तुमचे मानसिकत्व समजून घ्या ! Understand your Mindset & Mentality!
तुमचे मानसिकत्व समजून घ्या ! Understand your Mindset & Mentality!
कोणताही व्यक्ती हा समजून आणि उमजून घेण्यासाठी अत्यंत क्लिष्ट असा प्राणी आहे. असा हा व्यक्ती त्याच्या तीन अवस्था ठळकपणे दाखवतो. त्यामुळे त्याला समजून आणि उमजून घेणे अधिक क्लिष्ट आणि अवघड होवून जाते. या तीन अवस्था म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक अवस्था होत. शरीर म्हणजे रक्तमासाचा गोळा आहे, असे आपण म्हणतो आणि त्यात असणारे अंतर्गत आणि बाह्य अवयव मिळून आपले शरीर बनते त्यालाच आपण शारीरिक अवस्था असे म्हणतो. मानसिक अवस्था ही आपला मेंदू आणि मन याच्या जोडणी मधून तयार होते. या मध्ये आपले आकलन, शिकणे, स्मृति, कल्पना, निर्णय प्रक्रिया, विचार प्रक्रिया आणि समस्या सोडवणूक याचा समावेश होतो. तर भावनिक अवस्थेमध्ये आपल्या सहा मुख्य भावना आणि अनेक उपभावना याचा समावेश होतो. प्रस्तुत लेखात आपण मानसिक अवस्था, मानसिकत्व आणि मानसिक संतुलन याबाबत विस्तृतपणे पाहणार आहोत. आपली मानसिक स्थिति उत्तम आणि भक्कम कशी बनवायची आणि त्यातून एक यशस्वी आणि सुखी व्यक्तिमत्व कसे बनायचे यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माणूस हा जसा उदरनिर्वाहसाठी अन्न गोळा करतो, तसा तो त्यांचे पंच इंद्रिये मार्फत त्यांच्या दिनक्रियेत भरपूर माहिती गोळा करत असतो. मात्र अशी माहिती की जी पाहून, ऐकून, वास घेवून, स्पर्श करून आणि चव घेवून प्राप्त होते, ती सर्वच माहिती तो आपल्या मेंदुमधील स्मृति केंद्रात साठवत नाही. कारण मानव प्राणी या बाबतीत खूपच निवडक आणि चोखंदळ असा आहे. जी माहिती फायदेशीर आहे तीच तो स्मृति केंद्रात साठवतो. रस्त्यावरून चालताना त्याच्या डोळ्यांना अनेक प्रतिमा दिसतात किंवा अनेक प्रकारचे आवाज त्याला ऐकू येतात त्या सर्वच प्रतिमा आणि आवाज तो स्मृति केंद्रात साठवत नाही, तर फक्त गरजेपुरते आणि उपयोगापूरते तो साठवतो आणि इतर गोष्टी विसरून जातो.
पंच इंद्रिये मार्फत प्राप्त होणार्या चेतना किंवा संवेदना ह्या स्मृति केंद्राच्या दिशेने प्रवास प्रवास करतात आणि त्या स्मृति केंद्रात जावून स्थिरावल्या जातात. अशा प्राप्त होणार्या चेतना आणि संवेदना यांचा लक्षपूर्वक आणि जागरूकपणाने अर्थ लावणे म्हणजे आपली समज आणि आकलन होय. या पंच इंद्रिये मार्फत जी काही माहिती आपण घेतो ती आपल्या मेंदुमधील स्मृति केंद्रात साठवतो. म्हणजे आपण ‘दृश्यम २’ चित्रपट पहिला तर त्याची कथा आपल्या स्मृति केंद्रात साठवली जाते. जर आपण ‘केवड्याचे पान तू’ हे गाणे एकले तर त्याचे शब्द आपल्या मेंदूच्या स्मृति केंद्रात साठवले जातात. आपण जर फेणी नावाची मिठाई खाली तर त्याची विशेष अशी चव आपल्या मेंदूच्या स्मृति मध्ये साठवली जाते. आपण जर लोकरी पासून तयार केलेली चादरला स्पर्श केला तर तो स्पर्श आपल्या स्मृति केंद्रात साठवला जातो. आपण जर गुलाबाच्या फुलाचा वास घेतला तर तो वासही आपल्या स्मृति केंद्रात साठवला जातो.
