शासकीय अधिकारी–कर्मचारी यांची क्षमताबांधणी व प्रशासकीय गतिमानता
भारतीय राज्यघटना व त्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेल्या विविध यंत्रणा यातील प्रशासन हे महत्वाचे अंग आहे. राज्यघटनेनुसार सामाजिक कल्याण या तत्वाचा आपण स्विकार केला आहे. सामाजिक कल्याणाचे तत्व राबवत असताना व्यापक लोकहिताची धोरणे, कार्यक्रम, योजना व निर्णय सरकार किंवा शासन घेत असते. अशी ही धोरणे, कार्यक्रम, योजना व निर्णय यांची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर करण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करत असते. शासन व्यवस्थेचे यश हे प्रशासकीय व्यवस्था किती कार्यक्षमतेने व गतिमानतेने काम करते यावर अवलंबून असते. महाराष्ट्र राज्यात साधारण वीस लाख कर्मचारी व अधिकारी विविध विभागात काम करत आहेत. साहजिकच जनतेच्या प्रशासनाकडून रास्त वेळेत व विनासायास कामे व्हावीत ही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करणे हे प्रशासकीय यंत्रणेचे आद्य कर्तव्य ठरते. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पाच दिवसाचा आठवडा ही मागणी राज्य शासनाने नुकतीच मंजूर केली आहे .या अनुषंगाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे जनतेप्रती असलेले आपली वचनबद्धता व उतरदायित्व हे अधिक कार्यक्षम ,पारदर्शक, लोकाभिमुख व जबाबदार पद्धतीने कसे पार पाडता येईल या बाबतचा उहापोह उदाहरण दाखल करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. निश्चितच याचा उपयोग प्रशासकीय गतिमानता व कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी होईल.
- कार्यक्षम प्रशासन
कार्यालयात उपलब्ध असणारी संसाधने विचारत घेवून जनतेला शासकीय सेवा व सुविधा विहित मुदतीत व विनासायास पुरवणेसाठी आपण कटिबद्ध असायला हवे. प्रशासनाची कार्यक्षमता ही अनेक घटकांच्या व बाबींच्या समुच्ययावर अवलंबून असते. त्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे आवश्यक ठरते. उदा मंत्रालय ते ग्रामपंचायत.
- जबाबदार प्रशासन
जबाबदारीची जाणीव प्रशासनातील प्रत्येक घटकाला हवी. त्यासाठी विहित वेळेत लाभार्थी यांना योजनेचा लाभ देणे आवश्यक ठरते. ’शासनाने माझी जबाबदारी घेतली आहे’ हि जाणीव जनतेच्या मनामध्ये निर्माण होणे साठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची कामे तत्परतेने करून दिली पाहिजे उदा. वैयक्तीक लाभाच्या योजना.
- सहभागी प्रशासन
योजना व कार्यक्रम राबवत असतांनी नियोजन प्रक्रियेत व निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढवणेसाठी कसोशीने प्रयत्न हवेत. जनतेचा सहभाग वाढवणेसाठी अगोदर जनतेच्या मनात तुमच्या विषयी आदराची भावना निर्माण होणे गरजेचे आहे व ती फक्त तुम्ही जनतेची कामे किती तत्परतेने करून देता यावरून होते . उदा. ग्राम सभा व चावडी वाचन यात आपला सहभाग
- सर्वसमावेशक प्रशासन
दुर्बल घटक,आदिम जमाती,अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे संविधानिक लाभ त्यांचे पर्यंत पोहचणे व त्यांच्या जीवनमान मध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक बाब आहे.त्यासाठी सर्वसमावेशक प्रशासन अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. उदा. वन हक्क कायदा व कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना.
- रूल ऑफ़ लॉ
आपले काम व आपले निर्णय हे कायदा, नियम व शासन निर्देश याच्याशी सूसंगत असायला हवेत.त्यासाठी कायदा व नियम याचे ज्ञान आत्मसाद करावे. उदा. विविध अधिनियम .
