श्री शिवछत्रपती: बालपणातील स्फूर्ती आणि प्रेरणेचा खरा स्रोत

श्री शिवछत्रपती: बालपणातील स्फूर्ती आणि प्रेरणेचा खरा स्रोत

https://www.facebook.com/share/p/18g8TPcSQe

इयत्ता चौथीमध्ये शालेय अभ्यासक्रमातील ‘श्री शिवछत्रपती’ हे पुस्तक मी पन्नास पेक्षा जास्त वेळा वाचले असेल आणि त्यातील विविध प्रसंग वाचतांना मी शंभरपेक्षाही जास्त वेळा रडलो असेल.चौथी पास झाल्यावरही हे पुस्तक पुढे अनेक वर्षे माझ्या संग्रही होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, त्यांनी स्व-कष्टाने आणि स्व-पराक्रमाने निर्माण केलेले स्वराज्य हा विषय माझ्यासाठी कायम प्रेरणेचा स्रोत म्हणून राहिला आहे. शिवनेरी किल्ला आणि आमचे गाव यातील अंतर साधारण पंचवीस किलोमीटर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेच, त्या पेक्षाही शिवजन्मभूमीच्या आसपास आपलाही जन्म झाला आहे याचेही विशेष स्व-कौतुक आणि स्व-अभिमान मला होता आणि आजही आहे.

झेडपीच्या शिक्षणात हे चौथीचे पुस्तक, त्यातील धडे, विविध प्रसंग आणि विशेष म्हणजे पुस्तकातील कलात्मक चित्रे माझ्या स्मृतित ठळकपणे साठवली गेली आहेत. आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे व्हावे आणि पराक्रम करून मोठे व्हावे ही सुप्त इच्छा मनाच्या कोपऱ्यात सदैव तेवत होती. आजच्या सारखा माहितीचा भडिमार मेंदू आणि मनावर नसल्यामुळे जे काही वाचतोय, जे काही ऐकतोय, जे काही शिकतोय याचे आत्मसातीकरण त्या वयात खूप हळुवार होत होते. प्रत्येक बाब आणि गोष्ट ही विश्लेषण आणि निष्कर्ष यासह विवेकपूर्ण रीतीने पहिली जात होती आणि कृतीत ती आणण्याच्या प्रयत्न जाणीवपूर्वक आमच्याकडून केला जात होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे इयत्ता चौथी मधील श्री. शिवछत्रपती हे शिवचरित्रात्मक पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे(बालभारती) या संस्थेने अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने तयार करून अभ्यासक्रमात समाविष्ट केले त्याबद्दल एक झेडपीचा विद्यार्थी म्हणून मी कायम बालभारती संस्थेचा ऋणी आहे. अनेक बुद्धिवंतांना सोबत घेऊन हे पुस्तक तयार करून विद्यार्थी यांच्यापर्यंत योग्य वयात व अचूक रीतीने पोहचवणे ही बालभारतीची आज पर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी आहे असे मला वाटते. या पुस्तकाचे मुखपृष्ठावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी असा फोटो, त्यांचा उमदा असा घोडा, तलवारीने दिशा निर्देश करणारा मावळा, महाराजांच्या संरक्षणास सदैव तत्पर असणारा भाल्यासह सज्ज असणारा घोडेस्वार आणि सह्याद्रीच्या कुशीतील अभेद्य असा किल्ला पाहूनच मी गहिवरून जात असे.

इयत्ता चौथीच्या पुस्तकात अत्यंत संवेदनशील पद्धतीने मांडलेला शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र किती अन्याय आणि अत्याचार सहन करत होता याची जाणीव पुस्तकाच्या प्रारंभी होते. मराठी माणूस त्याकाळी किती हलाखीचे जीवन कंठीत होता हे वाचून मी पूर्ण हबकून गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ इत्यादी संतांनी लोकशिकवण आणि लोकजागृतीचा पाया महाराष्ट्रात घातला होता आणि त्यातूनही महाराजांनी प्रेरणा घेतली होती. त्यामुळे लहानपणी मी वारकरी पंथाकडे आकृष्ट झालो होतो. मात्र योग्य योग न साधल्याने मी वारकऱ्याचा माळकरी झालो नाही याचे मला आजही वाईट वाटते. पुस्तकातील संत ज्ञानेश्वर यांची भावमुद्रा व संत एकनाथ यांनी कडेवर घेतलेले लहान मूल पाहून संत व महात्मे यांच्या कार्याविषयी मी अत्यंत भावुक झालो होतो.