अशा प्रकारे आलेली ही माहिती स्मृति केंद्रात साठवली जाते आणि गरजेप्रमाणे नवीन माहिती समोर आली असता गरजेनुसार त्याचे प्रकटीकरण केले जाते. उदाहरण दाखल बोलायचे तर दृश्यम २ या पेक्षा दृश्यम १ छान आहे. केवड्याचे पान तू या पेक्षा सामी सामी छान आहे. फेणी स्वीट पेक्षा आपला गुलाबजामून बरा आहे. लोकरीच्या चादर पेक्षा आजीची लुगड्याची गोधडी बरी आणि गुलाबाचा वास हा आपल्या रोजच्या परफ्यूम पेक्षा चांगला आहे. एकंदर नवी माहिती आणि जूनी माहिती याचा संबध साधून एक विचार प्रक्रिया आपल्या मेंदू मध्ये सारखी तयार होत असते. त्यातून काही स्व-संकल्पना तयार होतात आणि स्व-विचार तयार होतात यालाच आपण आपल्या मनाची स्थिति असे म्हणतो. तसेच येणारी नवीन माहिती आणि जुनी माहिती याच्या संश्लेषण आणि संयोग यातून एक विचारप्रणाली तयार होते की जी आपल्या व्यक्तीमत्वाचा भाग बनते. मनाची स्थिति म्हणजे एकंदर आपल्याला मिळालेल्या अनेक प्रकारच्या माहितीच्या आधारे आणि त्या माहितीवर प्रक्रिया करून आपली तयार झालेली एक मनाची आणि विचारांची बैठक होय.
उपलब्ध झालेल्या आणि साठविलेल्या माहितीवर प्रक्रिया करून आणि परिवर्तन करून आपण आपली विचार प्रक्रिया आणि वैचारिक संकल्पना तयार करतो. अशा प्रकारे आपली ही आपली मानसिक बैठक आपण समजून आणि उमजून घ्यावी लागते कारण त्यावरून आपला दृष्टीकोण, वर्तन आणि वागणे ठरत असते. अशी वेगवेगळ्या प्रकारे प्राप्त झालेली माहिती तिचे मेंदू संपादन आणि एकत्रीकरण करतो. त्यावर तो प्रक्रिया करतो. तिचे संश्लेषण करतो आणि आधीच साठविलेल्या महितीशी संयोजन करतो आणि स्वत:ची एक मानसिक बैठक तयार करतो यालाही मानसिक अवस्था किंवा मानसिकत्व असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचे आकलन आणि समज ही वेगवेगळी असल्याने प्रत्येकाच्या मानसिक अवस्थेमध्ये फरक असतो तसेच ही मानसिक अवस्था कायम बदलणारी अशी असते.
तुझी मेंटालिटी ठीक नाही किंवा तुझी मानसिक स्थिती बरोबर नाही असे आपण आपल्याविषयी आणि दुसर्यांविषयी आपल्या आजूबाजूच्या परिसरात नेहमी ऐकत असतो. पण मानसिक स्थिती म्हणजे काय? ती कशी तयार होते? आणि ती कशी बिघडते? हे समजून आणि उमजून घेत नाही. साहजिकच आपली मनस्थिती खराब होते तेंव्हा त्यातून बाहेर कसे पडायचे हे आपल्याला कळत नाही. तसेच आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीची सरळ मिसळ करत असतो. त्यामुळे या तिन्ही स्थिति ज्या आहेत त्याचा वेगवेगळ्याने विचार करावा लागतो, तेंव्हाच काही तरी उपाययोजना करता येतात. अशा प्रकारे जागरूक राहून आपली आतली आणि बाहेरची परिस्थिति समजून घेणे मी मानसिक सक्षमपनाची पहिली पायरी ठरते.