- समान न्याय
कार्यलयात भेट देणाऱ्या व्यक्तीचा जात,लिंग,धर्म, स्तर यावरून भेद करून सेवा व सुविधा देता कामा नये. आपले वर्तन हे भेदभाव करणारे नसावे.
- पारदर्शकता
कार्यालयात काम करताना माहितीची उपलब्धता व आपल्या निर्णयात स्पष्टता आवश्यक आहे .यामुळे जनतेचा प्रशासकीय कार्यपद्धती बाबत विश्वास वाढतो उदा. माहिती अधिकार अधिनियम
- उतरदायित्व
घेतलेले निर्णय व केलेले कामकाज याचे उतरदायित्व आपल्याकडे आहे याची जाणीव नेहमी असायला हवी .त्यामुळे काळजी पूर्वक निर्णय आपल्याकडून घेतले जातात व त्याची योग्य अंमलबजावणी करता येते.
- निर्णय क्षमता
निर्णय क्षमता व कार्यक्षमता याचा परस्पर संबंध निश्चितच असतो. निर्णय क्षमता कमी झाली कि कार्यक्षमता कमी होते. निर्णय क्षमता वाढवण्यासाठी ज्ञान व अनुभव याचा योग्य समन्वय साधावा लागतो.
- टीम वर्क
कार्यालयीन कामकाज हे टीम वर्क असते. त्या मुळे कार्यालय प्रमुख यांनी टीम वर्क विकसित केले कि कामाची गती वाढून कार्यक्षमता वाढते. यासाठी आपण टिम लिडर म्हणून कामकाज करावे लागते .
- नैराश्य व चिंता
जनतेच्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा, काही सामजिक तत्वांचा दबाव व त्यास आपल्याकडून दिला जाणारा नकारात्मक प्रतिसाद या मुळे चिंता व नैराश्य अशा समस्या उद्भवतात . यासाठी समतोल जीवन पद्धतीचा स्वीकार अधिकारी व कर्मचारी यांनी करणे आवश्यक ठरते . उदा. विपशना व योग –प्राणायाम
- इतरांचे ऐका
आपल्यात अहंकार व श्रेष्ठत्व असेल तर आपले मन व बुद्धी इतरांचे ऐकून व समजून घेण्यात अडथळे निर्माण करते. वास्तविक जास्त बोलने पेक्षा जास्त ऐकणे श्रेयस्कर राहते. शिवाय अनावश्यक बोलण्याने निर्माण होणारे वादही टाळता येतात .
- लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणी
लोकसेवा हक्क अधिनियम नुसार अधिसूचित केलेल्या सेवा ह्या विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यास आपण कटिबध आहोत. त्यामुळे अधिसूचित सेवा पुरवण्याची विहित मुदत लक्षात घेवूनच कामकाज करावे.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
- माहिती अधिकार अधिनियम
माहिती अधिकार कायदा व अनुषंगाने प्रशासनात आलेली पारदर्शकता हि खूप जमेची बाजू आहे . माहिती अधिकार अर्ज कोणताही दुराग्रह न बाळगता हाताळणे व उपलब्ध असलेली माहिती मुदतीत दिल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण होत नाहीत.
https://sic.maharashtra.gov.in/Site/Common/GR.aspx
- न्यायालयीन कामकाज
सन्मानीय न्यायालयाचे आदेश, न्यायनिर्णय,स्थगिती आदेश या बाबत अधिकारी व कर्मचारी यांनी अति दक्ष व जागरूक राहणे आवश्यक आहे .त्यामुळे न्यायालयाचे प्रतिकूल शेरे व न्यायालयाचा अवमान ह्या बाबी आपण टाळू शकतो.
