असूया, इर्षा, तिरस्कार, द्वेष आणि घृणा यावर नियंत्रण मिळवूया. Get control over envy, jealousy, disgust, hatred and abomination.

असूया, इर्षा, तिरस्कार, द्वेष आणि घृणा यावर नियंत्रण मिळवूया. Get control over envy, jealousy, disgust, hatred and abomination.

        मानवी समाज हा एका साचेबंध सामाजिक व्यवस्थेमध्ये राहतो. या व्यवस्थेमध्ये त्याचा समाजातील अनेक व्यक्तींसोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येत असतो. मात्र हे संबंध नेहमीच सलोख्याचे आणि मित्रत्वाचे राहतील असेही नसते.  परस्परातील स्पर्धा, एकमेकावर वर्चस्व दाखवण्याची वृत्ती, परस्परावर कुरघोडी करण्याची सवय आणि इतरांपेक्षा पुढे जाण्याची इर्षा हि स्वभाव वैशिष्टे माणसाचे वैयक्तिक आणि अंतर वैयक्तिक संबध बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. या सर्व स्वभाव वैशिष्ट्यांवर एक प्रबळ भावना नियंत्रण करत असते, ती म्हणजे एकमेकाबद्दल असणारा तिरस्कार होय. तिरस्कार ही मुख्य भावना असून या भावनेच्या असूया, इर्षा, द्वेष, घृणा या सारख्या छटा अथवा उपभावना आपल्याला पहावयाला मिळतात. आजच्या लेखात आपण तिरस्कार का करतो? तिरस्काराचा उगम कसा आणि कोठून होतो? या तिरस्काराला कोणते घटक कारणीभूत होतात? परस्परांमधील तिरस्कार कमी करून एकमेकाविषयी आदर आणि परस्पर समभाव कसा निर्माण करता येईल? यावर आपण चिंतन करणार आहोत.

             मानव हा इतर प्राण्यांपेक्षा बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या चतुर आणि तितकाच समजून घेण्यास क्लिष्ट असा प्राणी आहे. स्पर्धा करणे हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. काळाच्या ओघात उत्क्रांत होत असतांना कधी अन्नासाठी, कधी भूप्रदेशासाठी, कधी धन मिळवण्यासाठी, तर कधी विविध सुखांसाठी तो कायम स्पर्धा करत आलेला आहे. त्याची हि स्पर्धा सर्व प्रथम इतर प्राण्यांसोबत, त्या नंतर आपले आप्तस्वकीय यांच्यासोबत, त्या नंतर इतर भूप्रदेश मधील माणसांसोबत राहिलेली आहे. एकंदरच जगातील सर्व मूर्त आणि अमूर्त गोष्टी सोबत त्याची स्पर्धा निरंतर चालू असते. हि स्पर्धा जेव्हा आपल्या सहकाऱ्यांसोबत असते तेंव्हा एकमेकाबद्दल असूया(Envy)तयार होते. जेंव्हा अशी स्पर्धा हि इतरांसोबत असते तेव्हा इर्षा (Jealous)तयार होते. जेंव्हा अशी इर्षा हि तीव्र होते त्यावेळेस तिरस्कार(Disgust) सुरुवात होतो. हा तिरस्कार जेंव्हा वारंवार होवू लागतो त्या वेळेस त्याचे रूपांतरण हे द्वेष(Hatred) मध्ये होते आणि सरते शेवटी द्वेष हा घृणे (Abomination) मध्ये रुपांतर होतो.

          असूया(Envy) हि तिरस्कार या मुख्य अथवा प्रबळ भावनेची उप भावना आहे. हि अत्यंत सोम्य स्वरुपात दिसून येते. आपला जवळचा किंवा आपल्या महितीतील कोणी यशस्वी होतो अथवा पुढे जातो तर त्या बद्दल आपल्या मनात असूया निर्माण होते. त्याच्याकडे जे आहे, ते आपल्याकडे नाही याची थोडी नाखुशी मनात घर करते म्हणून असूया तयार होते. असूया हि आपले मानसिक आरोग्य किंवा आपले दैनंदिन जीवन व्यवहार याला तशी धक्का पोहचवत नाही. मात्र थोडी उदासीनता आणण्यासाठी कारणीभूत ठरते. हि असूया आपल्याला नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा सुद्धा देत राहते. एखांद्या व्यक्ती जेंव्हा पुढे जातो आणि त्यामुळे त्याच्या कामगिरी बद्दल किंवा त्याच्या यशाबद्दल आपण विचार करतो, त्या वेळेस आपल्यात सर्वप्रथम असूया निर्माण होते. असूया हि तिरस्कार इतकी तीव्र नसते. तसेच ती त्या व्यक्तीच्या यश अथवा चांगली कामगिरी या पासून धडा आणि आदर्श घेवून आपलीही प्रगती साधण्याची गुरुकिल्ली राहते. असूया तयार झाल्याने आपणही कार्यप्रवण होवून त्याने आखलेल्या मार्गवर चालण्याचा अथवा त्यांनी सोडवलेले यशाचे कोडे आपणही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. असूया हि फक्त काही मर्यादित स्वरुपात असते, त्यामुळे त्यातून आपण प्रगती साधण्याकडे मार्गक्रमण करतो.

