ग्राम व्यवस्थापन आणि समाज विकास कौशल्य
ग्राम व्यवस्थापन आणि समाज विकास कौशल्य
खेडे हे आपल्या देशाचे हृदय आहे. खेडे हा विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. जोपर्यंत खेड्याचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास झाला असे आपण मान्य करू शकत नाही. तसं पाहिलं तर आधी खेडे तयार झाली आणि नंतर शहरे अस्तित्वात आली. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे कि खेड्याकडे चला हा त्यांचा संदेश आजही तंतोतंत लागू होतो.
कर्मयोगी गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा आपल्या कीर्तनातून व कृतीमधून खेड्यांचे महत्त्व पटवून दिले आहे. मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही ग्रामविकास वरच आधारित आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात ‘गावचा नकाशा हाच देशाचा नकाशा व गावावरून देशाची परीक्षा’. तर कर्मयोगी गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा मंत्र आपल्या सर्वांना दिला आहे .
आपला भारत देश खेड्याचा देश आहे असे आपण अभिमानाने म्हणतो. देशात साडेसहा लाख खेडी आहेत आणि साधारण ५० कोटी लोक आज खेड्यांमध्ये राहतात. त्यापैकी पंधरा कोटी लोक शेती करतात ; तर बारा कोटी लोक शेतमजुरी करतात. आज शहर असो की खेडे अन्नधान्य, भाजीपाला, फळे व दूध यासाठी सर्वांना खेडयावरच अवलंबून राहावे लागते. या साडेसहा लाख खेड्यांपैकी ६०% खेडी एक हजार लोकसंख्येच्या आत मध्ये आहेत. तर २० टक्के खेड्यांची लोकसंख्या एक हजार ते दोन हजार च्या आसपास आहे. म्हणजे मित्रांनो साडे सहा लाख खेड्या पैकी साडेपाच लाख खेडी लहान लोकसंख्येचे आहेत. खेडे हे विकासाचे युनिट जर धरले तर खेड्याचा विकास सहज शक्य आहे आणि त्या अनुषंगाने देशाचा विकास होईल असे माझे ठाम मत आहे.
आज या ठिकाणी आपण ग्राम व्यवस्थापन व समाज विकास मध्ये युवक कशा प्रकारे सहभाग घेऊ शकतील यावर आपण चिंतन करणार आहोत.
खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल : – भारत हा युवकांचा देश आहे कारण देशामध्ये 42 कोटी लोक युवक आहेत. युवक या व्याख्येत पंधरा ते एकोणतीस वयोगटातील युवकांचा समावेश होतो. युवकांमध्ये जिज्ञासा, जिद्द, चिकाटी, उत्साह, उपक्रमशीलता व वाहून घेण्याची क्षमता अशा अनेक प्रकारच्या ऊर्जा अस्तित्वात असतात. या युवकांना आपण योग्य दिशा देऊ शकलो व मार्गदर्शन करू शकलो तर हे युवक हे देशावरील भार न वाटता देशाची महत्त्वाची मानवी साधनसामुग्री होऊ शकतात .
शहर व ग्रामीण लोकसंख्या तुलना: – 1901 मध्ये फक्त 2.58 कोटी म्हणजे 10 % लोक लोक शहरात राहत होते. 1951 मध्ये 10.00 कोटी म्हणजे 17% लोक शहरात राहत होते. 2011 च्या जनगणनेनुसार 32.00 कोटी लोक म्हणजे 38 टक्के लोक शहरात राहत आहेत. याचाच अर्थ आजही देशांमध्ये 62 % जनता खेड्यामध्ये राहते. म्हणजे आजही देशाच्या विकासबिंदू खेडे हेच आहे.
