वाचन संस्कृती एक व्यापक चळवळ हवी!
*_वाचन संस्कृती एक व्यापक चळवळ हवी!_*
‘वाचाल तर वाचाल!’ असे उगाच म्हटले जात नाही. असे असले, तरी सध्याच्या या सोशल मीडियाच्या आणि धावपळीच्या जगात ‘वाचन’ कमी कमी होत आहे. वाचन हा आपल्या ज्ञानग्रहणाचा एक अविभाज्य असा घटक आहे. मात्र, सध्याचे ज्ञानर्जन हे फक्त परीक्षेपुरते मर्यादित असल्यामुळे, वाचनाकडे आणि वाचन संस्कृतीकडे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपली ज्ञानेंद्रिये ही आपले ज्ञान अथवा आपली समज ही अधिक पक्की करण्यामध्ये कायम कार्यरत असतात. ज्या वेळेस आपण वाचन करतो, त्या वेळेस जे वाचले आहे त्यावर आपला मेंदू प्रक्रिया करून महत्त्वाच्या बाबींची आणि गोष्टींची साठवणूक स्मृतिकेंद्रामध्ये करत असतो. वाचनातून नुसती माहितीची साठवणूक होत नाही, तर जी माहिती आपण ग्रहण केलेली आहे, तिचे विश्लेषण होऊन आपण काही निष्कर्ष काढत असतो. त्या निष्कर्षाच्या आधारे आपले जीवन अधिक सुसह्य आणि समाधानी करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. वाचनातून आपले अनुभवविश्व अधिक समृद्ध होत असते. वाचनातून आपण आपली निर्णयप्रक्रिया अत्यंत प्रगल्भ पद्धतीने घेत असतो. वाचनाने आपली बौद्धिक क्षमता वाढत असल्याने, आपण जगाकडे एका विस्तृत आणि विशाल दृष्टीने पाहण्याचे काम करत असतो. वाचनातून आपल्याला अनेक नवीन बाबींवर दृष्टी टाकता येते. तसेच, आपल्या अंतर्मनात डोकावून त्या वाचनाच्या आधारे आपल्याला एक नवी आंतरदृष्टीसुद्धा प्राप्त होत असते.
आज आपण पाहतो की, सर्व स्तरावर ‘वाचन’ कमी होत चाललेले आहे. लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काही अपवाद वगळता ‘वाचन’ शिल्लक राहिलेले नाही, असेही खेदाने म्हणावे लागते. यामागे सोशल मीडियाचा भरमसाठ वापर हेसुद्धा एक महत्त्वाचे असे कारण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर जो माहितीचा भडिमार होत आहे, त्यामुळे वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. सोशल मीडियावरून जे काही आपल्या वाचनात किंवा पाहण्यात येते तेच खरे आहे, असा ग्रह आपण दिवसेंदिवस करून बसलो आहोत. सोशल मीडियावर येणारे फोटो, व्हिडिओ आणि रिल्स यांच्या आधारे आपण आपली विश्लेषण क्षमता गमावून बसलो आहोत, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे, एकीकडे सोशल मीडियामुळे आपल्या बुद्धीला गंज चढत आहे, असेही काही संशोधकांचे म्हणणे आहे. जे काही पाहतोय ते फक्त स्मृतिकेंद्रामध्ये साठवून ज्ञानाची निर्मिती होत नसते, हे अगोदर आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, तर जे काही प्राप्त झालेले आहे त्यावर योग्य अशी आणि शहाणपणाने प्रक्रिया करून त्याचा वापर आपले जीवन अधिक सुखी आणि सुसह्य बनवणे म्हणजे ‘ज्ञान’ होय.
आज आपण पाहतो की, सर्वच ठिकाणी ‘वाचन’ अत्यंत कमी झालेले आहे. पूर्वी तासन्तास लोक कथा, कादंबऱ्या, पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके इत्यादी साहित्य वाचत असायचे. मात्र, सध्या सर्व काही मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने, एकंदरच वाचनाची गती कमी झालेली आहे. काही लोक असाही दावा करतात की, मोबाईलमध्ये अनेक गोष्टी वाचण्यासाठी उपलब्ध होत असतात; परंतु डिजिटल एक्सपोजर जास्त झाल्यामुळे त्याचा अनावश्यक भार आपल्या मानेवर आणि डोळ्यांवर येत आहे, हे आपण विसरून गेलो आहोत. मोबाईलवर वाचणे आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचणे यामध्ये खूप मोठे अंतर आहे. पुस्तक वाचत असताना आपण जेवढे खर्या अर्थाने वाचनाशी समरस होत असतो, तेवढे मोबाईलवर वाचत असताना होऊ शकत नाही, हेही एक महत्त्वाचे सत्य आहे. वाचन संस्कृती जोपासत असताना ‘काय वाचावे आणि काय वाचू नये’ हा प्रश्न आता शिल्लक राहिला नाही. जे काही सहज उपलब्ध आहे ते वाचावे. मी जेव्हा साधारण दहा ते बारा वर्षांचा होतो, त्या वेळेस महिन्यातून फक्त दोन ते तीन वेळेस वृत्तपत्र आमच्या घरी येत असे. हे वृत्तपत्र वाचणे म्हणजे आमच्यासाठी खाऊपेक्षा कमी नसे. त्यामुळे, या वृत्तपत्रांमध्ये जी काही माहिती आलेली असे, ती आम्ही पुरूवून पुरवून वाचत असू. त्यामुळे प्राप्त झालेले वृत्तपत्र हे एका दमात न वाचता, ते रोज थोडे थोडे घेऊन आम्ही वाचत असू. अगदी या काळात खाऊसोबत आलेला वृतपत्राचा कागद हासुद्धा आमच्या वाचनाचा भाग असे. म्हणजे, जेवढी भूक किंवा गोडी आम्हाला खाऊची होती, तेवढीच वाचनाची होती.
