किटकांमधील कैमॉफ्लाज Camouflage in Insects

किटकांमधील कैमॉफ्लाज Camouflage in Insects

https://www.facebook.com/share/p/16Jje1jNxh

कीटक आणि माणूस याचं नातं भाऊबंदासारख आहे. जेथे माणूस आहे तेथे कीटक आहे आणि जेथे कीटक आहे तेथे माणूस आहे. झुरळ, मच्छर, मुंगी आणि माशी यांनी माणसाचा पिच्छा अनादी काळापासून सोडला नाही. दोघंही एकमेकांना शिव्याशाप देत देत आहे त्या परिस्थितीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. प्रस्तुत प्रकरणात कीटक प्राप्त भौगोलिक परिस्थितीशी त्यांचे रंगछटा आणि आकार बदलून कसे एकरूप होतात याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

माणूस जसा त्याचे स्वभावातील आणि वागण्यातील रंग बदलून इतरांना जेरीस आणतो. तसे काही किटकही त्यांचे बाह्य रंग आणि आकार बदलून इतरांना जेरीस आणण्याचे काम करतात. कीटकांचे असे रंगसंगती बदलणे, नक्कल करणे आणि आकार बदलणे या पद्धतीला कैमॉफ्लाज असे म्हणतात. तसेच याला छद्मावरण या छलावरण असेही म्हटले जाते.

बॉर्डरवरील सैनिक शत्रूला दिसू नये म्हणून जो पेहराव करतात त्याला कैमॉफ्लाज असे म्हणतात.तसेच वन विभागातील कर्मचारी जो पेहराव करतात त्यालाही कैमॉफ्लाज असे म्हटले जाते.या पेहरावमुळे जंगलातील हिंस्र प्राण्यांपासून बचाव तर होतोच तसेच या पेहराव मुळे इतर प्राण्यांनाही त्रास होत नाही.

किटकांमध्ये कैमॉफ्लाजचे दोन प्रकार दिसून येतात. एका प्रकारात जन्मतः परिस्थितीनुरूप आकार व रंगछटा प्राप्त होतात तर दुसऱ्यामध्ये परिस्थितीनुरूप आकार प्राप्त केला जातो व नकल्ल केली जाते. कीटकांचा जन्म आणि मृत्यू हा प्रवास अगदी सुटसुटीत असतो. जन्माला येणं, विविध अवस्था मधून प्रवास करणे, हा प्रवास करत असताना अन्न मिळविणे, शिकाऱ्यापासून स्वतःचा बचाव करणे, प्रजनन करणे आणि मृत्यू पावणे असा प्रवास असतो. या प्रवासात कीटकांची सर्वात जास्त कसोटी ही स्वतःचा बचाव करण्यात लागते आणि यासाठी सर्वात जास्त ऊर्जा सुद्धा खर्च करावी लागते.

नाकतोडा नावाचा कीटक हा गवतात राहतो त्यामुळे त्याने त्याची रंगसंगती हिरव्यागार गवतासारखी करून घेतलेली आढळून येते.स्टिक कीटक हा गवताच्या वाळलेल्या काडीसारखा स्वतःचा आकार घेऊन जन्माला येतो. त्यामुळे तो गवतात अक्षरशः ओळखू येत नाही. लिफ कीटक हा झाडाच्या पानासारखा आकाराचा आणि हिरवा रंगाचा असतो त्यामुळे झाडावर असेल तर तो अगदी ओळखता येत नाही. लेसविंग नावाची कीटकांची अळी तर स्वतःभोवती कचरा गुंडाळते त्यामुळे कचरा की लेसविंगची अळी हा भेद करणे शक्य होत नाही.काही फुलपाखरे ही अगदी वाळलेल्या पानासारखी असतात की ज्यामुळे ती पानांवर बसली तर ओळखू येत नाहीत.काही बग हे झाडाच्या पानाला त्याच्या आकाराची छिद्रे करून ठेवतात त्यामुळे त्याची शिकार करायला आलेल्या शिकारी किटकाला किंवा पक्षाला छिद्र आणि बग यातील फरक कळणे शक्य होत नाही.कोळी नावाचा कीटक हा तर त्याच्या मार्गावर मेलेल्या मुंग्या ठेवतो की ज्यामुळे त्याचा शिकारी वाट चुकतो. ड्रॅगनफ्लाय कीटक भिंतीवर अशी जागा निवडतो की तो कोणाला दिसत नाही.पानावरील हिरवे आणि पिवळे भुंगेरे तर पानावर बसले आहेत की नाही हेच कळत नाही.मॅन्टिड नावाचा कीटक आशा प्रकारे स्वतःला विकसित करतो की तो अगदी फुलासारखा आकार घेतो, कधी झाडाच्या वाळलेल्या डहाळी सारखा किंवा सुकून पिवळ्या झालेल्या पानासारखा आकार घेऊन आपली शिकार साध्य करतो.

आशा प्रकारे कीटक गूढ रंगछटा वापरून,आकार प्राप्त करून किंवा नक्कल करून प्राप्त परिस्थिती सोबत जुळवून घेतात त्यालाच आपण कैमॉफ्लाज म्हणतो. यामुळे कीटकांचे अस्तित्व लपले जाऊन त्याला दुहेरी फायदा होतो एक म्हणजे शिकाऱ्यापासून सुटका करून घेता येते आणि दुसरे म्हणजे शिकारीला बेसावध ठेवून त्याची शिकार करणे शक्य होते.

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

९९७०२४६४१७

०५८/३६५ दिनांक २७.०२.२०२५

कीटकांची आश्चर्यकारक दुनिया ©