आपले गाव व आपण:- बऱ्याच वेळा आपले गाव आपण शिक्षण, रोजगार व व्यवसाय यासाठी सोडतो व शहराकडे येतो. असे असले तरी आपले धागे खेड्याशी घट्टपणे जोडलेले असतात. आपण गावासाठी काहीतरी योगदान द्यावे असे प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आपण आपली नोकरी, उद्योग, व्यवसाय ,शिक्षण इत्यादी कारणामुळे आपण इतके व्यस्त होतो की खेड्यापासून आपण दुरावतो. आपले मित्र, आप्तेष्ट व ग्रामस्थ आपल्याला काही वर्षाने ओळखत सुद्धा नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.
शहरात गेलेल्या युवकां पासून ग्रामस्थ, आप्तेष्ठ व मित्र यांच्या अपेक्षा : – शहरात गेलेल्या युवकां पासून ग्रामस्थ, आप्तेष्ठ व मित्र यांच्या अपेक्षा असणे ही सहज भावना आहे. आपण त्यांच्या अपेक्षा, भावना आणि स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यास कमी पडल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याबद्दल प्रेम तर राहातच नाही तर द्वेष आणि तिरस्कार सुद्धा निर्माण होतो. असे असले तरी गावातून शहरात गेलेल्या युवकाला मात्र आपल्या गावासाठी ,गावातील माणसांसाठी व गावाच्या मातीसाठी काहीतरी करावे असे नेहमी वाटते .
शहरात गेलेल्या युवकांची मानसिकता : – मित्रांनो शहरात गेलेले युवकांच्या मनात गावाच्या विकासा बाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना जरी गावा बद्दल आत्मीयता आणि विकासाबद्दल काही करावे वाटले तरी नेमके काय करावे? मार्गदर्शन मिळेल का? योग्य दिशा मिळेल का ?सहकार्य मिळेल का? यामुळे ते संभ्रमित होतात व यातच त्यांचे आयुष्य निघून जाते .
मनामध्ये विचारांमध्ये नंतर कृतीमुळे बदल करणे:- हा बदल करण्यासाठी आपल्याला इतरांची साथ व मदत अत्यावश्यक आहे. असे असले तरी गावातील प्रस्थापितांना सहजासहजी कोणताही बदल नको असतो. कारण बदल झाले तर वाटेकरी वाढतील तसेच आपल्याला किती फायदा होईल आणि त्यामध्ये मला किती वाटा मिळेल ही त्यांच्या मनात शंका असते. यामुळे हे प्रस्थापित विरोध करतात, त्यामुळे हा विरोध विचारात घेऊन आपला वाटचाल कशी करायची आहे याचे आधी मनात गणित सोडवावे लागेल.
ग्राम विकासामध्ये तुम्हाला विरोध होणारच हे आधी समजून वाटचाल करणे:- तुम्हाला विरोध होणार हि आता प्रथम पायरी समजली पाहिजे. त्यामुळे स्वतच्या फायद्याचा विचार करणारे काही निवडक राजकारणी लोक, नेहमी स्वार्थ पाहणारे लोक, मला किती फायदा मिळेल, भांडण-तंटा लावणारे लोक अशा प्रकारच्या लोकांपासून तुम्हाला दूर राहणे जास्त फायदेशीर होईल. याशिवाय काही लोक असे असतात कि माझा फायदा झाला नाही तरी चालेल परंतु इतरांना फायदा व्हायला नको. या लोकांपासून आपण दूर राहावे. ह्या लोकांपासून दूर राहणे म्हणजे पलायन नाही हे लक्षात ठेवूनच.
गावातील महत्त्वाच्या समस्या समजून घेणे :- यामध्ये गावाची स्वयंपूर्णता समजून घेणे, वाढीस लागलेले स्थलांतर , गावातील व्यसनाधीनता, गावातील राजकारण; संसाधनांचे केंद्रीकरण व अयोग्य वाटप, शासकीय योजनांची होणारे धीम्या गतीने अंमलबजावणी, लोकसहभाग व श्रमदान ची कमतरता, रोजगार व स्वयंरोजगार ची वानवा , कौशल्य असलेले मनुष्यबळ गावात शिल्लक राहिलेले नाही , गावातील रस्ते पाणी वीज आरोग्य शाळा ह्या सोयी सुविधा सुद्धा सहज उपलब्ध होत नाहीत. ह्या सर्व समस्या एकदा समजून घेतल्या व व्यवस्थित लिहून काढल्या की त्या कशा सोडवायच्या हे आपल्याला समजणे सोपे जाते .