विद्यार्थीदशेपासूनच वाचनाची गोडी आमच्यामध्ये हळुवार रुजली आणि ती वाढलीसुद्धा. ज्या वेळेस आम्ही हायस्कूलचे शिक्षण सुरू केले, त्या वेळेस रोज वाचनालयामध्ये जाऊन वृत्तपत्रामध्ये काय आलेले आहे, हे वाचणे हा आमचा शिरस्ता असे. गावाकडे तशी वाचण्याची साधने अत्यंत दुर्मिळ होती. त्यामुळे आमची वाचनाची जी भूक होती, ती भागत नसे. बऱ्याच वेळा नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर नवीन कॅलेंडर आल्यानंतर ते वाचणे, नवीन शाळा सुरू झाल्यानंतर नवीन पुस्तकाचे वाचन करणे आणि कुठे कुणाकडे जर एखादी जुनी कादंबरी वगैरे मिळाली तर ती वाचणे यासारखे आमचे वाचनप्रयत्न चालू असत. महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये आमच्या काकांच्या घरी उपलब्ध होती, त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य होत असे, तेव्हा तेव्हा ही महाकाव्ये वाचण्याचा खटाटोप मी करत असे. मात्र, ही महाकाव्ये अत्यंत जीर्ण झालेली होती आणि त्याची पानेही बऱ्याच वेळा इकडेतिकडे पडलेली असत. तसेच, बर्याच वेळा वाचताना पानांचा तुकडा पडत असे. मात्र, या महाकाव्यांचे वाचन झाल्यामुळे लहानपणीच माझी जी दृष्टी विशाल आणि विस्तृत झाली, तिचा वापर आजही मी माझ्या जीवनात करत आलेलो आहे. पुस्तक वाचन तसे पाहिले तर बऱ्याच लोकांसाठी कंटाळवाणे काम आहे. त्यामुळे बरेच लोक वाचनाला प्राधान्य देत नाहीत. मन, बुद्धी आणि अहंकार या तीन गोष्टींमध्ये आपल्याजवळ असलेला अहंकार, आपण इतरांचे काही वाचायचे नाही, असा शिक्कामोर्तब करायलाही मागे-पुढे पाहत नाही. वाचन संस्कृती ही, जसे मी सांगितले की, हळूहळू कमी होत आहे; तसेच अनेक मुलांनी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतल्यामुळे, त्यांच्याकडूनही ‘मराठी वाचन’ म्हणावे तेवढे होत नाही, हीसुद्धा एक मोठी शोकांतिका आहे.
वाचन संस्कृती वाढावी, तिचा निकोप फायदा व्हावा आणि त्यातून एक प्रगल्भ असा समाज निर्माण व्हावा, अशी धारणा बाळगणारे अनेक बुद्धिवंत या समाजामध्ये आहेत. ‘काय वाचावे?’ हाही प्रश्न बऱ्याच वेळा विद्यार्थी, तरुण आणि पालक यांच्यासमोर उभा राहत असतो. काय वाचावे यापेक्षा, काय आपण वाचतोय हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसातून किमान पाच पानांचे वाचन झाले, तरी खूप झाले. स्वत:बाबत सांगायचे झाले, तर सध्याही मी किमान दहा पाने लिहितो आणि दहा पाने वाचतो. ‘जिथे माणसे गप्प होतात तिथे पुस्तके बोलायला लागतात,’ असे कोणीतरी म्हटलेले आहे. आपण ज्या वेळेस निराश असतो किंवा आपल्या जीवनात जेव्हा नैराश्य आलेले असते, अशा वेळेस ऊर्जा आणि उर्मी देण्याचे काम जर कोणी करत असतील, तर ती म्हणजे आपली ‘पुस्तके’ होत. पुस्तके वाचल्याने या सृष्टीकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात. वाचन केल्याने आपल्या बुद्धीला खाद्य मिळते आणि त्यामुळे आपली बुद्धी सातत्याने तीक्ष्ण होण्याकडे वाटचाल करते, हेही आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. मनापासून वाचन करत असल्याने, आपण जे काही वाचत आहोत त्याच्याशी समरस होत असतो. सहाजिकच, त्यामुळे वाचनाने फक्त बुद्धी तीक्ष्ण होते असे नाही, तर आपले मनसुद्धा स्वच्छ होते.
