावर म्हणजे 500 एकर क्षेत्रावर ठिबक सेट बसवले.
8. तुषार सिंचन
सहा महिन्यांच्या अभियान कालावधीत 37 शेतकऱ्यांच्या शेतावर सरासरी प्रत्येकी 1 एकर क्षेत्रावर म्हणजे 40 एकर क्षेत्रावर तुषार सेट बसवले.
9. सिमेंट बंधारे
सिमेंट बंधाऱ्यांची उंची जवळपास 3 मीटर व लांबी जवळपास 30 मीटर घेतली जाते. सिमेंट बंधाऱ्यात पडणारे पावसाचे पाणी अडवल्याने लगतच्या क्षेत्रावरील विहिरींची पाणी पातळी वाढते. तसेच सुरक्षित जलसिंचन उपलब्ध होते.
10. गाळ काढणे
गाव तलाव, माती नाला बांध, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, लघुप्रकल्प ही भूपृष्ठीय पाणी साठवणुकीची साधने आहेत. काळाच्या ओघात अशी जल साधने गाळ साचून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जेसीबी व पोकलॅन यासारख्या कंपनीची यंत्रसामग्री वापरून गाळाचा उपसा केला जातो. गाळ हा ट्रॅक्टर वा टिप्पर सारख्या तत्सम वाहनातून शेतात घेऊन जाऊन शेतात पसरवला जातो व शेतीची सुपीकता वाढवली जाते. जलयुक्त शिवार अभियानात कन्नड तालुक्यात 27 कामांवर 50,000 घनमीटर गाळ जल साधनातून काढून 302 शेतकऱ्यांच्या 150 हेक्टर क्षेत्रावर पसरवण्यात आला.
आजपर्यंत शासनाने राबवलेल्या व अंमलबजावणी केलेल्या सर्व योजनेत जलयुक्त शिवार अभियान पारदर्शकतेबाबत अग्रेसर राहिली आहे.
कन्नड तालुक्यात निवडलेल्या 24 गावांत क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अभियान राबवण्यापूर्वी पाण्याची उपलब्धता 5462 होती, अभियान राबवल्यानंतर ती 6731 झाली म्हणजेच जवळपास जलसंसाधनांची क्षमता 1269 एवढी वाढली. क्षेत्रीय स्तरांवरून प्राप्त माहितीवरून भूजल पाणी पातळी अर्धा ते एक मीटर वाढली. जलयुक्त शिवार अभियानामुळे जवळपास 260 हेक्टर क्षेत्र नव्याने जलसिंचन खाली आहे. पीक घनतेमध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली. फळ पिकाखाली 34 हेक्टर क्षेत्र तर पिकाखाली 46 हेक्टर क्षेत्रात वाढ झाली. सद्यःस्थितीत कन्नड तालुक्यात 500 मि.मी. पाऊस झालेला असून, जलयुक्त शिवार अभियानात पूर्णत्वास नेण्यात आलेली कामांचे दृश्य फायदे शेतकऱ्यांना दिसू लागले आहेत. सिमेंट बंधारे पाण्याने भरले आहेत तर खोल सलग समतल चरातून पाणी जमिनीत मुरल्याने जलपातळीत वाढ झालेली आहे, विहीर पुनर्भरण माध्यमातून पावसाचे पाणी विहिरीत जमा झाल्याचे चित्र आम्हास पाहावयास मिळाले. शेततळे तुडुंब भरले आहेत. पहिल्यांदाच एखादी शासनाची योजना दृश्य स्वरूपात इतक्या लवकर जनमानसात रुजली गेलेली निदर्शनास आले.
राजू नंदकर
उपविभागीय अधिकारी (महसूल) कन्नड तथा अध्यक्ष
तालुकास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समिती, तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद.