आयुष्यातील अंधार दूर करून ते प्रकाशित करण्यासाठी मित्रत्वाचा दिवा कायम तेवत ठेवूया!

 आयुष्यातील अंधार दूर करून ते प्रकाशित करण्यासाठी मित्रत्वाचा दिवा कायम तेवत ठेवूया!

       मैत्री हे असं एकमेव नातं आहे की जे वर्ण, जात, धर्म, पंथ, लिंग या पलीकडे जाते. मैत्री हा एक आधाररूपी वड असून, मित्र हे आयुष्यरूपी प्रवासातील वाटसरू, मार्गदर्शक व दिशादर्शक असतात. संकटात हात देणारा,अडचणी दूर करणारा,सुख-दुखा:त साथीदार होणारा आणि आपल्या भावना समजून घेणारा म्हणजे आपला मित्र. त्यामुळे ज्यांनी मित्र कमवले, त्यांनी खूप मोठी संपत्ती कमवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

       मित्र योग्य व चांगले असतील तर ते तुमच्या आयुष्याला टेकू लावण्याचे काम करतात व आणि ते अयोग्य व वाईट असतील तर ते तुम्हाला खड्यात ढकलून देण्याचे कार्य त्यांच्या कडून होत असते. सबब मित्रांची पारख हि सोन्याची पारखी सारखी असावी तर निवड हि हिर्‍या सारखी असावी. मित्र हे आपले आयुष्य बदलून टाकतात त्यामुळे मित्राची निवड म्हणजे तुमच्या यशाची निवड हे सर्वमान्य सूत्र आहे. 

       मैत्री दीनानिमित्त या विशेष लेखात मित्र म्हणजे काय?, मैत्रीची व्याख्या काय?, मैत्री कशी तयार होते?, मित्राची गरज का?, मित्रांचे प्रकार कोणते?, चांगला मित्र कसा ओळखावा?, मैत्री व्यवस्थापन का गरजेचे आहे?, मैत्री व्यवस्थापन कसे करावे? अशा अनेक घटक व बाबीवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. 

      मित्र ह्या नात्याची उत्पती हि अगदी प्राचीन काळापासून आहे, हे मित्रांनी लक्षात घ्यावे. प्राचीन महाकाव्ये जसे महाभारत, रामायण यात सुधा अनेक मित्रत्वाचे दाखले आपणास पहावयाला मिळतात. मैत्री शब्द ऐकला की आपल्या समोर भगवान श्रीकृष्ण व सुदामा किंवा दुर्योधन व कर्ण यांच्या मैत्रीचा दाखला दिला जातो.

मित्र कसे तयार होत असावेत या बाबत आपण माहिती घेवूया. समान विचार व परस्पर सहकार्य हा मित्र होण्यामागचा एक धागा असतो. असे असले तरी परिस्थितिनुरूप हे दोन्ही धागे जरी नसले तरीही दोन व्यक्ती मित्र होत होवू शकतात. त्या साठी कधी कधी परिस्थिति कारणीभूत असते, उदाहरण एकाच बस मधून शाळा व कामा साठी प्रवास करणारे दोन व्यक्ती जरी त्यांचे विचार व परस्पर सहकार्य नसले तरी मित्र होतात या मागे व्यावसायिक अंतर्वैक्तिक संबध दिसून येतात. 

मित्रांची निवड : बालपणात आपला सर्वात जास्त सबंध हा आपले आई व वडील व जवळचे नातेवाईक यांच्याशी येत असला तरी कुमार अवस्था (१० -१४ ) व तरुण अवस्था(१५-२९ )मध्ये आपले मित्र कोण व कसे आहेत यावर आपल्या आयुष्याचे गणित अवलंबून असते असे माझे ठाम मत आहे, त्या मुळे मित्र निवडणे बाबत आपण दक्ष असावे.

मैत्रीचा विकास: तसे पहिले तर मित्रत्व हे दोन बाजूनी वृद्धिंगत होणारी बाब आहे. जो पर्यंत दोन्ही कडून प्रयत्न होत नाहीत,तो पर्यंत ती वृद्धिंगत होत नाही. अनेक वेळा आपली तक्रार असते कि मी त्याच्यासाठी एवढे करतो परंतु तो माझ्यासाठी काहीच करत नाही.मैत्री हि निस्वार्थी जरी असली तरी यात परस्पर सहकार्य असल्याशिवाय ती वृद्धिंगत होत नाही हे मित्रांनी लक्षात ठेवावे. मैत्री मध्ये उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, मोठा–छोटा असे अडथळे नसतात. मैत्री हि अत्यंत हळुवार व स्थिर पणे विकसित होते.

जवळचा मित्र कसा ओळखावा : जवळचा मित्र कसा ओळखावा यासाठी काही कसोटी आपण पाहूया. वेळ हि मोठी कसोटी आहे. वेळ अनमोल आहे तो आपल्याला देणारा ,आपले विचार ऐकून घेणारा, आपल्या भावना मोकळ्यापणाने ज्या पुढे व्यक्त करता येतात ,समस्या व संकटे यात धावून येणारा आपला मित्र असावा. 

मित्र टिकवणे: आपल्या आयुष्यात आपण वयानुरूप मित्र कमवत असतो, परंतु कुटुंब व काम या मुळे वय वर्ष २५ ते ४० या कालावधीत आपले अनेक जुने मित्र संपर्कात न राहिल्याने तुटून जातात. वास्तविक मित्र कमवणे आणि ते कायम राखणे हि तशी या धाकधकीच्या जीवनात मोठी कसरत आहे. त्या मुळे या साठी आपण जाणीव पूर्वक प्रयत्न जो पर्यंत करत नाही तो पर्यंत हे मित्र कायम टिकवले जाणार नाहीत.आपण जसे मोठे होत जातो तसे अनेक नवीन माणसे आपल्याला आयुष्यात येतात व भेटत राहतात. मात्र त्या सर्वांशी आपली मैत्री होत नसून काही मोजक्या माणसांशी आपली मैत्री होते. कारण मैत्री हि परस्पर सहकार्य व विचार व भावनांचे आदान प्रदान यातून तयार होत असते.

मित्रांचे प्रकार: मैत्रीच्या अनेक छटा असतात आणि मैत्रीचे विविध गुंते पण असतात. मैत्री हि वृक्षाला लगडलेल्या वेली सारखी असते. मित्र हे आपल्या आयुष्याला दिशा देतात आणि दशा पण करतात हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वास असावा मात्र तो आंधळा नसावा हे सर्वमान्य सत्य आहे. मित्रांचे वर्गीकरण करणे अवघड व अशक्य बाब असली तरी एक तीन प्रकारचे मित्र मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल. पहिला मित्र हा अगदी लहान पणा पासून आपल्या सोबत असतो . नेहमी संपर्क नसला तरी एक आत्मीयता त्यांच्या मध्ये असते.दुसरे मित्र हे शाळा व कॉलेज या मधील असतात हे थोड्या फार प्रमाणात संपर्कात असतात आणि यांच्या मध्ये एक आपुलकी व अभिमान आपल्या बदल असतो. तिसरे मित्र आपले काम व व्यवसाय या मुळे संपर्कात आल्याने झालेले मित्र असतात, यांचा नेहमी संपर्क येतो, आणि यांच्या मध्ये परस्पर सहकार्य असले तरी विचार व भावना चे आदान प्रदान कमी प्रमाणात असते हे तीनही मित्र आपल्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असतात त्या मुळे ते आपण जपले व जोपासले पाहिजेत.

“सारा गाव मामाचा एक नाही कामाचा”: आपण काही लोकांकडून ऐकतो कि माझे खूप कमी मित्र आहेत व असेही ऐकतो कि माझे खूप मित्र आहेत. तसे पहिले तर किती संख्या आहे या पेक्षा किती गुणवत्ता पूर्ण आहे हे अधिक महत्वाचे ठरू शकेल. “सारा गाव मामाचा एक नाही कामाचा” अशी एक ग्रामीण म्हण आहे. बर्‍याच वेळा असे होते कि ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्या वेळेस कोणताही मित्र आपल्या उपयोगी येत नाही सबब मित्र हे गुणवतापूर्ण असावेत आणि संकटाच्या व समस्यांच्या काळात आपल्याला मदत करणारे असावेत.     