उत्साह शेवटपर्यंत टिकवण्यासाठी उपाययोजना:- सुरुवातीस युवकांचा कोणत्याही कामात उत्साह व सहभाग खूप असतो मात्र प्रत्यक्ष काम करायची वेळ आली की हा उत्साह व ऊर्जा टिकवणे कठीण असते. हा उत्साह कमी होतो त्याचे एक कारण आहे की आपण मूळ उपाययोजना न करता मलम पट्टी करण्याचे धोरण स्वीकारतो .
या लेखाचा उद्देश हे प्रश्न संभ्रम सोडवणे मदत करणे: – मित्रांनो गाव विकास म्हंटले कि जेष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी, पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार नगर आणि भास्कर पेरे यांचे पाटोदा खेडे औरंगाबाद ही डोळ्यासमोर येतात. खरंच या खेड्यांचा एक विकासाचा निश्चित असा पॅटर्न आहे . राळेगणसिद्धी, हिवरे बाजार व पाटोदा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले खेडेगाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण कसे होईल यासाठी कोणती कृती करावी लागेल. ते आपण या ठिकाणी पाहूया .
सर्वसमावेशक आराखडा आवश्यक :– जोपर्यंत आपण गावाचा सर्वसमावेशक आराखडा विचारात घेणार नाही तोपर्यंत आपली वाटचाल व्यवस्थित सुरू राहणार नाही. म्हणजे आपल्याला मानसिकता बदलावी लागेल. सर्व मदत शासनाकडून मिळेल व अपयशाचे खापर शासनावर फोडायचे ही मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे .
स्वतःचे योगदान काय आहे आत्मपरीक्षण करण्याची वेळ :- गावा पासून मला काय मिळते यापेक्षा मी गावाला काय देऊ शकतो? माझे काय योगदान आहे ? सर्वांमध्ये ही भावना येणे आवश्यक आहे . यासाठी समाजाच्या दृष्टीची व विकास दृष्टीची पिढी निर्माण करण्याची आवश्यकता आहे .
विध्यार्थी दशेतच संस्कार रुजवावे:- विद्यार्थी दशेतच बालसंस्कार,बलसंस्कार व श्रमसंस्कार रुजवावेत. प्रज्ञा विकास, देश प्रेम, चांगल्या सवयी, कडक शिस्त प्रथम ह्या सर्व बाबी युवकांनी आपल्यामध्ये रुजवल्या पाहिजेत. शोषण, अन्याय व अत्याचार जर होत असेल युवकांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. जाती धर्म समाजात द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीपासून आपण दूर असले पाहिजे. नशाबंदी, चराईबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी या चारसूत्री चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे यावे लागेल. वृक्षारोपण जागतिक तापमान वाढी नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचे आहे .गावांमध्ये दरवर्षी किमान शंभर वृक्ष लावले जातील व त्याचे संवर्धन होईल हा कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे . लहान बंधारे जलसंवर्धन यासारखी छोटी कामे श्रमदान व शासनाच्या निधि मधून पूर्ण करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामविकास विभाग,कृषी विभाग व जलसंधारण विभाग या कार्यालयाची संघटितपणे संपर्क साधण्याची आवश्यकता आहे. गावामध्ये गावपण व माणुसकीपण जपणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. व्यसनाधीनता व अविचार पासून गावाला दूर ठेवले पाहिजे. जोपर्यंत युवक ग्रामविकास यामध्ये सहभागी होणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होणार नाही .
तीन महत्वाच्या सुरक्षा :-ग्रामीण बांधवांना आपण तीन सुरक्षा आवश्यक देणे आवश्यक आहे.
- वैयक्तिक सुरक्षा 2. सामाजिक सुरक्षा 3. आर्थिक सुरक्षा .