https://bombayhighcourt.nic.in/case_query.php
- झिरो पेंडन्सी
झिरो पेंडन्सी बाबत कार्यालय प्रमुख यांनी कार्यालयीन पत्र व्यवहार व त्या अनुषंगाने प्राथमिकता निश्चित केली कि कार्यालयाची झिरो पेंडन्सी कडे वाटचाल होते . झिरो पेंडन्सी ठेवल्याने कार्यालयात चौकशी साठी येणाऱ्या अभ्यागतांची संख्या कमी होवून तो वेळ आपल्याला इतर कामकाजासाठी वापरता येतो. शिवाय कामे जलद होत असल्याने शासनाची प्रतिमा जनमानसात सुधारते.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201710031646231520.pdf
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201802151816460007.pdf
- दौरे
कामचा वाढता व्याप व त्यामुळे अधिकारी यांचे गावोगावी होणारे कमी क्षेत्रीय दौरे हा चिंतेचा विषय आहे. दौरे केल्याने जनतेशी संवाद वाढतो, त्यांचे प्रश्न समजून घेता येतात व जागेवरच त्यांची सोडवणूक करता येते .यामुळे निश्चितच प्रशासन बाबत जनतेचा विश्वास वाढून कामकाजाला गती येते .
- माहिती तंत्रज्ञान याचा वापर
माहिती तंत्रज्ञान चा वापर प्रशासकीय गतिमानतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान यातील नवे बदल आत्मसाद करणे व त्याचा वापर करून प्रशासकीय गतिमानता वाढवणे शक्य होते .
https://www.maharashtra.gov.in/PDF/Web_Marathi_IT-ITES_Policy_2015.pdf
- विसंवाद व वाद
अधिकारी व कर्मचारी यांच्यातील परस्परातील वाद व विसंवाद याचा प्रत्यक्ष परिणाम कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर होतो. निश्चितच अधिकारी व कर्मचारी यांच्यात सोहद्पूर्ण वातावरण जाणीव पूर्वक निर्माण करणे आवश्यक ठरते . उदा. खाजगी समारंभ सहभाग
- गरिबी व दुर्बलता
प्रशासकीय व्यवस्था हि गरिबी हटवण्याचे एक साधन आहे. त्यामुळे हे साधन कार्यकुशलतेने व कार्यक्षमपणे हाताळणे व त्याद्वारे गरीबी निर्मूलन साधने आवश्यक व अनिवार्य ठरते उदा. विशेष घटक योजनेची अंमलबजावणी.
- वंचिताना न्याय
वंचीताना न्याय देणे व त्यांचे हक्क अबाधित राखणेची जबाबदारी प्रशासनावर आहे. त्यामुळे आपण काम करत असताना वंचित व दुर्बल घटकांचे हक्क हिरावून घेतले जात नाहीत ना ? याची जाणीव प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना असायला हवी.
- कर्मचारी व अधिकारी आकृतिबंध व उपलब्धता
मंजूर आकृतिबंध व कर्मचारी उपलब्धता याबाबत ताळमेळ घेणे. उपलब्ध कर्मचारी यांचे मध्ये कामाची सर्वकष विभागणी करणे व त्या नुसार कामाची प्राथमिकता निश्चित करून कामाचा उरक वाढवता येतो.
- जॉब चार्ट
अधिकारी व कर्मचारी यांचे कडे कोणते कामकाज सोपवले आहे या बाबत कार्यालयीन सुस्पष्ट आदेश करणे व त्याची त्या प्रमाणे अंमलबाजवणी करणे आवश्यक असते. या साठी तक्ता स्वरूपात अशी कामाची यादी कार्यालयाबाहेर व कार्यालयात दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. तसेच ती शाखा व ते कामकाज करणारा व सेवा पुरवणारा अधिकारी व कर्मचारी यांचा स्पष्ट उल्लेख त्यावर असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आदेश एक कर्मचाऱ्यांचे व कामकाज दुसरा कर्मचारी करतो ही बाब कटाक्षाने टाळायला हवी.
- जन संपर्क अधिकारी (पी आर ओ )
कार्यालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला माहिती विनासायास उपलब्ध व्हावी यासाठी कार्यालायातील उत्तम संवाद कौशल्य असलेल्या व्यक्तीला आपण जन संपर्क अधिकारी (पीआरओ ) नेमावे .
