कष्टाशिवाय यश नाहीच
कष्टाशिवाय यश नाहीच
साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी आणि आम्ही सर्वच मित्र स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असू. आमचा अभ्यास सकाळी आठ वाजता सुरु होत असे व रात्री आठ वाजता संपत असे. हा अभ्यास निश्चितच कष्टसाध्य असल्याने मी दिवसभर खूप थकून जात असे, म्हणजे पाठीला रग लागलेली असे, नोटस काढून काढून बोटांना खड्डे पडलेले असत आणि त्या उपर पोटात भुकेचे कावळे कोकत असत. पण मला आठवते जेंव्हा संध्याकाळी अभ्यास संपवून मी घरचा प्रवास करायला सुरुवात करत असे त्या वेळेस या कष्टातील एक आनंदची अनुभूती माझ्या मनाला नेहमी जाणवत असे. आजचा दिवस सत्कारणी लागला आणि आपण आपली ध्येय आणि उदिष्टे यांच्याकडे योग्य रीतीने मार्गक्रमण करत आहोत याची ती सुखद अनुभूती होती.
ही बाब मी आयुष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून मार्गक्रमण करतांनी अनेक वेळा या पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. आपले ध्येये आणि उदीष्टे आणि त्यासाठी आपण उपसत असलेले कष्ट याला प्राथमिकता दिली की त्यामधून एक प्रकारची सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती निर्माण होते हे मी वेळोवेळी अनुभवले. मात्र अशी कष्टातून सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती प्राप्त करणे, ती वृद्धिंगत करणे आणि ती टिकवून ठेवणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. मात्र हे एकदा जमले की तुम्ही शरीराने आणि मनाने तुमच्या कोणत्याही कामाशी आणि युवकांच्या संबधाने बोलायचे झाल्यास युवक अभ्यासाशी एकरूप होवून त्यातून त्यांना समाधान, सुख, आनंद मिळतो आणि युवक यशाकडे वाटचाल करतात. प्रस्तुत लेखात युवकांनी अभ्यासाच्या कष्टातून सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती कशी प्राप्त करायची आणि आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काम आणि कष्ट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनरूपी नौका पुढे घेवून जाणेसाठी कष्टाला पर्याय राहत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात वर्तमानकाळातील मौजमज्जा यावर पाणी सोडण्याचे ध्येर्य युवकांनी दाखवले तरच त्याचा भविष्यकाळ उज्वल होवू शकतो. काही कष्ट हे शारीरिक स्वरूपाचे तर काही मानसिक स्वरूपाचे असतात. कोणत्याही कामाचा ताण हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर येत असतो. युवक हे महाविद्यालयीन परीक्षांचा आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. साहजिकच या अभ्यासाचा ताण तनाव युवकांवर येत असतो. मात्र असा ताण युवकांनी कशा प्रकारे हाताळायचा याचे कसब त्यांनी हस्तगत करणे आवश्यक आणि अनिवार्य असते. नाहीतर सतत ताण निर्माण झाल्याने युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तर धोक्यात येतेच, शिवाय युवकांची प्रगती आणि विकास हा उलट्या दिशेने होण्यास सुरुवात होतो. त्यासाठी अभ्यास आणि अभ्यासासाठी उपसले जाणारे कष्ट यातून युवकांनी सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती कशी हस्तगत करायची आणि त्यातून यश कसे मिळवायचे हे समजून घेवूया.
१.अभ्यासाचे स्वरूप समजून घ्या : अभ्यासाचा आवाका युवक समजून घेत नसल्याने त्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता येत नाही. नियोजन फसले की अभ्यास फसतो. तो फसला की वेळेचा अपव्यय होतो. वेळेचा अपव्यय झाला की वेळेचे नुकसान होते. नुकसान झाले की मानसिक त्रास होतो. एकंदर आपला अभ्यास काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याची वेळ सीमा काय आहे हे सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा काहीही नियोजन न करता युवक हे अभ्यास सुरु करत असल्याने बरेच पुढे गेल्यानंतर अभ्यासातील त्रुटी लक्षात येतात आणि वेळेचा बट्याबोळ होत असतो. सबब युवकांनो सर्वप्रथम अभ्यासाचे स्वरूप समजून घ्या.
२.अभ्यासाचे उदिष्ट आणि ध्येय तपासा : तुम्ही जो अभ्यास करत आहात त्याचे उदिष्टे आणि अंतिम ध्येये काय आहेत त्याची माहिती घ्या. ज्या कष्टाला अंतिम ध्येय नसते ते काम म्हणजे फक्त ढोर मेहनत असते हे विसरता कामा नये. त्यामुळे तुमच्या अभ्यासाचे अंतिम ध्येय निश्चित करा. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर अधिकारी होणे हे तुमचे ध्येय असायला हवे. म्हणजे तुमच्या अभ्यासाचे तुम्ही अंतिम ध्येय पहिले निश्चित करणे आवश्यक राहते. तरच त्या अभ्यासात तुम्हाला उत्साह येवू शकेल.
