मधमाशी आणि मधनिर्मिती : एक कुतूहल

मधमाशी आणि मधनिर्मिती : एक कुतूहल

https://www.facebook.com/share/1DeGoFY5xV

अनादी काळापासून मानवाने आपल्या तीक्ष्ण बुद्धीच्या आणि अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर अनेक प्राणी, पक्षी आणि कीटक यांना आपल्या अधिपत्याखाली प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आणले आहे. ह्या सर्व प्राणिमात्रांच्या मदतीने त्याने आपला जीवनप्रवास वेळोवेळी सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्राणी, पक्षी आणि कीटक यामध्ये माणसाप्रमाणे समाजशील असणाऱ्या मधमाश्यांचा उल्लेख आवर्जून करता येईल. मधमाशा व त्यांचे ठायी असलेली समाजशीलता हा मानवाच्या दृष्टीने कायम कुतूहलाचा आणि प्रेरणेचा विषय राहिला आहे. राणी मधमाशी, कामकरी मधमाशी, सैनिक मधमाशी आणि त्यांच्यात असणारी कामाची विभागणी आणि समन्वय व्यवस्थापन शास्रला लाजवेल असा आहे.मधमाशा या मध कसे तयार करतात हा प्रत्येकासाठी जिज्ञासेचा विषय आहे. मधमाशाच्या अनेक गोष्टी ह्या अचंबित करणाऱ्या आणि वस्तुपाठ शिकवणार्‍या आहेत. त्या एकत्र कशा राहतात. मध का व कशा गोळा करतात. रानी माशी कशी असते. मधमाशा मार्ग कसा शोधतात. त्या काय खातात. किती दिवस जगतात.पिल्ले किती काढतात. अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आपण शोधणार आहोत.प्रस्तुत प्रकरणात मधमाशा आणि त्यांची जीवनपद्धती यावर विस्तृत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

विज्ञानाची किटकशास्र ही शाखा कीटकांचा अभ्यास करते. सृष्टीत जवळपास ५० लाख कीटकांच्या प्रजाती असून त्यापैकी १० लाख प्रजाती यांचा आजपर्यंत शोध लागला आहे. सर्व सजीव प्राणी येतात त्या किंगडमला अनेमेलीया असे म्हणतात. हा किंगडम मध्ये फायलम आर्थ्रोपोडा येते. या फायलम आर्थ्रोपोडा मध्ये क्लास इन्सेक्टा येतो. क्लास इन्सेक्टा मधील ऑर्डर डिप्टेरा म्हणजे मधमाशा येतात. एकूण १० लाख ज्ञात कीटकांच्या प्रजाती पैकी इन्सेक्टा ऑर्डर मध्ये १.५० लाख कीटकांच्या प्रजाती येतात. घरमाशी, गांधीनमाशी, डास, फळमाशी, सिकाडा हे कीटक डिप्टेरा ऑर्डर मध्ये येतात. डीपटेरा वर्गातील कीटक हे पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे परागीभवनासाठी ते मदत करतात.

मधमाशी हा कीटक समाजशील असा कीटक आहे. समाजशील म्हणजे तो कॉलनी मध्ये राहतो तसेच त्यांच्यामध्ये आपापसात कामाची विभागणी झालेली असते. मधमाशा ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांचे ते एक घर तयार करतात. त्या घराला आपण मधमाशीचे पोळे असे म्हणतो. असे पोळे शक्यतो उंचावर आणि अवघड ठिकाणी तयार केले जाते. या घरात तीन प्रकारच्या मधमाशा आढळून येतात. राणी मधमाशी, कामकरी मधमाशी आणि पुरुष मधमाशी अशी साधारण वर्गवारी असते. सरासरी एक राणी माशी, १०० ते ३०० पुरुष मधमाशी आणि १०,००० ते १,००,००० कामकरी मधमाशा एका पोळ्यात किंवा घरात असतात. राणी मधमाशी सरासरी २ ते ३ वर्ष जागते तर कामकरी मधमाशी पूर्ण वाढ झाल्यावर साधारण ३५-४९ दिवस तर पुरुष मधमाशी साधारण ३० दिवस जगते. राणी मधमाशीने अंडी दिल्यावर ती पुढील तीन दिवस आहे त्या अवस्थेत राहतात. एक राणी मधमाशी ही रोज २ ते ३ हजार अंडी देते. विशेष म्हणजे पुरुष मधमाशीने राणी मधमाशी सोबत मिलन केल्यानंतर त्याचा मृत्यू होतो. कारण मिलन करतांनी त्याचे पोट फाटते. अंड्यातून मधमाशी आळी बाहेर येते ती ७ दिवस तिचा जीवनक्रम पूर्ण करते. त्या नंतर ती कोशात जाते तेथे जवळपास १० दिवस राहते. त्या नंतर पूर्ण वाढ झालेली मधमाशी २१ दिवसात तयार होते. त्यानंतर ती जवळपास ३५ ते ४९ दिवस जगते. राणी माशी मात्र २ ते ३ वर्ष जगते.

