अग्नि देवो भव !

अग्नि देवो भव !

सकाळी जाग आली, तेव्हा मी पांघरूण शोधत-शोधत उठलो. शोधून पाहिलं तर पांघरूण अंगाखाली गेलं होतं. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असं हे होतं. रातभर थंडीने कहर केला होता. संपूर्ण रात्र मी कुडकुडत काढल्याची मला जाणीव झाली. तसही झोपेचं खोबरं झालं होतंच. सर्दी आणि बंद नाक हे काही माझ्यासाठी नवीन नव्हतं, पण आज दोन्ही नाकपुड्यांनी आपलं काम संपूर्ण बंद केलं होतं. त्यामुळे नाकाचं काम तोंडाने केलं जात होतं. मला उठावं वाटत नव्हतं, पण दुसरा पर्याय नव्हता. डोळे चोळत उठून ओसरीवरून मी आतल्या खोलीत गेलो. पाहिलं तर चूलीतील अग्नी प्रज्वलित झाला होता. आज्जी आजोबांशी बोलता-बोलता भाकरी थापत होती. आज्जी व आईकडे तशी कामातून उसंत नव्हतीच; त्यामुळे जो काही वार्तालाप होई, तो काम करत-करतच होत असे.

आज नक्की दिवस कोठून उगवला असेल, या नजरेने त्या दोघांनी माझ्याकडे पाहिलं. मीही कोडग्यासारखा आजोबांना खेटून चुलीसमोर जाऊन बसलो. “राजू आज लवकर उठला?” असं आज्जीने प्रश्नार्थक विचारलं, तसं आजोबांनी माझ्या अंगाला हात लावून मला ताप वगैरे काही नाही ना, याची चाचपणी करून घेतली. आज्जी व आजोबांसाठी मी त्यांचा जीव की प्राण होतो. त्यामुळे त्यांचा विशेष असा जीव माझ्यावर होता. मी काय करतोय, कोठे आहे, मी जेवलो का, मी झोपलो का―या सर्व दैनंदिन बाबींवर त्यांचं कायम बारीक लक्ष असे.

चूल पेटवून साधारण एक तास झाला असेल, त्यामुळे तिच्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. चुलीतून निघणारे धुराचे लोट कमी झाले होते. लालभडक झालेला लाकडाचा कोळसा आणि मंदपणे धूर सोडणारी राख चुलीच्या पुढ्यात पसरली होती. जेवढा जास्त अग्नी, तेवढ्याच जास्त गतीने आज्जी भाकरी तयार करत होती. भाकरी तयार करण्यात तिची एक लयबद्धता व क्रमबद्धता होती. एकाच वेळी तीन भाकऱ्यांवर काम चालू होते : एक परातीत, एक तव्यावर आणि एक लालभडक झालेल्या चुलीच्या कोळश्यावर. बटाट्याची पातळ भाजीासाठी चुलीत दोन कांदे अगोदरच टाकले होते. ते जळून-जळून काळेकुट्ट झाले होते. चुलीवर दुसऱ्या बाजूला भात शिजून झाला होता आणि अंघोळीचं पाणी बराच वेळ तापत होतं.

मागील महिन्यात भात काढून झाल्याने शेतात हरभरा व वाटाणा पेरायला आज आजोबांना सुरुवात करायची होती. आज्जीने मागच्या वर्षीच हरभरा व वाटाण्याचं काही बी उन्हात वाळवून व राख लावून साठवून ठेवलं होतं. तसं पाहिलं तर दिवसभराचं आणि संपूर्ण आयुष्याचं नियोजन आणि संकल्प, हे चुलीतील अग्नीसमोरच आज्जी व आजोबांनी सोडले होते. साहजिकच अग्नीसमोर सोडलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी त्या दोघांना पंचमहाभूतं मदतच करत होती. अग्नी ही इष्टदेवता असल्याने आणि तिला भजल्याने सर्वच कामं पूर्ण होत असावीत, याचं जरी त्यांना ज्ञान नसलं तरी अनाहूतपणे ते घडत होतं. घरातील सर्व नात्यांना जोडून ठेवण्याचं काम चुलीतील ही अग्नी करत होती.