- अभ्यागत नोंदी
कामानिमित्त अनेक अभ्यागत कार्यालयास भेट देत असतात. या अभ्यागताच्या नोंदी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या शाखेकडे सर्वात जास्त लोक भेटी देतात हे कळते. त्या प्रमाणे कामकाजाचे सुयोग्य व्यवस्थापन शक्य होते.
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201909161100474507.pdf
- कार्यालयीन स्वच्छता
आपण ज्या ठिकाणी कामकाज करतो, त्या कार्यालयात व परिसरात स्वछता ठेवणे हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. कार्यालयात रंग रंगोटी , टेबल क्लॉथ , तक्ते , माहितीचे फलक व परिसरात स्वछता व गार्डन अथवा वृक्षरोपण .
- संवाद कौशल्य
संवाद ही कोणत्याही कामकाजाची अथवा सेवेची पहिली पायरी आहे. त्या साठी येणाऱ्या व्यक्तीशी सुलभ, सोपा व संयुक्तिक संवाद होणे आवश्यक आहे. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी संवाद कौशल्य कशी वृद्धिंगत करता येतील यावर भर देणे आवश्यक आहे .
http://www.med.monash.edu.au/assets/docs/sphpm/commskills-presentation.pdf
- कार्यालयीन संसाधने
कार्यालयीन संगणक,प्रिंटर, नेट जोडणी, झेरोक्स सुविधा व कागद इत्यार्दी साहित्य आवश्यक तेवढे उपलब्ध करून देणे हे विभागाची व कार्यालय प्रमुख यांची जबाबदारी आहे. ह्या बाबी बऱ्याच वेळा उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही कर्मचारी कार्यक्षमता दाखवू शकत नाहीत. या मुळे सेवा व सुविधा पुरविण्यास अडथळे येतात. त्यामुळे कार्यालयीन प्रमुख व विभाग यांनी याबाबत प्राथमिकता घेणे आवश्यक ठरते.
- प्राप्त टपाल
सामान्य जनता किंवा वरिष्ठ कार्यालय या कडून विविध प्रकारचा पत्र व्यवहार हा कार्यालयाशी होत असतो. मात्र ह्या पत्रव्यवहाराच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या जात नाहीत. त्या मुळे ज्या वेळेस पत्राबाबत व केलेल्या कार्यवाहीबाबत ज्या वेळेस विचारणा होते त्या वेळेस असे टपाल व पत्र व्यवहार शोधण्यात कार्यालयातील कर्मचारी यांचा बराच वेळ खर्ची पडतो. या साठी आलेला टपाल कार्यवीवरण नोंदवही ला खतावणे तसेच संगणकीय कार्यविवरण तयार करणे आवश्यक ठरते. जेणेकरून सर्च सुविधा वापरून त्या पत्राचा शोध घेणे सोपे जाते.
http://djmscojal.org/index.php/Home/DeskLogin
- प्राप्त टपाल पृष्ठांकन
आलेल्या टपाल मह्सुला किंवा पृष्टांकन साठी अधिकारी यांचे कडे येत असतो . या टपाल वर संबधित अधिकारी यांचेकडून स्पष्ट पृष्टांकन न झाल्याने संबधित कर्मचारी याला पत्रावर काय कार्यवाही अपेक्षित आहे याचा बोध होत नाही त्यामुळे पत्रव्यवहाराची प्रलंबिता वाढते . या साठी आलेल्या टपाल वर कार्यालयीन प्रमुख अथवा सह प्रमुख यांनी स्पष्ट पृष्ठांकन करणे आवश्यक आहे.