३.अभ्यासाची वेळ आणि प्राथमिकता निश्चिती करा : आपल्याला अभ्यास कसा पूर्ण करायचा हे पूर्णतः समजून घेतले की त्यातील अनेक घटक यांचे संयोजन कसे करायचे हे ठरवता येते. आपल्याकडे असलेली वेळेची मर्यादा आणि उपलब्ध असलेले संसाधने यावरून अभ्यासाची प्राथमिकता निश्चितीकरण करता येते. अभ्यासाची लहान लहान तुकड्यामध्ये विभागांनी करा. अभ्यासाची तुकड्यांमध्ये विभागनी झाली की त्यातील प्रत्येक भागाची किंवा तुकड्याची प्राथमिकता निश्चित करा. आपण काय करतो की अभ्यास न विभागता एकदम डोक्यावर घेतो, त्यामुळे एकदम दबाव निर्माण होऊन आपण कोलमडून पडतो.
४.अभ्यासाशी प्रामाणिक राहा : अभ्यासाशी प्रामाणिक राहणे म्हणजे वेळेत गुणवत्तापूर्ण रीतीने अभ्यास पूर्ण करणे होय. युवक अभ्यास करतात मात्र त्यांच्या सवडीने व सोयीने आणि इथेच चूक होते. साहजिकच त्यामुळे अभ्यासाशी प्रामाणिकपणा राहत नाही आणि अभ्यास ज्या गुणवत्तेने व्हायला हवा तसा होत नाही. एकदा अभ्यास मागे पडला की त्याचा नाहक त्रास आपल्याला होवू लागतो. त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाशी प्रामाणिक राहणे होय. प्रामाणिक राहिल्याने अभ्यासातून निर्माण होणारा आनंद हा आपल्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेत व्यवस्थित झिरपतो आणि आपल्याला अभ्यासाचा दबाव राहत नाही.
५.अभ्यासाशी समरूप व्हा : अभ्यास आणि कष्ट हे गुणोत्तर एक समान रीतीने आणि गतीने चालते. अभ्यास कष्टाशिवाय नाही आणि कष्ट नाही तर अभ्यास नाही. साहजिकच अभ्यासाला समरूप होवून कष्ट करणे हि अनिवार्यता ठरते. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रकारे अभ्यासाला समरूप व्हावे लागते. ही समरुपात अभ्यास तडीस घेवून जाते आणि त्यातून निर्माण होणारे कष्टाचा त्रास सुद्धा कमी करते. आपले अभ्यासाशी जो पर्यंत समरूप होत नाहीत तो पर्यंत त्या अभ्यासाची गोडी युवकांमध्ये निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही.
६.अभ्यासाप्रती समर्पित व्हा : अभ्यासाप्रती स्वतः समर्पित होणे, हे अभ्यास वेळेत आणि गुणवत्तेने तडीस घेवून जाणेसाठी आवश्यक असते. समर्पण म्हणजे आपल्या कष्टाची आणि घामाची आहुती अभ्यासरुपी यज्ञात देणे होय. हे समर्पण दोष विरहित असले की कष्टाच्या ज्वाला ह्या अभ्यासाच्या अग्नीतून बाहेर पडतात. एकदा आपण या अभ्यासरूपी यज्ञ कुंडात समर्पित झालो की अभ्यासाचा आणि कष्टाचा त्रास होत नाही. अभ्यास हीच पूजा, अभ्यास हीच भक्ती आणि अभ्यास हीच शक्ती म्हणून काम करते. त्यातून एक समर्पणाची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जातो .
७.अभ्यासाचा ताण घेवू नका : ‘अभ्यासाचा ताण मी घेत नाही, तर तो येतो’, असे आपल्या पैकी बरेच जण उत्तर देतील. मात्र आपण एकदा तशी मनस्थिती बनवली की असा ताण येणारच. ताण येत आहे, पण मी तो घेत नाही, एवढी जरी खंबीरता दाखवली तरी तणाव कमी होण्यास सुरुवात होते. तणाव हा बऱ्याच अंशी मानसिक असतो. त्यामुळे त्याची सुरुवात ही मानसिकरीत्या होवून त्याचे विपरीत परिणाम शारीरिक होतात. त्यामुळे अभ्यासाची प्राथमिकता निश्चित करून नियोजन केले की ताण कमी होतो.
८.अभ्यासाला विरोध करू नका : अभ्यास म्हटले की कष्ट उपसावे लागतातच. अभ्यास हा कष्टातुनच मार्गी लागतो. पण आपण जर अभ्यास करत असतांना मला कष्ट पडायलाच नको अशी मानसिकता बनवली की अभ्यासाची गती संथ होते.गती कमी झाली की अभ्यास पूर्ण होण्यास वेळ लागतो. वेळ लागला की अभ्यासाचा ताण परत आपल्या दिशेने सरकतो. त्यामुळे जेवढा विरोध अभ्यासाला तुम्ही कराल तेवढा त्या अभ्यासाचा त्रास तुम्हाला होईल हे लक्षात घ्या.
