जालन्याची राज्यात आघाडी
जालन्याची राज्यात आघाडी
जालना/वार्ताहर
गत आर्थिक वर्षांत (२०११-१२) जिल्ह्य़ात भूसंपादनाच्या तीनशेपेक्षा अधिक प्रकरणांचा निवाडा करण्यात येऊन वीस कोटींपेक्षा जास्त रकमेचा मोबदला संबंधित शेतक ऱ्यांना देण्यात आला. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी साठवण तलावासाठी संपादित जमिनीच्या चार कोटी मोबदल्याचे वाटप सध्या सुरू आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांनी सांगितले की, सार्वजनिक कामांसाठी जमीन संपादन करण्यासाठी चार उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालये जिल्ह्य़ात कार्यरत आहेत. २००५ ते २००९ दरम्यान अनेक शेतक ऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या. त्यापैकी अनेक प्रस्ताव अंतिम निवाडय़ासाठी प्रलंबित होते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून जमिनी संपादन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर भूसंपादन मोबदला देण्याच्या कामाला गती आली. मागील ९-१० महिन्यांत जिल्ह्य़ात ३०२ प्रकरणांमध्ये अंतिम निवाडे घोषित झाले. जिल्ह्य़ात यापूर्वी कोणत्याही आर्थिक वर्षांत मोठय़ा संख्येने निवाडे झाले नव्हते. वर्षभरापूर्वी जिल्ह्य़ात सातशेपेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित होती. पैकी तीनशेपेक्षा अधिक भूसंपादन प्रकरणात निवाडा झाला. सध्या भूसंपादनाची जवळपास ४०० प्रकरणे प्रलंबित असून, ती जुलैपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अशा प्रकारे एवढय़ा मोठय़ा संख्येने भूसंपादन प्रकरणी निवाडा करणारा जालना हा राज्यातील एकमेव जिल्हा असावा, असेही नंदकर यांनी सांगितले. तुकाराम मुंडे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिली बैठक भूसंपादन अधिकाऱ्यांची व संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांची घेतली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विविध सार्वजनिक कामांसाठी भूसंपादन झाल्यानंतरही संबंधित जमिनी शासनाच्या नावावर केल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल अधिकारी, तलाठी, भूमिअभिलेख निरीक्षक यांच्या अनेक बैठका घेऊन यासंदर्भात सूचना केल्या. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत एकूण १३०० प्रकरणांत जवळपास ३०० हेक्टर जमिनीवर शासनाच्या नावाच्या नोंदी करण्यात आल्या, असेही नंदकर यांनी सांगितले.
घनसावंगी तालुक्यातील तनवाडी साठवण तलावासाठी सव्वाशे हेक्टर जमीन संपादित झाली असून भूसंपादन मोबदल्याचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या १५७ आहे. एकूण सहा कोटी मोबदल्यापैकी दोन कोटी देण्यात आले. चार कोटी मोबदला वाटपाचे काम सध्या सुरू असून, ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. तनवाडी तलाव भूसंपादन प्रकरणाचे मोबदला वाटप २००८ पासून प्रलंबित होते.