१ ) वैयक्तिक सुरक्षा : गावांमधील दिव्यांग, वृद्ध, महिला, मुली व विधवा यांना वैयक्तिक सुरक्षितच असणे अत्यावश्यक आहे. या घटकानाशिक्षणासाठी व कामासाठी मुक्तपणे वावर करता आला पाहिजे. यासाठी युवकांनी सर्वांना वैयक्तिक सुरक्षा पुरवली पाहिजे. यामध्ये महिलांचा आदर करणे दिव्यांगांना मदत करणे ह्या गोष्टी प्रथम पुढे येतील .
२ ) सामाजिक सुरक्षा : समाजातल्या प्रत्येक घटकास समाज विकासात सहभागी करणे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे याला सामाजिक सुरक्षा म्हणतात. यामध्ये पंतप्रधान सुरक्षा योजना संजय गांधी योजना आम आदमी विमा योजना व इतर सुरक्षाविषयक योजना यामुळे संबंधित घटकास सामाजिक सुरक्षा वाटते.
3 ) आर्थिक सुरक्षा: म्हणजे समाजातील या घटकांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळण्यासाठी सहाय्य करणे त्याला प्रोत्साहित करणे याला आर्थिक सुरक्षा म्हणतात .यासाठी गावातील रोजगार देणे आणि तशी वातावरणनिर्मिती निर्मिती करणे याला आर्थिक सुरक्षा म्हणतात . उदाहरणार्थ जीवन ज्योती महिला आर्थिक सुरक्षा योजना.
समविचारी लोकांनी गाव विकासासाठी एकत्र येणे गरजेचे: – ही सुरुवात आपण आपल्यापासून सुरू करावी व आपण गावासाठी काय करु शकतो याचा विचार करावा व तशी कार्यवाही सुरू करावी . याचा आराखडा नकाशा रोड मॅप तो सुद्धा आपणच आपल्या बुद्धीनुसार तयार करावा. यासाठी समविचारी व सहकार्य करणाऱ्या युवकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करावा . शेवटी एकाने काम करणे व संघटनेने काम करणे यात खूप फरक असतो. एक हजार लोकसंख्येच्या गावात किमान पन्नास समविचारी तर दोन हजार लोकसंख्येच्या गावात शंभर समविचारी लोक असातातच. त्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. या समविचारी लोकांनी पूर्वापार चालत आलेल्या परंपरा पद्धती याला धक्का न देता त्यांची विचारसरणी नवीन उत्साहाने आणि जोशाने होण्याची धडपड करावी . या समविचारी लोकांनी गावातील राजकारणी , शासकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न साधावा . गावातील पायाभूत माहिती संकलन होणे महत्त्वाचे असते . समविचारी युवकांनी मूळात सुरू असलेल्या राजकीय सामाजिक प्रशासकीय व्यवस्थेत किंवा सामाजिक व्यवस्थेत कुठेही धक्का लागू न देता गावातील पायाभूत माहिती व त्या अनुषंगाने एकत्रित आराखडा तयार करणे अत्यावश्यक असते. या समविचारी ग्रुप अथवा घटकाने गावातील पायाभूत समस्यांची व सोयी-सुविधांची माहिती जमा करणे अत्यंत महत्त्वाचे कठीण असे काम आहे. या पायाभूत सुविधांची माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे व निष्कर्ष काढणे हे खूप आवश्यक आहे. अशी माहिती जो पर्यन्त गोळा होत नाही तोपर्यंत आपण गाव विकास आराखडा करू शकत नाही हे लक्षात घ्यावे.
ग्राम विकास आराखडा तयार करावा:-
यासाठी गावातील दहा प्रमुख क्षेत्र व शंभर उपक्षेत्र आपल्याला विचारात घेणे अनिवार्य आहे.
दहा प्रमुख क्षेत्र
1) अन्न व त्यानुषंगाने अन्न सुरक्षा कायदा.
2) विद्यार्थी यांना शालेय गणवेश उपलब्ध करणे.
