कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल ,विभूती, अष्टगंध आणि चंदन
https://www.facebook.com/share/p/1C7BdkEPJ3
संस्कृती व सभ्यता हे मानवी जीवनाचे अभिन्न अंग आहेत. संस्कृती म्हणजे जगण्याची पद्धती किंवा जीवनशैली होय की जी वैयक्तिक, सामाजिक आणि संस्थात्मकही असू शकते.संस्कृती ही कायम बदलत असलेल्या समाजाला स्थिरता प्रदान करते. संस्कृतीमध्ये चाली, रूढी, परंपरा, नीती व मूल्ये यांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वहन होते.
सभ्यता म्हणजे एक जटिल आणि विकसित सामाजिक संरचना होय. सभ्यतेमध्ये संस्कृतीचे सांस्कृतीकरण झालेले आढळून येते. संस्कृती ही कायम बदलणारी असते आणि काळानुरूप ती स्वतः मध्ये बदल करून घेते.या उलट सभ्यता ही स्थिर आणि कालातीत असते.
चाली, रीती, रिवाज ,रूढी ,परंपरा नीती आणि मूल्ये ही समाजाला एकजीव व एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करतात.संस्कृती मधून येणार समान आचरण आणि सभ्यते मधून येणारी समान जीवनपद्धती ही समाजाची वीण घट्ट बांधून ठेवते. त्यामुळे मानवी जीवनात त्याज्य असे काहीच नसते.जे काही आहे त्यामागे काही तरी तत्व असते आणि हे तत्व समाजाला पुढे घेऊन जाण्यास मदत करते.
भारतीय संस्कृती आणि सभ्यता यामध्ये कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन याला अनन्यसाधारण पारंपरिक महत्व आहे. वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर या सर्व पावडर किंवा संमिश्रे आहेत. मात्र अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर या पवित्र गोष्टी आहेत. प्रस्तुत प्रकरणात कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल , विभूती,अष्टगंध आणि चंदन या बाबत विस्तृत आणि सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
कुंकवाचा करंडा आणि हळदी कुंकू समारंभ हे दोन शब्द तुमच्या कानी अनेक वेळा पडले असतील. कुंकू हे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीयांसाठी अत्यंत पवित्र अशी बाब आहे. लग्न झालेल्या स्त्रीच्या दृष्टीने कुंकू हे तिच्या सौभ्याग्च प्रतीक आहे. कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावण्याची जुनी प्रथा आहे. काळानुरूप कपाळावरील कुंकवाचा आकार कमी कमी होत गेला. आताच्या स्रिया ह्या कुंकवाच्या बदल्यात टिकली लावतात. उत्तर भारतीय स्रिया ह्या कुंकवाने त्यांची मांग भरतात. पुरुषांमध्ये जेंव्हा कुंकू लावले जाते तेंव्हा त्यात थोडं पाणी मिसळून ते लावले जाते त्याला गंध किंवा टिळा म्हटले जाते. भारतीय स्रिया जेंव्हा एकमेकींचा निरोप घेतात त्यावेळी एकमेकीला हळदी कुंकू लावतात.सध्याच्या युगात हळदी कुंकवाचे कार्यकम आयोजित केली जाण्याची प्रथा लोकप्रिय आहे. नैसर्गिक कुंकू हे हळद, बेकिंग सोडा, लिंबू आणि गुलाबजल वापरून केले जाते.रासायनिक कुंकू हे रेड लीड ऑक्साइड वापरून तयार केले जाते.रासायनिक कुंकवाचे अनेक दुष्परिणामही होतात.
हळद ही आरोग्यदायी आणि गुणकारी असून तिचा वापर वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. असे असले तरी अध्यात्मिक दृष्टीने हळद ही सूर्याचे व समृद्धीचे प्रतिक आहे. लग्नाच्यापूर्वी वर व वधू यांना हळद लावली जाते. यातून त्यांनी भावी आयुष्यात समृद्धी साधावी असा संदेश दिला जातो. हळद अंगावर असेल तर जीवजंतू यांच्या संसर्ग पासून संरक्षण होते. हळद ही एकाग्रता वाढवते. खंडोबाच्या जेजुरीला हळद उधळली जाते व ती एक जुनी प्रथा आहे.
