आशावाद जिवंत ठेवा(Keep Optimism Alive)

आशावाद जिवंत ठेवा ! (Keep Optimism Alive )

उजाड माळरानावर जेथे फक्त रखरखते ऊन आणि धुळीचे लोट असतात. तेथील निर्जीव आणि निस्तेज पडलेल्या गवताला सुद्धा पाण्याच्या थेंबाला बिलगून फुटण्याचा आशावाद असतो. पुढचा क्षण आणि वेळ याची शाश्वती नाही अशा मानवी जीवनाला हाच आशावाद घट्ट रोवून ठेवत असतो.

महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती,हे तत्वज्ञान अजूनही आपल्या मनात आणि मेंदूत आपण रुजवले आणि वाढवले आहे. अगदी त्या प्रमाणेच आशावादाची लव्हाळे कितीही अपयश व संकटांचा महापूर आला तरी टिकून राहतात, म्हणून तर मानवी जीवन भूतलावर टिकून आहे.

आशावाद हा आपोआप तयार होत नाही तर तो अत्यंत कष्टसाध्य रीतीने आणि अनेक पद्धतीने रुजवावा लागतो आणि वाढवावा लागतो. म्हणजेच सकारात्मक विचारांची पेरणी केली की त्यातून आशावाद उगवतो हे लक्षात घ्यावे. जेथे आशावाद संपतो तेथे जीवन संपते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . ज्या जीवनाला आशावाद नसतो आणि ध्येय नसते ते जीवन वावटळ मध्ये भरकटलेल्या कागदाच्या तुकड्या सारखे असते.जेथे आशावाद नाही तेथे पाणी नसलेल्या कोरड्या विहीरीसारखी स्थिति आपली असते. हाच आशावाद आपल्या आयुष्यातून संपवणे म्हणजे कोरड्या विहिरीत जीव देण्यासारखे आहे. म्हणूनच आपल्या जीवनाचा कागद आपण स्वतः लिहायचा की वावटळ मध्ये भरकटू द्यायचा याचे गूढ आपल्या दुर्दम्य अशा आशावादात लपलेले असते .

मात्र असा आशावाद म्हणजे जादूची कांडी नाही की जी लगेच फिरवली ही आपल्याला हवा तो बदल दिसेल. आशावाद हा विचारांच्या बैठकीतून आणि सखोल अशा चिंतंनातून तयार होतो. आशावादाला आपला अनुभव हाच नेहमी मार्गदर्शन करत असतो . आशावाद हा जीवनाच्या वाटेवर वाटाड्या सारखे काम करतो आणि आयुष्यरूपी वाट चुकलेल्याना रस्ता दाखवतो.आपण जेंव्हा निराशेच्या व अपयशाच्या गर्द व किर्र अंधारात भटकतो तेंव्हा या आशावादाचा एक किरण आपल्याला मार्गस्थ करतो.

आशावाद आणि सकारात्मकता या परस्पर पूरक असतात. आपण सकारात्मक झालो की आशावादी होतो आणि आशावादी असलो की सकारात्मकता आपोआप येते . आशावादी राहणेसाठी आपण नेहमी कार्यतत्पर आणि कामतत्पर असायला हवे . जे लोक स्वत:ला आपल्या आवडत्या व उत्पादक कामात झोकून देतात त्यांच्या मध्ये कमालीचा आशावाद आपल्याला दिसून येतो, तो यामुळेच.

आशावाद हा स्वतः मध्ये आणण्यासाठी आपल्या क्षमता व कौशल्ये वृद्धिंगत करावी लागतात अथवा वाढवावी लागतात. तुमच्या क्षमता जेवढ्या अधिक आणि तुमची कौशल्ये जेवढे अधिक तेवढे तुम्ही आशावादी राहता . आजचा दिवस माझा नसला तरी उद्याचा दिवस माझा असेल ही विचारसरणी खूप काही शिकवून जाते. हे मला आज नाही मिळाले परंतु मी कष्ट व प्रयत्न करून ते मिळवेलच हा विचारच नुसता अर्धी मोहीम फत्ते करतो.

अपयश या शब्दातच यश दडलेले असते,फक्त अशावादाच्या विचार आणि कृतीने हे यश खेचून आणावे लागते . शेवटी आशावादाचा दिवा कायम तेवत ठेवूया तोच तुम्हाला यशरूपी प्रकाश दाखवेल आणि आपले आयुष्य सोपे, सुटसुटीत आणि सुखी होईल .

जीवन अनमोल आहे !ते अधिक सुंदर बनवूया !!

००८/१०१ दिनांक २९.०३.२०२१
राजीव नंदकर©उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७.