मैत्री व समाजशिलता: मैत्री व मानवाची समाजशिलता याचा परस्पर संबंध आहे हे मित्रांनी लक्षात घ्यावे. लग्न व्यवस्था हि ज्या प्रमाणे समाज व्यवस्था टिकवून ठेवणेसाठी जशी मदत करते तशी समाजातील विविध व्यक्तींची परस्पर मैत्री ही समाज व्यवस्था एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने मदत करत असते. मैत्री जेवढी ज्या समाजातील घटकात जास्त वृद्धिंगत असते तो समाज लवकर विकसित पावतो. समाज विकासाचा मार्ग हा परस्पर सहकार्य व समन्वय वरून जातो हे काही नव्याने सांगायला नको. ज्या व्यक्ती ह्या मैत्री वृद्धिंगत करतात त्या अधिक परिपूर्ण झालेल्या आपणास पहावयाला मिळतात .

व्यावसायिक पातळीवरील मैत्री : मैत्री हि वैयक्तिक पातळीवर आणि व्यवसायिक पातळीवर काम करत असते. वैयेक्तिक पातळीवरील मैत्रीत परस्पर सहकार्य असते तसेच विचार व भावना आदान प्रदान असते, मात्र व्यवसायिक पातळीवर मैत्रीत फक्त परस्पर सहकार्य असते हे लक्षात घ्यावे.  पण त्यालाही विचाराची आणि परस्पर सहकार्याची जोड देता येते. त्यामुळे व्यावसायिक पातळीवरील मैत्रीला स्वार्थी म्हणून जोडले जाणारे बिरूद चुकीचे आहे असे मला वाटते.पश्चात देशात व्यवसायिक मैत्रीला जेवढे प्राधान्य दिले जाते तेवढे आपल्या देशात दिले जात नाही. त्यामुळे व्यावसायिक वृद्धी होण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.  

माझा मित्र हा माझ्या शत्रूचा मित्र: बर्‍याच वेळा आपण सर्व असे समजतो कि माझा मित्र हा माझ्या शत्रूचा मित्र असता कामा नये किंवा माझा शत्रू हा माझ्या मित्राचा मित्र होता कामा नये. परंतु आपण अश्या एखान्द्या व्यक्तीच्या गोष्टी नियंत्रित करणे हे चूक आहे. वास्तविक आपल्या नजरेतून एखांदी व्यक्ती चांगली नाही याचा अर्थ ती व्यक्ती दुसर्‍याच्या नजरेतूनही चांगली नाही असे समजणे म्हणजे पूर्वग्रह पेक्षा काहीच नाही. वास्तविक प्रत्येक नाते हे व्यक्ती सापेक्षता असलेले असते हे लक्षात घ्यावे म्हणजे ज्याचे माझ्या बरोबर जमते, त्याचे माझे ज्याच्याशी जमते त्याच्याशी जमेलच असे नाही. 

अवास्तव अपेक्षा: बर्याच वेळा आपल्याला मैत्री मध्ये नातेसंबंधांची फरफट झालेले पहावयास मिळते, या मागे कारण सोपे आहे. ते म्हणजे आपल्या अवास्तव अपेक्षा ह्या आपल्या मित्रावर लादणे होय. अपेक्षांचे ओझे जास्त झाल्याने मित्र तुटतात अथवा दूर जातात हे मित्रांनी लक्षात ठेवावे. अपेक्षा असणे गैर नाही मात्र त्या वास्तववादी असणे व त्या मित्राच्या ठायी असणाऱ्या क्षमता विचारात घेवून अपेक्षा ठेवणे आवश्यक आहे.