3) निवारा म्हणजे घरकुल योजना राबवता येईल यामध्ये रमाई निवास योजना आदिवासींनी निवारा योजना पंतप्रधान आवास व योजना ह्या समाविष्ट आहेत.
४ ) पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे .
५ ) अखंडित वीज पुरवठा मिळवणे .
६ ) रस्ते म्हणजे गाव रस्ते शिवार रस्ते पानंदी रस्ते
७ ) शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबवणे
८ ) आरोग्य मध्ये मुलीच्या व स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गर्भ यामध्ये गर्भवती स्त्रियांची काळजी वृद्ध व आजारी व्यक्तींची काळजी याचा समावेश होतो .
९ ) स्वच्छतेमध्ये सांडपाणी नियोजन ओला व सुका कचरा
१० ) रोजगार म्हणजे गावांमध्येच कसे रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करणे . रोजगार मध्ये उपलब्ध त्यांना कौशल्य शिक्षण कसे देता येईल याचा विचार करावा लागतो .
१०० प्राथमिक उपक्षेत्र:-
यासाठी गावातील शंभर उपक्षेत्र आपल्याला विचारात घेणे अनिवार्य आहे. १०० प्राथमिक उपक्षेत्र पाहूया, मित्रांनो जोपर्यंत आपण या 100 उपक्षेत्राची माहिती गोळा करणार नाही तोपर्यंत आपल्याला काम करणे शक्य होणार नाही .
१ रेशन कार्ड २ आधार कार्ड ३ निवडणूक कार्ड ४ बँक पासबुक ५ जॉब कार्ड ६ गाव रस्ते ७शिवार रस्ते ८ पानंद रस्ते ९ वीज वितरण व्यवस्था ९ पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ११नळ योजना १२ विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश १३ विद्यार्थ्यांची शाळांमधून होणारी गळती १४अंगणवाडी व शाळेमध्ये देणारा पोषण आहार १५ दवाखाना १६ दुर्धर आजाराच्या व्यक्ती १७ संस्थात्मक म्हणजे दवाखान्यातील बाळंतपण १८ अनिमिया मधुमेह रक्तदाब व्यक्ती १९ शौचालय २० सांडपाणी निचरा २१ ओला व सुका कचरा २२ नोकरी २३ स्वयंरोजगार२४ कुटिर उद्योग २५ ग्राम उद्योग २६ संघटित क्षेत्र २७ बारा बलुतेदार २८ आठवडी बाजार २९ शेतमजूर ३० रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर ३१ जीवन विमा ३२ अपघात विमा ३३ सर्वसाधारण विमा ३४ स्पर्धापरीक्षा ३५ क्षमता बांधणी ३६ उपजिविका विकास ३७ माती परीक्षण३८ पीक पद्धती ३९ फळबागा लागवड ४० सूक्ष्म सिंचन ४१ भाजीपाला पिके ४२ शेती पूरक व्यवसाय ४३ दुग्ध व्यवसाय ४४ कुक्कुटपालन ४५ शेळीपालन ४६ तुती लागवड /रेशीम उद्योग ४७ बँक खाते ४८ कर्ज खाते ४९ गावातून होणारे स्थलांतर ५० गावातील असणारे मानसिक रुग्ण ५१ एकल महिला विधवा घटस्फोटीत महिला परितक्त्या महिला ५२ शासनाचे पेन्शन धारक शासनाची ५३ सामाजिक सुरक्षा योजना पेन्शन धारक ५४ जनधन योजना ५५ मुली असलेले कुटुंब ५६ पिक विमा ५७ एलपीजी गॅस ५८ आरोग्य विमा ५९ पर्यटन ६० समाज मंदिर ६१ गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ६२ स्वयंसेवी संस्था संघटना ६३ महिला मंडळी ६४ युवा मंडळे ६५ बचत गट ६६ गावाच्या परिसरातील नदी व नाले लोकसहभाग ६७ श्रमदान ६८ गावात झालेल्या आत्महत्या ६९ गावात झालेले अपघात ७० वनक्षेत्र ७१ वृक्षलागवड ७२ गायरान ७३ गायरान क्षेत्र ७४ विंधन विहिरी ७५ वाचनालय ७६ सामाजिक सभागृह ७७ बँक ७८ दूरसंचार ७९ मोबाईल टावर ८० रस्ते ८१ रस्ते लाईट ८२ सौर ऊर्जेचा वापर ८३ क्रीडांगण शिक्षण सुविधा८४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सुविधा ८५ बाल मृत्यू ८६ मातामृत्यू प्रमाण ८७ लसीकरण ८८ किमान वेतन ८९ एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन९० सेंद्रिय शेती ९१ बाजारपेठ ९२ किमान हमी भाव ९३ गावातील तंटे गुन्हे ९४ व्यसनाधिनता ९५ दारूबंदी ९६ ग्रामसभा सक्षमीकरण ९७ महा-ई-सेवा केंद्र संग्राम केंद्र सीएससी केंद्र आपले सरकार केंद्र ९८ विविध कार्यकारी सोसायटी ९९ शोषखड्डे विहीर पुनर्भरण प्रादेशिक योजना उपसा योजना १०० पोषण आहार सकस आहार अशा किमान शंभर बाबींची माहिती आपल्याला संकलित करावी लागणार आहे .