             असूया मात्र कधी कधी इर्षा (Jealous) मध्ये बदलते. इर्षा हि भावना असूया पेक्षा थोडी तीव्र असते. एखांद्या व्यक्तीची गुणवत्ता आणि कर्तुत्व या पेक्षा आपण मागे पडतो, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये इर्षा तयार होते. तसेच आपल्या पुढे गेलेल्या माणसाबद्दल आपल्याला इर्षा तयार होत असते. इर्षा म्हणजे तो कसा पुढे गेला, तो कसा यशस्वी झाला, याबाबतची एक भावना आपल्या मनामधून आणि विचारामधून निघते आणि ती आपल्या मेंदूत घर करते. घर करते म्हणजे मन आणि मेंदू यात घोळत राहते. ती घोळत राहिल्याने त्या बाबतची भावना आणि विचार कायम तयार होतात आणि त्या मुळे विचारप्रक्रिया वारंवारता निर्माण होते. याला आपण विचारांचा कल्लोळ असेही म्हणू शकतो. दूसरा किती नशीबवान आहे हे पाहून इर्षा तयार होते. मात्र इर्षा हि जिगर आणि हिम्मत साठी आवश्यक ठरते. इर्षा हि असूया पेक्षा तीव्र स्वरुपाची असूया असून ती माणसाला घेरते आणि त्याला अधिक कार्यप्रवण करण्यासाठी शक्ति सुद्धा काही अंशी प्रदान करते.

               असूया आणि इर्षा हि जरी आपल्याला काही प्रमाणात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत असली तरी जेंव्हा आपण हतबल होतो किंवा आपली मनाची इश्चाशक्ती एकदम कमी होते, त्या वेळेस असूया आणि इर्षा मागे पडून त्याची जागा तिरस्कार(Disgust) हि भावना घेते. एकदा तिरस्कार आपल्या मध्ये प्रबळ झाला कि मानवी संबध अजून कलुषित होतात. तिरस्कार जेवढा तीव्र तेवढे तुम्ही आतून तुटत जाता. तिरस्काराने आपल्या जवळचे तर दूर जातातच, मात्र दुरचेही अजून दूर जातात. तिरस्कार हा जरी व्यक्तीनिष्ठ असला, तरी प्रेमाने आणि मदतीने माणूस जोडला जातो मात्र तिरस्कार हा माणूस माणसापासून तोडण्यास सुरुवात करतो. प्रत्येक वेळी आणि प्रत्येक व्यक्ती विषयी अगदी लहान सहान गोष्टी वरून जर तिरस्कार आपल्यामध्ये तयार होत असेल तर हि आपल्या सुदृढ कौटुंबिक आणि सामाजिक जीवनासाठी धोक्याची घटना ठरते. तिरस्कार सारखा निर्माण होत राहिला, तर शरीरातील अनेक हार्मोन्सचे कार्य बिघडते आणि आपली चिडचिड सुरु होते. आपला एखांद्या मागणीला किंवा घटनेला दिला जाणारा प्रतिसाद कमी होतो आणि एकसारखे शून्यात पाहणे हे सुद्धा घडू शकते. तिरस्कार जर वाढीस लागला तर काही लोक स्वत:ला इजा सुद्धा करून घेवून शकतात. माझ्याच आयुष्यात असे का होते? तोच कसा यशस्वी होतो? हा विचार सारखा मनात घोळत राहतो आणि त्या मुळे पुढे जावून खिन्नता आणि औदासिन्न तयार होते.