मित्रांची वर्गवारी: मैत्री व त्या अनुषंगाने आपले मित्र हे आपल्या वयोमानानुसार बदलत जातात. काही मित्र हे आपल्यासोबत कायम राहतात. तर काही मित्र हे थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात येवून आपल्या आयुष्याला कलाटणी देवून जातात. आपले लहानपणीचे मित्र ,आपले प्राथमिक शाळेतील मित्र,आपले माध्यमिक शाळेतील मित्र, उच्य माध्यमिक शाळेतील मित्र, विद्यालयीन व महाविद्यालयीन जीवनातील मित्र, आपण काम करतो तेथील मित्र, आणि आपण ज्या परिसरात राहतो तेथील मित्र अशी ढोबळमानाने मित्रांची वर्गवारी करता येते .

विचार व भावना आदान –प्रदान उत्तम माध्यम: आपण पाहतो कि मित्र हे विचार व भावना आदान –प्रदान करण्यासाठीचे उत्तम माध्यम असते. आपले मनात येणारे विचार आपण मित्रा  सोबत शेयर केल्याने त्या विचारांवर आपल्याला लवकर कृती करणे शक्य होते. विचार करणे व त्या विचाराला आपल्या मनातून अथवा मेंदूतून कृतीच्या रुपात काढून टाकणे सध्याच्या काळात खूप महत्वाचे झाले आहे. त्या मुळे जर मित्र सोबत आपण असे विचार आपण शेयर करत असू तर आपले मन व मेंदू अजून स्वच व निर्मळ  होते. अन्यथा तेच तेच विचार मनात व मेदूत घोळत असल्याने एक प्रकारची गुंतागुंत तयार झाल्याने आपली शारिरिक व मानसिक कार्यक्षमता अत्यंत क्षीण होत असते. त्या मुळे मित्र हे असे विचार व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देतात हे मित्रांनी लक्षात घ्यावे. आपले मन अत्यंत स्वैर असते हे आपणस माहित आहे. त्याला कोणतेही बंधन नसते. असे हे मन एकूण सहा प्रकारच्या भावना व भावनाचे एकत्रीकरण करत असते. या भावना म्हणजे राग, दुख, आनंद, भीती ,तिरस्कार ,आश्चर्य  होय. मात्र ह्या भावना जेवढ्या योग्य प्रकारे मित्रा सोबत शेयर होतील तेवढे आपले मन हलके होते हे आता संशोधन अंती सिद्ध झाले आहे. त्या मुळे या भावना आपल्याकडून आपल्या मित्राला शेयर झाल्या कि त्या भावनांची तीव्रता व शरीरावर होणारे नकारात्मक व वाईट परिणाम कमी होतात. साहजिकच ह्या भावना जेवढ्या आपण सहजतेने आपल्या मित्र समोर उघड करू तेवढे आपले मानसिक आरोग्य उत्तम राहील. कारण भावना जेवढ्या दाबल्या जातील तेवढा प्रेशर आपल्या मनावर व मेंदूवर निर्माण होतो हे सुजाण मित्रांनी लक्षात घ्यावे.   

समारोप: आयुष्यरूपी प्रवासाच्या वाटेवर आपले अनेक लोक भेटतात त्यातील काही मित्र होतात. असे मित्र आपल्याला आपल्या आयुष्यात् ज्या वेळी समस्या व संकटांचा अंधार होतो त्या वेळेस हेच मित्र दिवा रूपी प्रकाश देवून आपल्याला ह्या अंधारातून बाहेर काढतात. म्हणून मित्रत्वाची ज्योत कायम तेवत ठेवूया ,आपल्या आयुष्यातील अंधार रुपी संकटात हि मित्रत्वाची ज्योत कायम मार्ग दाखवेल.

(कोव्हिडच्या आजाराने मी माझा जिवलग मित्र संदीप बनसोडे गमावला आणि आपणही आपले अनेक मित्र गमावले,त्या सर्वांना हा लेख समर्पित )

०२४ /१०१ दिनांक ०१.०८.२०२१

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७