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजीराजे यांचे सुरवातीच्या काळाचे पुस्तकातील वर्णन माझ्या स्मृतीमध्ये ठळकपणे नोंदवले गेले आहे. हा काळ अत्यंत धामधुमीचा आणि प्रतिकूल अशा परिस्थितीची जाणीव करून देणारा होता.पुस्तकातील राजमाता जिजाऊ छत्रपतींना रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगत आहेत हा प्रसंग माझ्या आईबद्दलही अधिक प्रेम आणि स्नेहभाव वाढवणारा होता. रायरेश्वर मंदिरात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा करणारे शिवरायांचे चित्र बालपणातही कर्तृत्व गाजवता येते फक्त त्यासाठी जिगरबाज मित्रांची साथ पाहिजे याची शिकवण देणारे होते. प्रतापगडावरील अफजल खान व महाराज यांच्या भेटीचा प्रसंग, महाराजांनी दाखवलेले अतुलनीय प्रसंगावधान आणि शत्रूची उडवून दिलेली दाणादाण यातून आयुष्यात कितीही मोठे संकट आणि शत्रू आला तरी त्याला घाबरायचे नाही असे सूचित करणारा होता.घोडखिंड मधील बाजीप्रभू देशपांडे या विराचा भीमपराक्रम वाचतांना तर डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असत. विशाळगड वरून कडाडलेला तोफेचा आवाज अनेक वेळा स्वप्नात येत असे. बलिदान काय असत, ते का करावं आणि कोणासाठी करावं हे खूपच कोवळ्या वयात आमच्यावर संस्कारित झालं होत. शाहिस्तेखानाची महाराजांनी छाटलेली बोटे आणि बसवलेली जरब पाहून शत्रूचा नायनाट करताना किती सावधगिरी बाळगावी लागते याचा वस्तुपाठ आम्ही शिकलो होतो. पुरंदरचा वेढा प्रकरणातील हत्तीवर बसून धनुष्यबाण मुरारबाजीवर रोखलेला दिलेरखान आणि घोड्यावर भाला ताणून ताठ मानेने आणि तेवढ्याच हिमतीने बसलेला मुरारबाजी हा फोटो पहिला की मला गहिवरून येत असे. पुरंदरचा तह वाचून आपल्या आयुष्यातही विपरीत आणि प्रतिकूल परिस्थिती असेल तर तह केला पाहिजे याचा धडा मी घेतला होता.महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन केलेली सुटका मात्र मनाला विलक्षण समाधान देणारी होती. सिंहगडावर तानाजी मालुसरे या निधड्या छातीच्या विराने केलेला आभाळा एवढा पराक्रम, स्वराज्य रक्षणासाठी दिलेली प्राणाची आहुती, गड आला पण सिंह गेला आणि आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाच ह्या दोन वाक्यांनी जीवनात कर्तव्ये महत्वाची याची शिकवण दिली होती. शिवराज्यभिषेक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी किती मोठी होती याची जाणीव पक्की झाली होती. रयतेचा राजा, स्फूर्तीचा जिवंत झरा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपणही त्यांचे मावळे होऊन आपले कर्तृत्व गाजवावे असे कायम वाटत असे आणि तसा प्रयत्न आयुष्यात वेळोवेळी मी केला आणि यशस्वी सुद्धा झालो.

काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट कशी काढायची, आयुष्यात संकटे आली असता डगमगून न जाता त्यांवर मात करून पुढे कसे जायचे, बलाढ्य शत्रूशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत कसे जायचे, सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूना सतत चुकवत यश कसे मिळवायचे हे सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराज यांचे ठायी होते. आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले, वाचले आणि मनोमनी अनुभवले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप ।।.

एकंदर बालपणात सर्वात जास्त स्फुर्ती, प्रेरणा, आत्मविश्वास, स्वदेशप्रेम, मूल्यसंस्कार, मोठ्यांचा आणि आई बहिणींचा आदर अशा कितीतरी गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्र्यामुळे मनात आणि नंतर कृतीत अधोरेखित झाल्या होत्या आणि म्हणूनच कदाचित इथपर्यंतचा प्रवास सुखकर झाला.

जय भवानी जय शिवाजी I I

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

०५०/३६५ दिनांक १९.०२.२०२५

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती !

छोट्या गोष्टी आणि मोठे धडे©