खेड्यातील शासकीय कर्मचारी यांच्याशी सु-संवाद :- या मंडळीच्या सोबत संवादच नाही तर सुसंवाद वाढायला आवश्यक आहे. हळूहळू हा सुसंवाद पंचायत समिती स्तरावर व तालुका स्तरावर यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. संवाद वाढला की शासकीय योजना चांगल्या प्रमाणे राबवता येतात. यासाठी या शासकीय कर्मचारी अधिकारी यांची मोबाईल क्रमांक ईमेल आयडी व्हाट्सअँप क्रमांक आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. काही शंका-कुशंका असतील तर आपण त्यांना निर्भयपणे विचारले पाहिजे परंतु मित्रांनो त्यांना फोन करून डिस्टर्ब करणे योग्य नसते म्हणून आपण प्रोटोकॉल पाळावा व व्हाट्सअप वर आपला काय मुद्दा आहे तो पाठवावा आणि मग उद्या किंवा परवा सकाळी अकरा वाजता आपल्या सोयीनुसार फोन करतो असे त्यामध्ये लिहावे किंवा त्यांनी व्हाट्सअप उत्तर द्यावे असे म्हटल्यास त्यांनासुद्धा ते सोयीचे होते.
गावाच्या वतीने सकारात्मक गट निर्माण करणे यालाच दबावगट म्हणूया :- VDP Village Development Plan हा विकास आराखडा तयार झाला की त्यातील १०० निर्देशांक घेवून आपलं गाव राज्याच्या व देशाच्या तुंलनेत पुढे आहे की मागे आहे याची तुलना व याचा तुलनात्मक अभ्यास करणे सुद्धा आवश्यक आहे.जे निर्देशांक मागे असतील तर आपण त्या निर्दशक अनुसार काम करणे आवश्यक आहे
एकदा गावाचा तुलनात्मक अभ्यास झाला कि खालील चार महत्वाच्या निर्देशांकावर काम होणे अथवा करणे आवश्यक आहे.
१ वैयक्तिक बाबींच्या निर्देशांक वाढवणे : उदा एक ज्या व्यक्तीमध्ये व्यसनाधीनता आहे त्याची व्यसनापासून सुटका करणे आवश्यक आहे. आपण समाजामध्ये बरेचदा पाहतो की सत्संग, आर्ट ऑफ लिविंग, विपश्यना ही अशी काही क्षेत्र आहेत. अशा संस्थांचीही मदत घेणे आवश्यक आहे .
