अपूर्णता: जीवनाला अर्थ देते ! (Incompleteness: Gives meaning to life!)
अपूर्णता: जीवनाला अर्थ देते ! (Incompleteness: Gives meaning to life!)
आपले जीवन हे नेहमी पुढे जात असते आणि घटना मागे पडत असतात. आपले जीवन पुढे जात असतांना ते पूर्णत्वाकडे जात नाही किंवा त्याला आपण जावू देत नाही. त्यामुळे मानवी जीवनात कायम अपूर्णता दिसून येते. हि अपूर्णता कधी कधी जाणीवपूर्वक निर्माण केली जाते किंवा अजाणतेपणाने निर्माण होते. मात्र हिच अपूर्णता: आपल्याला जगण्याची उर्मी आणि उर्जा देते. आपली जीवनरूपी वाटचाल निरंतर सुरु ठेवते. जो व्यक्ती पूर्ण होतो, तो निरस आणि उदास जीवनाकडे मार्गक्रमण करतो आणि पुढे दु:खी होतो. त्यामुळे अपूर्णता हीच जीवनरूपी प्रवासाची खरी वाटचाल आहे. अपूर्णता हीच सुखाची आणि आनंदाची गुरुकिल्ली आहे हे स्पष्ट होते. आज आपण आपल्या जीवनातील अपूर्णता का महत्वाची आहे ,याबाबत विचार मंथन करणार आहोत.
आयुष्य हे कधीच परिपूर्ण नसते आणि ते तसे परिपूर्ण नकोही. आयुष्याच्या खरी मजा हि अपूर्णता मध्ये असते कारण आपण अपूर्ण आहोत, म्हणून जीवनाचा प्रवास सुरु आहे. आपण अपूर्ण आहोत म्हणून काही तरी मिळवण्याची आणि काही तरी जिंखण्याची आस आहे. अपूर्णता म्हणजे एक प्रवास होय, कि जो नेहमी पूर्णत्वाकडे सुरु असतो. काही तरी साध्य करण्याचा आणि काही तरी मिळवण्याचा हा प्रवास कायम सुरु असतो. हि अपूर्णता नेहमी आपल्याला कार्यशील आणि कार्यप्रवण ठेवते हे लक्षात घ्यावे.
आपल्याला अपूर्णता का हवी हवीशी वाटते, या मागचे मूळ निसर्गाने काळाच्या ओघात विकसित केलेल्या मानवाच्या विचार प्रक्रियेत दडले आहे. मानवी मन आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारे विचार आणि त्या विचारांना मिळणारा विविध भावनांचा प्रतिसाद त्याला कायम अपूर्ण ठेवण्यास मदत करतात. दिवसभरात सरासरी आपण किमान सोळा तास जागे असतो आणि आठ तास झोप घेतो. या सोळा तासात आपल्या मेंदूत सरासरी ६०००० -८०००० विचार निर्माण होत असतात. या सर्व विचारांचे आपल्या मनातून निर्माण होणाऱ्या भावनांशी संयोजन होते. असे संयोजन झाले कि त्यातून विचार प्रक्रिया पुढे जाते आणि त्यातून फक्त १ टक्के कृती होते आणि ९९ टक्के फक्त विचारप्रक्रिया होते. त्यामुळे कृती न झाले विचार आपल्याला कायम अपूर्णतेकडे ढकलत राहतात.
मनुष्य प्राणी आणि त्याच्या इच्छा-आकांक्षा आणि त्या अनुषंगाने त्याची उदिष्टे आणि ध्येये गाठण्यासाठी सदैव धडपड चाललेली असते. या जीवन प्रवासात त्याची काही उदिष्टे आणि ध्येये पूर्ण होत असतात. असे असले तरी हा मानव कायम काही तरी शोधत पुढे जात असतो. तो कधीच पूर्ण समाधानी नसतो. शरीराची भूक आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेला आहार या पुढेही जावून समुद्राचा तळ शोधण्यापासून अवकाशाला गवसणी घालण्याचे त्याचे मनसुबे कायम चालू असतात.
मात्र अशा त्याच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करत असतांना त्याच्या ठायी आढळून येत असलेला गुण म्हणजे त्याची अपूर्ण राहण्याची वृत्ती होय. काही तरी कमी आहे, काही तरी अपूर्ण आहे, काही तरी मिळवायचे आहे, यातून तो त्याचा जीवन प्रवास पुढे घेवून जात असतो. एक गोष्ट अथवा बाब प्राप्त झाली किंवा मिळवली कि तो दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागतो. ती दुसरी गोष्ट मिळाली कि तो तिसऱ्या गोष्टीच्या मागे लागतो. या प्रकारे आपल्या जीवनात अखंड अपूर्णता राखण्याकडे आणि पोकळी ठेवण्याकडे तो नैसर्गिकरित्या आतून प्रयत्न करत असतो.
हि अपूर्णता जरी खूप सुखावणारी नसली तरी ती एका दिशेने मार्गस्थ राहण्यास मानवास मदत करते. या अपूर्णते मुळेच मानव कार्यशील आणि कार्यप्रवण राहून नवीन नवीन क्षेत्रे पादांक्रात करत राहतो. कधी अपयशाचा कधी धनी होतो तर कधी यशावर स्वार होतो. त्या मुळे अपूर्णता हे अपयश नाही. अपूर्णता हा रितेपणाही नाही. अपूर्णता हे दु:ख नाही. तर तो एक शोध आहे पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करण्याचा आणि त्या आधारे जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देण्याचा. या प्रवासातूनच आपण एक साधे, सरळ, सोपे आणि सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगतो.
जीवन अनमोल आहे, ते अधिक सुंदर बनवूया !
०२५/१०१ दिनांक ११.०८.२०२१
राजीव नंदकर , उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७