आपले मानसिकत्व हे जसे बाह्य घटकांशी संबधित असते तसे ते अंतर्गत घटकांशी संबधित असते. आपण कोणत्या वातावरणात आणि परिसरात वाढतो तेथील जीवनमूल्य आणि संस्कार कसे आहेत यावरही आपली मानसिक जडणघडण होत असते. आपण घेत असलेले शिक्षण याचाही परिणाम आपली मानसिक जडण घडण वर होत असतो. त्याच सोबत आपली आनुवंशिकता आणि बुद्धिमता ही सुद्धा मानसिक जडणघडण यावर प्रभाव टाकत असतात. आपण ज्या प्रकारच्या कुटुंबात राहतो, आपण ज्या प्रकारच्या समाजात वावरतो आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो हे सर्व घटक आपल्या मानसिकतेशी निगडीत असतात. अशा प्रकारे आपल्या मानसिक स्थितीची एक बैठक आपली तयार झालेली असते आणि त्याअनुरूप आपण आपला दृष्टीकोण आणि वर्तन ठरत असते. आपला दृष्टीकोण, आपले वर्तन, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा यातून आपली जीवनविषयक मूल्ये, उदीष्टे आणि ध्येये ठरलेली असतात. साहजिकच या ठरविलेल्या अथवा मनात असलेली मूल्ये, उदीष्टे आणि याच्यात अडथळे आले किंवा समस्या निर्माण झाल्या की आपली मानसिक स्थिति बिघडते. कारण हे अडथळे आणि समस्या यामुळे आपण निर्धारित केलेली आपली स्व-संकल्पना आणि स्व-प्रतिमा हिला तर धक्का पोहचतो. सोबत आपली आयुष्याची होत असलेली वाटचाल आणि ध्येये आणि उद्दिष्टे याकडे होणारी मार्गक्रमणा यात अडथळे आल्याने आपले मानसिक संतुलन बिघडते. या सर्व बाह्य बाबी आणि अंतर्गत बाबी यांचा आपल्या स्मृति मध्ये असलेले विचार याच्याशी संघर्ष झाल्याने त्याचा दबाब आपल्या मेंदू आणि मनावर येत असल्याने आपली मानसिक स्थिति ढासळते.
आपण आपले मानसिकत्व काय आहे ? ते कसे आहे ? ते का बिघडते हे पहिले, आता मानसिक संतुलन आणि मानसिक भक्कमपणा कसा साधायचा यावर साकल्याने विचार करू. मानवी मेंदूची शिकण्याची क्षमता, माहिती साठवण्याची क्षमता आणि प्रतिसाद देण्याची क्षमता ही अविश्वसनीय, अचंबित करायला लावणारी आणि तेवढीच रहस्यमय अशी आहे. त्यामुळे आपल्या मेंदूची पूर्ण क्षमता वापरण्यासाठी आपण कायम कार्यक्षिल राहावे लागते. एकदा आपल्या मेंदूची क्षमता वाढविली की तो मानसिक संतुलन साधायला लागतो. विवेकवाद हा आधी मेंदू मध्ये रुजवावा लागतो जे काही आहे ते विवेकपूर्ण रीतीने करू असे सारखे मेंदूवर बिंबवावे लागते. बुद्धिप्रमान्यवाद हा कोणतीही गोष्ट आणि घटना बुद्धीने पडताळून स्वीकारतो त्यामुळे अनावश्यक आणि चुकीची माहिती मेंदूच्या स्मृति केंद्रात जात नाही ती जाण्याअगोदर काढून टाकली जाते. अनुभववाद यात जे दिसते किंवा जे अनुभवले यावरच विश्वास ठेवला जातो. साहजिकच विवेकवाद, बुद्धिप्रमान्यवाद आणि अनुभववाद याचा स्विकार केल्याने मानसिक स्थिति भक्कम आणि मजबूत होण्यास सुरुवात होते. आपले मन हे अनंत आणि शास्वत असे आहे. या मनावर आकलन, वाचन, मनन, चिंतन, ध्यान याच्या आधारे सुयोग्य संस्कार करावे लागतात. मन मजबूत झाले की ते मानसिक स्थर्ये निर्माण करते. ज्ञान जसे आकलन आणि अमूर्तीकरण यातून प्राप्त होते तसे हे जन्मजात आणि अंगभूत असू शकते. ज्ञानी माणूस हा मानसिक दृष्ट्या अढळ आणि अविचल असा होतो. भाषा आणि सुयोग्य संवाद आपल्याला अधिक स्वीकारार्ह बनवतो. आपला कुटुंबात आणि समाजात जेवढा स्वीकार होईल तेवढे आपण मानसिक दृष्ट्या कणखर बनतो. अशा प्रकारे ह्या अनेक बाबी आणि घटक यांचा स्वीकार करून आपले मानसिकत्व समजून घेवून आणि मानसिक स्थितीचे योग्य संतुलन राखून आपण अधिक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करतो.
जीवन अनमोल आहे. ते अधिक सुंदर बनवूया.
६१/१०१ दिनांक २८.०३.२०२३
सुखाच्या शोधात ©
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७
.