तिला समजून घेवूया (Let’s Understand Her)
तिला समजून घेवूया (Let’s Understand Her)
ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंखले! अशी एकंदर सर्व समावेशकता जिच्या मध्ये आहे आणि संपूर्ण जग जिच्या शक्तीवर चालते अशी सर्व शक्तिमान शक्तीचे रूप म्हणजे स्त्री होय. मात्र या स्त्री मधील स्त्रीत्वाला समजून आणि उमजून घेणे तेवढेच आवश्यक व काळाची गरज आहे.
आई, पत्नी, मुलगी,मैत्रीण, प्रेयसी आशा अनेक रुपात ती आपल्याला आयुष्यरूपी रस्त्याच्या विविध वळणांवर भेटते,आपल्याला साथ देते आणि आपले आयुष्य अर्थपूर्ण व परिपूर्ण बनवते. सृष्टी आणि विश्व याच्या अफाट पसाऱ्यात मानवी जीवन हे बिंदुरुप आणि पाण्याच्या थेंबासारखे असते. ते जेवढे विलक्षण आणि तेवढेच क्षणभंगुर असते. मात्र या आयुष्यरुपी प्रवासात आपल्याला साथ मिळत राहते ती या स्त्रीचीच.
आपण तिला जेवढे खोलवर समजून घेऊ तेवढी ती अधिक उर्जारूप व शक्तीरुप होते आणि आपले जीवन व्यापून टाकते. ही स्त्री जेंव्हा आईच्या रुपात असते तेंव्हा ती आपले भरण व पोषण करते. आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती अहोरात्र झटते.आपल्या सुख व दुःखात आपल्या सोबत राहते. ती जेंव्हा बहिणीच्या रुपात असते तेंव्हा ती आपल्याला समजून घेते .जेंव्हा ती प्रेयसीच्या रुपात येते त्यावेळी ती आपल्या अल्लड व अवखळ अश्या वागण्याला नियंत्रित करते.ती जेंव्हा आपल्या पत्नीच्या रुपात येते तेंव्हा ती आपले आयुष्य परिपुर्ण बनवते. ती आपल्याला प्रोत्साहन व आधार देऊन आपल्या यशाचा मार्ग सुकर करण्यास मदत करते.जेंव्हा ती मुलीच्या रुपात येते तेंव्हा ती आपल्या पित्याला अजून प्रेमळ व काळजीवाहू बनवते.
ज्या वेळेस यश व अपयश याचा लपंडाव सुरू असतो आणि तुम्हाला ज्या वेळेस या सृष्टीच्या पसाऱ्यात पाय घट्ट रोवून उभे राहायचे असते तेंव्हा हीच स्त्री तुमच्या बरोबरीने व खांद्याला खांदा लावून उभी राहते. अश्या प्रकारे स्त्री ही अनेक बहुआयामी रुपात आपल्या अवती भवती वावरत असते. आपण तिला समजून घेण्यात चुकलो तर कदाचित आयुष्यही निष्ठुर व निरस होते.
तिला समजून घेण्यासाठी तिच्या इच्छा व आकांक्षा आणि तिचे असणे व नसणे या पातळीवर जाऊन आपल्याला तिला समजून घ्यावे लागते. जशी ती शक्ती असते तशी ती उर्जारूप ही असते . ही ऊर्जा व शक्ती ही परस्पर पूरक असते आणि ही ऊर्जा पूर्ण आसमंत व्यापते. अनेक नात्यांना साज देण्याचे व त्याला सर्व समावेशकता व परिपूर्णता देण्याचे कार्य ही स्त्री अनंत काळापासून करत आली आहे.
तिला समजून घ्या ; तिचा आदर आणि सन्मान करा !!
००७/१०१ दिनांक २७.०३.२०२१
राजीव नंदकर©उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७.