९.अभ्यासाच्या ताणाला परतून लावू नका: तुम्ही जर अभ्यासातून निर्माण होणाऱ्या ताणाला परतून लावायचा प्रयत्न केला तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतील. तुम्ही जर ताण येतो म्हणून अभ्यास थांबवला तर तुमची अपेक्षित उदिष्टे आणि ध्येये पूर्ण होवू शकणार नाहीत. त्यामुळे बऱ्याच युवकांची फसगत होते. अभ्यास टाळावा की अभ्यास करावा अशी फसगत झाली की शक्यतो अभ्यास थांबवला जातो किंवा टाळला जातो आणि प्रगतीचा आलेख खाली खाली जाण्यास सुरुवात होते.
१०.अभ्यासातील तणावाला योग्य प्रकारे प्रवाहित करा: अगोदर सांगितल्याप्रमाणे अभ्यास आणि त्याला जोडून येणारे कष्ट हे युवकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. यामुळे याचे महत्व विचारात घेवून आपण अभ्यास पूर्ण करत असतानी निर्माण होणाऱ्या तणावाला योग्य प्रकारे प्रवाहित केले पाहिजे. त्याला योग्य दिशा दिली पाहिजे. अभ्यासातून निर्माण होणाऱ्या तणावाला प्रवाहित करायला येणे ही खूप महत्वाची बाब आहे. त्यासाठी अभ्यासातील अडचणी शेअर करा त्याबाबत चर्चा करा. अभ्यासाचा जास्त तणाव येत असेल तर थोडे थांबा पुन्हा अभ्यास सुरु करा.
११.अभ्यासात थकवा आणि आळस याची भेट होवू देवू नका : अभ्यास करत असताना आपल्या शरीरातील उर्जा ही अभ्यासनुरुप खर्च होत असते. अभ्यास करत असताना तुम्हाला एक प्रकारचा थकवा येत असतो. या थकव्याला आळसामध्ये रुपांतरीत करण्याचे काम तुमचे मानसिक संतुलन करत असते. एकदा तुमचा थकवा आणि आळस याची गट्टी जमली की तुमचा अभ्यास अडकलाच म्हणून समजा. त्यामुळे तुमचा थकवा हा मानसिक आळसापासून दूर ठेवायला शिका.
१२.अभ्यासाचा अपमान करू नका : बऱ्याच वेळा आपण स्टेटमेंट ऐकतो की मला अभ्यासाचा खूप कंटाळा आला आहे! असे बोलून खरे तर अभ्यासाचा आपण अपमान करत असतो. आपण निवडलेले किंवा आपल्या वाट्याला आलेले क्षेत्र हे एकदा आपण स्वीकारले की त्यात तडजोड किंवा चालढकल करता कामा नये. अकारण याचा संयुक्तिक परिमाण आपल्या एकंदर जीवनाच्या वाटचालीवर होतो.
१३.अभ्यासाबद्दल मन संकुचित करू नका : आपले मन संकुचित केले की अभ्यासातून निर्माण होणारे फायदे हे खुरटे व तोकडे होतात. त्यासाठी अभ्यासातून निर्माण होणारा ताण आणि त्रास मधून आनंद व सुख शोधण्याचे कसब आपल्याला निर्माण करावे लागते. हे कसब आपल्या अंगी रुजवण्यासाठी आपण काय करत आहोत किंवा करणार आहोत याच्याशी प्रामाणिक व समरस व्हा. एकदा ही समरसता आली की अभ्यासातील गोडी वाढते व त्याबद्दल आपल्याला प्रेमही वाढते.
अशाप्रकारे उपरोक्त नमूद बाबींचा स्विकार करून आपल्या अभ्यासाचा श्रीगणेशा युवकांनी करायला हवा. अभ्यासाला गती देण्याचा प्रयत्न अत्यंत समरूप आणि समर्पित होवून करा. अभ्यासाची चालढकल करू नका. काम आणि कष्ट हाच मानवाचा धर्म आहे. काम आणि कष्ट यातच मानवी जीवनाचे रहस्य सामावलेले आहे. अभ्यासातूनच युवकांचा विकास आणि आयुष्य घडत असतो हे कदापि विसरू नका. म्हणूनच उपरोक्त नमूद बाबी जाणीवपूर्वक स्विकारून आणि त्यांची अंमलबजावणी युवकांनी आपल्या दैनंदिन अभ्यासात करून त्यातून सुखदायक भावना आणि आनंदाची अनुभूती घेवून एक यशस्वी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.
राजीव नंदकर
अतिरिक्त जिल्हाधिकारी, यशदा पुणे
९९७०२४६४१७