              तिरस्कार अजून अति तीव्र आणि प्रबळ झाला कि आपण समोरच्याचा द्वेष(Hatred) करायला सुरुवात करतो. राग आणि तिरस्कार एकत्र आले ही द्वेष निर्माण होतो. बर्‍याच अंशी द्वेष आणि मत्सर हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. एकदा तिरस्काराची जागा द्वेषाने घेतली कि ती व्यक्ती कट कारस्थान करण्याच्या दृष्टीने हालचाल करायला सुरुवात करते. समोरच्याचा कसा पत्ता कट करता येईल, त्याचा पराभव कसा करता येईल किंवा त्याची कशी नाच्चकी होईल या अनुषंगाने प्रयत्न सुरु होतात. द्वेष तीव्र असेल तर त्या बाबत इतरांसमोर ज्याच्या बद्दल द्वेष आहे त्याची वाच्यता करून त्याला शिव्या शाप दिल्या जातात. त्याच्या बाबत चुकीचे आणि वाईट जेवढे पेरता येईल तेवढे पेरण्याच प्रयत्न केला जातो. द्वेष हा आगीसारखा असतो तो समोरच्याला सर्व बाजूंनी घेरून जाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण हे विसरून गेलो असतो, की ती आग आपल्यालाही पोळणार असते. आपल्यात द्वेष वाढला ही आपले अंग थरथरते आणि नकारात्मक भावना सारखी वाढीस लागते. इतरांबद्दल आपण कायम द्वेष करत राहिल्याने आपली विचारप्रक्रिया संथ आणि मंद होते.  

             द्वेष करून आणि दूषण देवून हाती काहीच लागले नाही की द्वेषाची जागा घृणा(abomination)घेते. घृणे मध्ये तिटकारा, उबग आणि वीट पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्या व्यक्ती पासून आपण दूर राहण्याचं प्रयत्न सुरु होतो. घृणा एवढी नकारत्मक असते कि त्या व्यक्तीची सावली सुद्धा नकोशी वाटते. साहजिकच असूया, इर्षा, तिरस्कार, द्वेष हा प्रवास घृणा पर्यंत येवून थांबतो. मात्र या प्रवासात आपल्या पासुन अनेक जवळची आणि आपल्या आयष्यात कधी काळी मदतीस आलेली माणसे तुटलेली असतात आणि दुखावलेली असतात. यातून खूप काही साध्य होत नाही, मात्र मानसिक अपंगत्व आपल्यामध्ये आलेले जाणवते किंवा पाहायला मिळते. जेंव्हा आपला प्रवास हा असूया, इर्षा, तिरस्कार, द्वेष आणि घृणा पर्यंत पोहचतो त्यावेळी आपण क्षीण आणि हतबल होत जातो आणि सामाजिक वर्तुळाच्या बाहेर फेकलो जातो. एकदा सामाजिक वर्तुळाच्या बाहेर फेकलो गेलो कि बर्‍यापैकी परतीचा मार्ग आणि प्रवास बंद होतो. साहजिकच याचे विपरीत परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होवून तुम्ही पदोपदी मागे पडत राहता.

        सबब आपण आपल्या विविध भावनाचे योग्य व्यवस्थापन करत असतांना असूया, इर्षा, तिरस्कार, द्वेष आणि घृणा या भावनांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आणि नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी तिरस्कार भावनेचा मूळ शोधायचा आपण आधी प्रयत्न करूया. आपल्या मेंदूच्या आसपास विसावलेले मन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना आणि विचार हेच मानवी जीवन मानसिकरित्या सुसय्य किंवा असय्य करत असतात. आनंद, दु:ख , राग , भीती , आश्चर्य आणि तिरस्कार या भावना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. या भावना विकसित होण्यामागे आपले घटना, गोष्टी आणि बाबी याचे वयानुरूप होणारे आकलन आणि येणारे अनुभव कारणीभूत ठरते. आनंद होतो म्हणजे काय तर हवी असलेली गोष्ट मिळाली किंवा हवी असलेली घटना घडली कि आनंद होतो. आता हवी असलेली हे कसे ठरते? तर यापूर्वी त्या गोष्ट किंवा घटनेचा संबध येवून आपल्या मेंदूमध्ये तिचे आकलन होवून तीची माहिती आणि त्यासोबतच तिचे गुणधर्म आणि गुणवैशिष्टे साठवलेली असतात. साहजिकच त्या साठवलेल्या माहितीशी अनुरूप काही घडल्यावर आणि मिळाल्यावर आनंद होतो. उदाहरण, वडील घरी आल्यावर मिठाई आणतात हि गोष्ट मनावर अधोरेखित झाली कि वडील आले कि मुलाला आनंद होतो. वडील घरी आल्यावर जवळ घेतात, डोक्यावरून हात फिरवतात, विचारपूस करतात आणि मिठाई देतात हे मनावर अधोरेखित जर असेल तर वडील घरी आले कि आनंद होणारच. आता आपल्याला तिरस्कार का होतो हे पाहूया. अजय आणि अक्षय रोज एकत्र खेळतात. काही दिवसांनी अक्षय अजयचे एक खेळणे घेवून त्याच्या घरी जातो. पुन्हा जेंव्हा अक्षय अजयच्या घरी येतो, त्यावेळेस ते खेळणे परत आणले जात नाही. त्यामुळे अजयच्या मनात अक्षय बद्दल तिरस्कार निर्माण होतो. नंतर काही दिवसांनी अजयला असे कळते की ते खेळणे अक्षय ने तोडले आहे तेंव्हा अजयला अक्षयाचा द्वेष वाटू लागतो. अशा घटना अजय आणि अक्षय दरम्यान वारंवार घडायला लागल्या की  अजयला अक्षयची घृणा तयार होते. साहजिकच एखान्दी व्यक्ती तुमच्या इश्चा आणि अपेक्षा या पेक्षा वेगळ वर्तन करते तेंव्हा साहजिकच तिरस्कार निर्माण होतो. तसेच काही घटना ह्या आपल्या मनाविरुद्ध घडल्याने सुद्धा आपल्यामध्ये तिरस्कार निर्माण होतो.     