बुक्का हा काळा रंगाचा असतो. वारकरी संप्रदायमध्ये बुक्याला मानाचे स्थान आहे. वैष्णव पंथात बुक्का अग्रस्थानी आहे. तुळस व बुक्का याला वारकरी पंथात महत्वाचे स्थान आहे. देवाप्रती आदर व भक्ती प्रकट करण्यासाठी बुक्का कपाळाला लावतात. सत्यनारायण पूजेतही बुक्का असतो.भजन व कीर्तन यातही बुक्का लावला जातो.नैसर्गिक बुक्का हा तुळशीच्या काड्या किंवा चंदन व कापूर याच्या एकत्र मिश्रण करून जाळून बनवतात. रासायनिक बुक्का हा आर्यन ऑक्साईड पासून तयार केला जातो.बुक्याला अबीर बुक्का असेही म्हणतात. आज्ञ चक्र जेथे असते त्या कपाळाच्या मधोमध बुक्का लावून भावनिक स्थिरत्व साधले जाते. तसेच बुक्यातून वैराग्य प्रकट केले जाते. बुक्का लावल्याने मोह व माया यापासून माणूस मुक्त होतो.
गुलाल हा उत्सवात वापरण्याची प्रथा आहे. विविध समारंभात गुलाल उधळला जातो. गुलाल हे आनंद आणि प्रेम याचेही प्रतीक आहे. होळी सणात गुलाल वापरला जातो. मुख्यते राजकीय कार्यक्रमात गुलाल उधळला जातो. रासायनिक गुलाल हा मर्कुरी सल्फेट पासून बनवतात. रासायनिक गुलाल मुळे त्वचा रोग, अस्थमा किंवा कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात.त्यामुळे नैसर्गिक गुलाल वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे
शेंदूर हा ग्रामीण भागात दगडाच्या मूर्तींचे मांजन करण्यासाठी वापरली जाते.विशेषतः मारुती, गणपती, म्हसोबा आणि ग्रामीण देव देवता यांच्या मूर्तींना शेंदूर वापरला जातो. शेंदूर हा तेलात ओला करून वापरतात.शेंदूर हा शास्त्रीय दृष्ट्या लाल रेड ऑक्साईड आहे.सेंदूर आणि सिंदूर यात फरक आहे हे लक्षात ठेवावे.
विभूती ही सफेद असून अनेक पंथामध्ये ती कपाळाला व अंगाला लावली जाते.विभूती हे एक भस्म म्हणून त्यावर बोटे घासून ती अंगाला लावतात.विभूती ही कपाळ, मान व छाती या ठिकाणी लावण्याचा प्रघात आहे. शिव पंथात विभूती लावली जाते. विशेषतः लिंगायत पंथामध्ये या विभूतीचा वापर धार्मिक कार्यक्रम व पूजा यामध्ये केला जातो. विभूती लावली तर सकारात्मक भाव निर्माण होतो तसेच मानसिक शांतता प्राप्त होते असे अध्यात्म सांगते. विभूती ही लाकूड व गायीचे शेण यांना जाळून एका विशिष्ट अशा प्रक्रियेने तयार केली जाते.एकंदर विभूती ही गाईचे शेणाला जाळून तयार केलेली राख असून तीला पवित्र स्थान आहे. शास्त्रीय दृष्ट्या विभूति शरीरावर लावली तर ती विविध रोग जंतू पासून शरीराचे संरक्षण करते.
अष्टगंध हा आठ प्रकारची जड़ी किंवा सुगंध मिसळून केला जातो. अष्टगंध मध्ये आठ पदार्थ असतात- चंदन, केशर , कापूर, अगर , जटामांसी , कुमकुम , गोरोचन , कचूर .असे मानले जाते की हे आठ पदार्थ सर्व ग्रहांना शांत करतात. त्याचा वापर करून ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होतात असे अध्यात्म शास्रात मानले जाते. असा हा अष्टगंध टिळा म्हणून कपाळावर लावला जातो.असे मानले जाते की ते अष्टगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो. अष्टगंध मुळे मन शांत व स्थिर होते.
चंदनला अध्यात्मिक दृष्टीने अत्याधिक महत्व आहे.चंदन उगाळून कपाळाला नाम काढतात.चंदनाचा टिळा शुभ कार्यात लावतात. देवाच्या मूर्तीला सुद्धा चंदनाचा लेप लावतात.चंदन लावल्याने थंडावा तयार होतो व तणाव कमी होतो.
अशा प्रकारे कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल,विभूती,अष्टगंध आणि चंदन हे ग्रामीण संस्कृती व अध्यात्म यांचे महत्वाचे अंग आहे.अध्यात्मिक नाही तर शास्त्रीय दृष्टीकोणातूनही ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मानवी जीवन हे काही अंशी शांत, संयमी, स्थिर आणि तणावमुक्त करण्यात कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल ,विभूती,अष्टगंध आणि चंदन हे प्राचीन काळापासून उपयोगी ठरले आहे.
राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी
ग्राम संस्कृती आणि ग्राम जीवन ©
७१/ ३६५ दिनांक २६.०६.२०२५
९९७०२४६४१७