- कार्यविवरण व संकलन याचा ताळमेळ
सिक्स बंडल पद्धती नुसार कार्यवीवरण व संकलन नोंदवह्या ठेवणे व त्याचा दर आठवडी व मासिक गोषवारे काढून त्याचा ताळमेळ घेणे आवश्यक आहे .तसेच असा गोषवारा कार्यालयीन प्रमुख यांचे कडून प्रतिस्वाक्षरी करून घेणे बाबत कार्य पद्धती नेमून दिली आहे. जर याबाबत त्रुटी असतील तर त्या मुळे कोणता कर्मचारी किती कार्य क्षमतेने काम करतो याचा बोध कार्यालयीन प्रमुखास होत नाही.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201710031646231520.pdf
- प्रशिक्षण
प्रशिक्षण ही सेवा कालवधीतील महत्वाची पायरी आहे. राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचारी याना नियमानुसार प्रशिक्षण अनिवार्य आहे . मात्र कामाचा व्याप खूप आहे , या नावाखाली व सबबीखाली अधिकारी व कर्मचारी याना प्रशिक्षण पाठवले जात नाही किंवा जाणीव पूर्वक अकार्यक्षम व विषयाशी संबधित नसलेल्या कर्मचारी याना प्रशिक्षणास पाठवण्याचा कल दिसून येतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची अपेक्षित क्षमता वृद्धी होत नाही . तसेच इन जॉब व ऑफ जॉब प्रशिक्षणउपलब्धकरूनदेणेआवश्यकआहे. https://www.yashada.org/STPEA_NEW/static/PDF/state_training_policy_gr_marathi.pdf
- कायदे नियम, शासननिर्णय , निर्देश पुस्तिका व परिपत्रके
निदर्शनास येते की विभाग व कार्यालय आपले कामकाज ज्या कायदा व नियम याद्वारे चालते त्याची प्रतच त्या कार्यालयात उपलब्ध नसते. शासन निर्णय व परिपत्रके ही उपलब्ध असली तरी ती अद्यावत नसतात.वास्तविक कार्यालयीन प्रमुख व कर्मचारी याना आपल्या विषयाच्या बाबत कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रके याचे ज्ञान तर हवेच परंतु याचा संग्रह त्यांच्या कार्यालयात असणे आवश्यक आहे. या मुळे कामकाजात गती तर येतेच शिवाय कामकाजात अचूकपणा येतो.
http://164.100.185.249/html/elibrary-1.htm
- टिपणी लेखन व पत्र व्यवहार
टिपणी लेखन चा मसुदा कसा लिहावा व पत्र व्यवहार कसा करावा यासाठी ज्ञान व अनुभव याचा संगम आवश्यक असतो. मात्र याबाबत अजूनही क्षेत्रीय स्तरावर प्रगती दिसून येत नाही . त्या मुळे एकतर कामकाजात विलंब होतो किंवा कामकाजात दविरुक्ती होते. यात कर्मचाऱ्याचा वेळ तर वाया जातोच परंतु सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागतो. या साठी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन होणे खूप आवश्यक आहे. या साठी कार्यालयीन प्रमुखांनी एक कार्यपद्धती विकसित करून दिली की त्या नुसार कामकाज सुरू होते.
https://gad.maharashtra.gov.in/pdf/Book-of-Noting-and-Drafting-in Mantralaya.pdf
- संचिकेच प्रवास
कार्यालयीन प्रमुख यांनी संचिकेचा प्रवास सरासरी किती वेळेत होतो याची शहानिशा महिन्यातून करणे आवश्यक आहे व त्यातील अडथळे शोधून त्यावर उपाययोजना अनुसरणे आवश्यक आहे.
- चर्चा करा
चर्चा करा हा शेरा कार्यालयीन पद्धतीचा भाग जरी असला तरी त्या मुळे सांचीका प्रलंबित राहतात . वास्तविक यासाठी संबधित कर्मचारी याला लगेच बोलवून संचिकेत काही शंका असेल तर त्याचे निरसन तात्काळ होणे गरजेचे आहे.