          तिरस्कार आणि त्याला अनुरूप अशा उप भावना यावर नियंत्रण मिळवणे आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे यासाठी आपल्याला आधी आपल्या अंतरंगात डोकवावे लागते. त्यासाठी स्वत:चा आणि स्वत:च्या मनाचा शोध घ्यावा लागतो. आपण कोण आहोत? आपले ध्येय काय आहे? आपले ध्येय गाठण्यासाठी कोणती उदिष्टे विचारार्थ आहेत? आपली क्षमता काय आहे? या बाबींवर सर्वप्रथम काम करायला लागते. आपली ध्येये आणि ती ध्येये गाठण्यासाठीची उदिष्टे निश्चित असावीत आणि ती गाठण्यासाठी आपण कायम प्रयत्नक्षील असावे. आपल्या विविध क्षमतांवर आणि शक्तींवर विश्वास असावा. आपल्या मनात तिरस्कार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या इतर उप भावना जरी निर्माण झाल्या तरी त्या अत्यंत पुसट अशा आणि तत्काळ विसरणार्‍या अशा असाव्यात. त्यामुळे त्या भावना जरी तयार झाल्या तरी त्या आपल्या जीवनावर नकारात्मक असा प्रभाव दाखवू शकणार नाहीत. या भावना येतील आणि तेवढ्याच गतीने जातील. या मध्ये माणूस अडकून पडत नाही. तो पुढे मार्गक्रमण करत राहतो. जेंव्हा एखांदा पुढे जातो त्या वेळेस त्याचे गुण दोष काढत बसण्यापेक्षा तो पुढे कोणत्या गुण वैशिष्टेच्या आधारावर गेला याची पडताळणी करणे आणि तसे आपल्या वागणूक आणि वर्तुणूक यात इष्ट असे बदल करणे अनिवार्य ठरते. तिरस्कार टाळायच असेल तर सोडून देणे ,विसरून जाणे आणि माफ करणे हे धोरण राबवणे आवश्यक ठरते. कमी अपेक्षा ठेवल्या कि यातून तिरस्कार उत्पन्न होत नाही. आपल्या स्वत:ला ओळखले कि इतरांशी तुलना आपण करण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. त्यामुळे इतरांच्या विषयी वाटणारी तिरस्कार हि भावना आपोआप गळून पडते. तिरस्कार ही भावना आगी सारखी असून हि आग आधी आपल्या मनात पसरते आणि आपल्यालाही भस्मसात करते.

       उपरोक्त सर्व विवेचेन लक्षात घेता आपल्या मन आणि मेंदू मधून निर्माण होणार्‍या विविध भावनांचे व्यवस्थापन आपण करणे आवश्यक आहे. इतरांबदल असूया आणि इर्षा निर्माण होणे इतपत ठीक आहे, परंतु कायम तिरस्कार, द्वेष आणि घृणा करत राहिल्याने आपली चिडचिड होवून आपण आपले मानसिक स्वास्थ हरवून तर बसतोच आणि त्यामुळे आपली प्रगती आणि विकास खुंटतो. त्यासाठी स्वत:ला कायम कार्यक्षिल आणि कार्यप्रवण ठेवणे. संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे. व्यायाम, योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा स्वीकार केला की आपल्याला इतरांचा तिरस्कार करणे साठी वेळच शिल्लक राहत नाही आणि आपण स्व-केंद्रीत होवून आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी कडे डोळसपणे आणि व्यावहारिक पणे पाहावयास सुरुवात करतो. चला भावनांचे योग्य व्यवस्थापन करूया आणि एक साधे ,सोपे, सरळ, सुटसुटीत, समाधानी आणि सुखी आयुष्य जगूया.

जीवन सुंदर आहे, ते अधिक अनमोल बनवूया.

०३५/१०१ दिनांक १०.१२.२०२१

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी मुंबई

९९७०२४६४१७