पाठमोरी बाजू थोडी थंड झाली म्हणून मी पाठ चुलीकडे करून तिला शेक दिला, त्यामुळे अजून बरं वाटलं. मधेच चुलीत काही तरी तडकल्याचा आवाज होऊन काही ठिणग्या माझ्या अंगावर आल्या, तसा मी दोन फूट मागे सरकलो. “कोणी तरी राजूची आज आठवण केली,” असं आज्जीने मला सांगितलं. मी बराच डोक्याला ताण दिला. कदाचित अशोकने किंवा मुरलीने आज राजू थंडीतील शेकोटीला त्याची सासू म्हणजे जळण घेऊन आला नाही म्हणून आठवण काढली असेल अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतली.

एव्हाना भाकरी थापत-थापत आज्जीने सकाळी उकळून-उकळून काळाकुट्ट झालेला चहा चुलीसमोर विस्तवावर ठेवला. त्यात थोडं दूध टाकून उकळून मला दिला. चहाचा रंग आता बदलला होता. चहा कमी आणि साखर टाकून गरम केलेलं दूध जास्त अशी त्याची चव लागली. मीही आधीच उशीर झाल्याने त्या चवीकडे विशेष लक्ष दिलं नाही. “राजू, दोन लाकडं आणि गोवरी घेऊन ये,” असं आज्जीने मला फर्मान सोडलं. मी शक्यतो गोवरी व लाकडं आणायला जायचं टाळत असे. बऱ्याच वेळा गोवरी व लाकडं यांचा आधार घेऊन विंचू घरात प्रवेश करत असे. त्यामुळे ती भीती माझ्या मनात घट्ट घर करून बसली होती. मागच्या आठवड्यात नंदू मामाला विंचू डसल्यावर तो कसा “आई गं ! बाबा गं !” असं ओरडून विहळत होता, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. “थोडं पाहून आण,” असंही आज्जीने भाकरीला आकार देता-देता मला अप्रत्यक्षपणे विंचवाची जाणीव करून दिली. मीही पाय आफटत-आफटत नाराजीचा सूर दाखवत लाकडाचा फाटा व दोन गोवऱ्या घेऊन येऊन मुद्दाम उभं राहूनच खाली टाकल्या. मला हे काम आवडलं नाही हे आज्जीच्या एव्हाना लक्षात आलं होतं. तिने लगेच विषय बदलून माझा राग कमी करण्याचा प्रयत्न केला.

अजून दोन लाकडं आणि अर्धी गोवरी चुलीत लावल्यामुळे ती अजून जोमाने पेटली होती. मीही चूल आणि माझ्यातलं अंतर एक फुटाने वाढवलं. आजोबा नुकतेच सुतारकाकांकडे नांगराचा फाळ दुरुस्त करण्यासाठी गेले होते. आई गोठ्यातील शेण भरून झाल्याने घर झाडत होती. मी आपला चुलीपासून दूर होण्याचं नाव घेत नव्हतो. चुलीसमोर बसून मी अधिक उबदार झालो होतो. आज सकाळी-सकाळी आजोबा व आज्जींसोबत भरपूर गप्पा मारून झाल्याने मी सुखावलो होतो. चुलीवर पाणी गरम झालं आणि आता माझ्याच अंघोळीचा नंबर होता. त्यामुळे अंघोळ आता टाळता येणारी बाब राहिली नव्हती, हे माझ्या लक्षात आलं होतं. आईने लगबगीने पुढे येऊन पाणी काढून दिलं आणि मीही नाराजीने दारातील दगडावर अंघोळ करण्यासाठी रवाना झालो.

एकंदर चूल आणि चुलीतून प्रज्वलित होणारा अग्नी हा ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. अग्नी प्रज्वलित झाल्याने तो काही फक्त अंधार दूर करत नव्हता, तर मनातील स्वार्थीपणा व अहंकाराची जळमटं तो काढून टाकत होता. परस्पर स्नेहभाव आणि सहकार्य वाढविण्यात या अग्नीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अग्नी हा तिच्या सान्निध्यात आलेल्या माणसांना जोडत होता आणि त्यांना जगण्याची उर्मी व ऊर्जा देत होता. चूल आणि तिच्यातून प्रज्वलित होणारा अग्नी यानेही माझ्या आयुष्यात परस्पर स्नेहाची व प्रेमाची ऊब पेरली होती आणि म्हणून आजपर्यंतचा प्रवास सुकर व सुखकर झाला.

राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी

०८१ /३६५ दिनांक ३०.११.२०२५

छोट्या गोष्टी मोठे धडे ©

९९७०२४६४१७