कंपास पेटी
कंपास पेटी
https://www.facebook.com/share/p/16Qqd83iBB
आज शाळेत पोहचलो तेंव्हा बराच उशीर झाला होता.परिपाठ सुरू झाला असेल आणि तुम्ही शाळेत आला तर शाळेच्या गेटवरच थांबायचे असा कडक नियम आमच्या झेडपीच्या शाळेचा होता. मी आपलं आपसूक गेटवर थांबून घेतलं. तेवढ्यात मुरली सुद्धा धापा टाकत मागून आला. “काय राजू आज तू पण का? असा खोचक प्रश्न त्यानं माझ्याकडे वर खाली बघून माझ्यावर फेकला.मुरलीसाठी उशिरा येणं काही नवीन नव्हतं.तो कालही उशिरा आला होता, आजही उशिरा आला होता आणि कदाचित उद्याही उशिरा येणार होता. मुरली त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण निवांतपणे आणि मजेशीरपणे जगत होता. परिपाठ संपल्यावर छडीचा प्रसाद उशिरा येणाऱ्या मुलांना रोज ठरलेला होता. त्यामुळे माझ शरीर हळूहळू थरकापायाला सुरुवात झाली होती.आज मी हा प्रसाद खाणार म्हणून माझीही भीतीने गाळण उडाली होती.
परिपाठ संपला तसे गुरुजी छडी घेऊन येतांना दिसले. त्यांच्या हातात बांबूची गुळगुळीत छडी होती.त्यामुळे मला अजूनच भरून आलं.डोळ्याच्या काठावर आलेलं पाणी मी हुंदक्याचा बांध घालून तेथेच अडवलं.”काय राजू आज तू पण का?” मुरलीने विचारलेला प्रश्न गुरुजींनी पुन्हा विचारला. मी मात्र मूग गिळून गप्प होतो.मी हात पुढे केला तशी गुरुजींनी जोरात छडी हातावर मारली आणि माझा अश्रूंचा बांध फुटून पाणी वाहायला सुरुवात झाली. हळू हळू पावले उचलत मी पुढे चालता झालो तर मुरली मागून दात विचकत आला. त्याने माझ्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाला “राजू उद्यापासून यार आपण लवकर शाळेत येऊ”.त्याच्या बोलण्यात माझ्या बद्दल मला समानभूती जाणवत होती.
वर्गात आम्ही पोहचलो तेंव्हा सर्वच मुले नेहमी प्रमाणे गोंगाट करत होती. मी नेहमी वर्गात डाव्या बाजूला एकदम पुढे बसत असे. मात्र आज मी माझ्यावरच नाराज असल्याने मागच्या बाजूला बसलो. तशीही माझी आज हुशार विद्यार्थ्यांसारखी पुढे बसण्याची इच्छा नव्हती कारण मला अपराध्यासारखे वाटत होते. डोक्यात आज घडलेल्या घटनेचे सारखे विचार येत होते आणि मधूनच रडायला सुद्धा येत होतं. सुन्या आणि दिन्या यांनाही कदाचित हे जाणवलं होतं. त्यांनाही मी आज छडी खाली हे एव्हाना कळलं होतं.दिन्याने येऊन ” राजू तुझी आज तब्बेत बरी नाही का?” अशी प्रश्नार्थक विचारपूस केल्याबरोबर मी दीर्घ श्वास घेऊन माझं रडू अडवलं.
आज सकाळच्या घाई गडबडीत मी माझी पत्र्याची आणि दोन्ही बाजूनी उघडणारी कंपास पेटी घरी विसरलो होतो. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी कंपास पेटी म्हणजेच सर्वस्व होत. कंपास पेटीमध्ये पाटीवरील पेन्सिलचे दोन तुकडे असत. खूप भूक लागली तर ते आपोआप तोंडात जात. कंपास पेटी वर ओरखडा पडला तर मनावर ओरघडा पडलाय असे वाटे. कमेलीन ब्रँडत्या वेळेस लोकप्रिय होते. असे असली तरी लोकल कंपनीची कंपास पेटी माझ्याकडे होती. मुली सहसा चॉकलेट व गोळ्या कंपास पेटीमध्ये ठेवत. या कंपास पेटीमध्ये एक कागद अंथरून त्याच्या खाली अत्यंत महत्वाच्या गोष्टी जसं एक किंवा दोन रुपयांची नोट किंवा नाणी ठेवली जात. काही बहाद्दर या कागदाच्या खाली ब्लेडही ठेवत असत. वर्गातील कोणी तरी फुटीर निघाल्याने परवाच गुरुजींनी सुन्याने कांचनला लिहलेली चिठी त्याच्या कंपासपेटीच्या खालच्या भागातून हस्तगत केली होती.