मधमाशा यांचे प्रमुख अन्न हे फुलांमधील परागकण व नेकटर किंवा मकरंद हे आहे. परागकण हे फुलांचे फलन होऊन फळ निर्मिती करण्याचे काम करतात. नेकटर किंवा मकरंद हा फुलांमध्ये श्रवणारा एक पाण्यासारखा चिकट व गोड पदार्थ असून तो मधमाशा यांना फुलांकडे आकर्षित करण्यास मदत करतो. ज्यावेळेस मधमाशा फुलांकडे येतात त्यावेळी त्या हा मकरंद त्यांच्या विशिष्ट आशा सोंड असलेल्या तोंडामार्फत शोषतात व अन्ननलिकेच्या खालच्या बाजूस व पोटाच्या वरच्या बाजूस असलेल्या विशिष्ट अशा पिशवीत साठवतात. या पिशवीत साधारण ४० मिलिग्राम मकरंद साठवता येतो. एवढा मकरंद गोळा करण्यासाठी मधमाशीला शेकडो फुलांना भेट दयावी लागते तर हजारो उड्डाणे करावी लागतात. एकीकडे मकरंद जमा करत असताना मधमाशी ही आपल्या पायाने परागकण गोळा करून त्याचे गोळे पायात तयार करत असते. विशेष म्हणजे ही दोन्ही कामे एकाच वेळी न थकता चालू असतात.

मधमाशा यांचे घर म्हणजे मेणाचे षटकोनी कप्पे असलेले पोळे असते. हे षटकोनी कप्पे मधमाशीच्या पोटाच्या मागील बाजूस ज्या आठ ग्रंथी असतात त्यातून मेण बाहेर काढून कामकरी मधमाशा तयार करतात. मेनापासून बनलेली षटकोनी घरे ही अंडी घालण्यासाठी, अळीच्या वाढीसाठी आणि कोषासाठी उपयोगी ठरतात. हे षटकोनी कप्पे परागकण, मकरंद व मध साठवून ठेवण्यासाठी वापरले जातात. एक संशोधन असे सांगते की एक किलो मेणाचे पोळे हे २५ किलो मध साठवू शकते.

परागकण व मकरंद घेऊन मधमाशी तिच्या मुख्य पोळ्याकडे आली की ती पोळ्याच्या षटकोनी कप्यात पायात गोळा करून आणलेले परागकण भरून ठेवते आणि त्यात थोडा मकरंद सुद्धा मिसळते. तोंडाच्या जवळ असलेल्या मकरंद पिशवीत मकरंद साठवून आणला जातो तो दुसऱ्या मधमाशीला दिला जातो आणि पोळ्याच्या षटकोनी कप्यात टाकला जातो. ज्यावेळी मकरंद आणला जातो त्यावेळी तो मधमाशीच्या पोटाच्या विशिष्ट पिशवीत असतो त्या ठिकाणी त्या पिशवीत त्या मकरंद मध्ये एंझाईम किंवा विकर मिसळून कॉम्प्लेक्स शुगर ही साधी शुगर मध्ये रूपांतरित होते.फुलातून वाहून आणलेल्या मकरंद मध्ये ७० टक्के पाणी असते. मधमाशा पोळ्यातील फक्त पोळे तयार करणाऱ्या आणि मधाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कामकरी मधमाशा ह्या त्या वाहून आणलेल्या मकरंद वर काम सुरू करतात. त्या आपल्या शरीरातून तापमान निर्माण करून मकरंद मधील पाण्याची वाफ करून ते अधिक घट्ट करण्याचे काम करतात. साधारण मधमाशा पोळ्याचे तापमान ३५ अंश डिग्री ठेवतात. जर तापमान जास्त झाले तर याच मधमाशा आपल्या पंखाने हवा पोळ्याला घालून ते ३५ अंश डिग्री तापमानावर कायम ठेवतात. एकदा मकरंदवर प्रक्रिया करुन मध तयार झाले की षटकोनी कप्पा मधमाशा मेन लावून बंद करतात. अशा प्रकारे मधात १७ टक्के पेक्षा कमी पाणी राहिले की ते कितीही काळ आहे तसे राहू शकते. अशा प्रकारे मधमाशा पोळ्यात विविध षटकोनी कप्पे असतात. काही कप्यात मध असते तर इतर कप्यात प्रक्रिया झालेले परागकण असतात. मध हे कर्बोदके म्हणून ऊर्जेसाठी तर परागकण हे प्रथिने म्हणून शक्तीसाठी मधमाशा वापरत आपला जीवनक्रम सुसह्य करतात.