२ सामाजिक स्तरावरील बाबींचा निर्देशांक वाढवणे : – उदाहरण द्यावयाचे झाल्यास ग्रामपंचायत बैठक, ग्राम सभा अशा कार्यक्रमांच्या वेळी एकत्र येऊन गावातील समस्यांवर सकारात्मक चर्चा करणे आवश्यक आहे
3 संस्थात्मक वाढ व विकास याचा निर्देशांक वाढवणे : – यामध्ये आपल्या खेड्यामध्ये ज्या संस्था संघटना व सेवाभावी संस्था आहे. त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यात सुधारूण करून त्यांचा निर्देशांक वाढवणे आवश्यक आहे. गावांमध्ये संग्राम केंद्र आहे त्याचा संगणक बिघडला किंवा प्रिंटर बिघडला आणि एखादी आयटी शिक्षण घेतलेला युवक आहे तर त्याने सहज त्याला सहकार्य करुन गावाचा विकास म्हणून ते व्यवस्थित सुरु करावे. भलेही दहा लोकांनी पन्नास रुपये वर्गणी काढून केले तरीही संस्थात्मक वाढ व विकासाची बाब होऊ शकेल . गावांमधील शाळा आहे त्या शिक्षकांच्या अडीअडचणी समस्या समजून घेणे त्यांना प्रोत्साहन देणे व विद्यार्थ्यांचे योग्य रीतीने अभ्यास दर्जा वाढवणे अशा आपल्याला करता येईल. ह्या गोष्टी फक्त उदाहरण दाखल आहेत अशा प्रकारे प्रत्येक बाबीवर आपल्याला काम करायचे आहे
४ . शासन व सरकार स्तरावरील समन्वय निर्देशांक वाढवणे : – यामध्ये शासकीय योजनांचा लाभ व शासकीय योजनेचा लाभ पाहिजे असलेले लाभार्थी यांचा समन्वय साधून लाभ देणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास उज्वला गॅस योजना चे उदाहरण घेवूया. याबाबत पात्र लाभार्थी यांची यादी घेणे, लाभार्थी यांचे फोर्म भरून घेणे, एजन्सी सोबत समन्वय साधने, पाठपुरावा करणे आणि लाभार्थ्यांना गस जोडणी मिळवून देणे. शासनाच्या योजनांच्या व्यवस्थित पाठपुरावा केला तर शासनाच्या योजना खेड्यापर्यंत पोहोचू शकतात व गरजू लोकांना त्याचा लाभ मिळू शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास अलीकडेच केंद्र सरकारने सामाजिक अंकेक्षण ही योजना सुरु केली आहे त्यामध्ये संजय गांधी योजनेचे एका खेड्यात पाच श्रीमंत व्यक्ती लाभ घेत होते तर दहा खरी गरज व्यक्ती अपेक्षित होती जेव्हा ग्रामसभा घेतल्या गेली तेव्हा त्या पाच व्यक्ती गुपचूप बाहेर पडल्या. आपली व आपल्या शेजाऱ्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शासन आपल्या कडे लाभ घेऊन येईल यापेक्षा आपणच शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितांना देऊ ही मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे .
अशा रीतीने खेड्यापासून दूर झालेले, शहरात शासकीय व खाजगी क्षेत्रात कर्मचारी व अधिकारी पदावर गेलेले किंवा यशस्वी उद्योजक व व्यावसायिक पदावर गेलेल्या व्यक्तींनी खेड्याची नाळ न तोडता आपल्या खेड्यामध्ये वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, संस्थात्मक पातळीवर आणि शासन पातळीवर काम करण्यास सुरुवात करावी व आपल्या गावाच्या विकासामध्ये सहभाग घ्यावा. गावाचा -खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल आणि असा विकास होण्यासाठी युवकांनी खेड्यामध्ये प्रत्यक्ष जावून काम करणे आवश्यक आहे .सरते शेवटी देशातील बेचाळीस कोटी युवकांच्या हातात देशातील साडे सहा लाख खेड्यांचे भवितव्य आहे. कोण सुरुवात करते? यापेक्षा आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर सुरुवात करावी. चांगल्या कामाला व सकारात्मक कामाला निसर्ग सुद्धा साथ देत .चला आपण जागे होऊया, पुढे जावूया आणि उज्ज्वल भारताचे स्वप्न पूर्ण करूया.
राजीव नंदकर
उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७