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20060814154425001.pdf
- माहिती उपलब्ध करून देने
योग्य वेळी माहिती उपलब्ध करून दिल्याने अभ्यागतांच्या कार्यालयात होणार्या अनावश्यक फेऱ्या थांबतात .त्या मुळे आपल्या कार्यालयातील माहिती सामान्य जनतेसाठी सुलभ पद्धतीने उपलब्ध राहील ही दक्षता घेणे आवश्यक आहे.
http://www.unipune.ac.in/admin/Circular/RTI/Circular_No67_28-2-13.pdf
- कार्यालयीन दूरध्वनी
बिल थकणे व वायर तुटणे या कारणाने शासकीय कार्यालयातील दूरध्वनी बंद असल्याचे आपणास पहावयास मिळते. त्यामुळे जुजबी कामकाजाबाबतही संबधित व्यक्ती कार्यालयात चौकशी साठी येतो. त्या साठी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी चालू कसा राहील व दूरध्वनी घेण्यासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक कशी होईल या बाबत दक्षता घ्यावी. उदा. स्वाभिमान हेल्पलाइन
- संकेतस्थळ व अँप
अर्जावर काय कार्यवाही सुरू आहे किंवा काय त्रुटी आहेत या बाबतचे ट्रेकिंग लाभार्थी व संबधित जनतेस विनासायास होणार नाही तो पर्यंत प्रशासकीय गतिमानता वाढणार नाही .
अर्जाच्या आवक क्रमांक नुसार अर्जदारास घरबसल्या त्यांचे अर्जाबाबत सद्यस्थिती काय आहे हे कसे कळेल याबाबत कार्यवाही व्हावी.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/Login/Login
- ई कार्यालय सुविधा चा वापर
इ ऑफिस प्रणाली चा वापर केल्याने प्रशासकीय गतिमानता तर वाढतेच त्याच सोबत संचिकेच प्रवास जलद होतो. संचिका कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे ते सुद्धा एका क्लिक वर तपासणी करता येते.
- योग्य व अचूक मूल्यमापन
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आठवडी , मासिक व वार्षिक मूल्यमापन करणे व त्यासाठी संगनिकीय प्रणाली निर्माण करणे आवश्यक आहे. मूल्य मापन पद्धती मध्ये KRA व KPI या सारख्या व्यवस्थापन विषयक मोडूल चा वापर कार्यालय प्रमुख करू शकतात जेणेकरून कर्मचारी यांचे कच्चे दुवे शोधून त्यावर मात करता येते . यामुळे प्रत्येकाचे उत्तरदायित्व निश्चित होत असल्याने निश्चितच कार्यक्षमता वाढीस लागते.
https://mahapar.maharashtra.gov.in/SPARROWPORTAL/LoginPage#no-back-button
https://nrlm.gov.in/KeyPerformanceIndicatorsAction.do?methodName=showDetail
- कार्यालयीन उपलब्धता
बायोमेट्रिक प्रणाली द्वारे कार्यालयीन कर्मचारी वेळेवर कार्यालयात प्रवेश करते झाले व वेळेवर कार्यालय सोडू लागले .मात्र त्या प्रमाणात त्यांचा कामाचा उरक निर्माण करणेसाठी कार्यालयीन प्रमुख यांनी फक्त त्यांचे दालनातच न बसता कर्मचारी दालनात फेरफटका मारणे. त्यांचेशी संवाद साधने आवश्यक आहे .
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20110119154624001.pdf
- अनिधिकृत एजंट यांना अटकाव व प्रतिबंध
काम प्रशासकीय यंत्रणेने टाळले व पुढे ढकलेले कि योजनाचे लाभार्थी एजंटच्या भूलथापाणा बळी पडतात .असे अनिधिकृत एजंट आपली व प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत असतात. कारण आपली प्रतिमा मलीन केली कि त्यांचे काम सोपे होते .वास्तविक योग्य संवाद कौशल्य निर्माण करून योग्य वेळी जनतेचे काम करून दिले कि प्रशासनाची छबी लोकमानसात सुधारते .