एका मधमाशी पोळ्यामध्ये एकच राणी मधमाशी असते. ती साधारण २ ते ३ वर्ष जगते. कामकरी मधमाशा या राणी मधमाशीला सातत्याने रॉयल जेली खाऊ घालतात. ज्या वेळी इतर कॉलनी तयार करणे आवश्यक असते त्यावेळी कामकरी मधमाशा ह्या अंड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या मधमाशी अळ्याना तीन दिवसापेक्षा अधिक काळ रॉयल जेली खाऊ घालतात. रॉयल जेली ही कामकरी मधमाशीच्या तोंडाच्या आतमध्ये असलेल्या एका विशिष्ट अशा ग्रंथीपासून तयार होते. जेंव्हा अंड्यातून मधमाशी अळी बाहेर येते तेंव्हा सर्वच अळ्याना पाहिले तीन दिवस हे रॉयल जेली खाऊ घातली जाते. मात्र ज्या मधमाशी अळीला पुढे जाऊन राणी मधमाशी होणे आहे तिला मात्र सातत्याने रॉयल जेली खाऊ घातली जाते. आपली लाळ असते अगदी तशीच ही रॉयल जेली असून ती थोडी पिवळसर असते. अशा प्रकारे कामकरी मधमाशा नवीन कॉलनीसाठी नवीन राणी मधमाशी तयार करून देत असतात. मधमाशी पोळ्यात अगदी काही पुरुष मधमाशी असतात त्या राणी माशी सोबत मिलन केल्यानंतर लगेच मरून जातात.

राणी मधमाशी ही त्या समूहाची राणी व माता या दोन्ही भूमिकेत असते. विशिष्ट प्रकारचे फेरोमोन म्हणजे रासायनिक स्राव सोडून ती कॉलनी मधील मधमाशा यांना नियंत्रित करते. तसेच जेंव्हा राणी मधमाशी अंडी देते त्या वेळेस ती किती कामकरी मधमाशी व किती पुरुष मधमाशा तयार होणार याची संख्या निर्धारित करते. तसेच कामकरी मधमाशा यांना विशिष्ट असे फेरोमोन स्राव सोडून त्यांना अंडी देण्यासाठी असमर्थ बनवते. मधमाशा ह्या मकरंद आणि परागकण मिळविण्यासाठी काही किलोमीटर प्रवास करतात. हा प्रवास करत असतांना त्या किती अंतर उडत आल्या आणि कोणत्या दिशेला उडत आल्या याचा नकाशा त्या त्यांच्या मेंदू मध्ये साठवतात. यासाठी महत्वाची ठिकाणे आणि सूर्याची दिशा त्या लक्षात ठेवतात असे संशोधन सांगते. तसेच एक विशिष्ट प्रकारचा डान्स करून त्या आपल्या सहकारी यांची दिशा निर्धारित करण्यास मदत करतात

एकंदर मधमाशा ह्या मध व मेण आणि इतर पदार्थ तयार करून मानवी जीवन सुसह्य करण्यात मदत करतात. अनादि काळापासून मानव मधमाशा आणि मध याबाबत परिचित आहे. याबाबत आठ हजार वर्षांपूर्वीचा पुरावा मिळतो. तसेच सृष्टीतिल अनेक वनस्पती मध्ये मधमाशा परागीभवण घडवून आणून सृष्टीच्या निर्मिती मधेही सहभाग दर्शवतात. मधमाशा आणि त्यांचा अचंबित करणारा जीवनक्रम यात एक शिस्तबद्धता दिसून येते. मधमाशा यांच्या मधील कामाची योग्य वाटणी आणि कामासाठी केले जाणारे समर्पण मानवी जीवनाला निश्चितच दिशा दर्शक ठरते. एकंदर समाजशीलता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे उचलावी लागते याबाबत मधमाशा ह्या मानवासाठी एक वस्तूपाठ घालून देतात.

राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी

कीटकांची आश्चर्यकारक दुनिया©

६९/ ३६५ दिनांक २३.०६.२०२५

९९७०२४६४१७