जे काही आपण वाचत आहोत ते वाचत असताना आपल्या भावभावनांमध्येसुद्धा चढ-उतार होत असतात आणि त्यामुळे आपली भावनिक बुद्धिमत्ता अधिक मजबूत होण्याससुद्धा मदत होते. वाचन करत असताना आपल्या अनेक प्रकारच्या भावना उंचबळून येत असतात. सहाजिकच, त्यामुळे या भावनांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्या भावना योग्य रीतीने प्रभावित करणे आपल्याला वेळोवेळी शक्य व्हायला लागते. वाचन हे आपल्याला आंतरबाह्य निर्मळ बनवण्याचे काम करत असते. ‘काय खरे, काय खोटे‘, ‘काय चूक, काय बरोबर’ याबाबतची खरी माहिती आणि चाचपणी जर कोणी करून देत असेल, तर ते म्हणजे आपले वाचन होय. वाचनाने आपण अधिक प्रगल्भ होतो आणि आपल्याला आपली विचार प्रक्रिया अधिक समृद्ध व फलदायी बनवता येते. आपले बरे-वाईट करण्याची खरी ताकद आपल्या विचारांमध्ये असते. त्यामुळे, तुमचे विचार जेवढे प्रगल्भ, तेवढा तुमचा विकास होत असतो. आज आपण समाजात पाहतोय की, सर्व बाजूंनी अगदी अंधारमय वातावरण निर्माण झालेले आहे. स्वार्थी आणि संकुचित वृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होतानासुद्धा दिसत आहे. एकमेकांवर कुरघोडी करणे आणि एकमेकाला खाली खेचणे हे तर नित्याचे झालेले आहे. अशा या विषम परिस्थितीमध्ये आपण टिकून राहणे खूप गरजेचे आहे. आपले समाजातील स्थान टिकणे हे जर आपल्याला अधिक शाश्वत करायचे असेल, तर आपल्याला आपले वाचन अधिक मूलभूत आणि पक्के करणे गरजेचे आहे. जे आपण वाचतो, त्यावर चिंतन करून, त्यावर विश्लेषण करून आणि त्यातून निष्कर्ष काढून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण कसे बनवता येईल, यावरही आपण सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. जे वाचतोय आणि त्याचा जो सार आहे त्याप्रमाणे आयुष्यामध्ये अनेक बाबींची आणि घटकांची अंमलबजावणी करणे हेही तितकेच गरजेचे आहे.
लहान मुले ही तर मातीचा गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसे ते बनतात. त्यांना वाचनाचे धडे देणे खूप गरजेचे आहे. यासाठी पालकांनी महिन्यातून किमान एकदा आपल्या मुलांसाठी काही पुस्तकांची खरेदी करणे तितकेच गरजेचे ठरते. ‘मुले वाचत नाहीत!’ असे म्हणण्यापेक्षा, आपण त्यांच्यापुढे काहीतरी ठेवणे आणि त्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त करणे हे खूप महत्त्वाचे ठरते. मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवायचे असेल, तर त्यांच्यासमोर पुस्तकांपेक्षा दुसरा चांगला पर्याय कोणताही असू शकत नाही. आज आपण पाहतोय की, जग सातत्याने विस्तारित होत आहे. ते सातत्याने बदलत आहे. जग ही एक मोठी बाजारपेठ झाली आहे. जगाला एका खेड्याचे स्वरूप आलेले आहे. हे सर्व घडत असताना जगामध्ये काय चाललेय याकडे आपण अगदी डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. जेवढे आपण डोळसपणे जगाकडे पाहू, तेवढा आपला विकास आणि आपली प्रगती अधिक होईल. आपली प्रगती आणि आपला विकास झाला, तरच देशाचा विकास होईल. अशा प्रकारे वाचनातून अनेक पिढ्या घडवून या देशाचा सर्वसमावेशक असा विकास घडवून आणणे हे एक मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे, वाचन संस्कृतीची पेरणी करणे, ती रुजवणे आणि ती वाढवणे यासाठी सर्व स्तरांवर खूप मोठ्या प्रमाणावर लोकजागृतीची गरज आहे. प्रत्येकाने आपला वाटा या वाचन संस्कृतीमध्ये उचलला, तर निश्चितच वाचनातून विचार, विचारातून कृती आणि कृतीतून देश बदलण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे. चला, ही वाचन संस्कृती आपण सर्व जण मिळून सर्वांमध्ये कशी रुजेल आणि कशी वाढेल यासाठी निरंतर प्रयत्न करण्याची शपथ घेऊ या. याची एक सुरुवात किंवा एक छोटी पायरी ही आपल्या स्वतःपासून करणे, हाच या वाचन संस्कृतीचा शुभारंभ आहे.
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
मो. 9970246417
सध्या उप आयुक्त, पुणे महानगरपालिका येथ कार्यरत.
(लेखन सहाय्य आणि संपादक : प्रा. हनुमंत भवारी सर)