- आंतरवयक्तिक संबंध
अधिकारी व कर्मचारी यांचे मध्ये आंतरवयक्तिक संबध निर्माण झाले कि ते प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूरक ठरते.अधिकारी यांनी फक्त व्यवस्थापक म्हणून काम न करता Mentor,Leader व Facilitator म्हणून काम केले तर लगेच बदल दिसून येतो.
- प्राथमिकता निश्चिती
कोणते काम आधी करावे कोणते काम नंतर करावे ही प्राथमिकता निश्चित न करता येणे ही एक अडचणीची बाब असते . त्यामुळे तुमच्या कडील कामांचे A B C D असे वर्गीकरण केले कि त्या प्रमाणे कामकाजाचा क्रम निश्चित करता येतो व त्यामुळे कार्यक्षमता वाढते .उदा. 20/80 नियम
- वेळेचे व्यवस्थापन
कार्यालयात प्रवेश केल्यानंतर तुमच्याकडे ८ तास म्हणजे ४८० मिनिट असतात . आज करावयाची कामे व माझ्या कडे असलेला वेळ याचे गणित आपण सोडवले कि कमी वेळात अनेक कामे आपण करू शकतो त्यामुळे कार्यक्षमता व गती वाढते .
https://www.iitk.ac.in/new/time-management-skills
- कार्यालयीन शिस्त व वर्तणूक
कार्यालयीन स्वच्छते सोबत कार्यालयीन शिस्त तेवढीच महत्वाची असते. त्या साठी येणाऱ्या अभ्यागतांशी आदराने बोलणे. आपल्या वरिष्ठांशी अदबीने बोलणे ह्या गोष्टी आवश्यक ठरतात.
- अतिरिक्त शिक्षण
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नोकरी सोबतच आपल्या विभाग व विषय याच्या अनुषंगाने दुरस्त शिक्षण विषयक डिग्री व डिप्लोमा पूर्ण करण्याकडे फावल्या वेळेत लक्ष दिले पाहिजे . त्या मुळे तुमच्या दृष्टीकोनात योग्य असा बदल होतोच शिवाय तुमच्यात आत्मविश्वास येतो.
- इतर विभाग समन्वय
कार्यालय प्रमुख म्हणून इतर विभाग सोबत समन्वय हा प्रशासकीय कार्यक्षमतेचा एक भाग असतो .त्या अनुषंगाने इतर कार्यालयांचे प्रमुख यांना भेटणे, माहितीचे आदान प्रदान करणे ,संवाद साधने या बाबी करायला हव्यात .
http://nirdpr.org.in/nird_docs/sagy/Maharastra.pdf
- योजनांचे व कार्यक्रमाचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यमापन
योजनांचे व कार्यक्रमाचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यमापन केल्याने अंमलबजावणीतील त्रुटी निदर्शनास येतात व त्या अनुषंगाने उपाययोजना करून अंमलबजावणीत गतिमानता आणता येते .
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201411131535143116.pdf
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201607301620308406.pdf
- नाविन्यपूर्ण उपक्रम
शासनाकडील सूचना व निर्देश नुसार आपण काम करतच असतो. मात्र या कामकाज सोबत आपण समाज उपयोगी व लोकउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यक्षेत्रात राबवयाला हवेत . त्यामुळे जनतेचा शासनाप्रती असलेला विश्वास अजून वृद्धींगत होतो.
https://darpg.gov.in/sites/default/files/PM-Award-Scheme-2019.pdf
उपरोक्त घटक व बाबी या लक्षात घेत असतांना अस्तित्वात असलेल्या नकारात्मक घटक, बाबी व घटना यांचा त्याग अथवा त्याकडे दुर्लक्ष आपणास करावे लागणार आहे . कामकाजाचे सुयोग्य नियोजन व जलद अंमलबजावणी करून अधिक कार्यक्षम ,पारदर्शक, लोकाभिमुख व जबाबदार सू-प्रशासन देण्यास प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी बांधील आहोत याची आपण हमी देवूया.
राजू नंदकर
उपजिल्हाधिकारी,
९९७०२४६४१७
rsnandkar@gmail.com