कंपासच्या वरच्या बाजूला वेळापत्रक चिटकविण्याची पध्द्त प्रचलित होती.वर्तुळ कंपास हे सर्वात आकर्षक आणि कामाचे साहित्य असल्याने कदाचित ह्या पत्र्याच्या पेटीला कंपास पेटी म्हणत असावेत. वर्तुळ कंपास आणि करकटक हे कंपास पेटी मधील मुलांचे सर्वात मोठं शस्त्र असे.विशेषतः खालच्या आळीचा बाळू त्याच्या शाळेतील भांडणात याचा वापर करत असे. मागच्या महिन्यांत त्याने मुरलीच्या मांडीत दुभाजक म्हणजे करकटक घुसवला होता. दुभाजक किंवा करकटक म्हणजे दोन्ही बाजूने तीक्ष्ण टोक असलेलं साहित्य. या कंपास पेटीत एक ४५ डिग्रीचा आणि एक ६० डिग्रीचा त्रिकोणी गुण्या असे मात्र त्याचा वापर खूप कमी होत असे. पेटीत अर्ध वर्तुळाकार कोन मापक सुद्धा असे.अर्ध्या फुटाची फूट पट्टी या कंपास पेटित असे मात्र ती १५ आगस्ट पर्यंत तुटलेली असे त्यापुढचे दिवस लाकडी पट्टीवर आम्ही काढत. शिशाची पेन्सिलचे टोक बनवणे हा आमचा एक विशेष उपक्रम असे. बऱ्याच वेळा असे टोक बनवत असतांना शार्पनर मधून ते तुटून पडे मग आमचाही जीवही तुटल्या सारखा होई. खोडून खोडून काळाकुट्ट झालेला खोडरबर सर्वांकडे होता.मिळाला तर शाईचा पेन, एक फाऊंटन पेन सर्वच मुलांकडे होता.एखादी रिफिल जर कंपास पेटी मध्ये ठेवली तर तिची शाई कंपास पेटीमध्ये कधी पसरेल याचा मेळ नव्हता.रेनॉल्ड पेनाची एन्ट्री झाली होती मात्र काही तुरळक अपवाद वगळता हा पेन कोणाकडेही नव्हता.एकंदर जसं जसं हे साहित्य हरवत जात असे तसे तसे आम्ही मार खात असू.कधी कधी डिसेंबर पर्यंत फक्त पेन आणि पेन्सिल एवढंच कंपास पेटीमध्ये शिल्लक राहत असे.
आज मी कंपास विसरलो होतो त्यामुळे मला आज गरज पडली तर कोणाकडून तरी साहित्य घ्यायला लागणार होते याची जाणीव मला झाली होती. त्यामुळे दिन्याच्या कानावर ही गोष्ट मी घालून ठेवली होती.कारण वेळेवर कंपास मधील कोणतेही साहित्य मुलं कोणालाही देत नाहीत हे मला पक्के ठाऊक होते. वर्ग शिक्षक एव्हाना वर्गावर आले होते.त्यांनी मी मागे बसलेला पाहून मला पुढे बसण्यास खुणावले मीही निमूटपणे पुढे जाऊन बसलो.
आज गुरुजींनी गणित-भूमिती शिकवू नये असे मनोमन वाटत होते.पेनाची सोय तर माझी झाली होती. सुन्याने उसना दिलेल्या पेनाच्या पुढच्या भागातून निघणाऱ्या शाई मुळे माझी बोटे निळी झाली होती. या शाईचे दोन तीन डाग आता शर्टवर स्पष्टपणे दिसत होते. जेंव्हा जेंव्हा शर्टावरील शाईकडे माझे लक्ष जाई तसे तसे आईची आठवण येत होती. तिच्या हे लक्षात ज्या वेळेस येईल तेंव्हा माझे काही खरे नाही याची जाणीव मला झाली होती.
आज गुरुजींनी गणित-भूमिती शिकवला नाही त्यामुळे तशीही कंपास पेटीची गरज पडली नाही. उन्ह कमी होऊन पश्चिमेकडील डोंगरावर सूर्य मावळतीकडे झुकल्याने सावल्या पूर्वेकडे निघण्याची लगबग करत होत्या. बरोबर साडेपाच वाजता शाळा सुटल्याची घंटा झाल्याबरोबर मुलं किलबिलाट करत आणि एकमेकाला ढकलत बाहेर पडली. मीही जड पावलांनी घराकडे मार्गस्थ झालो. आयुष्यात वेळेवर सर्व गोष्टी करायला हव्यात असा दृढनिश्चय मी केला आणि पुढे आयुष्यात त्याची अनेक वेळा अंमलबजावणी केली म्हणून कदाचित इथपर्यंतचा प्रवास सुकर आणि सुखकर झाला.
राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी
छोट्या गोष्टी आणि मोठे धडे ©
७२/३६५ दिनांक २८.०६.२०२५
९९७०२४६४१७